मंगेश नारायणराव काळे – mangeshnarayanrao@gmail.com
‘‘पुरुषाची ‘घडण’ ही अगदी मुलगा जन्माला आल्यावर झालेल्या अत्यानंदापासून (मुलगी जन्माला आली यापेक्षा जास्तीचा) होत असते हे आपल्या समाजव्यवस्थेतलं सत्य आहे. त्यामुळे ‘स्त्रीशिवायचा पुरुष’ किंवा ‘स्वतंत्र पुरुष जात’ ही संकल्पनाच काहीशी निसरडी आहे. भारतीय समाजात पुरुष जातीनं त्याचं अधिकचं स्वातंत्र्य पुरेपूर घेतलं आहे. त्यामुळे पुरुष हा स्त्रीच्या नजरेतून पाहिला गेला, तरंच त्याच्या ‘पुरुष ’ असण्याच्या व्यक्तित्वाला निश्चित असा अर्थ आहे असं मला वाटतं. मग भले तो ‘आदर्श’ पुरुष नसेल..’’
या सदराच्या शीर्षकातच एक गंमत आहे. स्वतंत्र पुरुष जात या दृष्टीनं पुरुषाचा विचारही अभिप्रेत आहे नि शीर्षकात ‘स्त्री’ आहे. तर प्रश्न असा आहे, की स्त्रीशिवायचा पुरुष किंवा स्त्रीच्या दृष्टिकोनाशिवायचा (पुरुषी दृष्टिकोनातला) पुरुष ही संकल्पनाच काहीशी कल्पित म्हणता येईल. मुळात इथे हे गृहीतक स्वीकारलेले आहे, की स्त्रीशिवायच्या पुरुषाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे नि तसं त्याच्याकडे पाहिलं जावं. तसं पाहाणं वावगं नसलं तरी अशा विचाराची आज गरज का निर्माण झाली? एक पुरुष म्हणून जरी मी विचार केला तरी स्त्रीशिवायचा पुरुष ही संकल्पनाच मला काहीशी निसरडी वाटते.
शिवाय या संकल्पनेत हे अनुस्यूत दिसते, की ज्याप्रमाणे स्त्रीचा एक स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून विचार व्हावा ही संकल्पना ‘स्त्रीवादा’तून ठळक झाली त्यामागे हजारो वर्षांपासूनचा एक इतिहास दडलेला आहे. हा कालखंड स्त्रीच्या दास्यत्वाचा आहे, शोषणाचा आहे. अगदी आज वर्तमानापर्यंत जरी आपण मागचा कालखंड तपासून पाहिला, तरी पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला पुरेसं स्वातंत्र्य आपल्या भारतीय समाजात आपण देऊ शकलेलो नाही. जे काही बरोबरीचं स्वातंत्र्य आपण पाहातो त्यामागे एकतर भारतीय संविधानानं दिलेले आधिकार किंवा एका शिक्षित समाजगटाची उदारमतवादी भूमिका दिसते. पण हे सगळं किती प्रमाणात आहे? एक निश्चित, की आधुनिक, उत्तराधुनिक काळातली स्त्री आज पुरुषाच्या बरोबरीनं, तर कधी पुढे जाऊनसुद्धा कार्यरत आहे. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात तिनं आपली मोहोर उमटवली आहे. मात्र हा टक्का भारतासारख्या देशात-जिथे अजूनही एक मोठी लोकसंख्या खेडय़ात राहाते, शिक्षणापासून वंचित आहे, तिथे हे मूठभरांचं स्वातंत्र्य पुरेसं आहे का? तर त्याचं उत्तर अर्थातच नकारार्थी मिळतं. आपण कितीही म्हणत असलो, की आजची स्त्री ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली आहे, तरी हा हक्क तपासून पाहिल्यावर पुरुष मक्तेदारी, वर्चस्व असणारा समाजच मोठा आहे. हे इथे आठवण्याचं प्रयोजन एवढय़ाचसाठी, की या पाश्र्वभूमीवर पुरुष स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, नि ते कसं पाहायचं, अनुभवायचं याचा विचार करावयाचा आहे.
