डॉ. राजन भोसले

शाळांमधून लैंगिक शिक्षण द्यावं की नाही याबाबत अद्याप अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. अनेक शाळांमध्ये ते कित्येक वर्षांपासून दिलेही जात आहे. तरीही अनेक पालक याविषयी गोंधळलेले असू शकतात. लैंगिक शिक्षण म्हणजे काय, त्यातून कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळू शकते, ते कोणत्या इयत्तेपासून दिलं जावं आणि मुख्य म्हणजे त्याची गरज काय आहे, या विषयीचा सविस्तर लेख.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

परब दाम्पत्याला एकुलती एक मुलगी चारू.. आई-वडिलांची अत्यंत लाडकी. घरापासून दहा मिनिटांत चालत जाता येईल इतक्या जवळच्या शाळेत चारू जात असे. रोज शाळेत जाताना वडील व येताना आई चारूला स्वत:बरोबर शाळेत घेऊन जात-येत असत. चारूचे आई-वडील दोघेही नोकरीव्यतिरिक्त राजकारणात सक्रिय होते. एका नामांकित राजकीय पक्षाचे ते सभासद व कार्यकत्रे होते. दोघेही थोडे शिस्तप्रिय व प्रथा-परंपरांना मानणारे.

चारू तिसरीत असताना, तिच्या शाळेतून एक पत्रक घरी आलं. चारूच्या शाळेत मुलामुलींना ‘लैंगिक शिक्षण’ देण्यासाठी एक तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. ‘लैंगिक शिक्षणा’च्या या खास वर्गासाठी पालकांची अनुमती मिळवण्यासाठी हे विशेष पत्रक शाळेनं पाठवलं होतं. पत्रक वाचताच चारूचे वडील संतापून म्हणाले, ‘‘शाळेला हे असले अभद्र उद्योग शोभत नाहीत. मुलांना इतक्या लहान वयात नको त्या गोष्टी शिकवून त्यांची मनं नासवण्याचा हा प्रकार थांबवावा लागेल. कुठून त्यांना या अनावश्यक कल्पना सुचतात कळत नाही!’’ नवऱ्याच्या मतांना दुजोरा देत चारूच्या आईनेसुद्धा हाच पवित्रा घेतला. दोघांनीही या गोष्टीला विरोध करण्याचा चंग बांधला व या मोहिमेसाठी लगेचच चारूच्या शाळेतल्या काही मुला-मुलींच्या पालकांना त्यांनी फोन केले.

त्यांना फोनवर मिळणाऱ्या इतर पालकांच्या प्रतिक्रिया मात्र मिश्र होत्या. एका बाजूला याला सहज अनुमती देणाऱ्या पालकांपासून ते याचा तीव्र विरोध करू इच्छिणारे पालक असे दोन्ही प्रकारचे विचार त्यांना ऐकायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूला विरोध किंवा अनुमती देण्याआधी ‘हा काय प्रकार आहे?’ हे जाणून घेण्याची समंजस उत्सुकता असलेले बरेच पालक निघाले. या महत्त्वाच्या विषयावर सर्व पालकांमध्ये मोकळी चर्चा व विचारविनिमय व्हावा म्हणून लगेचच एका उत्साही पालकाने पालकांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला.

हा ग्रुप तयार होताच चर्चेला उधाण आलं. अखेरीस ‘या गोष्टीचा स्वीकार किंवा विरोध करण्याआधी व मुलांसमोर थेट हा विषय मांडण्याआधी शाळेने व संबंधित डॉक्टरांनी ‘लैंगिक शिक्षणांच्या या खास वर्गात नेमकं काय व कसं शिकवलं जाणार आहे? त्याची मांडणी व स्वरूप काय असेल? याचा स्पष्ट खुलासा करावा व तो केल्याशिवाय आपण अनुमती देऊ शकत नाही’ असा एक सामूहिक निर्णय घेतला व शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर हा प्रस्ताव मांडला गेला. शाळेने तत्परतेने याची दखल घेऊन फक्त पालकांसाठी विशेष बैठक बोलावली. या बैठकीमध्ये लैंगिक शिक्षण देणारे ते डॉक्टर स्वत: पालकांच्या प्रश्नांची उत्तरं देतील व या विषयाचे स्पष्टीकरण करतील, असे ठरले. चारूच्या वडिलांची इच्छा होती, की शाळेला कसलाही वाव न देता या गोष्टीचा कडक शब्दांत विरोध करायचा; पण राजकारणात सक्रिय असलेल्या परब दाम्पत्याला बहुमत मानावं लागलं.

