प्रत्येक ऐतिहासिक वास्तू अनेक आठवणी घेऊन उभी असत़े  या भग्नावस्थेतील वास्तूंना आपले मन मोकळे करायचे असत़े  ऐन भराच्या काळातील आठवणींचे संचित कोणाला तरी सांगायचे असते, शिल्पा परब-प्रधानसारख्या काही इतिहासप्रेमींना ती भाषा कळते, आवडते आणि ती इतरांनाही कळावी, म्हणून कष्ट घेण्याची त्यांची तयारीही असत़े  इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या शिल्पा यांच्या या धडपडीविषयी ..
सह्य़ाद्रीच्या रांगांतून रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावले- बावले  खिंडीची.़ शिवकालात इथे रायगडाच्या रक्षणासाठी चौकी तयार करून जवळच्या सांदोशी गावातील जीवा सख्रेल या उमद्या तरुणाला चौकीचा नाईक करण्यात आलं होतं.़  नाईक आणि त्याच्यासोबत नऊ सैनिक अशी दहा जणांची ही चौकी होती़  शिवरायांच्या निधनानंतर संपूर्ण दख्खन गिळण्याच्या मनसुब्याने स्वत: औरंगजेब दख्खनेत उतरला, तेव्हा त्याच्या रेटय़ापुढे मराठय़ांच्या राजधानीचा गड लढवणंही आव्हानाचं होतं. शिवरायांनंतर या चौकीकडे दुर्लक्ष झाले असेल, या समजुतीने मुघल सरदार शाहाबुद्दिनखान याच्यासोबतच्या माणकोजी पांढरेने हजारोंच्या तुकडीनिशी या खिंडीतून रायगड गाठण्याचा प्रयत्न केला़  अर्थातच नाईक आणि त्याच्या नऊ वीरांनी आपल्या हौतात्म्याचा बांध घालून खिंड अडवली आणि माणकोजीचा प्रयत्न हाणून पाडला़  तत्कालीन प्रथेनुसार, वीरपत्नी सती गेल्या आणि त्यांची आठवण म्हणून दहा सतिशीला तेवढय़ा मागे राहिल्या़..
कालौघात या सतिशिलांचे तात्विक आणि ऐतिहासिक संदर्भ विस्मृतीत जाऊन, त्यांचे भौतिक अस्तित्व तेवढे शिल्लक राहिलं. काहीतरी कोरीव काम केलेले हे दगड, गावकऱ्यांनी शेंदूर फासून, पूजेला लावल़े गिरीभ्रमणाची आवड असणारी मंडळी या दगडांच्या जवळून जात, ग्रामदैवत वगैरे समजून त्याचे फोटो-बिटो काढत़  पण त्या निर्जिव धोंडय़ांना सांगायचा असलेला बलिदानाचा इतिहास ना गावकऱ्यांना ऐकू येत होता, ना भटकंती करणाऱ्यांना़  

सतिशिला म्हणजे काय?
शिवकालात वीर मरण आलेल्यांच्या पत्नी सती गेल्यानंतर त्यांचे स्मारक म्हणून दगडाच्या ‘सतिशिला’ बनवल्या जात़. अनेक चिन्हांचे कोरीव काम या सतिशिलेवर केलेले असे. पतीच्या पश्चात सती जाणाऱ्या स्त्रियांच्या सतिशिलेवर काटकोनच्या आकारात स्त्रीचा वज्रचुडामंडित हात दाखवलेला अस़े  पतीसोबत सती जाणाऱ्या स्त्रियांच्या सतिशिलांवर तीन प्रमुख असत़  सर्वांत खालच्या भागात युद्ध करणारा वीऱ, मधल्या भागात धारातीर्थी पडलेल्या या वीराचे डोके मांडीवर घेतलेली सती आणि सर्वात वरच्या भागात चंद्र-सूर्य यांच्या प्रतिकृती किंवा वीर आणि वीरपत्नी आकाशात उडताना दाखवल्या जत.

