28 February 2021

News Flash

सुत्तडगुत्तड : भळभळत्या जखमेचे अखंड दु:ख

आज सर्वाधिक काळजी मुलग्यांचीच करण्याच्या काळात आपण वावरतोय.

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

मुलग्याला बिनधास्त मोकळं सोडतो आपण. तो खेळतो कुणाबरोबर? हिंडतो कुठं? जातो कधी, येतो कधी? याबाबत आपण बेफिकीर. मुलगा आहे, त्याची कसली काळजी? त्याला का कोण पळवून नेतो? अशी प्रत्येकाची धारणा. आज सर्वाधिक काळजी मुलग्यांचीच करण्याच्या काळात आपण वावरतोय. मुलीला समोरचा पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेनं बघतोय हे जोखण्याचे उपजत ज्ञान प्राप्त झालेले असते. मुलग्यांना ती नजरच मिळालेली नसते. त्यामुळे त्याचं स्पर्शज्ञान आणि नजर लैंगिकतेबाबत विकसित झालेली नसते आणि काळ मात्र लिंगपिसाट विकृतीच्या सुळसुळाटाने व्यापून गेलेला. असं न व्हावं की त्याच्याबाबतीत काही वाईट घडेल आणि मग भळभळत्या जखमेचे अखंड दु:ख त्याच्या वाटेला येईल.

माझ्या वर्गात एक-दोन वर्ष शिकायला असलेली मैत्रीण माझ्यासमोर एकदम येऊन उभी राहिली. तिच्यासोबत एक मध्यमवयीन जोडपे होते. चांगले शिकलेसवरलेले असावेत असे त्यांच्या वावरण्यातून दिसत होते. हसून आगतस्वागत झाले. मैत्रिणीची ख्यालीखुशाली, चेष्टामस्करी पार पडली. सोबतचे जोडपे चिंताक्रांत अवस्थेत आमच्या गप्पा ऐकत होते. मैत्रिणीने त्यांची ओळख करून दिली. तालुक्याच्या ठिकाणी राहणारे. नवरा सरकारी कार्यालयात हेडक्लार्क.

त्यानंतर सगळे गप्प. मैत्रिणीचा चेहरा आक्रसत चालला. जोडपे अधिक चिंताक्रांत. ध्यानात आलं यांचं काहीतरी काम आहे. त्यांना बोलणं सुलभ व्हावं म्हणून विचारलं, ‘‘मी काही मदत करू शकतो का तुम्हाला?’’ तर तो नवरा म्हणणारा एकदम बसला खाली मान घालून. त्याला बोलणं अवघड वाटत असावं, त्याच्या बायकोची चुळबूळ चाललेली. खोचकरणं, भुवया उडवणं सारखं सुरू होतं. त्यानं बोलतं व्हावं अशी तिची अपेक्षा. तो बोलायला तयार नव्हता. मग मी सरळ म्हटलं, ‘‘ताई, तुम्हीच बोला काय असेल ते. संकोच नका बाळगू.’’

तर त्या एकदम सावध झाल्या. नवऱ्याकडे कुत्सित कटाक्ष टाकत म्हणाल्या, ‘‘तुमच्याकडे तो अमुकतमुक येत-जात असतो.’’ त्यांनी नाव सांगितलं.

मग मी त्या गृहस्थाविषयी भरभरून बोलायला सुरुवात केली. तसा त्यानं खूप पसा कमावलाय, फ्लॅट घेतलाय. कुठला कोण या शहरात आला. नशीब काढलं पण. आता त्याचं उत्तम चाललंय वगैरे. गेल्या दोनचार वर्षांत त्यानं लग्नही केलंय हेही सांगायला विसरलो नाही. त्याच्याविषयी इतकं बोलत गेलो, की दोघेही गोंधळून गेले. मत्रिणीच्या कपाळाला आठय़ाच आठय़ा. ही तिची कायमची सवय अजूनही शिल्लक. माझी बडबड तिला अनावश्यक वाटते म्हटल्यावर आवरतं घेतलं. ‘‘सांगा त्याच्याकडे काय काम आहे? झालंच म्हणून समजा.’’ माझी बडबड. ते पुन्हा धीरगंभीर. शांतता. आमची खटय़ाळ मैत्राणही कोडय़ात पडली. काही केलं तरी विषयाला मूस फुटायला तयार नव्हती.

