कौटुंबिक हिंसाचार हा नैसर्गिक मानणाऱ्या शरिफाला जेव्हा स्त्रियांवरील जीवघेण्या अत्याचाराच्या सर्वव्यापी कथा कळल्या तेव्हा ती आणि तिच्यासह आणखी चार जणींनी मिळून याविरुद्ध मोहीम उघडली, त्यातूनच आज तामिळनाडूत ‘स्टेप’ नावाने मुस्लीम स्त्रियांचे तब्बल २५ हजार सदस्य स्त्रियांचे एक तगडे नेटवर्क उभे राहिले आहे.
पुरुषाने घरातील स्त्रीला मारहाण करणे आणि तिच्यावर वर्चस्व गाजवणे ही एक स्वाभाविक, नैसर्गिक बाब आहे, असे शरिफाला वयाच्या २४ व्या वर्षांपर्यंत वाटत होते. तामिळनाडूमधील एका छोटय़ाशा गावात दहा भावंडांसोबत वाढत असताना स्वत:च्या घरात ती या वर्चस्वाचा अनुभव घेत होती. शेजारीपाजारी, ओळखीच्या घरांमध्ये अशाच घटना घडताना सर्रास बघत होती. पण १९८८ साली तिला संधी मिळाली थेट पाटण्यात जाण्याची. तिथे होणाऱ्या एक महिला परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी तामिळनाडूमधून सत्तर महिला जाणार होत्या आणि त्यांना एका दुभाषाची गरज होती. शरिफाने ते काम स्वीकारले. त्या परिषदेत जे जग तिच्यासमोर आले ते तिला भयचकित करणारे होते. महिलांवरील अत्याचार, मारहाण, त्यांचा लैंगिक छळ, उपासमारीच्या अनेक सत्य कहाण्या समोर उलगडत असताना ती बघत होती. त्यावर गांभीर्याने होणाऱ्या चर्चा ऐकत होती. त्या परिषदेनंतर आपल्या गावात परतलेली शरिफा खानूम पूर्णपणे बदललेली होती. मुळातून हलली होती. पाटणा परिषदेतील सहभागानंतर तिला अशाच विविध महिला परिषदांची आमंत्रणे येत गेली. आपल्या आईसोबत पुडुकोही या गावात राहायला जाताना शरिफाच्या मनात सतत एकच विचार होता. अन्यायग्रस्त महिलांसाठी अगदी छोटय़ा प्रमाणात का होईना, स्वत:ला झेपेल तेवढे काम करण्याचा पण एकटीने काही पाऊल उचलण्यापूर्वीच आणखी चौघींचे हात तिच्या हातात गुंफले गेले होते. झीनत, प्रभा, संगम, कमला; प्रत्येकीला मनापासून वाटत होते निमूटपणे त्रास सोसणाऱ्या, उपासमार सहन करणाऱ्या, मारहाणीच्या खुणा मूकपणे लपवणाऱ्या मैत्रिणींसाठी काहीतरी करावे. संस्था वगैरे स्वप्न तेव्हा कोणाच्याच डोळ्यापुढे नव्हते, पण छोटय़ाशा कामाला निमित्तानिमित्ताने वेगळी वळणे मिळत गेली..
आज, काम सुरू करून दोन दशके उलटून गेल्यावर, या पाच जणींनी सुरू केलेल्या कामातून तामिळनाडूतील मुस्लीम स्त्रियांचे तब्बल २५ हजार सदस्य स्त्रियांचे एक तगडे नेटवर्क उभे राहिले आहे. मुस्लीम महिलांचे हक्क आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी ‘तामिळनाडू मुस्लीम वुमन जमात’ काम करते आहे. तलाकच्या अन्यायकारक घटनांपासून ते उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम महिलांना अर्थसाहाय्य देण्यापर्यंत विविध पातळीवर काम करणारी ही जमात, शरिफा आणि प्रभाने बघितलेल्या छोटय़ाशा स्वप्नापेक्षा किती तरी विराट होऊन प्रत्यक्षात अवतरली आहे. फक्त मुस्लीम स्त्रियांसाठी काम करण्याचा इरादा या पाच जणींचा कधी नव्हताच, पण देशातील घडामोडींनी त्यांना या वळणावर आणून ठेवले. अर्थात ती गोष्ट फार पुढची.
