08 August 2020

News Flash

हर शख्स परेशान-सा क्यूँ है

शहरयारची ग़ज़्ाल असो वा कविता ती परंपरेशी नातं तोडत नाही. त्या परंपरांसोबत ती प्रवास करते, कारण ती परंपरा त्यांच्या भूतकाळाशी घट्ट जोडलेली आहे. त्यांची कविता

| July 25, 2015 01:01 am

ch10शहरयारची ग़ज़्ाल असो वा कविता ती परंपरेशी नातं तोडत नाही. त्या परंपरांसोबत ती प्रवास करते, कारण ती परंपरा त्यांच्या भूतकाळाशी घट्ट जोडलेली आहे. त्यांची कविता तत्कालीन तरुणांच्या भावनांचा आरसा आहे. तिच्यात ठायी ठायी तरुणांच्या व्यथा, वेदना, आशा-आकांक्षा, अंधूक भविष्याबाबतच्या चिंता व्यक्त होताना दिसते.

फिराक गोरखपुरी, कुरतुल ऐन हैदर अन् अली सरदार जाफरी यांच्यानंतर चौथा ज्ञानपीठ पुरस्कार उर्दू शायर शहरयार यांना जाहीर झाला, तेव्हा साऱ्याच उर्दू ग़ज़्ाल व नज्मप्रेमींना आनंद झाला असे म्हणता येणार नाही. कारण बशीर बद्र, निदा फाजली ही दोन नावे त्याच तोडीची अन् अधिक लोकप्रिय होती. त्यामानाने शहरयार यांची शायरी व्यक्तिकेंद्रित अधिक असून व्यथोपनिषद आळवणारी आहे, असे अनेकांचे म्हणणे होते. ‘मी’, ‘तू’ आणि ‘ती’ या वर्तुळातून ती क्वचित बाहेर पडते हे जरी खरे असले तरी त्या शायरीतील ‘मी’, ‘तू’, ‘ती’ व्यापक आशयाने प्रगट होतात हेही तेवढेच खरे. ‘शहरयार’ यांचे पुढील शेर वाचले तरी तुमच्या लक्षात येईल.
हर *सिम्त नजर आती है *बे-फस्ल जमीने
इस बार भी इस शहर में बरसात न आयी
आंधियाँ आती थी लेकिन कभी ऐसा न हुआ
*खौफ़ के मारे जुदा शाख से पता न हुआ
जहां भी, जब भी मिलती है, जिन्दगी मुझसे
कोई बिल्कुल अनोखा काम कर जाने को कहती है
मीठी है कि कडवी है सच्चाई बस इतनी है
रहना है *रिहाई तक इस *कैदे-मकानी में
दु:ख, उदासीनता, वैफल्यग्रस्तता या उर्दू शायरीच्या मूलभूत गरजा आहेत की काय असाच प्रश्न पडतो. पण हे भाव व्यक्तिगत प्रेमाची पातळी सोडून सामाजिक स्तरावर व्यापक भूमिकेतून उद्भवतात तेव्हा मात्र उर्दू कविता अन्य भारतीय कवितांच्या पंक्तीत जाऊन बसते.
शहरयार यांच्या मते, शायरी दोन प्रकारची असते जी गंभीर व सुंदर असते. ती जग देश व समाजाच्या समस्या, भावना स्थितींना मुखर करते व दुसरी जी मनोरंजनच करते. एक जी छापली जाते व दुसरी जी मुशायऱ्यात ऐकवण्यात येते. दुसऱ्या प्रकारच्या शायरीबाबत कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नसते. कारण उर्दूत या दोघांत एवढा फरक पडलाय की सांगता येत नाही. मुशायऱ्यात पेश होणारी शायरी उच्चस्तराची बहुधा नसते. त्यातील शायरांचा उद्देशदेखील तो नसतो. त्यांना केवळ लोकप्रिय व्हायचे असते. खरे तर श्रेष्ठ शायरी मुबलक प्रमाणात कधीच निर्माण होत नाही. अशातही चांगली शायरी कमी प्रमाणातच मंदगतीने होणे गरजेचे आहे. खालील शेर पाहा, मुशायऱ्यात हे दाद घेणार नाहीत.
दिलों में लोगों के हमदर्दयिाँ है मेरे लिए
मैं आज खुश हूँ कि मेहनत मेरी ठिकाने लगी
दुनिया में कहीं है भी, नहीं भी है, अजब है
मुद्दत से हमें ऐसी ही एक शै की तलब है
तमाम शहर में जिस अजनबी का चर्चा है
सभी की राय है, वह शख्स मेरे जैसा है
रुकने के *मुकान जहां भी आयें, रुक जाओ
यूं *जीना-ब-जीना उतरो दिल गहराई में
