तो विचित्र वा वल्लीच म्हणावा असा! आमचा कार्यालयीन सहकारी, पण कोणाशी बोलणं नाही, कोणाच्यात मिसळणं नाही. कोणी बोलायचा प्रयत्न केला तर पटकन तोडून टाकणारा. ‘तुम्ही निघताय का? मला खूप कामं आहेत’ असं तो जरा उंच स्वरातच बोलायचा. त्याच्या स्वभावामुळे असेल, पण कुणीच त्याच्याशी फारसं बोलायला जायचं नाही.
किती प्रकारचे स्वभाव असतात नाही माणसांचे. रागीट, शांत, अबोल, आनंदी, बडबडय़ा, मिस्कील, संतापी, कितीतरी प्रकार. त्यात मनस्वी स्वभाव असलेली माणसं, खरंतर त्यांना विचित्रच म्हणायला हवं. जे त्यांच्या मनात, डोक्यात असेल तेच करतील. कुणाशी गप्पा नाही, संवाद नाही, कुणाशी सल्लामसलत नाही, तडजोड नाही. नाही म्हणजे नाही.
आता हेच पाहा ना..
सरकारी ऑफिसमध्ये काम करणारा मी. सरकारी पद्धतीनेच कामं चालायची. कधी नवीन क्लार्क्‍स वगैरे यायचे, बदली वगैरे होऊन. हळूहळू आमच्याप्रमाणेच सगळय़ात सामावून जायचे, पण विजय आमच्या इथे आला आणि इथली नेहमीची प्रथा मोडली गेली. म्हणजे त्याचं असं झालं की, तो अजिबात आमच्यामध्ये मिसळला नाही. सामील झाला नाही. सुरुवातीस आम्हाला वाटलं, नवीन आहे, इथे बुजला असेल, स्वभाव लाजरा असेल, संकोची असेल. पण तसं झालं नाही. चार-पाच महिने झाले तरी तो तसाच होता, म्हणजे कामापुरतं बोलणं होई तेवढंच, अगदी साहेबांशीसुद्धा! लंच टाइममध्येसुद्धा एकटाच कोपऱ्यात बसून डबा खाई. आमच्यातल्या काही जणांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण नाही. ऑफिसमध्ये कधीतरी आम्ही वर्गणी काढून खाण्यापिण्याची पार्टी करत असू. विजय पैसे द्यायचा, पण पार्टीत सहभागी व्हायचा नाही. मग आम्हीच त्याची डिश भरून त्याच्या टेबलवर नेऊन ठेवायचो, मग तो एकटा खायचा.
विजय कामात एकदम वक्तशीर होता. कधी रजा नाही, उशीर नाही, लवकर पळणं नाही, कन्सेशन नाही. आम्हाला आश्चर्य वाटायचं, असा कसा हा? बरं, त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमीदेखील माहीत नव्हती. एवढंच कळलं होतं, की वडील वारल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर त्याला इथे नोकरी मिळाली होती नि त्याचं लग्न झालं नव्हतं.
एक दिवस अचानक तो हेडक्लार्कच्या टेबलासमोर उभा असलेला दिसला. आम्हा सर्वानाच आश्चर्य वाटलं. त्यांच्याशी तो काहीतरी बोलला आणि ऑफिसमधून बाहेर पडला. चौकशीनंतर कळलं की त्याने दोन तास बाहेर जाण्याची परवानगी मागितली होती आणि हेडक्लार्कनी ती दिली होती. काही विशेष कारण आहे का, असं विचारलं तर ‘जरा, खासगी काम आहे’ एवढंच त्रोटक उत्तर दिलं.
कामाच्या गडबडीत आम्ही नंतर ते विसरूनही गेलो. विजयच्या टेबलाकडे सहज नजर गेली तर तो काम करत असलेला दिसला. म्हणजे तो गेला केव्हा नि आला केव्हा तेही कळले नाही.
