13 July 2020

News Flash

स्वत:ची ओळख

आपले मन नेहमी कशाने तरी व्याप्त असते. मुख्यत: समस्यांत, चिंतांत गुंतलेले असते. समस्या कितीही मोठी वा छोटी असली तरी मन चिंतांमध्येच गुंतले की समस्या सोडवू

| August 31, 2013 01:01 am

आपले मन नेहमी कशाने तरी व्याप्त असते. मुख्यत: समस्यांत, चिंतांत गुंतलेले असते. समस्या कितीही मोठी वा छोटी असली तरी मन चिंतांमध्येच गुंतले की समस्या सोडवू शकत नाही. जे मन रिक्त असते तेच समस्येचा समाचार घेऊन तिचा उलगडा करू शकते….
प्रश्न – आपल्याला स्वत:ला कसे जाणता येईल?
कृष्णमूर्ती- तुम्हाला तुमचा चेहरा माहीत आहे. कारण तुम्ही अनेकदा त्याचे आरशातले प्रतिबिंब पाहिले आहे. आता, तुम्ही स्वत:ला संपूर्णपणे ज्यात पाहू शकता असाही एक आरसा आहे- केवळ तुमचा चेहराच नव्हे तर तुमचे सर्व विचार, तुमच्या सर्व भावना, तुमचा हेतू, तुमचा हव्यास, तुमच्या प्रेरणा व भयही तुम्ही त्यात पाहू शकता. तो आरसा परस्पर संबंधाचा आहे.  हा परस्पर संबंध तुम्ही व तुमचे पालक यातला, तुम्ही व तुमचे शिक्षक यामधला, तुम्ही, ती नदी, ती झाडे, ही पृथ्वी यामधला, तुम्ही व तुमचे विचार यामधलाही असतो. परस्पर संबंध हा असा आरसा आहे की त्यात स्वत:ला तुम्ही कसे असावे तसे नव्हे, तर तुम्ही कसे आहात तसे पाहू शकता. एखाद्या साध्या आरशात पाहताना त्या आरशाने मी सुंदर आहे असे दाखवावे, असे मला वाटते. पण तसे घडत नाही, कारण आरशात मी जसा आहे तसाच दिसतो आणि मी स्वत:ला फसवू शकत नाही. त्याचप्रमाणे परस्पर संबंधाच्या आरशात मी स्वत: नेमका कसा आहे तसा स्वत:ला पाहू शकतो. मी लोकांशी कसा बोलतो- ज्यांच्यापासून मला काही मिळेल असे वाटते त्यांच्याशी अगदी विनम्रपणे व प्रेमाने बोलतो- हे मी अवलोकन करू शकतो. ज्यांना मी भितो त्यांच्याकडे मी लक्ष देतो. महत्त्वाचे लोक आत आले की मी उठून उभा राहतो; पण नोकर आला की मी लक्ष देत नाही. म्हणजे परस्पर संबंधातच मी माझे निरीक्षण केल्यामुळे मी लोकांना किती खोटा आदर दाखवितो ते मला कळून आले आहे, नाही का? त्याचप्रमाणे झाडांशी आणि पक्ष्यांशी, कल्पनांशी आणि पुस्तकांशी माझा काय संबंध असतो त्यातूनही मला माझा स्वत:चा शोध लागतो.
तुम्ही जगातील साऱ्या शैक्षणिक पदव्या मिळविल्या पण तुम्हाला जर स्वत:चे ज्ञान नसेल तर तुम्ही अत्यंत मूर्ख माणूस आहात. स्वत:ला जाणणे हाच मुळी एकंदर शिक्षणाचा उद्देश असतो. स्वत:ला जाणल्याशिवाय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नुसती माहिती गोळा करणे किंवा वहीत टिपणे काढणे, हे जगणे मूर्खपणाचे आहे. तुम्हाला भगवद्गीता, उपनिषदे, कुराण व बायबल यातून वचने उद्धृत करता येत असतील. पण तुम्हाला जर स्वत:चे ज्ञान नसेल तर तुम्ही पोपटासारखी नुसती तीच तीच बडबड करणारे व्हाल. याउलट ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला जाणण्यास प्रारंभ कराल, मग तो प्रारंभ जरी अगदी अल्पही असला तरी लगेच एक अलौकिक अशी सृजनाची प्रक्रिया चालू केली जाते. तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात, लोभी, भांडखोर, रागीट, हेवा करणारे, मूर्ख आहात हे अचानक लक्षात घेणे, हा एक शोधच असतो. वस्तुस्थिती तिच्यात बदल करण्याचा प्रयत्न न करता पाहणे, तुम्ही काय आहात तेच केवळ पाहणे हा मोठा आश्चर्यकारक साक्षात्कार असतो. तेथून मग तुम्ही कितीही अधिकाधिक खोल जाऊ शकता, कारण आत्मज्ञानाला अंत नसतो.
