18 February 2020

News Flash

आत्मशोधन

माणसात आंतरिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आत्मशोधनाची आवश्यकता आहे.

| September 21, 2013 01:01 am

माणसात आंतरिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आत्मशोधनाची आवश्यकता आहे. आत्मशोधन म्हणजे आत्म्याचा शोध घेणे नव्हे; तर आपल्या दैनंदिन जीवनातून आपल्या बाह्य तसेच आंतरिक अस्तित्वाचा शोध घेणे होय.
एका गावात देवावर नितांत श्रद्धा असलेला एक ख्रिश्चन धर्मगुरू राहत होता. आपला देव आपले सर्व प्रकारच्या संकटातून रक्षण करील यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. एकदा त्या गावाजवळील नदीला पूर येऊन पुराचे पाणी गावात घुसले. गावातील लोकांनी गाव सोडून सुरक्षित जागी आसरा घेण्यास सुरुवात केली. त्यातील काही लोक धर्मगुरूकडे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आले; परंतु ‘माझा देव माझे रक्षण करील, तुम्ही चिंता करू नका’, असे म्हणून त्याने त्यांच्याबरोबर जाण्याचे नाकारले. पुराच्या पाण्याने चर्च वेढून गेले. तो धर्मगुरू चर्चच्या छतावर जाऊन बसला. पुन्हा काही गावकरी एक मोठी नाव घेऊन धर्मगुरूकडे आले व त्यांनी त्याला सुरक्षित जागी येण्याची विनंती केली; परंतु ‘माझा देव माझे रक्षण करील’, असे म्हणून त्याने पुन्हा त्यांच्याबरोबर जाण्याचे नाकारले. आता पुराचे पाणी खूपच वाढले. तो धर्मगुरू चर्चच्या घंटेच्या मनोऱ्यावर जाऊन बसला. त्या धर्मगुरूची चिंता वाटणाऱ्या गावकऱ्यांनी त्याच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरसह एक मदतपथक पाठवले, पण देव आपले रक्षण करील अशी दृढ श्रद्धा असणाऱ्या त्या धर्मगुरूने त्यांच्याही बरोबर जाण्याचे नाकारले. शेवटी व्हायचे तेच झाले. तो धर्मगुरू पुराच्या पाण्यात वाहून गेला. एक देवभक्त श्रद्धाळू म्हणून जेव्हा त्याने स्वर्गात प्रवेश केला तेव्हा तो रागाने थरथरत होता. त्याच्या देवाने त्याचा विश्वासघात केला होता. त्याने जेव्हा देवाला याचा जाब विचारला, तेव्हा देव हसून त्याला म्हणाला, ‘अरे, तुला वाचवण्याचा मी तीनदा प्रयत्न केला. एकदा लोकांना पाठवून, नंतर होडी पाठवून व शेवटी हेलिकॉप्टर पाठवून. पण तू एवढा श्रद्धांध झाला होतास, की तुला वाचवण्याचे माझे सर्व प्रयत्न फोल ठरले.’
श्रद्धा म्हणजे अशा गोष्टीला सत्य मानणे, की जी कदाचित खरीही असणार नाही. याचाच अर्थ असा, की मानलेली गोष्ट प्रत्यक्षात तशीच आहे किंवा नाही याचा शहानिशा न करता ती तशीच आहे असे समजणे. श्रद्धाळू मन हे त्याच्या श्रद्धा-विषयावर चटकन विश्वास ठेवते. परीक्षण करणे, शंका घेणे, प्रश्न करणे, सत्यासत्यतेचा पडताळा घेणे हे त्याच्या गावीही नसते. उलट असे करणे म्हणजे श्रद्धा डळमळीत होणे असे ते मानते. खरेच, मनुष्य श्रद्धाळू का बनतो? माणसाला श्रद्धेची काय आवश्यकता आहे?
ज्या गोष्टीसंबंधी आपल्या मनात स्पष्टता असते, ज्या गोष्टीचे आपल्याला व्यवस्थित आकलन झालेले असते, त्या गोष्टीच्या बाबतीत श्रद्धेचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण असे कधी म्हणत नाही, की न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर माझी पूर्ण श्रद्धा आहे; म्हणून वर फेकलेली गोष्ट ही खाली येणारच. किंवा सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे; म्हणून उद्यादेखील तो पूर्व दिशेलाच उगवणार. याचा अर्थ असा होतो, की ज्या गोष्टीचे आपल्याला यथार्थ आकलन झालेले नाही अशा गोष्टीविषयी ठाम कल्पना बनवणे व ती गोष्ट आपण बनवलेल्या कल्पनेप्रमाणेच आहे असे समजणे म्हणजे श्रद्धा ठेवणे होय.