शेवटी जिवाच्या करारावर त्या बाईनं सांगायला सुरुवात केली, ‘‘आमचा मुलगा आता दहावीत गेलाय. त्याचं अभ्यासावर लक्ष नाही. घरात तर नसतोच. शाळेतल्या शिक्षकाच्या तक्रारीवर तक्रारी. जेवत नाही वेळेवर.’’ मग त्या पुन्हा थांबल्या. तसा त्या बाईचा नवरा धाडसी झाला. म्हणाला, ‘‘मुलाचं लक्षण ठीक दिसत नव्हतं. वायाच जाणार असं वाटत होतं. बायकोकडं पाहात म्हणाला, ‘‘हिनं त्याला विश्वासात घेतलं, शेवटी त्यानं सांगितलं.’’ हा तुमचा गृहस्थ सारखा पाठलाग करत असतो त्याचा. त्याच्या शाळेभोवतीच फिरत असतो. दुपारची सुट्टी झाली की त्याला गाडीवर घेऊन जातो. शेतवडीत त्याच्याशी चाळे करतो. परत आणून सोडतो. त्यापासून माझ्या मुलाची सुटका करायला हवी. म्हणून आलो तुमच्याकडे.’’ माझ्या अंगावर सर्रकन काटा आला, घशाला कोरड पडली. तांब्यातलं पाणी पिताना हात थरथरायला लागले. स्वत:ला काबूत ठेवलं.

एक घोट पाणी पिऊन विचारलं, ‘‘तुम्ही त्या इसमाला बोलून बघितलं का?’’ तर म्हणाले, ‘‘हो. एकदा दम देऊन बघितला. तर तो दोन-तीन गुंड घेऊन आमच्याच दारावर चकरा मारायला लागला. बभ्रा नको म्हणून आम्ही थंड घेतलं. अशात तुमच्याशी संबंधित आहे असा पत्ता लागला. म्हणून आलो.’’ त्या बाई डोळ्यातलं पाणी आवरत होत्या. माझ्याकडे येणाऱ्या त्या गृहस्थाचा चेहरा उभा राहिला. साळसूद. भोळा वाटणारा. तत्परतेनं जी-जी करत प्रत्येक कामाला तयार असणारा. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्याबरोबर एकदम सलगीने वागणारा. सतत इकडेतिकडे फिरत का असतो याचा अचानक उलगडा झाला. त्या जोडप्याला धीराच्या चार गोष्टी सांगून मत्रिणीचा निरोप घेतला. अर्ध्याएक तासात त्याच्या ठरलेल्या वेळी तो गृहस्थ आमच्या कार्यालयात आला. बोलवून घेतलं त्याला. नेहमीचीच लाचारी. म्हटलं कुठं-कुठं हिंडून आला? एकदम बेफिकिरपणे म्हणाला, ‘‘कुठंच नाही. घरातून सरळ इथंच आलो.’’ म्हटलं, ‘‘त्या अमक्या-तमक्या तालुक्याला कधी जाणं होतं?’’ सहज खडा टाकला. तर लगेच तत्परतेनं त्यानं उत्तर दिलं. ‘‘तिथं माझं काय काम? लग्नापूर्वी राहायचो तिथल्या एका भाडय़ाच्या घरात. या शहरातलं भाडं परवडत नव्हतं. म्हणून काढली दोन-तीन वर्ष. आता काही संबंधच उरला नाही.’’ विषय वाढवला नाही. तो निघून गेला. माझ्या डोक्यातली भुणभुण वाढायला सुरुवात झाली.

अचानक प्रमोद नवलकरांची आठवण झाली. मुंबईतील मोठं प्रस्थ. राजकीय वलय असलेलं. त्या काळात माझ्या ‘भंडारभोग’ या कादंबरीची जुळवाजुळव सुरू होती. कोल्हापूर जिल्ह्य़ातील बऱ्याच हिजडय़ांची, जोगत्यांची मत्री बऱ्यापैकी झालेली. त्यांचं जगणं, त्यांची उद्ध्वस्तता प्रत्यक्ष अनुभवत होतो. जिल्ह्य़ात हिजडे किती, जोगते किती याची मोजदाद सुरू होती. हिजडा आणि जोगता यांच्यातील फरक घेत होतो समजून. जन्मजात नपुंसक असणाऱ्याला हिजडा म्हटलं जायचं. तर देवीला सोडलेल्या पुरुषास जोगता. जोगता करण्याची प्रक्रिया समजून घेणं अधिक गुंतागुंतीचं होतं. कोणकोणत्या कारणांनी देवीला मुलं सोडली जातात याची माहिती जमा करणं सुरु होतं. कधी नवस, कधी आजार, कधी करणी, कधी देवीचा कोप, अशी असंख्य कारणं.