व्यक्तिश: एक पुरुष म्हणून मला तरी ‘पुरुष जात या दृष्टीनं पुरुषाचा विचार केला जात नाही’ हे विधान पुरेसं वाटत नाही. किंवा ‘पुरुषाची स्वत:ची अशी बाजू, नेमके विचार’ काय आहेत, असा प्रश्नही पडत नाही. इथे फारतर असं म्हणता येईल, की ज्याप्रमाणे स्त्रीकडे एक स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून पाहिलं जावं असं वाटतं, तसंच पुरुषाकडेही पाहिलं जावं, अशी अपेक्षा इथे दिसते. ती गर नसली तरी आपल्या समाजात अजून तरी तशी गरज निर्माण व्हावी अशी परिस्थिती नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय समाजात पुरुष जातीनं त्याचं अधिकचं स्वातंत्र्य पुरेपूर घेतलं आहे.
आता इथे दुसऱ्या घटनेकडे पाहू. २०११ च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांच्या तुलनेत ‘स्त्री’चं प्रमाण हे ८९६ इतकं आहे. म्हणजे स्त्रियांचा जन्मदर हा पुरुषांच्या तुलनेत १०४ नं कमी आहे. आणखी एक आकडेवारी ‘माय नेशन’ संस्थेनं दिली आहे. ती ही, की ९० टक्क्यांहून अधिक पुरुष घरगुती िहसेला सामोरे जातात(?) किंवा पुरुष आत्महत्या दर हा स्त्रियांच्या तुलनेत दुप्पट आहे. या सगळ्याचा मथितार्थ असा काढणं, की पुरुष हा पीडित आहे, हेसुद्धा अडाणीपणाचं ठरेल. या सगळ्याची कारणमीमांसा वेगळी आहे. समाज, जात, धर्म, परंपरा अशा अनेक गोष्टी या सगळ्यामागे आहेत. एका विशिष्ट गटाचं ‘पुरुष’ म्हणून शोषण झालंही असेल म्हणून ‘पुरुष जात’ संकटात असल्याचा निष्कर्ष हास्यास्पद म्हणता येईल. त्यामुळे इथे या अनुषंगानं स्वतंत्र पुरुष जात या दृष्टीनं पुरुषांचा फारसा विचार झाला नाही का? या प्रश्नाकडे मी पुरुष म्हणून जेव्हा पाहातो तेव्हा निश्चितपणे म्हणू शकतो, की मी ज्या समाजात उभा आहे, तिथे अगदी लहानपणापासून आतापर्यंत पुरुष असण्याचं म्हणून जे काही स्वातंत्र्य आहे, ते मला पुरेपूर मिळालं आहे. ज्या समाजव्यवस्थेत मी राहातो तिथे ते विनासायास मला मिळवून देण्यात आलं आहे.
इथे मला ही कल्पनाच बऱ्यापकी हास्यास्पद वाटते, की स्त्रीला वगळून किंवा स्त्रीशिवाय पुरुषाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करण्याची गरज आहे. कारण मी एक व्यक्ती म्हणून जे स्वत:चं अवलोकन करत आलो आहे, नि स्त्री-पुरुषाचं बरोबरीचं स्वातंत्र्य स्वीकारलं आहे, त्यानुसार स्वतला घडवत गेलो आहे ते ‘ती’च्या नजरेतून ‘मी’ पुरुष म्हणून कसा आहे?, माझ्यात काय न्यून आहे?, हे आलेल्या अनुभवातूनच. मत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, बहीण, आई या वेगवेगळ्या नात्यांतून माझा पुरुष म्हणून झालेला स्वीकार, नकार मी अनुभवला आहे नि त्यानुसार मी स्वत:चं पुरुषत्व घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मी हे इथे कबूल करू इच्छितो, की माझ्यातला पुरुष घडण्यास, त्याला एक व्यक्ती म्हणून आकार येण्यास या सगळ्या नात्यांतून मिळालेल्या प्रतिसादातूनच बळ मिळालं आहे. जर ही सगळी नाती मी अनुभवलीच नसती तर एक पुरुष म्हणून माझं स्वरूप काय राहिलं असतं? तर स्वत:च्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करणारा एक मुक्तभोगी पुरुष. भारतीय समाजाची रचना पाहिली तर लक्षात येईल, की स्त्रीशिवाय पुरुष असा पुरेपूर स्वातंत्र्य घेण्यातूनच घडत गेला आहे. पुरुषसत्ताक जीवनपद्धती त्यानंच निर्माण केली आहे. कारण यातच त्याचं ‘पुरेपूर’ स्वातंत्र्य दडलेलं आहे. व्यक्तिश: एक पुरुष म्हणून मी निश्चितपणे म्हणू शकतो, की माझ्याशी संबंधित किंवा अपरिचित कोणत्याही स्त्रीचं स्वातंत्र्य हे मला नेहमीच महत्त्वाचं वाटत आलं आहे. अर्थात हे अचानक घडलेलं नाही. मीसुद्धा याच पुरुषसत्ताक परंपरेतून आलेला, पुरुषाचं अधिकचं स्वातंत्र्य उपभोगलेला एक पुरुष आहे नि त्याची खंत मला आहे. अज्ञानातून, माझी जडणघडण ज्या परिवेशात झाली तिथल्या संस्कारांतून माझ्यातला पुरुषाचं व्यक्तित्व घडलं आहे. त्याला एक पूर्ण आकार यायला (ज्यानं स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तित्व असणं स्वीकारलं आहे.) एक मोठा कालखंड गेला आहे.