दरम्यानच्या एप्रिलमध्ये रायगडच्या आसमंतातील वारंगी, वाळणकोंड, बिरवाडी अशा गावांतून सोबत्यांसह भटकंती करताना शिल्पा परब-प्रधान हिच्या दृष्टीला या शिळा पडल्या़  आणि मग हरवलेले ऐतिहासिक संदर्भ त्या शेंदूर फासलेल्या दगडाला झरझर येऊन चिकटू लागल़े
मुळात शिल्पाचा शिवकालीन इतिहासाचा अभ्यास दांडगा! त्यात गिर्यारोहण आणि गिरिभ्रमणाची आवड आणि लहानपणापासूनच सवयही़  त्यामुळे इतिहास केवळ पुस्तकात वाचून स्वस्थ बसणं तिला माहीतच नव्हतं़  जे वाचले त्यातले शक्य तितके ऐतिहासिक संदर्भ प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पडताळून पाहायचे, हा शिल्पाचा शिरस्ताच आह़े  या सतिशिलांचा संदर्भही तिच्या वाचनात आला होता़  त्यात रायगड परिसरात भ्रमंती करताना अचानक या शिळाही समोर आल्या आणि आपल्याला कळलं ते अधिकाधिक इतिहासप्रेमीपर्यंत पोहोचवायच्या ध्यासामुळे, या शिळांच्या इतिहासाबद्दल तिने काही ठिकाणी लिहिलं, काही ठिकाणी बोललीही़  पण केवळ एवढय़ावरच न थांबता, तिने या शिळांच्या संवर्धनासाठी कंबर कसली़  ग्रामस्थांना जमवून त्यांचे प्रबोधन केल़े  त्यांना त्यांच्या गावाचा आणि त्या शिळांचा इतिहास साधार समजावून सांगितला़  गावातले पाटील- सरपंच अशा प्रतिष्ठित मंडळींना या शिळांच्या संवर्धनाची काळजी घेण्यास विनवल़े  परिणामत: आज गिरिभ्रमणासाठी येथे येणारे, ग्रामदेवतेचा नाही तर सतिशिलांचे फोटो काढतात़  त्यावरची चिन्हे अभ्यासतात़  गावकऱ्यांमध्येही आपल्या गावाच्या इतिहासाचा अभिमान निर्माण झालाय़  त्यामुळे तेही या ऐतिहासिक वारशाची काळजी घेतात़  
कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणाचे गिरिभ्रमण ज्यांच्या सोबतीविना आणि इतिहास कथनाविना पूर्ण होत नाही, त्या आप्पा परब यांची शिल्पा ही कन्या़  आप्पांनी अवघं आयुष्य गड-किल्ल्यांचा अभ्यास, त्यावर लेखन आणि त्याहीपेक्षा गडावर आलेल्यांना आपल्या  तेजस्वी वाणीत साधार इतिहास समजावून देण्यासाठी वेचलं़  आज शिल्पाही गेली १५ वष्रे त्याच मार्गावरून चालतेय़  गड-किल्ल्यांचा इतिहास अभ्यासायचा आणि तो गडावर येणाऱ्या जिज्ञासूंसाठी प्रेरणादायी पद्धतीने कथन करायचा़  शिल्पाचा शिरस्ता गेली १५ वर्ष जवळपास प्रत्येक शनिवार- रविवारी सुरू आह़े  त्यातही शिवरायांचा इतिहास सांगताना पैसा कमवायचा नाही, हे परब घराण्याचे ब्रीद शिल्पाने आजवर पाळले आह़े  तिचा या क्षेत्रात प्रवास सुरू होण्यालाही एक योगायोगच कारणीभूत ठरला होता़  एकदा ती वडिलांसोबत रायगडावर गेलेली असताना, अचानक आप्पांचा आवाज बसला आणि सोबत आलेल्या इतिहासप्रेमींचा हिरमोड होऊ द्यायचा नाही म्हणून आप्पांनी आपल्या चौदा वर्षांच्या लेकीला पुढे केल़े  आणि तिथूनच तिच्या इतिहास कथनाला सुरुवात झाली़
शिल्पाने इतिहासातून एमए आणि बीएड केलयं़  सध्या दादरच्या सानेगुरुजी विद्यालयात ती शिक्षिका आहे आणि प्रशासकीय सेवाच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इतिहास विषयाचे मार्गदर्शनही करत़े  पण तरीही पावसाळ्याचे चार महिने वगळता प्रत्येक शनिवार- रविवार किल्ल्यावर घालवणं हा तिचा वर्षांनुवर्षांचा उपक्रम आजही सुरू आह़े  युथ होस्टेल, वायएचए, नेचरलव्हर्स अशा एक ना अनेक संस्था इतिहास सांगण्यासाठी हक्काने शिल्पाला किल्ल्यांवर घेऊन जातात़  घर-संसार सांभाळून या छंदासाठी वेळ देणं कसं शक्य होतं, या स्वाभाविक प्रश्नावर ‘इच्छा तिथे मार्ग’ एवढेच प्रांजळ उत्तर तिच्यापाशी आह़े  हा तिचा छंद जोपासण्यात आधी वडिलांचे आणि मग पतीचे मात्र तिला विलक्षण सहकार्य मिळत आह़े