मानवी संस्कृतीत विज्ञानाचा उदय होण्यापूर्वी अस्तित्वासंबंधीच्या मानवाच्या सर्व संकल्पना या विविध धर्मानी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे व त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांप्रमाणे होत्या. त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न न करता श्रद्धा ठेवणे अपेक्षित होते. जर कोणी त्या श्रद्धेविरुद्ध आवाज उठवला तर त्याला त्याची शिक्षा दिली जायची. अशा प्रकारे मानवी नतिकता व धार्मिकता ही भयाधिष्ठित होती. परंतु जसजसे विज्ञान विकसित होऊ लागले व त्याच्या आधारे निसर्गातील घडामोडींचे मानवाला आकलन होऊ लागले व त्यावर थोडय़ाफार प्रमाणात त्याला नियंत्रण करता येऊ लागले, तेव्हा त्याचे निसर्गासंबंधीचे भय कमी झाले. विज्ञानाने त्याच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण केला व त्याला पूर्वीच्या धर्मकल्पना व नियमांवर श्रद्धा ठेवण्याची आवश्यकता उरली नाही. मानवाने विज्ञानाची कास धरली व त्याचे बाह्य जीवन झपाटय़ाने बदलू लागले. आजच्या मानवाच्या जीवनाकडे आपण जर बघितले तर आपल्याला दिसून येईल, की मानवातील आत्मविश्वासाची जागा आता हळूहळू बेदरकारपणा घेऊ लागला आहे. या जगात किंवा सूर्यमालेतदेखील आम्ही काहीही करू शकतो व आम्हाला त्याचा जाब विचारणारे कोणीही नाही अशी त्याची धारणा होऊ लागलेली दिसते. परंतु विज्ञान ही सर्व मानवी समस्यांची गुरुकिल्ली आहे असे मानणे, हीदेखील एक अंधश्रद्धाच आहे. कारण विज्ञानाने बाह्य मानवी जीवन बदललेले असले तरी मानवाचे आंतरिक जीवन अजूनही तसेच आहे. त्याच्या मानसिकतेतील भय, क्रोध, िहसा, इत्यादी अजूनही पूर्वीप्रमाणेच आहेत. अजूनही त्याचे मन श्रद्धाळूच आहे. श्रद्धेचे विषय फक्त बदललेले आहेत. विज्ञानाची कास धरणारा माणूस त्याच्या आयुष्यात संकट उद्भवले की लगेच श्रद्धाळू बनतो. इतर वेळी वेडगळ वाटणाऱ्या गोष्टीही तो या काळात सहजपणे करावयास तयार होतो. माणसाला खरोखरच श्रद्धेची आवश्यकता आहे का?
मानवी मेंदू हा पूर्ण सुरक्षिततेचे व्यवस्थित कार्य करू शकतो- केवळ शारीरिक सुरक्षितताच नव्हे, तर मानसिक सुरक्षिततादेखील. माणसाचे मन जर असुरक्षिततेच्या भावनेने पूर्णपणे ग्रासलेले असेल तर तर्कशुद्ध विचार करण्याची त्याची क्षमता कुंठित होते; तो िहसक बनतो व इतरांसाठी धोकादायक ठरतो. म्हणूनच मानसिकरीत्या माणसाला सुरक्षित वाटणे हे अन्न-वस्त्र-निवारा याइतकेच आवश्यक आहे. श्रद्धा ही कितीही भ्रामक व वस्तुस्थितीला सोडून असली तरी ती जोपर्यंत माणसाला मानसिक सुरक्षितता देत असते तोपर्यंत माणूस ती सोडणे शक्य नाही. संघर्ष, स्पर्धा, द्वेष, भय, असुरक्षिततेची भावना, इत्यादी गोष्टींवर आधारित या मानवी जगात देवासारखा सर्वशक्तिमान, दयाळू, क्षमाशील व प्रत्येक माणसाला पूर्णपणे समजून घेणारा, न्यायप्रिय, सर्व परिस्थितीत आपले रक्षण करणारा, आपले कल्याण करणारा असा कोणीतरी आहे ही कल्पनाच इतकी लोभस व पूर्ण मानसिक सुरक्षितता देणारी आहे, की भयाने झपाटलेला माणूस देव व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व संकल्पनांवर श्रद्धा ठेवू लागला तर त्यात नवल काय? या ठिकाणी आपण देव आहे किंवा नाही यासंबंधी कोणत्याही निष्कर्षांप्रत येत नाही आहोत. देव जर खरोखरच असेल तर तो निश्चितच भयग्रस्त मनाने निर्माण केलेल्या त्याच्या संकल्पनेपेक्षा वेगळा असेल.
