बऱ्याच घरांमध्ये आज वृद्ध मंडळी एकेकटे राहताना दिसतात. बऱ्याच जणांची पुढची पिढी परदेशात वास्तव्यात असते. अशा वेळी एकटेपणा खायला उठू शकतो. मनात नकारात्मक विचार गर्दी करतात. ‘मला काही झाले तर?’ ही भावना खूप अस्वस्थ करू शकते. एकाकी वाटू शकते. मात्र  Loneliness  आणि Aloneness  म्हणजेच ‘एकाकी’ आणि ‘एकांत’ या वेगवेगळ्या संज्ञा आहेत. एकाकी व्यक्तीला मानसिक अस्वस्थतेने आजार जडू शकतात. आयुष्य अर्थहीन वाटू लागते. पण ‘एकांतात’ मात्र खूप मजा, मस्ती, आनंद उपभोगता येऊ शकतो. आपले पृथ्वीवरील अस्तित्व, योगायोगाने आपल्या नात्यात अथवा संपर्कात आलेल्या व्यक्ती, आपल्या वाटय़ाला आलेले मानापमानाचे प्रसंग या साऱ्यांचे अर्थ आध्यात्मिक पातळीवर लावू लागलो की नाण्याची दुसरी बाजू दिसू लागते. God does not play dice असे आइनस्टाइन म्हणतो. सकारात्मक विचारांच्या साखळीतून ‘आयुष्य’ नावाच्या जत्रेत खूप आनंद घेता येईल.
वीरासन
धर्याने आयुष्य जगण्यासाठी चिंतकाच्या भूमिकेत जाऊ या. वीरासनाचा सराव करू या. विधिवत वज्रासन धारण करा. आता डावा गुडघा वर उचला. डावे पाऊल उजव्या मांडीच्या आतील बाजूला लावून ठेवा. डाव्या हाताचे कोपर डाव्या मांडीवर ठेवून हाताचा तळवा डाव्या हनुवटीखाली ठेवा. लक्ष श्वासावर एकाग्र करा. डोळे सावकाश मिटा. कपाळावरील आठय़ा काढून टाका.  काही श्वासांनंतर विरुद्ध बाजूने ही कृती पुन्हा करा.
———————-

मिसळणीचा डबा
भारतीय ‘किचन’ परंपरेनुसार ओटय़ावर ‘तिखट-मिठाचा’ डबा ऊर्फ मिसळणीचा डबा असायलाच हवा. त्याशिवाय चविष्ट आणि रुचकर भोजन होणे नाही हे मी सांगायला नको. सर्वसाधारणपणे तिखट, हळद, हिंग, गोडा मसाला, मोहरी आणि जिरं असं फोडणीचं साहित्य महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात असतंच. पण आज आपण काही इतर मसाल्यांचा वापर का आणि कसा करावा हे बघू या.
   हिरवा ठेचा- हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता असे जिन्नस थोडं मीठ घालून वाटून घ्यावे. मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करून त्यात घालावी. असा ‘मसाला गोळा’ करून ठेवला तर ४ दिवस फ्रिजमध्ये राहील आणि गरजेप्रमाणे फक्त हा मसाला आमटी किंवा उकडलेल्या भाजीत घातला की काम फत्ते. वयानुसार मिरची सोसत नाही म्हणून त्याचे प्रमाण कमी वापरावे किंवा नाही घातले तरी चालेल. सर्व पाचक रससुद्धा मिळतील आणि कढीपत्ता-कोथिंबीर आवडत नाही तरी पोटात जाईल. पुदिना आणि ओव्याची पानं असतील तर अधिक चांगलं.
चटपटीत चटणी- अळशीच्या बिया, सुकं  खोबरं, पांढरे आणि काळे तीळ, जिरं, धणे, कारळे, किसलेला सुका आवळा किंवा कैरी/ आमचूर आणि सैंधव असा भाजका मसाला जाडसर दळून घ्यावा आणि चटणी म्हणून रोजच्या जेवणात वापरावा. हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम.  
पंच फोडणी- ही बंगाली परंपरेनुसार फोडणी असून अन्नाची पचनशक्ती उत्तम वाढवते. तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, अख्खे धणे, मेथीचे दाणे आणि बडीशेप टाकावी आणि फोडणी तडतडल्यावर तमालपत्र, सुकी लाल मिरची आणि हिंग, हळद घालून कोणतीही भाजी करावी. (लाल भोपळ्याची भाजी अतिशय चविष्ट लागते.)