बैठक मुद्दय़ाला धरून व आटोपशीर व्हावी या उद्देशाने, डॉक्टरांच्या सुचवण्यावरूनच, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून, पालकांच्या या विषयावरील विविध प्रश्नांची एक सूची बनवण्यात आली. ही सूची बनवण्याची जबाबदारी चारूच्या वडिलांनी हेतुपुरस्सर स्वत:वर घेतली, जेणेकरून प्रश्नांच्या माध्यमातून आयोजकांची कोंडी करणं सोपं जाईल व त्यामाग्रे विरोध करणं शक्य होईल. बैठकीच्या दिवशी मोठय़ा संख्येने पालक जमा झाले. पालकांव्यतिरिक्त शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व काही विश्वस्तसुद्धा आवर्जून या बैठकीसाठी उपस्थित झाले.

बैठकीची औपचारिकता संपली व पालकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं सत्र सुरू झालं. पहिला प्रश्न चारूच्या वडिलांचाच होता, ‘‘लैंगिक शिक्षण ही पाश्चिमात्य संस्कृतीतून उचललेली संकल्पना आहे. आपली भारतीय संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीचं हे भ्रष्ट अनुकरण करण्याची गरज आहे का?’’

डॉक्टरांनी उत्तर दिलं, ‘‘भारतीय संस्कृतीबाबत म्हणाल, तर वास्तव तुम्ही म्हणताय त्याच्या उलट आहे. भारत हा एकमेव असा देश आहे व भारतीय संस्कृती ही एकमेव अशी संस्कृती आहे जिथे जगात सर्वात आधी, हजारो वर्षांपूर्वी, लैंगिकतेला एक ‘शास्त्र’ म्हणून अभ्यासलं गेलं व कलात्मक पद्धतीने त्याची संरचना केली गेली. लैंगिक विज्ञानावर अभ्यासपूर्वक लिहिलेले ‘विज्ञान भरव तंत्र’, ‘कामसूत्र’, ‘अनंगरंग’, ‘रती रहस्य’ या प्रकारचे बरेच ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी प्रथम भारतात लिहिले गेले. एक हजारापेक्षा अधिक वर्षांपूर्वी खजुराहो व कोणार्कला असंख्य कामशिल्पांनी शृंगारित अशी अनेक मंदिरे समाजाच्या सर्वसंमतीने भारतात उभारली गेली.. ज्यांच्या निर्मितीत राज्यकर्त्यांची संमती, धनिकांची संपत्ती व कलाकारांची अभिव्यक्ती या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात.’’ डॉक्टरांचं उत्तर ऐकून चारूचे वडील मनोमन ओशाळले.

दुसरा प्रश्न थोडा मार्मिक होता. ‘‘लैंगिक प्रेरणा ही नैसर्गिक व सहजप्रवृत्त (इनिस्टगटिव्ह) असते. मनुष्याच्या मानाने अविकसित अशा प्राणिमात्रांमध्येसुद्धा लैंगिक प्रेरणा दिसून येते. प्राणिमात्रसुद्धा कुठल्याही प्रशिक्षणाव्यतिरिक्त लैंगिक संबंध ठेवतात. मग मनुष्याला त्याचं असं वेगळं शिक्षण देण्याची काय गरज आहे?’’ या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी डॉक्टरांनी एक स्पष्टीकरण आवर्जून दिलं, ‘‘केवळ लैंगिक संबंध कसे ठेवावेत हा लैंगिक शिक्षणाचा केंद्रिबदू अजिबात नसतो, तर ‘जबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय’ याची समज मुलांना देणं व बेजबाबदार लैंगिक वर्तनातून उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांची जाणीव त्यांना करून देणं याला त्यात प्राधान्य दिलेलं असतं. त्यांत शरीरधर्मानुसार आपल्याच आतून उफाळणाऱ्या लैंगिकतेचं नियमन नेमकं कसं करायचं व बाहेरून होऊ शकणाऱ्या लैंगिक आघात-अपघातांना नेमकं कसं टाळायचं हे शिकवण्याला महत्त्व दिलं जातं.’’

