07 April 2020

News Flash

सुरक्षिततेचा शोध

देव या संकल्पनेने माणसाला कितीही सुरक्षित वाटले तरी प्रत्यक्षात तो असुरक्षितच असतो. मानसशास्त्रीय सुरक्षिततेचा शोध जर माणसाला प्रत्यक्षात असुरक्षितच बनवत असेल तर माणूस अशी सुरक्षितता

| April 20, 2013 01:01 am

देव या संकल्पनेने माणसाला कितीही सुरक्षित वाटले तरी प्रत्यक्षात तो असुरक्षितच असतो. मानसशास्त्रीय सुरक्षिततेचा शोध जर माणसाला प्रत्यक्षात असुरक्षितच बनवत असेल तर माणूस अशी सुरक्षितता का शोधत असतो? अशा प्रकारची सुरक्षितता असते तरी का?
प्रत्येक सजीवामध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती उपजतच असते. जगण्याच्या धडपडीत स्वत:ला जिवंत ठेवणे या गोष्टीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. स्वत:च्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर त्या सजीवाची त्या धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू होते. धोका टळला की मग त्या सजीवाच्या बाकीच्या हालचाली सुरू होतात. जगण्यासाठी प्रत्येक सजीवाची अन्न ही प्राथमिक गरज आहे. प्रत्येक प्राणिमात्र सतत अन्नाच्या शोधात असतात; परंतु सुरक्षिततेला अन्नापेक्षाही अधिक प्राधान्य आहे. पक्ष्यांना जर अन्न दिले तर ते लगेच त्यावर तुटून पडत नाहीत. प्रथम ते इकडे तिकडे बघत, कोणत्याही प्रकारचा धोका तर नाही ना, याची खात्री करीत हळूहळू अन्नाच्या जवळ येतात व कोणताही धोका नाही याची खात्री पटल्यावरच अन्न खातात. जंगलात निवांतपणे चरणारी हरिणेदेखील जिवाला धोका निर्माण झाल्यानंतर चारा सोडून सरावैरा पळत सुटतात. स्वत:ला वाचविण्याच्या धडपडीतून प्राण्यांमध्ये अनेक प्रकारच्या क्षमता विकसित झालेल्या दिसतात. मनुष्य हादेखील प्राणीच असल्याने जगण्याची धडपड त्याच्यातही दिसून येते. त्यालाही सुरक्षिततेची आवश्यकता असते.
या पृथ्वीतलावर अस्तित्वात आल्यापासूनच माणसाची स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची धडपड सुरू आहे. लाखो वर्षांच्या अस्तित्वानंतरही मानवात असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती करणारा मानव मानसशास्त्रीय स्तरावर स्वत:ला अजूनही तसाच असुरक्षित समजतो, जसा लाखो वर्षांपूर्वी गुहेत राहणारा मानव समजत असे. इतक्या दीर्घ काळाच्या अस्तित्वानंतरही माणूस असुरक्षित का आहे?
इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचे वेगळेपण आहे ते त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मनुष्याने आपल्या विचारक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. त्यामुळेच आज मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वाधिक संख्येने अस्तित्वात असल्याचे दिसते; परंतु याच विचार करण्याच्या क्षमतेने सुरक्षिततेसंबंधी एक वेगळाच घटक मानवाच्या जीवनात आणला आहे.
मानवासाठी प्रत्यक्षात सुरक्षित असणे पुरेसे नाही, तर त्याला सुरक्षित वाटणेदेखील आवश्यक आहे. प्रत्यक्षात सुरक्षित असणे व आपण सुरक्षित आहोत असे वाटणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्याने भौतिक पातळीवर स्वत:ला कितीही सुरक्षित ठेवले तरी जोपर्यंत त्याला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत त्याची सुरक्षिततेसाठीची धडपड सुरूच राहते. याउलट प्रत्यक्षात सुरक्षित नसूनही माणसाला आपण सुरक्षित आहोत असे वाटू शकते व त्याची सुरक्षिततेसाठीची धडपड थांबू शकते. सुरक्षित असण्यापेक्षाही सुरक्षित वाटण्याला माणसाच्या जीवनात एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे?