दूध मसाला- काजू , पिस्ता, केसर, बदाम, वेलची, जायफळ, हळद, सुंठ आणि जेष्ठीमधाची पावडर. सर्व साहित्य पावडर करून कोरडय़ा ठिकाणी ठेवा. रात्री झोपताना एक कप गरम दुधात १ चमचा पावडर घालून प्या. एकदम शांत झोप लागते.
ताक मसाला- शोपा, ओवा, अळशीच्या बिया, जिरं हे जिन्नस थोडेसे भाजून पावडर करा. त्यात सैंधव, मिरी पावडर, हिंग आणि सुंठ पावडर मिसळा आणि ताकात घालून जेवणानंतर प्या. अन्नपचन एकदम छान! कोथिंबीर- पुदिना- आलं- मिरची असा हिरवा मसाला असेल तर बहार येते.
आरोग्यसंपन्न असा मिसळणीचा डबा परिपूर्ण कसा कराल ?
१. मोहरी २. जिरं ३. ओवा ४. मेथीचे दाणे ५. तीळ ६. शोपा ७. अख्खे धणे ८. कसुरी मेथी असे ‘फोडणीचे साहित्य’ आणि हळद, हिंग, तिखट, मसाले नेहमीप्रमाणे असतातच. आकार थोडा मोठा होईल, पण आपलं आरोग्य आपल्या ‘हाताशीच’ राहील हे तितकंच खरं!
चहा मसाला- सुंठ ५० ग्रॅम, लवंग १० ग्रॅम, मिरपूड २५ ग्रॅम, पांढरा मिरपूड २५ ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, जायफळ १ नग,  हिरवी वेलची १०-१२ नग. सर्व साहित्याची पावडर करा व चहा करताना त्यात घाला.
संडे मसाला- अख्खे धणे १ वाटी, लाल मिरची १/२ वाटी, सुंठ १ नग, दालचिनी १० ग्रॅम, शाह जिरे १० ग्रॅम, काळी मिरी १० ग्रॅम, बडीशेप १० ग्रॅम, नागकेशर ५ ग्रॅम, हिंग चिमूटभर, तेजपत्ता ५ ग्रॅम, सुके खोबरे पाव वाटी. थोडय़ाशा तेलात भाजून फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि हवे तेव्हा वापरा.
वैदेही अमोघ नवाथे , (आहारतज्ज्ञ ) vaidehiamogh@gmail.com
——————————————————-
.. आणि पर्यटनसंहिता तयारही झाली

सप्टेंबर २०१० मध्ये मी निवृत्त झालो. निवृत्त झाल्यावर मनाशी ठरविले की आता आपला भटकण्याचा छंद जोपासायचा, वाढवायचा. गेली वीस-पंचवीस वर्षे मी हिमालयात पदभ्रमणासाठी नेमाने जात होतोच. आता निवृत्तीनंतरच्या मोकळय़ा वेळात नवीन नवीन जागा शोधून, दौरे आखायचे, त्यानिमित्त मित्र जोडायचे, जमलेच तर त्यावर लिखाण करून एक दस्तावेज तयार करायचा, त्याचा झालाच तर कोणाला चांगला उपयोग होऊ शकतो. शरीर आणि मन गुंतवून ठेवायला हा चांगला छंद आहे, असे मला वाटते.
 २०११ या वर्षांमध्ये कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा संकल्प सोडला, त्याप्रमाणे तिकिटेसुद्धा आरक्षित झाली होती. परंतु काही कारणांमुळे हा दौरा काही होऊ शकला नाही. वर्षांअखेरीस अमेरिका दौरा मात्र निश्चित केला. अमेरिका दौऱ्याची तयारी करत असतानाच योगायोगाने कैलास मानसरोवर यात्रासुद्धा निश्चित झाली आणि दोन्ही दौरे सफल झाले.
२०१३ वर्ष उजाडले ते २०१२ मध्ये केलेल्या पर्यटनाचे अनुभवसंपन्न गाठोडे घेऊनच! मनात आता
वेगळेच विचारचक्र सुरू झाले. आपल्याला मिळालेला अनुभव, मित्रांमध्ये, नातलगांमध्ये वाटावा. अमेरिका व कैलास मानसरोवरदरम्यान केलेल्या टिपणांवरून एक टिपणवहीच तयार केली व मित्रमंडळींना वाचावयास दिली. ‘यावर पुस्तक तयार करा’ असे सांगून मित्रमंडळींनी व नातलगांनी मला प्रोत्साहित केले. काहींनी मार्गदर्शनही केले व मदतीचे आश्वासनसुद्धा दिले.
