News Flash

स्मृती आख्यान : लवचीक मेंदू

शास्त्रज्ञांना खूप मोठी आशा देणारा, मेंदूबाबतच्या ज्ञानाचं महाद्वार खुला करणारा हा शोध आहे.

डॉ. मेरिअन डायमंड

मंगला जोगळेकर

मेंदू केवळ लहानपणीच विकसित होतो आणि मोठं झाल्यावर त्याची क्षमता वाढवता येत नाही, असं आत्तापर्यंत मानलं जात होतं, मात्र  मोठय़ा वयातदेखील मेंदू बदलू शकतो, त्याची कार्यक्षमता वाढू शकते, तो मोठी आव्हानं पेलू शकतो, अगदी नव्वदाव्या वर्षीसुद्धा त्याला नवा बहर येऊ शकतो, असं आधुनिक संशोधन सांगतं. त्यामुळेच मेंदू हा लवचीक ठरला आहे.  मेंदूशास्त्रज्ञ डॉ. जिल बोल्टी टेलर आणि डॉ. मेरिअन डायमंड या दोघींनी यावर खूप काम करून मेंदूची ताकद जगाला दाखवून दिली आहे. ‘मला काय करायचं आहे आता शिकून, माझं वय झालं..,’ असं म्हणणाऱ्यांसाठी मेंदूच्या प्रचंड कार्यक्षमतेची ही ओळख..

लहान बाळाचा मेंदू म्हणजे एक प्रकारे  कोरी करकरीत पाटी असते. एका सुपरमॅनच्या गतीनं बालकाचा मेंदू आपल्याला जे दिसेल ते, जे जाणवेल ते, जे अनुभवाला येईल ते या पाटीवर मुद्रित करतो. ऐकणं, बघणं, वास घेणं, हालचालींवर नियंत्रण ठेवणं, भावनांवर नियंत्रण ठेवणं, विचार करणं, यांसारख्या सर्व क्रिया लहानपणापासून शिकत, शिकत मेंदू घडत जातो.

अगदी आता-आतापर्यंत असं समजलं जात होतं, की बालपणी मेंदू एकदा घडला की, त्यात काही बदल होऊ शकत नाही, त्याची क्षमता वाढवता येत नाही, त्याला अधिक बलवान करता येत नाही; उलट त्याची शक्ती पुढे कमी, कमी होत जाऊन नंतर थंडावत जाते; परंतु मोठय़ा वयातदेखील मेंदू बदलू शकतो, त्याची कार्यक्षमता वाढू शकते, तो मोठी आव्हानं पेलू शकतो, काय वाटेल ते करू शकतो, हे आपल्याला मिळालेलं ज्ञान अलीकडचं आहे. त्यामुळेच मेंदू हा लवचीक आहे. तसंच त्याच्या या गुणधर्मामुळे तो मोठय़ा वयातही बदलू शकतो हे निरीक्षण मेंदूवरील आतापर्यंतच्या संशोधनातील सर्वात महत्त्वाचं निरीक्षण मानण्यात येतं. हा शोध मेंदूबाबतच्या अनेक गैरसमजांना धुळीला मिळवणारा आहे. सर्व जगभर मेंदूच्या अभ्यासांची दिशा त्यातून बदलली आहे. शास्त्रज्ञांना खूप मोठी आशा देणारा, मेंदूबाबतच्या ज्ञानाचं महाद्वार खुला करणारा हा शोध आहे. यावरून या निरीक्षणाची महती तुमच्या लक्षात यावी. मेंदू सामथ्र्यवान करण्यासाठी मेंदूच्या लवचीकतेची माहिती असणं फार महत्त्वाचं असल्यानं आपण स्वतंत्र लेखात ही माहिती घेत आहोत.