दुसऱ्या दिवशी हेडक्लार्कने आम्हा सर्वाना एकत्र बोलावून एक बातमी सांगितली. बातमी अशी होती की, काल दुपारी विजय दोन तासाकरिता बाहेर गेला होता. तेवढय़ा दोन तासांत तो ‘लग्न’ करून आला होता! कोर्ट मॅरेज! अर्थात विजयने सकाळी आल्यावर पी.एफ. नॉमिनेशन अर्ज भरून दिला होता व त्यात वारसदार म्हणून त्याने त्याच्या पत्नीला नेमलं होतं नि सोबत मॅरेज सर्टिफिकेट जोडलं होतं, त्यावर कालचीच तारीख होती.

अर्थात आम्ही सर्वानी त्याचं अभिनंदन केलं. त्याने अत्यंत माफक हसत नि विशेष काही घडलं नाही अशा आविर्भावात ते स्वीकारलं! लग्नासारखी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना इतक्या तटस्थपणे स्वीकारणे साधी गोष्ट आहे? पण अशी माणसे असतात!
दुसरी व्यक्ती तर अधिकच विचित्र वा वल्लीच म्हणावी अशी! आमचा कार्यालयीन सहकारी, पण कोणाशी बोलणं नाही, कोणाच्यात मिसळणं नाही. कोणी बोलायचा प्रयत्न केला तर पटकन तोडून टाकणारा. ‘तुम्ही निघताय का? मला खूप कामं आहेत’ असं तो जरा उंच स्वरातच बोलायचा. त्याच्या स्वभावामुळे असेल किंवा माहीत नाही, पण लग्नानंतर वर्षभरातच त्याचा घटस्फोट झाला. घरी त्याचे वयस्कर वडील आणि तो असे दोघेच. बाप-लेकाचा डबा यायचा दोन्ही वेळेस. वडील घरी असायचे की काम करायचे काही कल्पना नव्हती, पण सोसायटीतदेखील कोणाशी संबंध नव्हता. वडील-मुलगा आपापसात तरी बोलत असत की नाही याचीदेखील शंकाच होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ कसा घालवत असतील याचं गूढ वाटायचं. तसा तो कामात व्यवस्थित होता, पण चिडका असावा असं वाटायचं. कधी दांडी नाही, रजा नाही, त्याच्या कॅज्युअल लीव्हसुद्धा वाया जायच्या.
एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये त्याचा फोन आला की त्याला यायला थोडासा, तास- दोन तास उशीर होईल. त्याच्या फोनचंही आम्हाला आश्चर्य वाटलं. सांगितल्याप्रमाणे तो दोनेक तासांनी उशिरा आला.
‘‘आज उशीर झाला. काही काम होतं का महत्त्वाचं?’’ हेडक्लार्कनी थोडय़ाशा आपुलकीने विचारलं.
त्याने जे सांगितलं त्यामुळे आम्ही सगळेच हादरलो. त्याने सांगितलं, ‘सकाळीच वडिलांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून जवळच्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर त्यांना तपासत असतानाच वडिलांना तीव्र हार्टअ‍ॅटॅक आला आणि ते गेले. कोणाला काही कळवायचा प्रश्नच नव्हता. आणि कोणी येऊन तरी काय करणार? आणि सकाळीच कळवणं म्हणजे सर्वाचीच पंचाईत होणार. त्यामुळे शववाहिका बोलावली, विद्युत दाहिनीत जाऊन सर्व उरकून आलो.’ एवढे सांगून तो शांतपणे आपल्या टेबलापाशी जाऊन कामाला लागला.
या दोन्ही व्यक्तींना काय म्हणणार?
मनस्वी, एकलकोंडे, लहानपणी पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या एखाद्या दारुण, भयानक प्रसंगाचा मनावर झालेला विपरीत परिणाम? की जगाविषयी वाटणारी असुरक्षितता? इतकं कोरडं, भावनाशून्य, संवदेनाहीन आयुष्य? यांच्या आयुष्यात आनंद, उल्हास, प्रेम, सौहार्द याचा कधीच अनुभव नसावा? की केवळ श्वास चालू आहे म्हणून यांना जिवंत म्हणायचे? इतक्या कोरडय़ा, शुष्क, भावनांचा ओलावा नसलेल्या स्वभावाची संगती तरी कशी लावायची?