माझा लिखाणाचा आत्तापर्यंतचा अनुभव हा वृत्तपत्रीय पत्रलेखन व केलेल्या पदभ्रमण यात्रेचे प्रवासवर्णन एवढाच मर्यादित होता. त्यामुळे संग्रहित टिपणांचे पुस्तक तयार करण्याच्या दृष्टीने फेरलेखन सुरू केले. त्यामध्ये स्केचेस व फोटो यांचाही समावेश करून पुस्तक आकर्षक कसे होईल यासंबंधी मार्गदर्शन घेतले.
  दिवसातील काही तास लिखाणासाठी ठेवून शिस्तबद्ध स्वरूपात काम चालू केले. मध्येच कधीतरी ‘हे सर्व कशासाठी करतोय?’ असा नकारात्मक विचार येई. परंतु माझ्या भावाने व काही मित्रांनी असा ‘तगादा’ लावला होता की मनातील नकारात्मक विचार पळून जात.
बघता बघता २०० पानांची संहिता तयार झाली. पुस्तकाचे नाव ‘कॅलिफोर्निया ते कैलास’ असे ठरविले. या सर्वापाठोपाठ मुद्रणालयाकडे संहिता सोपविण्यात आली. प्रूफे तपासली, फोटो व स्केचेससाठी सॉफ्ट कॉपी तयार करणे, किरकोळ फेरफार करून पुनर्लेखन करणे, यामध्ये तीन महिने कसे गेले कळलेच नाही. स्वत:च प्रकाशनाची धुरा सांभाळून नोव्हेंबरमध्ये ‘कॅलिफोर्निया ते कैलाश’ पुस्तक प्रकाशित केले. मित्रमंडळी, नातलग व सुहृद यांच्या प्रतिसादामुळे पुस्तकाच्या दोनशे प्रती संपल्यासुद्धा!
यानंतर आत्तापर्यंत केलेल्या पदभ्रमण यात्रांचे टिपण संग्रहित करून दस्तावेज तयार करण्याचे काम सुरू आहे. कुठाय? मोकळा वेळ!
विश्वास बर्वे, विलेपार्ले
——————————–
कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे  वृद्ध स्त्रियांना संरक्षण
वृद्धापकाळात विशेषत: एकत्र कुटुंबात अनेक आई-वडिलांना त्यांच्या अपत्यांकडून अथवा सुनेकडून त्रास दिला जाण्याच्या घटना घडताना दिसतात. घरातील सासूला जर सून व मुलगा, दोघे मिळून शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपाचा त्रास देत असतील तर त्या वृद्ध महिलेस कौटुंबिक हिंसाचार (संरक्षण) कायदा कलम २००५ च्या अंतर्गत मुलाविरुद्ध व सुनेविरुद्ध तक्रार दाखल करता येते.
ही तक्रार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येते. या तक्रार-अर्जाअंतर्गत संरक्षण आदेश (protection Order); घरासाठीचे आदेश (Household Order) पोटगीचे आदेश (Compensation Order) अशा स्वरूपाचे आदेश पारित केले जातात. अर्ज दाखल केल्यापासून निकाली निघेपर्यंत अंतरिम आदेशही पारित केले जातात.
कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत अर्ज दाखल करताना खालील प्रमुख गोष्टी लक्षात घ्याव्यात.
१) सदरचा अर्ज दाखल करण्याचा अधिकार फक्त वृद्ध स्त्रियांना असून वृद्ध पुरुष व्यक्ती या कायद्यांतर्गत अर्ज दाखल करू शकत नाही.
२) वृद्ध स्त्री (सासू) केवळ सुनेविरुद्ध अर्ज दाखल करू शकत नाही. सदर अर्जात ‘विरोधी पक्षा’मध्ये मुलाचाही समावेश करणे बंधनकारक आहे.
३) सदर अर्जात विरोधी पक्ष ही केवळ स्त्री असल्यास हा अर्ज बेकायदेशीर ठरतो.
४) कलम १२५ अर्जाची कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या अर्जास आडकाठी नाही. मात्र या अर्जातील पोटगीची रक्कम ठरविताना कलम १२५ च्या अर्जातील पोटगीचा विचार केला जातो.
अ‍ॅड. प्रीतेश देशपांडे  pritesh388@gmail.com
    

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी