संपदा सोवनी – chaturang@expressindia.com

डॉ. रोहिणी गोडबोले, २०१९ च्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ज्ञात आहेतच, पण नुकताच फ्रान्सच्या सरकारकडून दिला जाणारा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अतिशय मानाचा किताब त्यांना मिळाला आहे. हा गौरव हे त्या गेली ४० र्वष करत असलेल्या संशोधनाचं आणि भौतिकशास्त्रात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत-फ्रान्सच्या संयुक्त संशोधन प्रकल्पाचं फळ आहेच; परंतु अधिकाधिक स्त्रियांनी विज्ञानविषयक संशोधनात यावं आणि त्यांचा प्रगतीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी त्या विविध पातळ्यांवर मांडत असलेल्या विचारांनाही जागतिक स्तरावर मिळालेली ती पावती आहे.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

‘‘विज्ञान संशोधनात स्त्रियांची संख्या कमी का, या प्रश्नावर वारंवार चर्चा होते. त्याची कारणं नवीन नाहीत. फक्त भारतातच नाही, तर एकूणच ‘स्त्रियांची’ म्हणून काही ठरवून दिलेली कामं असतात. स्त्रियांनी ती करायलाच हवीत, या विचारात काळानुरूप फरक पडत असला तरी तो प्रत्यक्षात यायला अजूनही काही काळ जावा लागेल.  विशेषत: विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात व्यक्तीनं ‘पीएच.डी.’ पदवी मिळवल्यानंतरची ५ ते १० र्वष प्रचंड महत्त्वाची असतात. स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याचा हा काळ असतो. सर्वसाधारणपणे त्याच सुमारास तरुणींनी विवाह करून ‘सेटल’ होण्याचं नियोजन झालेलं असतं. काही प्रमाणात त्यासाठी दबावही येत असतो. संततिप्राप्तीसारख्या गोष्टी वेळेत व्हाव्यात, त्यासाठी काळ थांबत नसतो, हे मान्य; पण विज्ञानाचं घडय़ाळही थांबत नसतं. त्यात दिवसागणिक नवीन काही तरी सापडणार असतं, पावलोपावली नवं तंत्रज्ञान येणार असतं. त्यामुळे हा कृतिशील काळ कौटुंबिक कारणात खर्ची पडला, तर संशोधनात स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनेकींच्या मार्गात सुरुवातीलाच प्रदीर्घ थांबा येतो आणि या तरुणींसाठी विज्ञान संशोधनाची वाट आणखीच अवघड होते..’’ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी गोडबोले सांगत असतात; पण त्यांच्या बोलण्यात याप्रश्नी काही करताच येणार नाही, असा नकारात्मक भाव मात्र नसतो. उलट काय केलं तर मुलींना करिअर म्हणून विज्ञान संशोधनाची निवड करणं, त्यातली आव्हानं झेलणं सोपं जाऊ शकेल, याबद्दलच्या कल्पना रोहिणी यांच्या डोक्यात असतात आणि जिथे संधी मिळेल तिथे त्या हे उपाय जाहीरपणे मांडतातही.