मेंदू म्हणजे एक रोपटं आहे अशी कल्पना केली, तर जशा रोपटय़ाला नवीन फांद्या फुटतात, ते तरारतं, वाढतं, फोफावतं, तसाच मेंदूही डवरून त्याचा विस्तार होत असतो. हा विस्तार म्हणजेच मेंदूची लवचीकता. मेंदूच्या लवचीकतेचा आपल्याला प्रत्यय येतो त्याच्या ज्ञान साठवण्याच्या असीमित क्षमतेतून, न थकता आयुष्यभर दिलेल्या जोमदार साथीतून, त्याच्यासमोर आजाराच्या रूपानं प्रतिकूल परिस्थिती उभी असताना त्यातून मार्ग काढण्याच्या प्रवृत्तीतून, एवढंच नाही तर त्याचा काही भाग निकामी झाला असतानासुद्धा त्याला दिलेली कामं तितक्याच समर्थपणे हाताळायच्या त्याच्या ताकदीतून. या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मेंदूमध्ये जे अंतर्गत बदल घडतात. उदा. नवीन पेशींची निर्मिती, नवीन संदेशवहनाचे मार्ग, साठवण करण्यासाठी नवीन जागेची उपलब्धता, कार्यपद्धतीत बदल वगैरे. या सर्वाना मिळून इंग्लिशमध्ये ‘ब्रेन प्लॅस्टिसिटी’ किंवा ‘न्यूरो प्लॅस्टिसिटी’ असं संबोधलं जातं. आपण त्याचा ‘मेंदूची लवचीकता’ असा इथे उल्लेख करत आहोत.

याबद्दल आणखी सांगायचं, तर दर क्षणाक्षणाला प्रत्येकाचा मेंदू काही तरी नवीन बघत असतो, नवीन माहिती गोळा करत असतो, नवीन अनुभव घेत असतो, शिकत असतो; नवीन ज्ञान, नवीन कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. हे ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करण्यासाठी, त्याला मेंदूत स्थान मिळण्यासाठी मेंदूत बदल घडून यावे लागतात. हा सातत्यानं बदल घडून येण्याचा मेंदूचा जो गुणधर्म आहे, हा मेंदूच्या लवचीकतेचा एक पैलू झाला. शाडूच्या मातीची मूर्ती बनवताना जसा पाहिजे तसा आकार देता येतो, तसाच आकार मेंदूला आपल्या प्रयत्नांनी देता येऊ शकतो. हे निरीक्षण क्रांतिकारी मानलं गेलं आहे, कारण वयस्कर मेंदू हा लाकडाचा ठोकळा किंवा थकत जाणारं यंत्र आहे, या शतकानुशतकांच्या कल्पनेला त्यानं बसलेला धक्का. मेंदूच्या उपचारांचे नवीन मार्ग त्यातून गवसतील, ही आशा त्यामुळे दुणावली आहे. वेगवेगळ्या उदाहरणांतून मेंदूच्या लवचीकतेचा गुणधर्म आणि त्याचे दूरगामी पडसाद आपण समजावून घेऊ या.

मेंदूची लवचीकता आणि वातावरण

मेंदूची लवचीकता ही लहान मूल जेव्हा जगाचा अनुभव घ्यायला सुरुवात करतं तेव्हा खरी प्रत्ययास येते. दोन-तीन वर्षांचं मूल तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्दन् शब्द तसाच्या तसा म्हणत असतं. तुम्ही त्याला जे जे शिकवाल, जे ज्ञान द्याल, ते ते आत्मसात करण्याची अपार ताकद त्याच्याकडे असते. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचं त्याचं कुतूहल टिपेचं असतं. त्याचं हे ज्ञानग्रहण अथक चालू असतं आणि त्याला कसल्याही मर्यादा नसतात.