‘‘प्राणिमात्रांच्या जीवनशैलीशी आपली तुलना होऊ शकत नाही. प्राणिमात्र नग्न राहतात. त्यांच्या जीवनात विवाहव्यवस्था, कुटुंबनियोजन, गर्भप्रतिबंधक उपाय, लैंगिक वर्तनाबाबतचे कायदे, मर्यादा व नियम या कशाचाही समावेश नसतो. मनुष्याला मात्र या गोष्टी वेगळ्या शिकाव्या लागतात. लैंगिक प्रेरणा ही जरी नैसर्गिक असली तरी लैंगिक वर्तनाबाबतची परिमाणं मनुष्याच्या बाबतीत अगदीच वेगळी आहेत.’’ डॉक्टरांनी मार्मिक उत्तर दिलं.

‘‘एखादी गोष्ट नैसर्गिक आहे याचा अर्थ त्याबाबत काहीही शिकण्या-शिकवण्याची गरज नसते असं नाही. प्रसाधनगृहांत आपण ज्या गोष्टी करतो त्यासुद्धा नैसर्गिकच असतात; पण त्यातही आपण काही नियम, पद्धत, शिस्त व मर्यादा पाळतो. त्या शिकवल्याशिवाय त्यांचं नैसर्गिक आकलन शक्य नाही व नेमकं हेच लैंगिक शिक्षणातून साधलं जातं.’’

एका उत्साही पालकाने हात उंचावून मध्येच एक प्रश्न विचारला, ‘‘ते सर्व ठीक आहे, पण आमची मुलं अवघी आठ-नऊ वर्षांची आहेत. इतक्या लवकर व लहान वयात हा विषय शिकवणं कितपत योग्य?’’

डॉक्टरांचं उत्तर होतं, ‘‘पौगंडावस्था सुरू होण्याचं वय नऊ. वयाच्या नवव्या वर्षांपासून कधीही मुलींना मासिक पाळी सुरू होऊ शकते. काहीही पूर्वकल्पना नसेल तर पाळीमुळे पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. शिवाय अशा वेळी ती शाळेत किंवा घरापासून दूर कुठेही एकटी असल्यास याचा आघात अधिक तीव्रतेने जाणवू शकतो. अशा पीडादायी अनुभवांचे परिणाम अनेकदा तिच्या जीवनावर दूरगामी ठरू शकतात. हे टाळायचं असेल तर पहिली पाळी येण्याआधीच मुलींना त्याबद्दलची माहिती देऊन त्यासाठी तयार करणं महत्त्वाचं असतं. शिवाय ज्या नवीन संप्रेरकांमुळे हे घडू लागतं तीच संप्रेरके तिच्या शरीरात आणि मनात इतर अनेक बदल घडवत असतात. या तमाम बदलांसाठी तिची मानसिक पूर्वतयारी करून घेणं आवश्यक आहे. वैज्ञानिकदृष्टय़ा ही माहिती देण्याचं योग्य वय ‘आठ’ असं ‘जागतिक आरोग्य संस्थे’ने सूचित केलं आहे.’’

‘‘लैंगिक शिक्षणात नेमकं काय-काय अंतर्भूत असतं?’’ या सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी सविस्तर दिलं. ‘‘पौगंडावस्थेतून जात असताना मुला-मुलींच्या शरीरात व मनांत अनेक आमूलाग्र बदल होत जातात. त्यांची पूर्वकल्पना व पूर्वतयारी नसेल तर मुलं अनेकदा त्याने कमालीची विचलित होतात. पाळी सुरू होणं, शरीरावर विविध ठिकाणी केस येऊ लागणं, आवाज फुटणं, कमी-अधिक वेगाने स्तनांची वाढ होणं, स्वप्नावस्थेत वीर्यस्खलन होणं, अशा प्रकारचे अनेकानेक शारीरिक बदल एका बाजूला होत असतानाच दुसरीकडे मनात तीव्रतेने कामुक विचार येणं, असह्य़ होतील अशा लैंगिक भावना व वासना उफाळून येणं व त्या अनुषंगाने हस्तमथुन किंवा तत्सम लैंगिक वर्तनास व्यक्ती उद्युक्त होणं असे अनेक मानसिक बदलही होऊ लागतात. काही वर्ष अव्याहत चालणारी बदलांची ही अपरिहार्य मालिका मुलामुलींसाठी अनपेक्षित असते. या तमाम स्थित्यंतरांसाठी मुलांची पूर्वतयारी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, जेणेकरून या नैसर्गिक प्रक्रियेतून जात असताना मुलं विचलित होणार नाहीत. शिवाय त्यांच्याकडून गंभीर चुका होणार नाहीत व त्यांच्या अज्ञानाचा कोणी गैरफायदा घेणार नाही. ही मुले आंतरिक लैंगिक आवेगांशी एकांगी झुंजत असतात. अशा वेळी अभ्यासात लक्ष न लागणं, एक नवीन कमीपणाची भावना मनात खोल रुजत जाणं, अपराधीपणाचा न्यूनगंड मनात दृढ होत जाणं, कामवासनेच्या अधीन होऊन बेजबाबदार लैंगिक प्रयोग करण्यास उद्युक्त होणं, असे अनेक घातक परिणाम मुला-मुलींमध्ये दिसू शकतात. अशा वेळी त्यांना योग्य-अयोग्य, साधकबाधक अशा विचार-वर्तनाचा सुरक्षित व सुगम मार्ग दाखवणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून त्यांची भावी व्यक्तिमत्त्वं व वैचारिक ठेवण निकोप राहील.’’ डॉक्टर बोलत होते.