डॉ. रोहिणी गोडबोले आपल्याला ‘थिओरेटिकल आणि पार्टिकल फिजिक्स’ क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव म्हणून माहीत आहेत. त्यांना २०१९ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. आता नुकतंच त्यांचं नाव पुन्हा प्रकाशात आलं ते त्यांना मिळालेल्या फ्रान्स सरकारच्या ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ या सन्मानामुळे. विशेष बाब अशी, की हा गौरव होताना संशोधन प्रकल्पातील त्यांच्या योगदानाचं कौतुक करण्यात आलंच, पण स्त्रियांचा विज्ञान संशोधनातील सहभाग वाढावा यासाठी त्यांच्या असलेल्या प्रयत्नांचा त्यात खास उल्लेख आहे. बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधील ‘सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’मध्ये काम करणाऱ्या डॉ. रोहिणी गोडबोले मूळच्या पुण्याच्या. हुजुरपागा शाळेच्या विद्यार्थिनी. अगदी इयत्ता पहिली-दुसरीपासूनच अभ्यासात हुशार म्हणून नावाजल्या गेलेल्या रोहिणी यांनी सातवीत ‘स्टेट मेरिट स्कॉलरशिप’ची परीक्षा देण्याचं ठरवलं. त्या वेळी सामान्य विज्ञान हा विषय त्यांच्या शाळेत इयत्ता आठवीपासून शिकवला जात असे. त्यामुळे विज्ञानासाठी त्यांनी त्यांच्याच एका शिक्षिकेच्या यजमानांकडे (श्री. सोवनी) शिकवणी लावली. शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना विज्ञानात त्यांना गोडी वाटू लागली आणि ती कायम राहिली. त्यांच्या शाळेतून ती शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या. ‘अकरावी- एस.एस.सी’च्या गुणवत्ता यादीत त्या झळकल्या तेव्हा कौतुक समारंभानंतर मुलाखत देताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘‘मला ‘पीएच.डी.’ करायचंय!’’ त्यांना संशोधन तर करायचं होतंच, पण ते विज्ञानातच करायचंय हे माहिती नव्हतं. गणितात किंवा अगदी संस्कृतमध्येही आपण संशोधन करू, असा विश्वास त्यांना वाटत होता. मूलभूत विज्ञानाच्या प्रसाराच्या उद्देशानं घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आणखी एका शिष्यवृत्ती परीक्षेनं त्यांच्या मनात विज्ञानाचं प्रेम पुन्हा प्रबळतेनं निर्माण झालं. पदवी परीक्षेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्यांनी ‘आयआयटी’तून विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यातही त्यांच्या विभागात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी रौप्यपदक मिळवलं.

‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’मधून त्यांनी ‘पीएच.डी.’ संपादन केली. या सगळ्या प्रवासात त्यांच्या विषयाच्या आणि विचारांच्या कक्षा रुंदावत गेल्या.

‘पीएच.डी.’नंतर त्यांनाही आप्तेष्टांकडून ‘आता विवाह करायला हवा’, ‘हिचं लग्न लवकर न केल्यास लहान बहिणीचं लग्न आधी करावं लागेल’, असं सुचवलं जाऊ लागलं; पण त्यांच्या कुटुंबानं त्यांना विज्ञान संशोधनासाठी सतत प्रोत्साहन दिलं. लग्नासाठी त्यांच्यावर कधीही दबाव आणला गेला नाही. घरची मोठी आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळे त्या पूर्णपणे झोकून देऊन आपल्या आवडीचं काम करू शकल्या; पण मुलींना केवळ घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाचाच सामना करावा लागतो असं नाही. रोहिणी सांगतात, ‘‘विज्ञान क्षेत्रात गरजेचं असलेलं ‘पॅशन’, उत्कटतेनं मेहनत घेण्याची आच स्त्रियांमध्ये नसते, असा एक सार्वत्रिक समज असतो. त्याचा प्रत्यय स्त्रियांना कामादरम्यान वारंवार येतो. जेव्हा विद्यार्थी-विद्यार्थिनी पीएच.डी. पूर्ण करतात तेव्हा ती पदवी मिळवलेली असूनही या क्षेत्रात आपण स्वतंत्रपणे उभं राहू शकू का? विज्ञानातील नवे प्रश्न विचारू शकू का? त्यांची उकल करण्याचा मार्ग शोधता येईल का? याबद्दलचा पूर्ण आत्मविश्वास आलेला नसतो. संशोधनात स्वत:ला पारखून पाहाण्याच्या या काळात घरच्या मंडळींकडून पाठिंबा आणि दिशा दाखवणारा गुरू (मेंटॉर) मिळणं फार गरजेचं. मी सुरुवातीपासून माझ्या विषयात मनापासून रस घेऊन काम करत होते, कष्ट करत होते. ते समजून घेऊन मदत करणारे सहकारी आणि मित्रमंडळी मला मिळत राहिली. त्यामुळे मला आलेल्या अडचणी मी यशस्वीपणे पार करू शकले.’’