कॅलिफोर्नियातील नावाजलेल्या बर्कली विद्यापीठात डॉ. मेरिअन डायमंड या गेली चाळीस-पन्नास वर्ष आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा मेंदूवर काय परिणाम होतो, यावर संशोधन करत होत्या. जीवनानुभवातून आणि वातावरणातून आपला मेंदू आपण घडवू शकतो, हा त्यांच्या संशोधनाचा गाभा होता. या विषयावरचं त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे पायाभूत स्वरूपाचं मानलं जातं. डॉ. डायमंड यांच्या संशोधनाला जगभर मान्यता मिळाली आहे. त्यांचं बरंचसं संशोधन हे प्राण्यांवर झालेलं असलं तरी ते माणसांच्या बाबतीत तितकंच लागू आहे. मुलांना पहिली दहा वर्ष विचारांना चालना देणारं, मनात कुतूहल निर्माण करणारं, औत्सुक्य निर्माण करणारं वातावरण मिळाल्यास मेंदू फोफावतो, हे त्यांनी सिद्ध केलंच, परंतु अगदी नव्वदाव्या वर्षीसुद्धा मेंदूला नवीन बहर येऊ शकतो, असं त्यांचं संशोधन सांगतं. पोषक, तणावहीन, प्रेमळ वातावरण, जिथे इतरांची साथ आहे, प्रेमाची ऊब आहे, चुकांमधून शिकायची परवानगी आहे, अशा ठिकाणी प्रज्ञावंतांची मूस घडते, असं त्या सांगतात. हेच वातावरण कुठल्याही वयातील मेंदूला नवीन नवीन आव्हानं पेलायची ताकद देतं.

ज्ञानग्रहण आणि अनुभवातून लवचीकतेचा विस्तार

जितक्या प्रकारचं ज्ञान/ कौशल्य तुमच्याकडे असेल, तितके ज्ञानाचे विभाग तुमच्या मेंदूत तयार होतात. जितकं तुमचं एखाद्या बाबतीतलं कौशल्य अधिक तेवढी मेंदूमध्ये त्याच्यासाठी असलेली जागा अधिक. एखाद्या चित्रकाराच्या घरात त्याच्या चित्रकलेच्या सामानानं बरीच जागा व्यापलेली असेल, तद्वत त्याच्या मेंदूमध्येही चित्रकलेसाठी जास्त जागा असेल. लंडनमध्ये तेथील रहदारी आणि रस्त्याच्या रचनेमुळे टॅक्सी चालवणं महाकठीण समजलं जातं. तिथे टॅक्सी चालवणाऱ्या ड्रायव्हर्सच्या मेंदूच्या अभ्यासातून असं दिसलं, की त्यांच्या मेंदूत या विषयासाठी खूप मोठी जागा तैनात केली गेली आहे. एकापेक्षा अधिक भाषा येत असणाऱ्यांच्या मेंदूमध्येही भाषेचा विभाग जास्त विस्तृत असतो. म्हणजे गायक, संगीतकारांच्या डोक्यामध्ये संगीताचा विभाग जास्त व्यापक असणार. जितकं तुमचं शिकणं अधिक, तितका मेंदू नवीन नवीन ज्ञानासाठी नवीन जागा उपलब्ध करून देणार. तुमचं घर तुम्ही किती मोठं कराल, याला निश्चित मर्यादा असते, परंतु तुमच्या ज्ञानासाठी मात्र मेंदूमध्ये अमर्याद जागा आहे. हा मेंदूच्या लवचीकतेचा एक भाग आहे.

दुखण्यावर मात करणं शक्य

एखादा कर्मचारी रजेवर असल्यास त्याच्या कामाची जबाबदारी दुसरा माणूस सांभाळतो, तसंच एखाद्या दुखण्यामुळे मेंदूचा एखादा भाग तात्पुरता अशक्त किंवा दुर्बल झाल्यास त्या भागाचं काम दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातं. आपल्या नेहमीच्या जगण्यातल्या काही गोष्टी पाहू या. मी शाळेत असताना माझ्या एका मैत्रिणीच्या उजव्या हाताला फ्रॅ क्चर झालं. ती शाळेत रोज येत होती, पण तिला लिहायला अडचण येत होती. इतरांच्या मदतीवर अवलंबून राहून अभ्यास पूर्ण होत नाही, त्याचा डोंगर वाढतच चालला आहे, हे बघून ती डाव्या हातानं लिहायला लागली. तिचं प्लॅस्टर निघेपर्यंत ती डाव्या हातानं छान लिहायला लागली होती. माझ्या कॉलेजमध्ये वयाच्या आठव्या वर्षी अपघातामुळे दोन्ही हात अगदी वरपासून कापले गेलेला एक मुलगा होता. तो आपले पायच हातासारखे वापरायचा. लिहिण्यासकट इतर किती तरी कामं त्याचे पायच करायचे. वरच्या उदाहरणात मेंदूच्या उजव्या भागानं लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली, तर नंतरच्या उदाहरणात पायावर नियंत्रण असलेल्या भागानं आपण कधीही न केलेली अनंत कामं नुसती शिकली नाहीत, तर त्यावर कौशल्य प्राप्त केलं. तुम्हालाही अशी काही उदाहरणं नक्की ठाऊक असतील.

