प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

सातशे वर्षांची परंपरा असलेली राजस्थानची पारंपरिक आणि अद्वितीय अशी ‘फड चित्रकला’ कृतिका जोशी आणि बबिता बन्सल या नवीन पिढीच्या प्रतिनिधी पुढे नेत आहेत. त्या केवळ स्वत: ‘फड चित्रं’ काढत नाहीत, तर पारंपरिक कलेचा आधुनिकतेशी सुंदर मेळ घालून ही कला जगवत आणि फुलवत आहेत. कृतिका पारंपरिक कलाकारांना आधुनिक बाजारपेठेत काम मिळवून देण्यासाठी झटते आहे, तर बबितानं अनेक गृहिणींना फड चित्रकला शिकवून त्यांच्या पायावर उभं केलं आहे.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
panvel municipal corporation
फडके नाट्यगृहाच्या नुतणीकरणासाठी ५५ लाख पालिका खर्च करणार
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Eight year old child molested in Khandeshwar
खांदेश्वर येथे आठ वर्षांच्या बालकावर अत्याचार

वेळ रात्रीची. वीस फुटांच्या अंतरावर उभ्या केलेल्या दोन खांबांच्या आधारे एका कापडी पडद्यावर दोन हजार आकृती चित्रित केलेल्या असतात. त्यात मानवाकृती, झाडं, पक्षी, प्राणी हे मोजक्याच गडद रंगांमध्ये रंगवलेले असतात. त्यासमोर पणती लावून पूजा मांडलेली असते. एक ‘भोपी’- म्हणजे स्त्री, घुंघट ओढून, हातात कंदील घेऊन अधून-मधून त्या पडद्यावर प्रकाश पाडत असते. हातात थाळी फिरवत नृत्य करत असते. ‘भोपा’- म्हणजे पुरुष, पायात घुंगरू बांधून, हातानं करवंटी आणि बांबूच्या काठय़ांच्या साहाय्यानं बनवलेलं, रंगीबेरंगी गोंडे लावलेलं ‘रावणहत्ता’ हे वाद्य वाजवत, गाण्यातून कथा सांगत नृत्य करत असतो. चित्रकला, संगीत आणि नृत्याचा हा एकत्रित सोहळा पाहायला गावकरी गर्दी करून बसले असतात.. हे दृश्य आहे राजस्थानमधल्या एका गावातलं. पूर्वी ते वारंवार पाहायला मिळत असे, आता मात्र फारच कमी वेळा पाहायला मिळतं. हे दृश्य म्हणजे ‘पाबूजी की फड’.

‘फड’ या शब्दाचा अर्थ ‘पढ’- म्हणजेच ‘वाच’, आणि या सादरीकरणाला म्हणतात ‘फड बाचना’. ‘पाबूजी की फड’ या कलेला ७०० वर्षांपासूनची परंपरा असल्याचं भिलवाडामधील राष्ट्रपती पारितोषिक विजेते ‘फड चित्रकार’ कल्याणजी जोशी सांगतात. ‘पाबूजी राठोड’ हे राजपुतांचे प्रमुख. त्यांचा जन्म राजस्थानमधला, जोधपूरचा. त्यांच्या जन्माशी संबंधित अनेक ‘चमत्कार’ सांगणाऱ्या कथा सांगितल्या जातात. ते लोकदैवत असून लक्ष्मणाचा अवतार समजले जातात. तसंच ‘योद्धा संत’ आणि ‘तपस्वी दैवत’ म्हणूनही त्यांची पूजा प्रामुख्यानं ‘रबारी’ जमात करते. त्यांनी आपलं पूर्ण जीवन लोकसेवा आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतीत केलं. भोपा, भोपी हे पारंपरिक कथाकथनकार आहेत. त्यांना पुजारी मानतात. जिथं-जिथं पाबूजींचं मंदिर असेल त्या-त्या भिंतीवर पाबूजींची जीवनकथा, साहसकथा भित्तिचित्र रूपात दिसते.

