सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
‘वेळेचे संयोजन’ (टाइम मॅनेजमेंट) हा खरे तर अयोग्य वाक्प्रचार आहे. वेळ कधीही आपल्या नियंत्रणात नसतो. प्रत्येकाला वेळ सारखाच मिळतो. प्रत्येकाला २४ तासच मिळतात. वेळेचे संयोजन नव्हे, तर वेळेच्या संदर्भात स्वत:चे नियोजन करणे असा वाक्प्रचार खरे तर हवा. वेळेवर आपले नियोजन नसले तरी स्वत:वर मात्र असू शकते. विद्यार्थीदशेत हे नियोजन गरजेचे आहे.
सध्याच्या जगात सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी व्यावसायिक पदवी आवश्यक झालेली आहे, ती मिळवण्यासाठी सर्व पालक आपल्या मुलांना शाळा-कॉलेजात पाठवितात. सध्या ज्ञानाभिसरणाची (किंवा ज्ञानवितरणाची) एकच पद्धत प्रचलित आहे आणि ती म्हणजे शिक्षक वर्गात येतो, लेक्चर देतो आणि मुले ऐकतात. अगदी ३-४ वर्षांच्या वयापासून ते २२-२३ वर्षांपर्यंत ही लेक्चरची मालिका अखंडपणे चालू असते. ज्ञानार्जनाचा याच्यापेक्षा चांगला पर्याय अजून तरी उपलब्ध नाही. ज्या वेगाने इंटरनेटची टेक्नॉलॉजी पुढे जात आहे, त्यानुसार काही पर्याय नजीकच्या भविष्यकाळात कदाचित निर्माण होतीलही; पण सध्या तरी शिक्षण-वर्ग-विद्यार्थी या पद्धतीला पर्याय नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विश्वाचा सर्वात जास्त वेळ लेक्चर ऐकण्यात जातो. तेव्हा, ही जी ज्ञानार्जनाची एकमेव पद्धत आपल्याला उपलब्ध आहे तिचा जास्तीत जास्त उपयोग जो करेल त्यालाच यश सहज प्राप्त होईल हे निश्चित. तेव्हा आजच्या लेखाचा विषयच मुळी लेक्चर्स कशा पद्धतीने ऐकली पाहिजेत हा आहे.       
        बऱ्याच लोकांना असे वाटते की, लेक्चर्स तर आमची मुले लहानपणापासून ऐकत आलेली आहेत. यात नवीन ते काय? पण शिक्षणाचे हे जे एकुलते एक माध्यम आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने फारच थोडी मुले करून घेतात. माझ्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर मी ही गोष्ट ठामपणे सांगू शकतो, की ९० टक्के मुले याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. प्राध्यापक किंवा कुठल्याही शिक्षकाने दिलेले लेक्चर याविषयी मुलांचे काय मत असते, हे जर जाणून घ्यायचे असेल तर ते या शब्दाचा कसा वापर करतात यावरून दिसून येते. उदा. जर आई मुलाला म्हणत असेल ‘किती वेळ टीव्ही बघतोस? अभ्यास कधी करणार? असेच जर चालू राहिले..’ यावर मुलगा उत्तरतो, ‘आई लेक्चर देऊ नकोस.’ यावरून त्याचे लेक्चरबद्दल मत लगेच स्पष्ट कळते. बहुतेक सर्व मुलांना लेक्चर म्हणजे असा एक अखंड शब्दप्रवाह जो शिक्षकाच्या तोंडून उगम पावतो आणि जो उजव्या कानातून जाऊन डाव्या कानातून बाहेर पडतो असा असतो.