विचार करण्याच्या क्षमतेने मानवाला भौतिक पातळीवर बव्हंशी सुरक्षित केले असले तरी मानसशास्त्रीय पातळीवर मात्र असुरक्षितच ठेवले आहे. एकदा आजार येऊन गेल्यानंतर, आपण पुन्हा आजारी तर पडणार नाही ना, या विचाराने माणसाला असुरक्षित वाटू लागते. आपले नेमून दिलेले काम कितीही चोखपणे केले तरी आपली नोकरी तर जाणार नाही ना, हा विचार माणसाला मानसशास्त्रीय पातळीवर असुरक्षित करतो. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी माणसाने कितीही संपत्ती गोळा केली तरी ही संपत्ती आपल्याला पुरेल ना, आपल्याजवळ ती टिकून राहील ना, असे विचार माणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. असा विचार करणाऱ्या माणसाजवळ कितीही संपत्ती असली तरी त्याला ती पुरी पडत नाही व संपत्ती गोळा करण्याचा त्याचा हव्यास तसाच सुरू राहतो. विचाराला आपल्या जीवनात प्रमुख स्थान देणारा मानव मानसशास्त्रीय पातळीवर सुरक्षित होऊ शकेल का?
माणसाने विविध गोष्टींमध्ये ही मानसशास्त्रीय सुरक्षितता शोधली आहे. ज्ञान, शारीरिक बळ, संपत्ती, विविध प्रकारच्या संकल्पना, विश्वास, श्रद्धा, अंधविश्वास, अन्य व्यक्ती, गुरू, देव, अशा अनेक गोष्टींमधून त्याने मानसशास्त्रीय पातळीवर सुरक्षित होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्याला सुरक्षित जरी वाटले असले तरीही प्रत्यक्षात तो असुरक्षितच झाला आहे. उदाहरणार्थ, माणसाने देव या संकल्पनेतून सुरक्षितता मिळविण्याचा केलेला प्रयत्न. अशा माणसासाठी प्रत्यक्ष देवापेक्षादेखील त्यासंबंधीची त्याची संकल्पना महत्त्वाची असते. कोणी तरी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आपली काळजी घेणारा आहे, आपले संरक्षण करणारा आहे, असा नुसता विचारदेखील खूप सुखावह असतो. अशा देवावर एकदा आपली जबाबदारी टाकली की माणूस वाटेल तसे जगायला मोकळा होतो. आपण काहीही केले तरी देव आपल्याला क्षमाच करेल, कारण तो दयावान आहे, करुणामय आहे, असा त्याचा विश्वास असतो. वाटेल तसे जगताना मग त्याला देवाची आठवणही होत नाही. परंतु तो जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तो देवाचा धावा करतो. देवाची स्तुती करून तो देवाला त्याच्या करुणामय स्वरूपाची आठवण करून देतो. इतकेच नव्हे तर विविध गोष्टी देऊ करून त्यांच्या मोबदल्यात तो स्वत:ची संकटातून मुक्तता करण्याची विनवणी करतो. इतके करूनही देव जेव्हा त्याची मदत करत नाही, तेव्हा असला देव काय कामाचा, असे म्हणून तो अन्यत्र सुरक्षितता शोधू लागतो. माणसाचा हा स्वभावविशेष दर्शविणारी एक रोचक गोष्ट आहे.
एकदा एक मनुष्य उंच कडय़ावरून खाली पडला. पडता पडता त्याच्या हाताशी झाडाची एक फांदी आली. त्याने फांदी पकडून स्वत:ला वाचवले तर खरे; परंतु तो तसाच लोंबकळत राहिला. धार्मिक प्रवृत्तीचा असल्याने त्याने देवाचा धावा सुरू केला. ‘देवा, मला वाचव. मी तुझा भक्त तुला पूर्णपणे शरण आलो आहे. मला यातून वाचव,’ असे तो मोठय़ाने ओरडू लागला. देवाला त्याची दया आली. देव मग त्याला म्हणाला, ‘भक्ता, मी तुला जरूर वाचवीन, तू फक्त ती धरून ठेवलेली फांदी सोड.’ परंतु त्या माणसाला ती फांदी सोडवेना व देवही त्याला वाचवेना. मग त्या माणसाने पुन्हा ओरडण्यास सुरुवात केली, की ‘अरे, यापेक्षा आणखी श्रेष्ठ देव नाही का, जो मला फांदी सोडायला न लावता वाचवू शकेल?’