प्रभा, झीनत, संगम, कमला या शरिफाला भेटल्या तेव्हा त्यांनी स्त्री-हिंसेविरुद्ध थेट मैदानात उतरण्याऐवजी आधी एक हाताने बनवलेल्या पोस्टरचे प्रदर्शन तयार केले आणि जिल्ह्य़ातील शाळेत ते नेऊन लावले. स्वत:च्या पदरचे पैसे मोडून महिलांसाठी छोटी छोटी कामे करणाऱ्या या मैत्रिणींच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी जिल्हाधिकारी शीला राणीसुगत यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि अन्य शाळांमध्येही हे प्रदर्शन नेण्याबाबत सुचवले. खरे म्हणजे, कामात उतरला आहात तर ते अधिक शिस्तबद्ध रीतीने, आखणी करून आणि शासकीय योजनांची उपलब्ध मदत घेऊन करा असे त्यांना सुचवायचे होते आणि त्यामुळेच थोडय़ाच अवधीत शासनाने दिलेल्या जागेवर या महिलांनी अन्यायग्रस्त, गरजू महिलांसाठी तात्पुरते निवारा केंद्र उभारले. यादरम्यान शरिफा महिला साक्षरतेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात गेली होती. हा भाग मुस्लीमबहुल लोकसंख्येचा होता. इथे तिला पुन्हा तोच हिंसाचार दिसला, जो अन्य जाती-धर्मामध्ये यापूर्वी दिसला होता. आजपर्यंत केवळ महिलांवरील अन्याय आणि हिंसा याविरुद्ध या मैत्रिणी सरसकट लढत होत्या. किनारपट्टी भागातील भेटीनंतर शरिफाला स्वत:च्या धर्माची जाणीव झाली आणि मग सगळ्यांनाच वाटू लागले, आपले दु:ख वाटून घेऊन हलके करण्याची कोणतीच जागा, कोणताही अवकाश नसलेल्या या स्त्रियांसाठी काम करायला हवे.
दरम्यान, देशातही बाबरी विध्वंसामुळे आग पेटली होती. आणि त्यात भाजून निघत होत्या, सर्वसामान्य मुस्लीम स्त्रिया. एव्हाना ‘स्टेप’ अशा नावाने आकारास आणि नावारूपास आलेल्या या पाच मैत्रिणींच्या संस्थेत अनेक नव्या स्त्रिया स्वेच्छेने मदतीसाठी दाखल झाल्या होत्या. या सगळ्यांनाच वाटले, हा वैमनस्यातून पेटलेला वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी ‘सिव्हिल लिबर्टीज’साठी काम करणाऱ्या एका संघटनेच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून गावोगाव शांतता सभा घेतल्या आणि त्यानंतर आपल्या कामाला अधिक बळकटी, नेमकी दिशा मिळण्यासाठी एक पाहणी केली. ‘वुमन लिव्हिंग अण्डर मुस्लीम लॉज नेटवर्क’ या लंडनमधील संस्थेची मदत त्यासाठी मिळाली होती. तामिळनाडूतील पाच जिल्ह्य़ांतील मुस्लीम स्त्रियांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीची ही पाहणी होती. त्यातून समोर आलेल्या आकडेवारीमागील दाहकतेने या प्रत्येकीला अस्वस्थ, बेचैन करून टाकले. प्रत्येक पाच स्त्रियांमागे एक स्त्री ही एक तर शारीरिक, मानसिक अपंगत्व असलेली असते किंवा तलाकी / परित्यक्ता तरी! आणि यापैकी कोणत्याही समस्येचा उपाय मशिदीमध्ये भेटणाऱ्या पुरुषांच्या जमातीतर्फे घेतला जातो. ज्या कुराणाच्या आधारे हा न्याय केला जातो ते अरेबिक भाषेत लिहिलेले. त्यामुळे आकलनाच्या पलीकडे. मग कुराणाच्या तमीळ अनुवादाच्या प्रती ‘स्टेप’तर्फे गावोगावच्या मुस्लीम स्त्रीपर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि मुस्लीम महिलांच्या जमातीची वेगळी बैठक सुरू झाली. ही बैठक होते ती या महिलांना त्यांचे प्रश्न, त्यांच्या इच्छा, मागण्या मांडण्याचा अवकाश मिळावा म्हणून.