माझे शिक्षक म्हणून दुर्दैव असे, की माझ्याकडे येणारे विद्यार्थी १० वी पास होऊनच येतात. त्यामुळे याविषयात जे काही नुकसान होणार असेल ते आधीच झालेले असते. ही मुले माझ्याकडे शिकायला येण्याआधी अगदी नर्सरीपासून ते १० वीपर्यंत जवळजवळ १२,००० लेक्चर्सना हजेरी लावून आलेली असतात. लेक्चर्स ‘अटेंड’ करण्याचा (शिकण्याचा नव्हे) त्यांना प्रचंड अनुभव असतो. या अनुभवातून त्यांना लेक्चर्स अटेंड करण्याचे विशिष्ट कौशल्य प्राप्त झालेले असते. या कौशल्याचे त्यांनी विज्ञानात रूपांतर केलेले असते. जसे न्यूटनचे गतीविषयक तीन नियम असतात, तसे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी त्यांनीही स्वत:चसाठी कळत-नकळत दोन नियम केलेले असतात. पहिला नियम वर्गात हाताची घडी घालून चूप बसायचे. चेहऱ्यावर कुठल्याही भावना दिसता कामा नयेत. चेहरा शक्य तितका भावनाहीन हवा. नियम क्र. दोन म्हणजे जसजसे लेक्चर पुढे सरकते, शंकामागून शंका निर्माण व्हायला लागतात. असे झाले तर दुसरा नियम लागू होतो तो म्हणजे, इकडे-तिकडे बघायचे. कोणी दुसरा विद्यार्थी शंका विचारतोय का याचा कानोसा घ्यायचा; जर कोणीच काही विचारत नसेल तर एक गोष्ट सरळ आहे, या सर्व वर्गात मीच काय तो मूर्ख माणूस आहे आणि मी जर काही विचारले तर सगळ्या जगाला माझा मूर्खपणा कळेल. तेव्हा शहाणपण गप्प बसण्यातच आहे. थोडक्यात, आता तो विद्यार्थी अतिशय शहाणा ‘मूर्ख’ असतो. त्याला एक गोष्ट कळत नाही की वर्गात बसलेले सगळेच अतिशय शहाणे ‘मूर्ख’ आहेत. कोणालाच काही कळत नाही, पण सगळे गप्प आहेत. कारण १६-१७ वर्षांच्या मुलांना आपण दुसऱ्यांसमोर किती स्मार्ट आहोत हे दाखविण्यात जास्त इंटरेस्ट (रस) असतो. मग आपल्याला काही कळले नाही तरी बेहत्तर!
थोडक्यात म्हणजे, हे विद्यार्थी त्यांचे विद्यार्थीपण विसरलेले असतात. त्यांना वर्ग म्हणजे स्वत: किती स्मार्ट आहोत याविषयी गैरसमज पसरवण्याचे एक माध्यम वाटते. पण प्रत्येक ५०-६० विद्यार्थ्यांच्या वर्गात २-३ अपवाद असतातच. त्यांचे हात आपोआप वर जातात. तसे घडले की इतर मुलं त्यांना हसतात, टोमणे मारतात. ‘विचार, विचार, बघ हा आता सरांना कसं पकवतो!’ या तऱ्हेचे रिमार्क्‍स ऐकावे लागतात. पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हा मुलगा प्रश्न विचारतो. त्याला जेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते तेव्हा सगळे त्याला हसतात, पण मनातल्या मनात खूश होतात. ‘बरे झाले याने विचारले. मलाही हीच शंका सतावत होती.!’ थोडक्यात तो विद्यार्थी हा समाजसेवकच असतो. प्रश्न एकच असतो, पण उत्तरं मात्र उपस्थित विद्यार्थी संख्येने गुणल्यानंतर जेव्हढी होतील तेवढी असतात. त्या मुलाला एक माहित असते, की शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि शंका निवारण करण्याचा मला मूलभूत हक्क आहे, तो मी बजावणारच. त्या बद्दल इतर मुलं मला कुत्सितपणे हसतील किंवा इतरांच्या नजरेतून माझा मूर्खपणादेखील सिद्ध होईल. परंतु ही रिस्क मी घ्यायला तयार आहे. पण मला वाटणाऱ्या शंकेचे समाधान झाल्याशिवाय घरी जाणे मला परवडणार नाही. आणि विद्यार्थी म्हणून हे माझे प्रथम कर्तव्य आहे. हा विद्यार्थी विद्यार्जनासाठी तेथे बसलेला असतो. आणि बाकीचे सगळे लेक्चर्स ‘अटेंड’ करत असतात. जर एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी असतील आणि प्रत्येकाने ठरवले की मी कमीतकमी एकतरी प्रश्न विचारेन; तर प्रश्न ५० असतील, पण उत्तरे मात्र ५०x५०=२५०० असतील. म्हणजे शिक्षक तोच, विद्यार्थी तोच, तोच विषय, तोच वर्ग परंतु शिक्षणाची पातळी मात्र २५०० पटीने वाढलेली असेल. आपल्यातला एक छोटासा बदल प्रचंड परिणामकारक असू शकतो. प्रत्येक पालकाने जेव्हा विद्यार्थी घरी येतात तेव्हा त्यांना एकच प्रश्न विचारायला हवा, ‘आज वर्गात किती प्रश्न विचारलेस?’