चित्रकारांकडून फड विकत घेणारे मुख्य खरेदीदार म्हणजे भोपा-भोपी. ते चांगला मुहूर्त शोधून देतात आणि त्या दिवशी चित्रकार चित्र रंगवण्यास प्रारंभ करतात. तत्पूर्वी चित्र ज्यावर चित्रित करायचं ते कापड तयार केलं जातं. पूर्वी कोळी समाजाचे लोक हातानं हे कापड विणत. आता बाजारातून तयार सूती कापड आणतात. या कापडाला मैदा आणि खायचा गोंद (डिंक) वापरून कांजी (‘स्टार्च’) केली जाते. वाळल्यावर त्यावर काचेच्या बाटलीच्या पृष्ठभागानं घासून किंवा ‘मून स्टोन’ दगडानं घासून तकाकी किंवा गुळगुळीतपणा आणला जातो, जेणेकरून त्या पृष्ठभागावर कुंचला लीलया फिरेल. खारीच्या केसांपासून बनवलेले कुंचले याकरिता वापरले जातात (आता हे कुंचले बनवण्यावर बंदी आली आहे.). राजस्थानमधल्या खाणीत सापडणाऱ्या विविध दगडांची भुकटी पाण्यात १५ दिवस भिजवून रंग तयार केले जातात. जसं हडताळ दगडापासून पिवळा, संग्रहकपासून लाल, जंगाल दगडापासून हिरवा, इंडिगोपासून निळा आणि काजळीपासून काळा. कापडाला मैदा आणि गोंद असतो. त्यामुळे किडा-मुंगी लागू नये म्हणून काळ्या रंगात ‘बीसाबोल’ नावाचं विष मिसळतात. कारण काळ्या रंगानं बाह्य़रेषा काढली जाते त्यामुळे आतले रंग सुरक्षित राहातात. प्रथम नारिंगी रंगानं बाह्य़रेषा काढतात. त्यानंतर हळूहळू गडद होणारे रंग वापरून चित्र रंगवतात. देव लाल रंगात, देवी निळ्या रंगात, साधू पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात, राक्षस काळ्या रंगात, तर शरीरावरील दागिने पिवळ्या आणि लाल रंगाचा अधून-मधून वापर करून रंगवतात. शेवटी बाह्य़रेषा करतात- त्याला ‘खुलाई करना’ असं म्हणतात. मुख्य चित्रकार हा चित्राची पहिली बाह्य़रेषा आणि खुलाई करतो आणि इतर मदतनीस रंग भरतात. चित्रावरचा पहिला फटकारा मारण्याचा मान कुमारिकेचा असतो. सर्वात शेवटी, चित्र पूर्ण करताना ‘पाबूजीं’चे डोळे रंगवले जातात आणि चित्रकार आणि भोपा-भोपीची नावं लिहिली जातात. हे मध्यभागी- म्हणजे पाबूजींच्या आकृतीजवळच्या चौकटीत लिहितात आणि तो मुहूर्त असलेला दिवस भोपा सुचवतो.

‘पाबूजी की फड’प्रमाणे देवनारायणजी, रामदेवजी, भैसासूर, रामदला, कृष्णदला की फड  आदी प्रकारही आहेत. यातला फक्त शेवटचा फड दिवसा वाचतात आणि इतर रात्री वाचतात. यांपैकी सर्वात मोठा फड देवनारायणजींचा आहे. भारतीय टपाल खात्यानं १९९२ मध्ये त्यावर तिकीट प्रसिद्ध केलं होतं. ते चित्र पद्मश्री श्रीलाल जोशींचं आहे. ७०० वर्षांची परंपरा असणारी ही फड चित्रकला अजून जपून ठेवण्याचं काम कल्याण जोशी करत आहेत. या कलेची परंपरा फक्त आपल्याच घराण्यात राहावी म्हणून यापूर्वी घरातील मुलींना ही कला शिकवत नसत, पण सुनांना शिकवत. ‘जानेवाली को नहीं सिखाना, आनेवाली को सिखाना’, असं म्हणत. मात्र कल्याण जोशींचे पिता श्रीलाल जोशी यांनी प्रथम घरातल्या मुलींना शिकवण्यास प्रारंभ केला. त्यापैकी पार्वती जोशी या पहिल्या फड चित्रकर्ती होत. श्रीलाल जोशी यांनी गावाबाहेर जाऊन वेगवेगळ्या राज्यांतल्या कलासंग्रहालयांना आपली चित्रं संग्रहाकरता दिली आणि नंतर जगभरातील संग्रहालयांमध्येही त्यांची फडचित्रं संग्रहासाठी घेतली गेली. जपानमध्ये तर भिंतीवर फडचित्र रंगवण्यासाठीही त्यांना निमंत्रित केलं गेलं. फड चित्रकलेचा मान जोशी कुटुंबाचा असल्यामुळे इतर नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. कारण आपली कला आपल्याकडेच राहावी, हे त्यांचं तत्त्व होतं. नंतर हळूहळू याचं महत्त्व कळल्यावर इतर जोशी फडचित्रकारही गावाबाहेर कलाकृती घेऊन जाऊ लागले. ‘फड बाचना’साठी भोपा आणि भोपी हे चित्रांची गुंडाळी करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हे चित्र पूजेसाठी वापरलं जात असल्यामुळे ते विरतं, अधेमधे फाटतं, कधी रंग खराब होतात. अशा वेळी पुष्कर येथील तलावात त्याचं विसर्जन केलं जातं. या धार्मिक विधीला ‘ठंडी करना’ असं म्हणतात.

मुघल आणि राजपूत चित्रकलेच्या वैशिष्टय़ांनी युक्त असलेली राजस्थानची फड चित्रकला ठरावीक घराण्यांची मक्तेदारी राहू नये याकरिता राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रकर्ते कल्याण जोशी यांनी १९९० मध्ये ‘चित्रशाला’ नावाची संस्था सुरू केली. खास फड चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी अनेक स्त्रिया, युवक, पुरुष इथे येऊ लागले. आतापर्यंत जवळजवळ दोन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिले तीन महिने फक्त रेखाटन करावं लागतं. यात मनुष्याकृती, प्राणी, झाडं, वास्तुरचना याचा सराव फड चित्रं पाहून करावा लागतो. या चित्रांचं वैशिष्टय़ म्हणजे सर्व आकृत्यांचे चेहरे एका बाजूनं दिसतात आणि ते समोरासमोर संवाद साधताना दिसतात. फक्त देव, राक्षस यांचे चेहरे समोरून दाखवतात. फडमध्ये धोबी, कोळी, राण्या, मत्स्यकन्या अशा १०३ प्रकारचे व्यक्ती प्रकार, शिवाय झाडं, महाल, कमानी, प्राणी अशा तीन हजारांवर आकृती असतात.