कुणाला वयाच्या पाचव्या वर्षी तर कुणाला वयाच्या दहाव्या वर्षी, आमच्या मित्राला तर आठवीची परीक्षा सुरू असतानाच सोडलं देवीला. कारण काय तर त्याच्या लघवीतून रक्त जात होतं. डॉक्टरी इलाज केले. त्या काळी खेडय़ात डॉक्टर ते कसले? शहरातल्या डॉक्टरच्या हाताखाली शिकून आलेले कंपाउंडर. हे आमच्या खेडय़ातले नावाजलेले डॉक्टर. सायकलला बॅग अडकवून गावभर हिंडायचे. घरपोच उपचार. त्यांचे उपचार असणार ते काय? शेवटी मित्राच्या घरातल्या लोकांनी शोधले देव-देवऋषी. एका देववाल्या बाईनं सांगितलं. त्याच्या लघवीतून रक्त जातंय. म्हणजे त्याला पाळी आली. देवीला आवडलाय तो. संपलं सारं. त्याच्यावर रीतसर भंडाराच टाकला. हे आम्हाला खूप दिवसांनी कळलं. त्या वेळी त्यानं लुगडं नेसायला सुरुवात केली होती. त्याच्या दोस्तीमुळं जोगती पंथाची गुरुपरंपरा, त्यांच्या रीतीभाती, प्रथा परंपरा सगळंच समोर येत गेलं आणि डोक्याचा भुगा झाला. जोगत्याच्या फटकुऱ्यासारख्या आयुष्याची भळभळती जखम अस्वस्थ करत गेली..

परंतु हिजडय़ाचं जग नीट कळायला तयार नव्हतं. जन्मत:च नपुंसक असण्याचं प्रमाण किती? ते वेश्याव्यवसाय कसा करतात? त्यांना होणारे रोग, त्यांच्या जगण्याची उद्ध्वस्तता समजून घेण्यासाठी भटकंती सुरू होती. अशात मुंबईच्या एका पत्रकार मित्रानं प्रमोद नवलकरांच्या समोर नेऊन उभं केलं. एकदम दिलखुलास माणूस. नवंच जग त्यांनी माझ्यासमोर ठेवलं. हिजडे व्यवसाय कोणकोणत्या ठिकाणी करतात? त्यांच्या वेळा कोणत्या असतात? ते मेकअप कसा करतात? गिऱ्हाईक कसे शोधतात? इथपासून ते या व्यवसायासाठी काही हिजडे लिंग कसं काढून टाकतात? त्याची अमानुष पद्धत नवलकरांनी तपशिलानं सांगून टाकली. त्यांच्यामुळं काहींच्या भेटी घेता आल्या. या भेटीतून हिजडा बनवण्याची एक नवीनच माहिती माझ्यासमोर आली. मुंबई किंवा त्यासारख्या प्रचंड दाटीवाटीच्या शहरात अनेक प्रकारचे लोक देशभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेले. सगळ्यांनाच आपली लैंगिक भूक सहज भागवणे शक्य नसते. असे लोक शोधत असतात अनेक पर्याय. त्यातून एकत्र राहणाऱ्या पुरुषात समिलगी संबंध तयार होतात तर काहीजण अवतीभवतीच्या लहान पोरांचा वापर करून आपली लैंगिक भूक भागवण्याच्या प्रयत्नात असतात. लैंगिक संबंधासाठी वापरलेल्या मुलालाही अशा सुखाची चटक लागते. मग ते लहान पोर त्यातच बुडून जाते. हळूहळू त्याच्या या सवयीतून त्याच्या शरीरात वर्तन बदल होत जाऊन मानसिकतेवर परिणाम होऊन ते नपुंसक बनून जाते.

ते सारं विश्वच मला नवीन होतं. हिजडा आणि जोगता बनवण्याचं नवीनच कारण माझ्यासमोर आलं होतं. गावी परतल्यावर माझी शोधक नजर पुन्हा भिरभिरू लागली. जे जोगते मित्र होते त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तर त्यातल्या एकानं आपल्या शाळेतल्या मास्तरानंच आपल्याला हिजडा कसं बनवलं याची सचित्र कहाणी माझ्यासमोर ठेवली. त्यात त्याचं अगाध ज्ञान. म्हणाला, ‘‘मी लहानपणी दिसायला गुटगुटीत. गोबऱ्या गालाचा. मास्तर गाल कुरवाळता-कुरवाळता अंगच कुरवळायला लागला.’’ ते सारं ऐकताना माझ्या अंगाचं पाणी-पाणी झालं होतं.