अन्य समकालीन शायरांपेक्षा तेच विषय पण वेगळ्या विचाराने व शैलीने शब्दबद्ध करण्याचे कसब शहरयार यांच्या लेखणीत आहे, त्यामुळे त्यांचं काव्य वेगळं ठसठशीतपणे उठून दिसतं. जरी ते तथाकथित मराठी ग़ज़्ालकारांच्या निकषांप्रमाणे ‘खणखणत’ नसेल. इथे खणखणणे म्हणजे तकलादू गुणांपेक्षा वाङ्मयीन मूल्य वरचढ असणे असे अभिप्रेत आहे.
शहरयार म्हणजे नगरमित्र. शहरयार यांचे मूळ नाव कुंवर इख्लाक मोहम्मद खान. ते उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हय़ातल्या आंवला या गावी ६ जून १९३६ रोजी जन्मले. तशी त्यांच्या घराण्यात शायरीची कुठलीच परंपरा नव्हती किंबहुना साहित्याशी कुणाचाही संबंध कधीही आला नव्हता. खलीलु रेहमान आजमी या जदीद म्हणजे साठोत्तरीच्या उर्दू शायरामुळे ते शायरीकडे वळले. १९६१ मध्ये त्यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून एम.ए. केले. १९६६ ला ते तेथेच उर्दू विभागात लेक्चरर म्हणून नियुक्त झाले. १९९६ ला उर्दू विभागाध्यक्ष या पदावरून निवृत्त झाले. ‘हमारी जबान’ या संस्थेशी निगडित होते. ‘गालिब’ नावाचे मासिकही त्यांनी काही काळ संपादित केले होते.
शहरयार यांचा पहिला काव्यसंग्रह ‘इस्मे आजम’ १९६५ मध्ये आला. त्यानंतर ‘सातवां दर’ (१९६९), ‘तीसरी हिज्र के मौसम’ (१९७८), ‘ख्वाब का दर बंद है’ (१९८५), ‘नींद की किरचें’ (१९९५) हे चार संग्रह प्रकाशित झाले. १९८७ साली ‘ख्वाब का दर बंद है’ या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शहरयार यांची एक सकारात्मक, प्रयत्नवादाचं समर्थन करणारी कविता ‘अंतिम प्रयास तर करायचाच आहे’ बघा –
मान्य आहे तुमचे हात थकून चूर झालेत
सुकाणूही जुने आहेत हेही खरे
किनारा फारच दूर आहे हेही मान्य,
दरिया वादळी आहे हेपण खरंय
होडी किनाऱ्यास लागणार नाही
पण, अंतिम प्रयास तर करायचाच आहे.
माणसाने शेवटपर्यंत आपत्तींशी लढा द्यायलाच हवा, प्रतिकार/ संघर्ष करण्याचा उपदेश ‘शहरयार’ अनेक कवितांमधून देतात. त्यांचे हे काही शेर-
माना कि दोस्तों को नहीं दोस्ती का पास
लेकिन ये क्या कि गर का एहसान लिजिए
अब जिधर देखिये लगता है कि इस दुनिया में
कहीं कुछ चीज ज्यादा है कहीं कुछ कम हैं
राही मासूम रजांच्या मते ‘शहरयार’ यांच्या काव्याभिव्यक्तीचे माध्यम ग़ज़्ाल आहे, कारण तो ‘ऑब्जेक्टिव्ह’ वास्तवाला व्यक्तिगत बनवून पाहतो. तर खलीलु रेहमान आजमींच्या मते ते नज्मचे उत्तम शायर आहेत. ते म्हणतात, ‘शहरयार’ अन्य व्यक्तीचे मरणदेखील स्वतचे मरण मानून विचार करतो. उर्दूच्या नवोदित शायरांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचे जे व्यसन ‘शहरयार’ला आहे ते कोणासही नाही. मनुष्याच्या एकटेपणाचा जेवढा अनुभव याच्या गाठी आहे. तेवढा अनुभव क्वचितच एखाद्याच्या गाठी असावा.
भूतकाळ-वर्तमानाच्या संदर्भात ते म्हणतात,
कल और साथ सबके इस पार हम खडे थे
इक पल में किसने हमको उस पार कर दिया है?
हमने खुद अपनी रात को इतना *तवील कर लिया
वर्ना हमारे शहर में जीने का ढब कुछ और है
सीने में जलन आँखों में तूफान-सा क्यूँ है
इस शहर में हर शख्स परेशान-सा क्यूँ है
शहरयारची ग़ज़्ाल असो वा कविता ती परंपरेशी नातं तोडत नाही. त्या परंपरांसोबत ती प्रवास करते, कारण ती परंपरा त्यांच्या भूतकाळाशी घट्ट जोडलेली आहे.भूतकाळ अन् भविष्यातील स्वप्ने शहरयार सतत पाहतात,