विविध व्यक्तींच्या देवासंबंधीच्या संकल्पनादेखील विविध प्रकारच्या असतात. त्यात तुलना होऊन माझा देव तुझ्या देवापेक्षा श्रेष्ठ अशी भावना निर्माण होते व त्यातून मग माणसामाणसांत संघर्ष निर्माण होतो. आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष हा माणसाला प्रत्यक्षात असुरक्षितच बनवत असतो. म्हणून देव या संकल्पनेने माणसाला कितीही सुरक्षित वाटले तरी प्रत्यक्षात तो असुरक्षितच असतो. मानसशास्त्रीय सुरक्षिततेचा शोध जर माणसाला प्रत्यक्षात असुरक्षितच बनवत असेल तर माणूस अशी सुरक्षितता का शोधत असतो? अशा प्रकारची सुरक्षितता असते तरी का? मनुष्य पूर्णतया सुरक्षित असू शकतो का?
माणसाचे विचार हे बहुतेक स्वकेंद्रित असतात, स्वत:भोवतीच ते घोटाळत असतात. त्यातूनच मी आणि तू, आम्ही आणि ते असे विभाजन निर्माण होते जे संघर्षांला कारणीभूत होते. विचारांप्रमाणेच माणसाच्या भावना व हालचालीदेखील स्वकेंद्रित असतात. मला आलेला राग हा दुसऱ्याला आलेल्या रागापेक्षा महत्त्वाचा असतो, माझे दु:ख हे दुसऱ्याच्या दु:खापेक्षा मोठे असते, मला झालेला आजार हा दुसऱ्याच्या आजारापेक्षा अधिक त्रासदायक असतो. माणसाला स्वकेंद्रित नव्हे तर वस्तुस्थितीला धरून विचार करता येणे शक्य आहे का?
त्यासाठी आपल्याला विचाराचे स्वरूप, त्याच्या मर्यादा समजावून घ्यायला हव्यात. आणि हे आपण फक्त आपल्या रोजच्या जीवनाच्या अवलोकनाद्वारेच करू शकतो. रोजच्या जीवनात आपण कसे जगतो, कसा विचार करतो, विविध प्रकारच्या प्रक्रिया व प्रतिक्रिया आपल्या आत कशा तयार होतात, विविध परिस्थितींमध्ये आपण कसे वागतो आणि तसेच का वागतो, आपल्या संकल्पना, आपल्या बऱ्यावाईट समजुती, सवयी, दु:ख, चिंता, विविध प्रकारचे भावनिक उद्रेक, इत्यादी सर्व गोष्टींचे अवलोकनाद्वारे आकलन करून जेव्हा या सर्व गोष्टींचा आपल्या जाणिवेतून निचरा होऊ लागतो, तेव्हा तेथे एक रिक्तता, एक अवकाश निर्माण होतो. या अवकाशात मग एक वेगळाच आयाम उदित होतो. तो म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा ही स्वकेंद्रित नसते. ती पूर्णपणे वास्तवाधिष्ठित असते. ती विचाराचा अथवा भावनेचा परिणाम नसते किंवा मेंदूने लावलेला शोधही नसते. या तिन्ही घटकांना व्यापून ती त्यांच्याही पलीकडे असते. प्रज्ञा म्हणजे मानवी अस्तित्वाचा एक वेगळाच असा आयाम आहे, की ज्यामुळे विचार, भावना व शरीर यांच्यात सुसंगतता निर्माण होऊन ते आपापल्या स्वाभाविक जागी स्थिर होतात. या तिन्ही घटकांमध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन न राहिल्याने त्यातून कोणताही संघर्ष निर्माण होत नाही व मानवी अस्तित्वाला धोकाही पोहोचत नाही. प्रज्ञा ही वास्तवाभिमुख असली तरी दिलेल्या परिस्थितीत तिची नेमकी काय कृती असेल याचे भाकीत करता येत नाही. म्हणजेच विचाराद्वारे प्रज्ञेच्या कृतीचे अनुमान काढता येत नाही. मनुष्य जर आपले जीवन प्रज्ञापूर्वक जगला असेल तर ती प्रज्ञाच संकटसमयी योग्य ती कृती घडविते. अशा या प्रज्ञेतच मानवी जीवन पूर्णपणे सुरक्षित असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2013 1:01 am

Web Title: secure livelihood
टॅग Human
Next Stories
1 कस सुसंस्कृतपणाचा
2 शहाणी मुलगी
3 थेंब थेंब पाण्यासाठी
Just Now!
X