ही एक अशी डायरी आहे, ज्यात येणार आहे ‘तिचा’ एक दिवस.. त्या दिवसातून उभं राहील तिचं उभं-आडवं आयुष्य. ती कमवते आहे, बहुतांशी मजबुरीनेच, पण आता ती तिच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे. जे दोन घास पोटात घालते तेच खरं काम, हे आयुष्याचं सत्य तिने अनुभवानं पदरी पाडून घेतलंय. जगाने कितीही नाक मुरडलं, टोचून खाल्लं, वाळीत टाकलं तरी ती बेफिकीर आहे, कारण ती उभी आहे, स्वत:च्या पायावर. ती ट्रक ड्रायव्हर आहे, मृतदेह फाडणारी रुग्णालयातील मदतनीस आहे, सार्वजनिक संडास साफ करणारी मेहतरही आहे.  सात्त्विक, सोज्वळ जगण्याच्या पलीकडे जाणारी यातील ही काही आयुष्ये, समाजाचा मुखवटा टराटरा फाडत त्यातही आपलं लखलखतं स्वत्त्व कायम टिकवणारी.. दर पंधरा दिवसांनी.
ती आहे ट्रक ड्रायव्हर. गेली अकरा वर्षे समोर येणाऱ्या पुरुषी आव्हानांना कधी हॉर्न देत कधी ओव्हरटेक करत पुढे जाणारी. कधी ब्रेक फेल होतात, कधी ट्रॅफिक जाममध्ये गाडी अडकते. पण ती त्यातूनही आपला मार्ग काढते, कारण थांबायची तिला मुभाच नाही. तिला स्वतला जगवायचंय नि मुलांनाही वाढवायचंय. ती सावध आहे कारण, ‘एक गलती खेल खतम.’ हे तिच्याच ट्रकवरचं वाक्य तिच्या आयुष्यालाही लागू पडतं.
रात्रीचे साडेअकरा वाजलेत. गाडीत माल भरून विजापूरच्या धाब्यावर जेवण आटोपून ट्रककडे निघाले, तेव्हा खाटल्यावर बसलेल्या दोघा-तिघा ट्रक ड्रायव्हर्सनी एकमेकांना केलेले इशारे माझ्या नजरेने अचूक हेरले. त्यांच्याकडे एक नजर टाकून स्कार्फ डोक्यावरून घट्ट लपेटून घेतला आणि ड्रायव्हिंग सीटवर उडी मारून बसले. आरशातून पाहिलं तर ते तिघे अजूनही माझ्या ट्रककडेच बघत होते. ड्रायव्हिंग सीटवर एक तरुणी बसलीय हे बहुधा त्यांच्या पचनी पडत नसावं. अर्थात हे नेहमीचेच आहे. हां, परवा भेटलेल्या एका वयस्क सरदारजी ट्रक ड्रायव्हरने मात्र मला चक्क सॅल्यूट ठोकला आणि म्हणाला, ‘‘हमें बहोत खुशी है की तुम ये काम कर रही हो! तुमने ये साबित किया है की आज की नारी में भरपूर हिम्मत है! बेटा मेरा आशीर्वाद है तुम्हे!’’ माझे डोळे भरून आले. म्हटलं, ‘‘सच है पापाजी! आखिर मंझिल उन्ही को मिलती है जो रास्तोंसे दोस्ती कर लेते है! और हमने तो ग्यारह सालसे ये दोस्ती बखुबी निभाई है!’’