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्री आणि पुरुष यांच्यातलं वेगळेपण काय, तर दोघांची लिंगभिन्नता. तेवढा एक फरक सोडला तर दोघांमध्ये वेगळं असं काही नाही की जे एकाला शक्य आहे ते दुसऱ्याला नाही. अगदी ओझी वाहाण्यापासून ते मल्लविद्य्ोपर्यंत सगळीच शारीरिक श्रमांची, कसरतीची कामं दोन्ही करताना दिसतात. अगदी वैदिक काळापासून जरी आपण मागे जाऊन पाहिलं तरी लक्षात येतं, की कधीकाळी आपला समाज हा स्त्रीसत्ताक स्वरूपाचा होता. स्त्रियांना ते सगळे अधिकार होते, जे नंतरच्या पुरुषसत्ताक पद्धतीनं पुरुषांना बहाल केले. ‘स्त्री’ला दुय्यमत्व देण्यात आलं आणि याच दुय्यमत्वातून तिचं शोषण होत गेलं, जे आजपर्यंत सुरू आहे. इथे हे सगळं सांगण्याचं प्रयोजन एवढय़ासाठी, की स्त्रीशिवायचा पुरुष ही संकल्पनाच मुळात फसवी आहे. स्त्रीसोबतचा किंवा स्त्रीच्या दृष्टीतला पुरुष, नि ‘पुरुष जात’ म्हणून स्वतंत्र असा पुरुष वेगळा करून पाहाणं अशक्यप्राय आहे.
‘तुम्ही स्त्रियांपासून दूर राहा. त्यांच्यासाठी काही एक करण्याची गरज नाही. त्यांना जे करायचे ते त्या करतीलच,’ अशा आशयाचं विवेकानंदांचं एक वचन आहे. ते इथे उद्धृत यासाठीच करतोय, की तिला ‘गृहीत’ धरून वा वगळून तुम्हाला ‘पुरुष जात’ असं वेगळं व्यक्तित्व उभं करता येणार नाही. मी एक व्यक्ती म्हणून, पुरुष म्हणून हे मानणारा आहे की ‘ती’चं असणं पुरुष म्हणून मी तितक्याच तत्परतेनं स्वीकारलं पाहिजे, आणि तिनंही माझं ‘पुरुष’ असणं. इथे प्रश्न असलाच तर तो हा असेल की समाजात, घरात वावरत असताना दोघं (पुरुष आणि स्त्री) पुरेसा ‘अवकाश’ एकमेकांना देत आहेत का? मी व्यक्तिश: असं म्हणेन की कदाचित थोडा उशीर झाला असेल माझ्यानं, पण माझ्याशी निगडित असलेल्या मत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी, बहीण, आई या नात्यांत ‘तो’ अवकाश जपण्याचा मी प्रयत्न करत आलो आहे आणि त्यामुळेच मी पुरुष म्हणून कसा आहे याची छाननी मला याच नात्यातून करता आली आहे. त्यामुळे केवळ मी पुरुष आहे म्हणून स्वत:ला पुरुष जात म्हणून स्वतंत्रपणे पाहाणं मला अशक्य वाटतं.