‘‘मुलां-मुलींच्या ‘सेक्शुअल अब्युज’ म्हणजेच लैंगिक शोषणांची असंख्य प्रकरणं आजकाल ऐकायला मिळतात. मुलांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे मुलांना स्वत:लाच त्याबाबत प्रशिक्षित करणं. कारण मुलांची सतत पाठराखण करणं पालकांना शक्य नसतं. मुलांवर असे अत्याचार बहुतांश वेळा माहितीतल्या व जवळच्या व्यक्तींकडूनच होत असतात. मुलांना जे लैंगिक शिक्षण या वयात दिलं जातं त्यात कोणाकडूनही त्यांच्याशी केल्या जाणाऱ्या अयोग्य लैंगिक वर्तनास कसं वेळीच ओळखायचं, जागरूकतेने ते कसं टाळायचं हे आवर्जून शिकवलं जातं.’’ डॉक्टरांचं हे स्पष्टीकरण ऐकताच अनेक पालकांचे चेहरे खुलले. जे शिक्षण मुलांना देणं आपल्याला कदाचित जमलं नसतं ते काम एक तज्ज्ञ डॉक्टर स्वत: पुढाकार घेऊन इतक्या तत्परतेने करत आहेत याचा मानसिक-भावनिक आधार काही पालकांना जाणवला.

‘‘इंटरनेट व स्मार्टफोनवर अश्लील व्हिडीओ (पॉर्नोग्राफी) तसेच लैंगिकतेबाबत अत्यंत चुकीची व घातक माहिती आज सहज उपलब्ध झाली आहे. त्याच्या नादी लागून, त्यात गुरफटून भरकटत गेलेली शालेय वयातली खूप मुलं आजकाल पाहायला मिळतात. अधिकृतपणे दिलेल्या लैंगिक शिक्षणातून मुलांमधलं हेच लैंगिक कुतूहल योग्य व वैज्ञानिक माहिती पुरवून योग्य वयात शमवलं जाऊ शकतं, जेणेकरून त्यासाठी चुकीचे मार्ग मुलं अवलंबणार नाहीत व कधी चुकून त्या मार्गाने गेलेच तर योग्य-अयोग्यतेचं आकलन त्यांना वेळीच होईल.’’ डॉक्टरांनी हा मुद्दा मांडताच अद्याप थोडे साशंक असलेले काही पालकही पूर्णपणे आश्वस्त झाले. ‘आमच्या मुलांना हे लैंगिक शिक्षण अवश्य द्या.’ असं मत एकमुखाने व जाहीरपणे पालकांनी टाळ्यांच्या गजरात व्यक्त केलं.

डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी पालकांतर्फे चारूचे आई-वडील उत्स्फूर्तपणे पुढे आले. त्यांच्या मनात लैंगिक शिक्षणाबाबत या कार्यक्रमापूर्वी असलेले गैरसमज व भ्रामक कल्पना त्यांनी स्वत:हून मान्य केल्या. इतकंच नव्हे, तर त्यांच्या पक्षाच्या शाखांतर्फे असे उपक्रम डॉक्टरांच्या मदतीने इतर शाळांमधूनही राबवण्याचा मानस त्यांनी सर्वासमोर जाहीर केला. डॉक्टर स्वत: लैंगिक शिक्षण कसं द्यायचं याचं प्रशिक्षण देणारे अधिकृत अभ्यासक्रम चालवतात हे समजताच अनेक पालक पुढे आले. आज हे काम मोठय़ा संख्येने होत असून अनेक पालक यात सक्रिय झालेले दिसून येतात, ही समाजाच्या दृष्टीने एक स्वागतार्ह गोष्ट आहे.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे; पण गोपनीयतेच्या उद्देशाने नावे व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com