स्वत:ला जाणण्यातूनच तुम्ही ईश्वर म्हणजे काय, सत्य म्हणजे काय आणि कालविरहित अशी स्थिती  काय आहे याचा शोध घेऊ लागता. तुमच्या शिक्षकांना त्यांच्या शिक्षकांकडून मिळालेले ज्ञान ते तुम्हाला देऊ शकतील, परीक्षाही तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन पदवी मिळवाल आणि इतरही काही मिळवाल. पण तुमचा चेहरा आरशात जसा तुम्ही पाहता तसे तुम्ही स्वत:ला जाणल्याशिवाय इतर सर्व ज्ञानाला फारच थोडा अर्थ आहे.  याचा अर्थ असा की मनाचे व्यापार व भावना समजल्या पाहिजेत. परस्पर संबंधांच्या आरशात त्यांनी ते स्वत: नेमके कसे आहेत ते पाहिले पाहिजे. स्वत:ला जाणणे हाच सुज्ञतेचा प्रारंभ असतो. स्वत:ला जाणण्यातच सारे विश्व जाणता येते; मानवाच्या सर्व धडपडीशी ते निगडित असते.
प्रश्न – जर आपण आपल्या मानसिक चिंतांना कारणीभूत होणारी परिस्थिती टाळू शकत नसलो तर त्या चिंतांतून आपण कसे सुटणार?
कृष्णमूर्ती- त्या वेळी त्यांना तुम्ही तोंडच दिले पाहिजे, नाही का? चिंतेपासून सुटका व्हावी म्हणून तुम्ही सामान्यत: समस्येपासून पलायन करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही देवळात जाता किंवा सिनेमाला जाता, मासिक वाचता, रेडिओ ऐकता किंवा दुसरा विरंगुळा शोधता. पण पळून जाऊन समस्या सुटत नसते, कारण तुम्ही परत आलात की ती तशीच असते; मग सुरुवातीासूनच तिला तोंड का देऊ नये?
आता, चिंता म्हणजे काय? तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हाल की नाही याची तुम्हाला चिंता वाटते आणि तुम्ही उत्तीर्ण होणार नाही अशी भीतीही वाटतेच म्हणून तुम्ही त्यासाठी घाम गाळता, रात्र रात्र जागता. तुम्ही उत्तीर्ण झाला नाहीत तर तुमच्या पालकांची निराशा होईल आणि ‘‘बघा, मी करूनच दाखविले! मी परीक्षा उत्तीर्ण झालोच की नाही?’’ असे म्हणता यावे, असे तुम्हाला वाटत असते. अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत आणि तुम्हाला निकाल कळेपर्यंत तुम्ही चिंता करीत राहता. तुम्ही वस्तुस्थितीपासून पळून जाऊ शकता का, सुटू शकता का? तुम्ही तसे करू शकत नाही, होय की नाही? म्हणून तुम्ही तिला तोंडच दिले पाहिजे. पण त्याची चिंता कशाला करता?