मिट्ट काळोखातून लांबच लांब रस्त्यावरून माझा ट्रक वेगात पळत होता. थंड हवेचे सपकारे चेहऱ्यावर बसत होते. अचानक लक्षात आलं एक जीप बराच वेळ माझा पाठलाग करतेय. एकदा त्या जीपला रस्त्याकडेला दाबली मग राँग साइडने गाडी पुढे काढली. तरी त्यांचा पाठलाग चालूच! समोर एका गावातल्या एटीएमजवळ जरा गर्दी दिसतेय. म्हटलं, इथेच थांबवावी गाडी! गाडी थांबवली आणि सामोरीच गेले त्या जीपच्या, पळाले इतर. एक मात्र सापडला, गचांडीच धरली त्याची! म्हटलं, ‘‘क्यू रे, का पाठलाग करतोयस माझा?’’ तर तो घाबरत म्हणाला, ‘‘आम्हाला वाटलं, ट्रकमध्ये दोन नंबरचा माल आहे. म्हणून ट्रक थांबवत होतो.’’ ‘‘अच्छा! चल आयकार्ड दाखव तुझं. बघू तू पोलीसवाला आहेस की आरटीओवाला?  याद राख. पुन्हा पाठलाग केलास तर तुझ्या गाडीवर ट्रक असा घालेन के जिंदा नही बचेंगे तुम लोग’’ माझा अवतार बघून तिघंही जीप घेऊन सुसाट पळाले.  अरे, स्टिअरिंग हातात असताना घाबरायचं कशाला? समोरच्याला बिनधास्त भिडायचं. जास्तीतजास्त काय होईल. तो मरेल नाहीतर आपण मरू! एक ना एक दिन मरना तो है ही!
गेल्याच आठवडय़ात चंबळच्या खोऱ्यातून जात असताना जिवावर बेतलं होतंच की! त्याचं काय झालं, संध्याकाळी पिपरीयाला गाडी लोड केली आणि हायवेला लागले, एकाने सांगितलं, ‘‘तू ज्या रस्त्याने चालली आहेस तो चुकीचा आहे. तू हा समोरचा रस्ता पकड. तो रस्ता मोठा आहे.’’ म्हटलं, ठीक आहे. त्या रस्त्याने जाऊ. अर्धा किलोमीटर रस्ता कापला आणि लक्षात आलं, हा रोड तर बंदच आहे. गाडी रस्त्याच्या कडेला लावली. रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. रस्ता पूर्ण सुनसान होता. एवढय़ात कुठूनतरी तीन मोटरसायकलवाले आले. ते म्हणाले, ‘‘तुला इथे ट्रक टर्न नाही करता येणार. याच रस्त्याने पुढे जा.’’ निघाले तशीच पुढे. पण हाय! मधोमध एक मोठा नाला गढूळ पाण्याने भरून वाहात होता. गाडी वळवणं अशक्य होतं. परत ते तीन मोटरसायकलवाले भेटले. म्हणायला लागले, ‘‘पुढे पक्की सडक आहे. तू आणखी थोडी पुढे जा.’’ वेगळ्या रस्त्याने आणखी पुढे गेलं तर सगळा उंचसखल पहाडोवाला रस्ता! त्या रस्त्यात तर ट्रक नक्कीच फसणार. मी थांबले. ते तिघे माझा पाठलाग करत आले. आता मात्र माझा संयम संपला. ट्रकमधूनच त्या तिघांवर ओरडले, ‘‘खबरदार तुम्ही आता माझ्या वाटेत आला तर! घालीन गाडी तुमच्या अंगावर!’’ पुढे एक बरासा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावर गाडी घातली तर अचानक समोर विजेच्या तारा लोंबकळत होत्या. त्यात जाऊन ट्रक अडकला. मी ट्रकच्या टपावर चढले. काठीने त्या वायर्स उंच केल्या. तेवढय़ात झपकन समोरच्या गावातले लाइट्सच गेले. एकदम किर्र काळोख झाला. अभी तो मुझे भागनाही है। नही तो गांववाले मेरा चक्का जाम करेंगे! पटकन सीटवर बसले. गाडी थोडी पुढे दामटवली तर पुन्हा वायर्सचं जाळं! आता आली का पंचाईत! म्हटलं, पळ काढावा इथून. जेमतेम वीस पावलं पुढे जातेय तर लाइट गेल्याने बंद पडलेल्या भजनवाल्याचं मंडळ पुढय़ातच येऊन उभं राहिलं. मी आधी ट्रकमधला भलामोठा लोखंडी रॉड बाहेर काढला. म्हटलं, ‘‘तुमच्यापैकी कोणीही माझ्याजवळ येणार नाही. मला हातसुद्धा लावणार नाही. तुमच्या वायरी तुटल्यात. त्याची नुकसानभरपाई मी देईन तुम्हाला!’’ लगेच ते मघाचे तिघे पुढे आले. ते त्या गावातले गुंड असावेत. ते ओरडले, ‘‘जरूर कुछ गडबड है! दो नंबर का माल लेके भागती है! चलो जला देंगे इसका ट्रक!’’ मी हातातला लोखंडी रॉड आपटला. म्हटलं, ‘‘खबरदार कोणी हात लावला माझ्या ट्रकला तर! इज्जत की रोटी कमाती हूं! कोई गलत काम नही करती! बुलाओ पुलीस को!’’ असं म्हणून मी चक्क त्या भजनी मंडळींतच बैठक मारली. एक बाई पुढे आली. तिने मला पाणी दिलं. मग तिथेच स्टोव्ह पेटवला. डाळभात शिजवायला घेतला. तोवर भजनी मंडळी जरा शांत झाली. दोघेजण पोलिसांना बोलवायला चौकीवर गेले. उरलेले मला भजन म्हणण्याचा आग्रह करायला लागले. म्हटलं, जो होगा देखा जाएगा! पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात मी निर्धास्तपणे गायला लागले, ‘‘कान्हाड कान्हा आन पडी रे तेरे द्वार’’ थोडय़ा वेळाने पोलीस आले. त्यांनी गाडीचे पेपर्स तपासले. माझ्या मोबाइलमधले नंबर्स तपासले. आता ते गुंड हटून बसले. ‘‘आम्हाला तीन हजार रुपये नुकसानभरपाई दे!’’ म्हटलं, ‘‘ए तुमच्या वायरी तुटल्यात त्या पाचशेच्या पण नाहीत. मुकाट हे पाचशे रुपये घ्या आणि सुटा. नाहीतर तेवढेही देणार नाही.’’ मग पोलिसांनीच मला गाडी वळवायला मदत केली. चौकीवर नेलं. चहा पाजला आणि नीट रस्त्यावर सोडलं. आपण कसे वागतो त्याप्रमाणे समाज आपल्याशी वागत असतो. सीर उठा के, खुल के जिओ तो हर पल आसान है।
या व्यवसायात अडचणींचे पहाड आहेत. विशेषत: स्त्रियांसाठी! म्हणून तर कोणी स्त्री जीव धोक्यात घालून या ‘लायनीत’ यायला तयार नसते. मी तर क्लीनरसुद्धा न घेता मैलान्मैल एकटी गाडी चालवते. त्यांचं तंबाखू खाणं, दारू पिणं मला आवडत नाही. मी मस्त तोंडात लवंग-वेलची टाकते. मोठ्ठय़ाने गाणी लावते आणि निघते पुढे. हां, आता रात्री-अपरात्री खूपच पेंगायला लागले तर एखाद्या गावात रस्त्याकडेला गाडी लावते आणि मालावरच्या ताडपत्रीवर मस्त ताणून देते. आजपर्यंत मी कधीही हॉटेलमध्ये मुक्काम नाही केलेला. मला माझी गाडीच जास्त सुरक्षित वाटते. कधीकधी फ्रेश व्हायची खूपच निकड भासली तर दुपट्टा तोंडावर घट्ट लपेटते. अंगावर शर्टपँट असते. एखादा आडोसा बघते आणि होते मोकळी! पण शक्यतो रात्री कोणाच्या नजरेस न पडण्याची मी काळजी घेते. हां, दिवस उजाडला की मग मात्र मुद्दाम लोकांसमोर वावरते. त्यांना दाखवते की बघा आता मी ट्रक घेऊन निघणार आहे. लोक जेव्हा डोळे फाडून माझ्याकडे, ट्रककडे बघतात तेव्हा मला खूप मजा वाटते. गर्व होता है खुदपें! मजबुरीसे सही लेकिन जिंदगीने ही मुझे इस मकामपे पहुँचाया है!