अंधश्रद्धेचे निर्मूलन करणे म्हणजे लोकांच्या श्रद्धांना तडा पोहोचवणे नव्हे. कारण कोणाचीही श्रद्धा हिरावून घेणे म्हणजे त्याला मानसिकरीत्या असुरक्षित करणे होय. असा असुरक्षित माणूस आक्रमक व िहसकच होण्याची अधिक शक्यता असते. अंधश्रद्धेपासून मुक्त व्हायचे असेल तर मुळातच माणूस श्रद्धावान का बनतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिकरीत्या सुरक्षित वाटेल असे वातावरण जगात निर्माण करणे आवश्यक आहे; परंतु मानवाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत असे वातावरण निर्माण होणे अशक्य आहे. कारण बाह्यत: कितीही बदल केले तरी मुळातच मानसिकरीत्या भयग्रस्त व असुरक्षित माणूस आपल्या आतील हे घटक बाहेर प्रक्षेपित केल्याशिवाय राहणार नाही.
माणसात आंतरिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आत्मशोधनाची आवश्यकता आहे. आत्मशोधन म्हणजे आत्म्याचा शोध घेणे नव्हे; तर आपल्या दैनंदिन जीवनातून आपल्या बाह्य तसेच आंतरिक अस्तित्वाचा शोध घेणे होय. असा शोध आपल्या दैनंदिन जीवनात नित्य चालत असलेल्या बाह्य तसेच आंतरिक घडामोडींच्या अवलोकनातूनच शक्य आहे. असे अवलोकन म्हणजे नातेसंबंधांच्या आरशातून स्वत:कडे जसेच्या तसे बघणे- कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय, विचाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय. अशा अवलोकनात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा, विश्वास, अविश्वास किंवा अंधविश्वास यांना कोणतेही स्थान नसते. किंबहुना त्यांचा कोणताही स्पर्शदेखील तेथे असत नाही. तेथे असते फक्त अस्तित्वाचे निखळ वास्तव. अशा अवलोकनातूनच आपल्या अस्तित्वाचे सूक्ष्म स्तर उलगडत जातात व दृग्गोचर होऊ लागतात. आपल्या अस्तित्वाच्या या अनोख्या आयामाच्या दर्शनाने आपल्या जीवनाला एक वेगळेच महत्त्व, एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तो विचाराने लावलेला अर्थ नसतो तर जीवनाच्या सखोलतेतून स्वयंप्रकटित झालेला असतो. असा हा अर्थपूर्ण जीवनस्पर्श म्हणजे निखळ प्रेम होय. हे प्रेम म्हणजे विचाराने आपल्या आसक्तीतून निर्माण केलेले प्रेम नव्हे. कारण आसक्तीतून निर्माण झालेले प्रेम हे आंधळे असते, श्रद्धाळू असते. जीवनाच्या सखोल स्पर्शाने निर्माण झालेले प्रेम हे डोळस असते. त्यात कोणत्याही गोष्टीच्या यथार्थ आकलनाची क्षमता असते व म्हणूनच ते प्रज्ञावान असते. जीवनात जेव्हा अशा प्रेमाचा उदय होतो, तेव्हा जीवनातील सर्व संघर्ष, सर्व असुरक्षितता संपुष्टात येते. जीवनातील सर्व नीरसता, सर्व कंटाळा नाहीसा होऊन ते अस्तित्वाच्या आनंदलहरींनी रसरसून जाते. परंतु या सर्वाप्रत प्रत्येकाने स्वत:च्या अवलोकनातूनच यायचे असते. दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्यावर विश्वास ठेवणे अथवा कोणत्याही परीक्षणाशिवाय ते स्वीकारणे म्हणजे आणखी एका अंधश्रद्धेला जन्म देणे होय.
किशोर खैरनार,
संचालक, कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्ट.
संपर्क – kkishore19@gmail.com

First Published on September 21, 2013 1:01 am

Web Title: self purification
Next Stories
1 भय केव्हाच संपले आहे
2 आंबा, आम्रखंड ते मॅगो डेझर्ट
3 मन मनास उमगत नाही..
Just Now!
X