कल्याण जोशी विविध प्रयोग, प्रदर्शनं करून ही कला अधिकाधिक विकसित आणि प्रसारित करण्याचा प्रयत्न करतात. ते या घराण्यातल्या २२व्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पन्नास नव्या चित्रकारांना घेऊन फड चित्रकलेचं वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन केलं. तेविसाव्या पिढीची प्रतिनिधी कृतिका कल्याण जोशी हिनं ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्राफ्ट अ‍ॅण्ड डिझाइन’मधून वस्त्रविद्येची पदवी घेतली आहे. तिला नृत्यकलेची आवड असूनही आपली पारंपरिक कला पुढे नेण्यासाठी ती नृत्य  छंद म्हणून जपत आहे. वस्त्रकलेमध्ये फड चित्रकलेतील आकार वापरून आधुनिक पद्धतीची वस्त्रप्रावरणं बनवण्यात ती रुची घेत आहे. वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून पुस्तकबांधणी करण्यातही ती कुशल आहे. बांधणी, भरतकाम, गोधडी (‘पॅचवर्क’), ठोकळ्यांची छपाई (‘ब्लॉक प्रिंट’) अशा विविध प्रकारांत ती प्रयोग करते. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलांचा ती सुंदर मेळ साधते आहे. तसंच पारंपरिक कारागिरांना आधुनिक बाजारपेठेत काम मिळवून देण्यासाठी ती प्रयत्न करते. ‘क्राफ्ट व्हिलेज’ या संस्थेमार्फत ती नामांकित  कंपन्यांकडून कलाकारांसाठी काम मिळवून देते. त्यांना दिल्लीमधील प्रदर्शनासाठी निमंत्रित करते. या प्रदर्शनाची अभिरक्षक (‘क्युरेटर’) म्हणून ती काम पाहते.

कृतिका विविध शहरांत जाऊन फडचित्रांच्या कार्यशाळा घेते. ती स्वत: पारंपरिक पद्धतीचं फड चित्र काढतेच, पण वस्त्रविद्येचा अभ्यास असल्यामुळे बेडशीट, दुपट्टे, ड्रेस डिझायनिंग या साऱ्याचा फड चित्रकलेची लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करते. नवीन मुलांना ती ही चित्रकला शिकवते. अलीकडेच तिनं फक्त काळ्या रंगाचा वापर करून पांढऱ्या भिंतीवर

‘६ फूट बाय ६ फूट’ आकाराचं चित्र गृहसजावटीसाठी केलं. एका कार्यशाळेत तिची भेट झाली. त्या वेळी ती तीन फूट लांबीच्या कॅनव्हासवर पाबूजी फड कथेतल्या ‘राजा-राणी’ या दोन व्यक्तिरेखा घेऊन सहजतेनं चित्र रंगवत होती. याच कार्यशाळेत बबिता बन्सल भेटली. ती वाणिज्य शाखेची पदवी घेऊन त्यानंतर आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीलाल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चार र्वष फड चित्रकला शिकली. ती विवाहित असल्यामुळे घर सांभाळून गेली जवळजवळ १७ र्वष चित्रकला क्षेत्रही सांभाळते आहे. तिनं जयपूर, भिलवाडा, पुणे, नाशिक इथे आतापर्यंत २५ प्रदर्शनांतून भाग घेतला आहे.  ‘मांडणा’ ही पारंपरिक रांगोळी, कॅलिग्राफी, फड चित्रकला हे विषय ‘कलादालन’ या २००४ मध्ये स्थापन केलेल्या स्वत:च्या कलासंस्थेत ती शिकवते. बबितानं अनेक गृहिणींना फड चित्रकलेचं प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे. या चित्रकर्तीना काम मिळवून देण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि फड चित्रकला यातल्या विविध प्रयोगांकरता तिला राजस्थान सरकारनं आमंत्रित केलं होतं. तिनं अनेक पुरस्कारही मिळवले आहेत.

कृतिका आणि बबिता या दोन्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कला यांचा समन्वय साधणाऱ्या तरुण पिढीच्या प्रतिनिधी आहेत. श्रीपाल जोशी, कल्याण जोशी यांनी ‘आनेवाली’बरोबर ‘जानेवाली’लाही फड चित्रकला शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ७०० वर्षांची परंपरा असलेली ‘फड चित्रकला’ भविष्यातही टिकेल, नवनवीन अंगांनी बहरेल.

विशेष आभार :  वर्षां कारळे, मेधा प्रभाकर