जो चाहती दुनिया है वो मुझसे नहीं होगा
समझौता कोई ख्वाब के बदले नहीं होगा
तुझको खोकर क्यूँ ये लगता है कि कुछ खोया नहीं
ख्वाब मे आयेगा तू, इस वास्ते सोया नहीं
शहरयार यांच्या शायरीत सामाजिक बांधीलकी असल्याने त्यांना आधुनिक शायर मानले जात असावे असा त्यांचा कयास आहे. त्याच्या मते पारंपरिक ग़ज़्ाल दिवसेंदिवस आपली शब्दसंपदा, जाणिवा, भावना बदलत जाते अन् असे घडणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्याचमुळे ती उत्तरोत्तर आधुनिक व समकालीन घडत जाते.
शहरयार यांच्या कवितेबाबत एक आक्षेप असा घेतला जातो की, ते समाजविन्मुख आहेत व ‘आयसोलेटेड इन्डिव्हिजुअल’ आहेत. त्यांच्या काव्यात एकांत अत्याधिक साकारतो. म्हणून ते पलायनवादी आहे, हा आक्षेप निर्थक आहे. शहरयार यांची कविता तत्कालीन तरुणांच्या भावनांचा आरसा आहे. तिच्यात ठायी ठायी तरुणांच्या व्यथा, वेदना, आशा-आकांक्षा, समस्या अंधूक भविष्याबाबतच्या चिंता व्यक्त होताना दिसते.
या संदर्भात ‘क्रांतीची शुभवार्ता’ ही त्यांची कविता,
हवा बनून जे बाटलीच्या देहात बंद आहेत
ते सारे दैत्य आहेत.
भय व तिरस्काराचे,
ते सारे दैत्य एक दिवशी मुक्त होतील,
त्या दिवशी या शहरातील एकेक व्यक्ती
स्वत:वर लज्जित होईल.
हव्यासाने इंद्रजाल तुटल्याने विस्मित होईल.
नजरा कधी अभाळाच्या दिशेला वळतील.
कधी हात एखादी खूण करतील.
कधी ओठ काही तरी बोलण्याचा विचार
करतील.
फक्त युद्ध होईल
चारही दिशांतून दगडांचा वर्षांव होईल.
शहरयार यांनी गद्य कवितादेखील लिहिल्या, त्यांच्या मते, ‘गद्यकविता ही पद्याचीच एक विधा असून जे छंदोबद्ध लिहू शकतात व लिहितात त्यांनाच गद्यकविता लिहिण्याचा अधिकार आहे. जे शायरी (छंदोबद्ध) करू शकतात तेच उत्तम गद्यकविता लिहू शकतील जी भावना, जाणीव त्यांना छंदोबद्ध करणे जमत नसेल तीच ते गद्यकवितेत मांडतील. मी थोडय़ा गद्यकविता लिहिल्या आहेत. पण छंदोबद्ध कविता रचताना जो आनंद मला मिळाला तो गद्यकविता लिहिताना मिळाला नाही.’’
आगामी काळ उज्जवल असे आश्वस्त करणारे ‘शहरयार’ यांचे शेर ऐका -गेल्या वर्षी शहरयार यांचे कर्करोगाने निधन झाले. प्रेयसी-पत्नी नजमापासून विलग झाल्याने ते मनाने खचले होते. चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण लक्षणीय ग़ज़्ालांमुळे त्यांचे नाव झाले. ‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये’, ‘अजीब सा.. मुझ पर गुबर गया यारों’
‘सीने में जलन आँखों में धुवाँसा क्यू है’.. एवढेच म्हणणे आता आम्हा मित्रांच्या हाती आहे.
शब्दार्थ : सिम्त – दिशा, बे-फस्ल – पीक नसलेली, खौफ़ – भय, रिहाई – मुक्तता, कैदे-मकानी – घरातच कैदी, शय – वस्तू, शख्स – व्यक्ती, दोस्ती का पास – मत्रीचा मान राखणे, तवील – दीर्घ, तस्लीम – मान्य, मुकाम – पडाव/ ठिकाण
डॉ. राम पंडित – dr.rampandit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 1:01 am

Web Title: shayar shahryar
Next Stories
1 बाई झाली सरपंच, सुधारला गावाचा प्रपंच
2 ए फासले…
3 शिक्षण, देश आणि माणसं : हवंहवंसं.. तेच ते
Just Now!
X