अकरा वर्षांपूर्वी अचानक माझा नवरा अपघातात गेला. तेव्हा मला कुठे ठाऊक होतं पुढय़ात काय वाढून ठेवलंय? तो वकील होता. पण वकिली सोडून तो या वाहतुकीच्या धंद्यात आला. मी बी.कॉम. होते. लग्नानंतर एलएल.बी. केलं. त्या वेळी आमचे तीन ट्रक होते. पण नवरा अचानक गेला आणि मालमत्तेवरून वादंग सुरू झाले. आमचे तिन्ही ट्रक, बँक अकाउंट्स सर्वच मालमत्तेवर स्टे आला.  एके दिवशी माझ्याजवळ शंभर रुपयेसुद्धा नव्हते. मुलगा यशवीन पाच वर्षांचा, मुलगी याशिका दहा वर्षांची! मी न्यायाची वाट बघत बसले तर ट्रक पडून राहिले असते. मला ते चालवण्याची कोर्टाने परवानगी दिली. सुरुवातीला ड्रायव्हर्स ठेवून पाहिले. पण धंद्यात जबरदस्त खोट आली. तोवर मी साधी कारसुद्धा चालवत नव्हते. पण एक दिवस ठाम निर्णय घेतला आणि ट्रक चालवायला शिकले. माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. पण माझी मजबुरी कोणाही, अगदी रक्ताच्या नातेवाईकानेही समजून नाही घेतली. एक दिवस मुलांना जवळ घेतलं. समजवलं. एकटं कसं राहायचं.. स्वत:ला कसं सांभाळायचं. माझी दहा वर्षांची याशिका त्या दिवसापासून यशवीनची आई झाली. मी केलेलं जेवण संपलं की स्वयंपाक करण्यापासून मस्तीखोर यशवीनला सांभाळणं, त्याचा अभ्यास घेणं.. सगळं सगळं ती सांभाळू लागली आणि मी ट्रक घेऊन घराबाहेर पडले.
माझ्या ट्रकवर घोषवाक्य आहे,’One mistake Game Over!’ एक गलती खेल खतम’ सुरुवातीला ट्रान्सपोर्टचा धंदा जमत नव्हता. ड्रायव्हिंगचं तंत्र जमत नव्हतं. तेव्हा अशा अनेक चुका मी केल्यात. घाटामध्ये गिअर टाकत गाडी चालवण्याऐवजी मी ब्रेकवर गाडी चालवत गेले आणि एकदम ब्रेक फेल झाले. गाडी दरीच्या बाजूला वळली. चपळाईने गाडीतून उतरून चाकाखाली मोठ्ठा दगड लावला आणि दरीपासून चार पावलांवर गचकन गाडी थांबली. मी बालबाल वाचले. माझ्या डोळ्यांसमोर माझी दोन चिमणी लेकरं आली.
आज सग्यासोयऱ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवलेय. त्यांना वाटतं, मी शर्टपॅन्ट घातली. बाईपण विसरून पुरुषी झालेय. अरे पण, माझ्यातली ‘आई’ तिच्या पिल्लांसाठीच हे करतेय ना! भेटावं. फोन केला. तर म्हणाले, ‘‘तू ट्रक घेऊन गावात आलीस तर आमची अब्रू जाईल! ट्रक गावाबाहेर सोडून भेटायला ये!’’ त्या क्षणी मी माहेरच्या माणसांकडे पाठ फिरवली. माझा ट्रक माझी मायमाऊली आहे. जिवात जीव आहे तोवर मी तिला अंतर देणार नाही. तिच्यामुळेच रोज मला जगण्याची उमेद मिळते..
हे सगळं आठवता आठवता पहाट झालीच. ट्रक बोगद्यातून बाहेर पडतो आहे.. हळूहळू वाढत चाललेल्या उजेडाने मार्ग आता स्पष्ट झालाय.. आणि त्याबरोबर माझा पुढचा प्रवासही..  
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com