आजकालच्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारणपणे एकच तक्रार असते. मी जेव्हा वेळेच्या संयोजनाबद्दल (टाइम मॅनेजमेंट) कार्यशाळा घेतो, तेव्हा त्यांची एकच तक्रार असते, ‘सर, आमच्याकडे अभ्यासाला वेळच नसतो. कारण ३ तास कोचिंग क्लासमध्ये जातात. ७-८ तास कॉलेजमध्ये, जाण्यायेण्यात २ तास जातात. किमान ७ तास झोपेत जातात. तेव्हा अभ्यासाला वेळ असा मिळतच नाही.’ पालकांना देखील त्यांचे म्हणणे योग्य वाटते. त्यांचीही तीच तक्रार असते. पण मी मुलांना विचारतो,‘तू क्लासला का जातोस?’ ‘म्हणजे काय सर? अभ्यासासाठी’ म्हणजे ८ तास कॉलेजमध्ये व ३ तास क्लासमध्ये असे ११ तास तू अभ्यासासाठी घालवतोस, तरीदेखील तुला अभ्यासाला वेळ मिळत नाही यात थोडा विरोधाभास आहे असे नाही कां तुला वाटत?’ तेव्हा तो मुलगा अंतर्मुख होतो. याचा अर्थ वरवर पहाता त्याने हे जे ११ तास अभ्यासासाठी घालवले त्यात खऱ्या अर्थाने त्याचा अभ्यास होतच नाही. तो का होत नाही या कारणांकडे आपण नंतर बघू या, पण एक गोष्ट निश्चित की आपल्या आयुष्यातले अत्यंत बहुमुल्य असे ११ तास जर रोज असेच वाया जात असतील या वेळेच्या अपव्ययाचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागणार. कारण वेळ हा तीराप्रमाणे एकाच दिशेने झेपावत असतो. गेलेला वेळ कधीच परत येणार नसतो. ‘वेळेचे संयोजन’ (टाईम मॅनेजमेंट) हा खरे तर अयोग्य वाक्प्रचार आहे. वेळ कधीही आपल्या नियंत्रणात नसतो. प्रत्येकाला वेळ सारखाच मिळतो. प्रत्येकाला २४ तासच मिळतात. वेळेचं संयोजन नव्हे, तर वेळेच्या संदर्भात स्वत:चे नियोजन करणे असा वाक्प्रचार खरे तर हवा. वेळेवर आपले नियोजन नसले तरी स्वत:वर मात्र असू शकते.