मन हे काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का? मोठमोठय़ा तत्त्वज्ञ लोकांनी मनाचे स्वरूप तपासण्यात अनेक वर्षे घालविली आहेत आणि त्याविषयी पुस्तकेही लिहिली गेली आहेत. पण आपण जर त्याकडे आपले संपूर्ण अवधान दिले तर, मला वाटते, मन म्हणजे काय आहे ते शोधून काढणे पुष्कळसे सोपे आहे. तुम्ही कधी तुमच्या स्वत:च्या मनाचे अवलोकन केले आहे का? आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलात ते सर्व, तुमच्या छोटय़ा अनुभवांची, तुम्हाला तुमच्या पालकांनी व शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींची स्मृती, तुम्ही पुस्तकातून काय शिकलात व बाहेर जगात काय काय पाहिलेत त्यांची स्मृती, हे सर्व म्हणजे तुमचे मन होय. अवलोकन करणे, स्पष्ट निरीक्षण करणे, शिकणे, तथाकथित सद्गुणसंवर्धन करणे, कल्पना दुसऱ्यांना कळविणे, इच्छा करणे, भय वाटणे या सर्व गोष्टी मनच करते. मन हे तुम्ही वर वर पृष्ठभागावर पाहता तेवढेच नसते, तर तुमच्या मनाचे खोलवरचे अगम्य स्तरही त्यात असतात व तिथे वांशिक महत्त्वाकांक्षा, हेतू, प्रेरणा व संघर्ष दडलेले असतात. हे सारे म्हणजेच मन होय. त्यालाच जाणीव असेही म्हटले जाते.
तसेच मनाला व्याप्त होण्यास कोणता तरी विषय हवा असतो. उदाहरणार्थ, आई मुलाची काळजी करते, गृहिणी तिच्या स्वयंपाकघराचीच काळजी करते, पुढारी त्याच्या लोकप्रियतेबद्दल किंवा लोकसभेतील त्याच्या पदाबद्दल काळजी करतो. जे मन व्याप्त असते ते कोणतीही समस्या सोडविण्यास असमर्थ असते, हे तुमच्या लक्षात आले का? फक्त निर्विषय, रिक्त मनच समस्या समजून घेण्यासाठी ताजे टवटवीत असू शकते.
तुमच्या स्वत:च्याच मनाचे अवलोकन करा व ते किती अस्वस्थ असते ते पाहा. ते नेहमी कशाने तरी व्याप्त असते. कोणी तरी काल काय म्हणाला, तुम्ही आता काय शिकलात, उद्या तुम्ही काय करणार आहात, वगैरे अनेक गोष्टी त्यात असतात. ते रिक्त कधीच नसते- ते मन तुंबून राहिलेले असते. ते समस्येचा समाचार घेऊन तिचा उलगडा करू शकत नाही. त्यासाठी मन रिक्त असायला हवे. पण मन रिक्त असणे फार अवघड आहे. कधी तरी तुम्ही तुमच्या खोलीत किंवा बाहेर नदीकाठी निवांतपणे बसला असता, तेव्हा तुम्ही स्वत:चे निरीक्षण करा, म्हणजे आपण ज्या अवकाशाला, छोटय़ाशा ‘जागेला’मन म्हणतो, जाणीव म्हणतो, ते किती अविरतपणे, त्यात येऊन अवतरणाऱ्या अनेक विचारांनी व्याप्त झालेले असते ते तुम्हाला दिसून येईल. जोपर्यंत मन हे कशाने तरी भरून गेलेले, व्यापलेले असते- मग ते मन गृहिणीचे असो किंवा सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाचे असो- ते छोटे व क्षुद्रच असते आणि त्याने कोणत्याही समस्येचा समाचार घेतला तरी त्याला ती समस्या सोडविता येत नाही. याउलट जे मन व्याप्त नसते, ज्या मनात अवकाश असतो. ते मन समस्येला तोंड देऊन तिचा उलगडा करू शकते; कारण असे मन ताजे असते. ते समस्येचा नव्या दृष्टीने विचार करते, त्याच्या स्वत:च्या स्मृती व परंपरा यांचा जुनाट वारसा घेऊन विचार करीत नसते.
जे. कृष्णमूर्ती
(‘संस्कृतीचा प्रश्न’ या  कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2013 1:01 am

Web Title: self identification
Next Stories
1 शून्य विवाह
2 जपण्याचा जप, बाद करण्याचा नाद
3 वसा वंचितांच्या विकासाचा
Just Now!
X