थिओरेटिकल आणि पार्टिकल फिजिक्समधलं काम कसं चालतं हे जाणून घेतलं तर त्यासाठी किती एकाग्रतेनं प्रयत्न करावे लागत असतील याचा अंदाज येतो. गेली ६०-७० र्वष जागतिक स्तरावर या विषयात लक्षणीय संशोधन झालं. साध्या आणि ढोबळ भाषेत बोलायचं झाल्यास सृष्टीचे मूलभूत घटक (खरं तर मूलभूत कण) कोणते मानावेत हे शोधण्याचा हा शास्त्रीय खटाटोप आहे. ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाच्या बातम्या वाचताना काही वर्षांपूर्वी सामान्य माणसाला या विषयाची काही प्रमाणात ओळख झाली होती. या विषयातले प्रयोग खूप मोठे आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांच्या महाकाय स्वरूपामुळे केवळ एखादीच संस्था हे प्रयोग करू शकत नाही, तर विविध देशांच्या आणि जागतिक स्तरावरील संस्थांच्या परस्पर सहकार्यातून ते केले जातात. भारत आणि फ्रान्सदरम्यान झालेल्या या विषयातील संशोधनातही एक प्रयत्न म्हणून दोन्ही देशांच्या विविध संस्था एकत्र आल्या होत्या, ४०-५० शास्त्रज्ञ त्यात काम करत होते. या संपूर्ण चमूची एकत्र मोट बांधण्याचं काम, म्हणजेच या ‘कोलॅबोरेशन’ प्रकल्पाचं नेतृत्व रोहिणी यांच्याकडे होतं. याशिवाय ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च’ या सल्लागार परिषदेच्या त्या ५ र्वष सदस्य होत्या. त्या दरम्यानही विज्ञान क्षेत्रातील स्त्रिया आणि त्यांचा सहभाग कसा वाढवावा, याबद्दल भारत आणि फ्रान्समध्ये दोन बैठका झाल्या. यात रोहिणी यांना त्यांच्या विषयात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न जवळून समजून घेता आले. भारत सरकारच्या ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसी-२०२०’मध्ये रोहिणी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

स्त्रियांचा या क्षेत्रातील सहभाग वाढविण्याविषयी बोलताना विज्ञान संशोधनाच्या बाबतीत काही वेगळ्या योजना राबवाव्या लागतील, असं रोहिणी सांगतात. सध्या अनेक विज्ञान संस्थांमध्ये संशोधकांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची सोय असते. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थिनींसह ‘पोस्ट डॉक फेलो’ म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांनाही याचा फायदा मिळायला हवा, असं त्यांचं मत आहे. त्या म्हणतात, ‘‘एक काळ असा होता की, केवळ घरी मुलांना कुणी सांभाळू शकत नाही म्हणून अनेक स्त्री संशोधक मूल होऊ देणंच पुढे ढकलत; पण साधी पाळणाघराची सोय आणि आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी तरी आहे, ही जाणीवही आईला दिलासा देणारी असते. पाळणाघर चालवण्याचा खर्च खरं तर फार मोठा नाही. हे सहज होण्याजोगं आणि अनेक ‘पोस्ट डॉक’ विद्यार्थिनींना निश्चिंतपणे संशोधनावर लक्ष के ंद्रित करू देणारं आहे.’’ ‘पीएच.डी.’ पूर्ण केल्यानंतर एखाद्या संस्थेत ‘फॅकल्टी पोझिशन’ मिळवण्यासाठीच्या योजनांना वयाची मर्यादा असते. बहुतेक वेळा घरगुती कारणांमुळे ‘ब्रेक’ घ्यावा लागून या काळात स्त्री संशोधकांच्या अनेक संधी हातच्या जातात. अशा वेळी संशोधकाचं वय गृहीत न धरता, शैक्षणिक वय (अकॅडमिक एज) लक्षात घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. बाळंतपणाच्या रजेनंतर काही विशिष्ट ‘पोस्ट डॉक्टरल फेलोशिप्स’च्या संदर्भात पोस्ट डॉक संशोधकांना आणखी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देता येईल का, असाही विचार व्हायला हवा, असं त्या सांगतात.

संशोधनाबद्दलची धोरणं जशी बदलायला हवीत तशीच विचारांची पद्धतही बदलायला हवी. जास्तीत जास्त स्त्रियांनी या क्षेत्रात का यावं, मुळात हे सगळं का करायची गरज आहे, हे सर्वाच्याच,अगदी स्त्री संशोधकांच्याही लक्षात आणून देणं रोहिणी यांना गरजेचं वाटतं. विज्ञान आणि संशोधक हे नातं दोन्ही बाजूंनी असतं. स्त्रियांचा विज्ञान संशोधनातील सहभाग जसा स्त्रियांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे, तसाच तो विज्ञानाच्या प्रगतीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे, हे व्यापक स्वरूपात पटलं तर अनेक बदल आपोआप घडू शकतील..