नंतर ‘भंडारभोग’ लिहिली. त्याचं जे व्हायचं ते होऊन गेलं. पण प्रमोद नवलकर कायम मनात ठिय्या मांडून बसले. कुठंही गुटगुटीत, गोबऱ्या गालाचं शाळकरी मूल दिसलं, की मनात उगाचच पाल चुकचुकायची. या पोरावर कोणी झडप तर घालणार नाही ना? याची चिंता पोखरू लागायची.

आपण सारे कुटुंबातले लोक. मुलीला वाढवताना खूपच काळजी घेत असतो. तिनं कसं बसावं, कसं चालावं, बाहेर जाताना कसं असावं. गल्लीतून वावरताना, शाळेत जाताना, वर्गात बसताना हजार सूचना. उताणी झोपू नये, पायाखाली पांघरूण गच्च पकडावं असले भयंकर उपदेश. घरी यायला किंचित जरी मुलीला उशीर झाला तरी आपला जीव कासावीस. आल्यावर पुन्हा तिची झाडाझडती. रागावणं, ‘काळ किती वाईट आहे, बाहेरचं जग कसं बिघडलंय..’ अशी भयंकर वचवच.

मुलग्यांना मात्र बिनधास्त मोकळं सोडतो आपण. तो खेळतो कुणाबरोबर? हिंडतो कुठं? जातो कधी, येतो कधी? याबाबत आपण एकदम बेफिकीर. मुलगा आहे. त्याची कसली काळजी? त्याला का कोण पळवून नेतो, त्याची कोण विचारपूस करणार? अशी प्रत्येकाची धारणा. पण खरंतर आज सर्वाधिक काळजी मुलग्यांचीच करण्याच्या काळात आपण वावरतोय. मुलीला समोरचा पुरुष कोणत्या नजरेनं बघतोय हे जोखण्याचे उपजत ज्ञान प्राप्त झालेले असते. मुलाला ती नजरच मिळालेली नसते. त्यामुळे त्याचं स्पर्शज्ञान आणि नजर लैंगिकतेबाबत विकसित झालेली नसते आणि काळ तर असा लिंगपिसाट विकृतीच्या सुळसुळाटाने व्यापून गेलेला. आपला शेजारी, आपला नातेवाईक, आपला शिक्षक, आपला मित्र लैंगिक विकृतीने पछाडलेला नसेलच याची खात्री देता येणं कठीण. लोक ‘ज्याला-त्याला लैंगिक स्वातंत्र्य असलं पाहिजे.’ असं काय-काय बोलाय लागलेत. पण या साऱ्यात कोणाच्या तरी लहानग्याला नपुंसक होऊन आयुष्य व्यतीत करावे लागणार आहे. त्याच्या वाटय़ाला हे अखंड भळभळत्या जखमेचे दु:ख देणारे नामानिराळेच राहणार आहेत. अशा विकृतीला विरोध करायला हवा. याबरोबरच आपल्या घरातील मुलगा वाढवताना आपल्यातील पालक सजगच असायला हवा. आपल्या मुलाशी कोण बोलतं, आपला मुलगा कुठं जातो, कोणी त्याला नादी लावते आहे का? त्याचा गैरफायदा घेतला जातो का? यावर आपली करडी नजर असायलाच हवी. त्याच्या वर्तन-व्यवहारावर आपले पालक म्हणून लक्ष असणे ही आपली जबाबदारीच आहे. त्याच्यातील किंचित बदलाबाबत आपण संवादी असायला हवे.

बापाला मुलाचा मित्र होता येणे आणि आईला मुलाची मैत्राण होता येणे जास्त गरजेचे आहे. या साऱ्याचा हमरस्ता संवादाच्या अरण्यातून तयार होत असतो. हा संवादसेतू बांधणे हेच आजच्या पालकासमोरचे आव्हान आहे. हा संवादसेतू भरभक्कम असायला हवा कारण काळाला विकृतीचा विळखा बसलाय. एवढं तरी आपण आपल्या मनाला समजून सांगायला हवं.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 12:04 am

Web Title: sexuality wounds sustained rajan gavas abn 97
Next Stories
1 सरपंच! : तीन गावच्या सरपंच
2 आभाळमाया : संगीत नाटकाचा वसा
3 मधल्यांचा अवघड तिढा
Just Now!
X