शिक्षक म्हणून मला किंवा इतरही सर्व शिक्षकवर्गाला हा अनुभव आलाच असेल, की कुठल्याही वर्गात साधारणपणे तीन प्रकारची मुले असतात. पहिल्या वर्गातल्या मुलांना मी पॅसिव्ह म्हणतो. किंवा ज्यांना निर्विकार हा शब्द जवळचा आहे. ही मुलं वर्गात येतात कारण त्यांच्या पालकांना ती घरी नको असतात. त्यांना शिक्षणात काहीही रस नसतो. त्यांच्यात आणि फळ्यामध्ये एक प्रकारचे अपकर्षण (रिपल्सिव्ह फोर्स) असते. त्यामुळे ही मुलं फळ्यापासून शक्य तितक्या दूर जाण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच अशी सगळी मुले विद्युतकणांसारखे शेवटच्या बाकावर जमा होतात. त्यांचा स्वत:चा एक क्लब तयार होतो. कुठल्याही क्लबला स्वत:ची अशी एक कार्यक्रम पत्रिका असते, त्यात ते मश्गुल असतात. दुसरा वर्ग म्हणजे अ‍ॅक्टिव्ह मुलांचा किंवा क्रियाशील व आज्ञाधारक मुलांचा. ही मुले अतिशय सिन्सीयर असतात. त्यांच्या दृष्टीने शिक्षक म्हणजे देव. तो ज्ञानाच्या उच्च पातळीवर असतो आणि आपण जर त्याच्याजवळ बसलो तर विद्युत प्रवाहाप्रमाणे ज्ञान उच्च पातळीवरून आपल्या पातळीपर्यंत धावत येईल आणि आपल्याला देखील शिक्षकांइतकीच ज्ञानप्राप्ती होईल. म्हणून ते पहिल्या बाकावर बसण्याची धडपड करतात. ते अतिशय आज्ञाधारक असतात. शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचं तंतोतंत पालन करतात. पण शिक्षण म्हणजे फक्त आज्ञापालन नव्हे. शिकण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. त्यासाठी स्वत:हून साधकबाधक विचार करावा लागतो. ज्याला याची सवय नसते त्याला तो मानसिक छळच वाटतो. आणि त्याची तशी तयारी नसेल तर खऱ्या अर्थाने ही एक शिक्षाच. फक्त वह्य़ांच्या आणि त्यामध्ये घेतलेल्या टिपणाची, आपण अ‍ॅटेन्ड केलेल्या लेक्चर्सचे एक पावती पुस्तक त्यांच्याकडे शिल्लक रहाते. याच वर्गामध्ये तिसऱ्या प्रकारची मुलं असतात. त्यांना मी ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह’ म्हणतो. ही मुलं अतिस्मार्ट असतात. ते देखील पुढच्या बाकांवर बसण्याचा प्रयत्न करतात.  त्यांच्या दृष्टीने शिक्षक काही देव वगैरे नसतो. त्यांना माहित असते, की तो देखील आपल्यासारखाच माणूस आहे. एकाच बाबतीत तो आपल्यापेक्षा वेगळा आहे, कारण तो आपल्या बऱ्याच आधी जन्माला आलेला आहे. त्यामुळे त्याला काही गोष्टींची माहिती आहे जी आपल्याला नाही आणि ती जर मिळवायचाी असेल तर त्याचे लेक्चर ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही. पण तो माणूसच आहे. आणि मानव हा स्खलनशील प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या चुका होणारच. माझे काम त्याच्या चुका शोधणे हे आहे. परंतु एखादा शिक्षक जो २० वर्षांपासून शिकवत आहे, त्याच्या चुका काढणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्याला आधीच तयार होऊन यावं लागतं. त्याचा विचारांचा वेग शिक्षकापेक्षा अधिक असावा लागतो. शिक्षकाने केलेले प्रत्येक विधान ही मुलं साधकबाधक तऱ्हेचा विचार करूनच स्वीकारतात. न पटल्यास पटकन प्रश्न विचारतात. शिक्षकांनी दिलेल्या उत्तरांनी समाधान न होता ते स्वत: त्यापेक्षा चांगले उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू शिक्षकांचे सगळे लक्ष ते स्वत:कडे आकर्षून घेतात. ते लेक्चर लेक्चर रहातच नाही, तर तो शिक्षक आणि तो विद्यार्थी यांच्यातला एक व्यक्तिगत सुसंवाद होऊ लागतो. आणि तो वर्ग हा वर्ग न रहाता त्याचे एका स्टेडियममध्ये रुपांतर होते. बाकीची सगळी मुलं स्टेडियममध्ये बसून बघ्याची भूमिका घेतात. ते शिक्षक आणि मुलामध्ये चाललेला शिक्षण नावाचा खेळ फक्त बघत राहातात. आपणही कधी तरी हा खेळ खेळू. सध्यातरी फक्त बघायची मजा घेऊ या, असे विचार करतात. प्रत्येक पालकाला याचा विचार करायला हवा, की १०/१२ वर्ष आपली मुलं शाळेत जातात ज्ञानार्जनासाठी, पण खरोखर ते स्टेडियममधले प्रेक्षक आहेत, की शिक्षणाच्या खेळात सहभाग घेत आहेत. जोपर्यंत ते स्टेडियममधून खालती उतरून खेळात खेळाडू म्हणून सहभाग घेत नाहीत तोपर्यंत त्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरीच असणार आहे.