प्रयत्नांतून नवजीवन

मेंदूमध्ये अगम्य शक्ती आहे यावर निष्ठा ठेवून असाध्य प्रयत्नांतून आपलं जीवन पूर्ववत सांधणाऱ्या डॉ. जिल बोल्टी टेलर यांची कहाणी कुणालाही स्फूर्ती देणारी आहे. डॉ. टेलर प्रसिद्ध अशा हार्वर्ड विद्यापीठातून शिकलेल्या मेंदूशास्त्रज्ञ. १९९६ च्या डिसेंबर महिन्यात एक दिवस त्या सकाळी उठल्या तेव्हा त्यांच्या डोक्यात डाव्या बाजूला प्रचंड वेदना होत होत्या. काही तरी असेल, थोडय़ा वेळानं बरं वाटेल, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपले सकाळचे व्यवहार आटोपण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या; पण काही वेळानं आपल्या हातात पुरेशी शक्ती नाही, आपण नीट चालू शकत नाही, तोलही संभाळता येत नाही, हे त्यांच्या लक्षात येऊन आपल्याला ‘पॅरॅलिसिस’चा (ज्याला ‘स्ट्रोक’ असंही संबोधलं जातं) अ‍ॅटॅक येतो आहे हे त्यांना समजलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवेपर्यंत त्यांचं बोलणं, चालणं, लिहिणं-वाचणं, विचार करणं, सगळंच थांबलं होतं. त्यांच्या डोक्यामध्ये एक रक्तवाहिनी फुटली असल्याचं प्राथमिक चाचणीत दिसून आलं. शस्त्रक्रिया करताना त्यांच्या मेंदूमध्ये एक लिंबाएवढा टय़ूमर असल्याचंही आढळून आलं. याचा परिणाम त्यांचा डाव्या बाजूचा मेंदू पूर्णपणे निकामी होण्यात झाला.

मेंदूशास्त्रज्ञ असल्यानं आपल्याला आलेल्या या अनुभवाचा, आपल्याला जाणवलेल्या मानसिक स्थितीचा, शारीरिक दुबळेपणाचा आणि आपल्या प्रयत्नांचा त्या अभ्यास करू लागल्या. आपलं जीवन पूर्वस्थितीत आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांना त्यासाठी आठ वर्ष लागली. अ‍ॅटॅक आला तेव्हा त्यांचं वय फक्त सदतीस वर्षांचं होतं. आपला हा प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला असून (माय स्ट्रोक ऑफ इनसाइट) सध्या त्या स्ट्रोकबद्दल जागृती वाढवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या कहाणीचा मराठी अनुवादही झालेला आहे.

सर्वसामान्य माणसालाही त्याच्या मेंदूच्या कक्षा आजमवायला उत्तेजित करणारं असं हे मेंदूबद्दलचं संशोधन आहे. मेंदूच्या लवचीकतेवर जो विश्वास दाखवेल ती व्यक्ती भले उतारवयीनही का असेना, ‘मला काय करायचं आहे आता शिकून, माझं संपलं..,’ असं न म्हणता, कुतूहल, जिज्ञासा, औत्सुक्य अशा मेंदूला आवाहन करणाऱ्या गुणांचं रोपण करायला प्रवृत्त होईल, नवी क्षितिजं पादाक्रांत करेल, अशी खात्री वाटते.

mangal.joglekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:20 am

Web Title: scientist marian diamond efficiency of the brain flexible brain zws 70
Next Stories
1 जगणं बदलताना : शिकणं इथलं संपत नाही!
2 पुरुष हृदय बाई : पौरुषाचं अनघड सुख
3 जोतिबांचे लेक  : ‘मुलगे’ घडवणारी प्रयोगशाळा!
Just Now!
X