इथे आणखी एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं; ते हे, की शिक्षित समाजात स्त्रीचं व्यक्तित्व काहीसं पुढारलेलं दिसत असलं तरी, किंवा तिचा कर्ता म्हणून टक्का वाढलेला दिसत असला तरी पुरुषाचं असणं यात काही प्रमाणात दुर्लक्षित झालेलं दिसतं. अर्थात ही एक मोठी स्थित्यंतराची गोष्ट आहे. हजारो वर्षांच्या दमनाच्या पाश्र्वभूमीवर स्त्रीवादाच्या प्रखर जाणिवेतून झालेली स्त्रीची स्वतंत्र घडण आहे. यामागे सामाजिक, सांस्कृतिक, आíथक अशी असंख्य कारणं आहेत. अशा एका वर्गात शक्यता आहे की पुरुष जात ही दुय्यम होत गेली असावी. एक निरीक्षण असंही नोंदवावंसं वाटतं, की तत्कालीन प्रचलित रूढी, परंपरांमधून स्त्रीला आलेलं गौणत्व, त्यातून आलेली हुंडा पद्धतीसारखी अमानवी प्रथा, यातून घटत गेलेला स्त्री जन्मदर याचाही एक मोठा परिणाम इथे झालेला दिसतो. काही विशिष्ट समाजात विशेषत: महाराष्ट्रातल्या काही जाती-जमातींमध्ये तर स्त्री जन्मदर इतका घसरला, की दुसऱ्या जाती-जमातींमधून स्त्रीची जोडीदार म्हणून निवड करणं, प्रसंगी विकत घेणं या टोकापर्यंत आलं. या सगळ्या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र पुरुष जात ही संकल्पनाच मला नकारात्मक वाटते. उलट मी आग्रहपूर्वक असं सुचवू इच्छितो की पुरुष हा स्त्रीच्या नजरेतून पाहिला जावा, तरंच त्याच्या ‘पुरुष’ असण्याच्या व्यक्तीत्वाला निश्चित असा काही एक अर्थ आहे. भलेही मग तो ‘आदर्श’ पुरुष नसेल, पण तो त्याच्याशी असलेल्या स्त्री नात्यात तिची पाठराखण करणारा, प्रसंगी भांडणारा, चिडणारा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, सोबत करणारा असावा. तो सद्गुणाचा पुतळा असावा असा आग्रह नसेल कुणाचाच, पण तो जिथे आहे, जसा आहे, त्या गुणदोषांसकट ‘ती’चं सोबत असणं गृहीत धरणारा असावा. हेच स्वतंत्र ‘स्त्रीजात’ या संकल्पनेबद्दलही म्हणता येईल.
हे सगळं अर्थातच एका दिवसात घडणारं नाही. यासाठी आपल्या समाजातल्या चालीरीती, रूढी, परंपरा, जातपातींचं तुष्टीकरण, आíथक-सामाजिक उतरंडी अशा अनेक घटकांना ‘लिबरल’ (उदारमतवादी) व्हावं लागणार आहे. तसं झालं, तर असाही विचार भविष्यात रूढ होऊ शके ल, की माझा जोडीदार हा एकवेळ माझ्या विचारांचा नसला तरी चालेल, तो माझ्या जाती-धर्माचा नसला तरी चालेल, पण तो दुसऱ्याचा अवकाश जपणारा, त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा, समजून घेणारा, पाठीमागे खंबीरपणे उभा राहाणारा असावा, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो..
माझ्यातला पुरुष शोधताना सुचलेले हे विचार. हे बरेचसे विस्कळीत आहेत. याचा अर्थ मी आदर्श पुरुषाचा पुरेसा शोध घेऊ शकलो असं म्हणता येणार नाही. मागे वळून पाहाताना लक्षात येतंय की आपण स्त्री आणि पुरुष या नात्याचा पुरेसा विचार करू शकलेलो नाही. बहुतेक वेळा तर जोडीदाराचं सोबत असणं आपण ‘गृहीत’ धरत आलेलो आहोत. शिवाय पुरुष असण्याचा पुरेपूर फायदा आपण वेळोवेळी घेतला आहे. ते अधिकचं स्वातंत्र्य वारंवार घेतलं आहे. जो अवकाश जोडीदाराला द्यायला हवा तो देण्यात बऱ्याचदा कमीच पडलो आहे. एक मात्र निश्चित, की माझ्याशी निगडित असलेल्या ‘स्त्री’च्या नात्यात मी प्रामाणिक राहिलो. माझी भूमिका, मग ती मुलाची असो, बापाची, की नवऱ्याची, ती प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न केला आहे. मी आदर्श पुरुष जरी होऊ शकत नसलो, तरी माझ्याशी संबंधित स्त्रीचा सन्मान करण्याचा, तिला जपण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच करत आलेलो आहे. तो पुरेसा नव्हता याचीही मला पूर्ण कल्पना आहे. पण माझ्यातल्या पुरुषापेक्षा माझ्यातल्या ‘स्त्री’ला संपूर्णपणे उभं करण्याचा प्रयत्न मी करत आलोय. तो यापुढेही अधिक ठळकपणे व्हावा इतकी माझ्यातल्या पुरुषाकडून अपेक्षा करण्यात गर काय आहे?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 6, 2021 1:08 am