याच अवकाश देण्याच्या प्रयत्नांचा एक अत्यंत साहसी टप्पा म्हणून ‘स्टेप’तर्फे सध्या मुस्लीम स्त्रियांसाठी स्वतंत्र मशीद बांधण्याचे काम सुरू आहे. मशिदीसारख्या धर्मस्थळात प्रवेश करण्याचा अधिकार स्त्रियांनाही आहे हे सांगण्यासाठी हा जगातील अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे.
आज जमातीचे कामकाज तीन पातळ्यांवर होते. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तामिळनाडूत दहा जिल्ह्य़ांमध्ये जमातीच्या शाखा आहेत. राज्य पातळीवर असलेल्या समन्वयकांच्या टीममध्ये मुस्लीम स्त्रियांच्या बरोबरीने अन्य धर्मीय स्त्रिया आहेत आणि कामकाजात पुरुषांचा सहभाग आहे. प्रत्येक जिल्हा समन्वयकाला बॅचलर इन सोशॉलॉजीचा अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाद्वारे पूर्ण करावा लागतो. स्त्रियांच्या होणाऱ्या छळाच्या, हिंसेच्या अगदी टोकाच्या केसेस राज्यस्तरीय समितीकडे येतात. जिल्हास्तरीय समित्या या पोलिसांतर्फे ग्रस्त स्त्रियांसाठी जी हेल्पलाइन चालवली जाते तिला मदत करतात. ‘स्टेप’कडे आलेल्या शेकडो केसेसपैकी चाळीस टक्के केसेस समुपदेशनाद्वारे, एकतृतीयांश केसेस पोलीस हस्तक्षेपाद्वारे, तर उरलेल्या कायदेशीर कारवाई करून सोडवल्या गेल्या आहेत. एकीकडे स्त्री अन्याय-अत्याचाराबाबत असे थेट हस्तक्षेपाचे काम करणारी ‘स्टेप’, या प्रश्नी समाजात जागृती करण्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, बैठका- परिषदांसारखे उपक्रम सातत्याने राबवीत असते.
पण अन्यायाला विरोध करण्यासाठी एवढे पुरेसे नाही. स्त्रियांना स्वयंपूर्ण करण्यासाठीही बळ पुरवले तर याविरोधात जोर होईल हे या सगळ्या जणी जाणतात. म्हणूनच आजपर्यंत ‘स्टेप’ने किमान सातेकशे स्त्रियांना छोटय़ा उद्योगासाठी गरजेपुरते कर्ज दिले आहे. तालुका पातळीवर अशा छोटय़ा उद्योजक स्त्रियांचे गट बांधले आहेत आणि एकूणच आपल्या प्रत्येक उपक्रमाला एक निश्चित, ठोस अशी वेळेची आणि उपक्रमांची चौकट दिली आहे. अनेक महिला कार्यकर्त्यां, विचारवंत, आधुनिक पुरुष कार्यकर्ते यांच्या वर्दळीने या चौकटीमध्ये एक रसरशीत चैतन्य आले आहे.
शरिफा आणि तिच्या मैत्रिणींना आपले काम आणि आपली ऊर्जा अशी कोण्या एका धर्मापुरती मर्यादित ठेवायची नव्हती. त्यामुळेच त्या आणखीही एक खंत व्यक्त करतात. मुस्लीम धर्माविषयी भारतीय समाजात असलेल्या अनेक पूर्वग्रहांमुळे असेल कदाचित, पण भारतीय स्त्रीवादी चळवळीही मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नी काम करण्यास फारशा उत्सुक नाहीत, अशी त्याची ही खंत आहे.
निधर्मी म्हणवल्या जाणाऱ्या देशातील संवेदनशील नागरिक या गोष्टीमुळे अस्वस्थ व्हायला हवा…

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?