केवळ घरून सहकार्य मिळत असले तरीही, एक स्त्री म्हणून तिची वाट काही फार सोपी नाही़  रात्री-अपरात्री, दऱ्याखोऱ्यांत हिंडताना समाजकंटकांच्या अनेक उपद्रवांना तिला आणि सर्वच इतिहासप्रेमींना सामोरे जावे लागते. रायगडसारख्या किल्ल्यावरही केवळ मौजमजा करायला येणाऱ्यांकडून दारू पिऊन हैदोस घालणं, छेडछाडी करणं, तिथल्या ऐतिहासिक वारशाची नासधूस करणं, असले प्रकार फारच चिंताजनक असल्याचं ती सांगत़े  अशा वेळी पुरातत्त्व विभागाच्या एकटय़ा-दुकटय़ा कर्मचाऱ्याचाही या कंटकांपुढे पाड लागणं अवघड असतं़  शिवाय प्रत्येक किल्ल्यावर पोलिसांचा नियमित जागता पहारा ठेवायचा, तर तेही व्यवहार्य नाही़  त्यामुळे यावर उपाय हाच की, स्थानिक गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या ऐतिहासिक वारशाचं जतन करायचं़  त्यासाठी आळीपाळीने गडांवर गस्त घालणं, किल्ल्यावर चढण्यापूर्वीच पिशव्या तपासून त्यातील मादक पदार्थ काढून घेणं, असे प्रयोग करता येऊ शकतात, असं शिल्पाचं मत आह़े  त्यासाठी स्थानिकांमध्ये जागृती करण्यासाठी शिल्पा एकाकी प्रयत्न करतेय़  आपल्या या कामाला संस्थात्मक रूप देण्याची तिची मुळीच इच्छा नाही़  त्याऐवजी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना हाताशी धरून काम करत राहाणे तिला अधिक महत्त्वाचे वाटत़े
कावले- बावले खिंडीतल्या सतिशिलांप्रमाणेच, रायगडच्याच आसमंतातील वारंगी गावातली ऐतिहासिक शिवपिंडी, काळ नदीतील वाळणकोंड गावाजवळच्या डोहातील वैशिष्टय़पूर्ण मासे, गोवेले गावातील ऐतिहासिक अवशेष, अशा सहजासहजी कोणाच्या माहितीत नसणाऱ्या एक ना अनेक स्थळांची आणि तिथल्या साधार इतिहासाची शिल्पाने भ्रमंती करून आणि ऐतिहासिक संदर्भ धुंडाळून माहिती करून घेतली आह़े  या ज्ञानाचा उपयोगही ती लोकांमध्ये इतिहासाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठीच करते आह़े  तिच्या माहेरचं म्हणजेच आप्पांचं दादरमधलं घर आजही दुर्ग आणि इतिहासप्रेमींसाठी हक्काचे माहिती केंद्र आह़े  अधिकाधिक लोकांपर्यंत वास्तूंचा इतिहास पोहोचावा यासाठी, शिल्पा गिरिभ्रमणाशी संबंधित मासिकांतून लिखाण सुरू केलं आह़े  व्याख्यानांच्या माध्यमातूनही तिचा जनजागृतीचा प्रयत्न सुरू आह़े  सोबत डोंगरवाटांतून भटकंतीही सुरू आहेच़  भविष्यात इतिहास आणि निसर्ग संबंधित विषयांवर कार्यशाळा वगैरे उपक्रम सुरू करून आणखीनही काही ध्येयवेडे ‘इतिहास कथनकार’तयार करण्याचा तिचा मानस आह़े  
प्रत्येक ऐतिहासिक वास्तू अनेक आठवणी घेऊन उभी असत़े  घरातल्या कोनाडय़ात अडगळ होऊन पडलेल्या, एखाद्या गलितगात्र वृद्धाला जशा आपल्या ऐन भराच्या काळातील आठवणींचे संचित कोणाला तरी सांगायचे असते, तसे या भग्नावस्थेतील वास्तूंनासुद्धा आपले मन मोकळे करायचे असत़े  शिल्पा परब-प्रधानसारख्या काही इतिहासप्रेमींना ती भाषा कळते, आवडते आणि ती इतरांनाही कळावी, म्हणून कष्ट घेण्याची त्यांची तयारीही असत़े  म्हणूनच जाज्वल्य भूतकाळ, इतिहास म्हणून मान्यता पावतो आणि सहस्रावधींना प्रेरणादायी ठरतो़…