साधना तिप्पनाकजे

ताईंनी गावकऱ्यांना- ‘तुम्हाला कोणताही दाखला हवा असल्यास, कराची थकबाकी भरली असेल तरच दाखला मिळेल,’ असं सांगितल्यामुळे कराची रक्कम पटापट वसूल होऊ लागली. विकासकामांना गती मिळाली. गावातील रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली. पथदिवे लागले. एके काळी फक्त एक ‘रबर स्टँप’ म्हणून ओळख असणाऱ्या शिल्पाताई आता आपल्या कर्तृत्वाची वेगळी मोहोर पंचायतराजवर उमटवत आहेत.  पतीच्या निधनानंतर कमालीच्या जिद्दीने उभ्या राहिलेल्या अमरावती जिल्ह्य़ातील शाहापूर गावच्या सरपंच शिल्पा सापके यांची यशकथा..

घटनादुरुस्तीच्या सुरुवातीच्या दशकात पंचायतराजमधील स्त्री लोकप्रतिनिधी या कोणाच्या तरी सांगण्यावरूनच राजकारणात आल्या. त्या ‘पती, कुटुंबातल्या किंवा गावातल्या प्रस्थापितांच्या रबर स्टँप’ याच भूमिकेत होत्या. आजही काही ग्रामपंचायतींमध्ये हीच परिस्थिती आहे. आजच्या आपल्या सरपंच याच वाटेवरच्या प्रवासी, मात्र या वाटेवर एका भयंकर आघाताला त्यांना सामोरं जावं लागलं आणि तोच त्यांच्यातल्या आमूलाग्र बदलाचं साधन ठरला. परिणामस्वरूप शाहापूर गावाला एक कणखर आणि विकासाच्या वाटेवर नेणारं खणखणीत नेतृत्व मिळालं.

अमरावतीमधल्या रेवसा गावच्या शिल्पा २००८ मध्ये लग्नानंतर अमरावतीमधल्याच शाहापूर गावात आल्या. त्यांचं लग्न शाहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश सापके यांच्याशी झालं. महेश यांना पूर्वीपासूनच राजकारणाची आवड होती. त्यामुळे ते घरची दीड एकर शेती सांभाळून गावातल्या कामांमध्ये सहभागी होत असत. शिल्पा यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं; पण कुटुंबातच पूर्णत: रममाण झालेल्या. काही कामाकरिता घराबाहेर पडल्या, तरच बाहेरच्या जगाशी संबंध. नाही तर आपलं घर भलं नि आपण! अशी त्यांची वृत्ती होती. २०१२ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. या वेळी पती महेश यांनी त्यांना ‘स्त्री आरक्षित सदस्य’ या पदासाठी फॉर्म भरण्याचा आग्रह केला. त्या त्यासाठी तयार नव्हत्या पण पतीच्या आग्रहावरून त्यांनी अखेर अर्ज दाखल केला आणि निवडूनही आल्या.

मात्र सांगितलं म्हणून केलं, हीच त्यांची भूमिका होती. एक लहान मुलगी, बाळंतपण आणि मग आणखी एका बाळाची जबाबदारी यातच त्या गुरफटलेल्या होत्या. कधी वेळ मिळालाच तर त्या ग्रामपंचायतीत जायच्या. सभेच्या रजिस्टरवर फक्त सही करायच्या. गावकारभार काय असतो, ग्रामपंचायतीची कामं, सदस्यांचे अधिकार आणि कामं या सगळ्यापासून त्या पाचही वर्ष दूरच राहिल्या.

ऑक्टोबर २०१७ मध्ये पुन्हा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. या वेळी सरपंचपद स्त्रीकरिता आरक्षित होतं. आता तर सरपंच थेट निवडणुकीने निवडायचा होता. पुन्हा एकदा शिल्पा यांना महेश यांनी निवडणूक लढवायला सांगितली. मात्र त्यांनी ‘मला यातलं काही कळत नाही, घरच्या जबाबदाऱ्या आहेत,’ असं सांगून नकार दिला; पण अखेर पतीच्या आग्रहास्तव त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरलाच. ताईंच्या पॅनलचा प्रचार सुरू झाला. प्रचारादरम्यान विरोधी पॅनलची एकमेकांवर टीका हे तर इथल्या प्रचारातही झालं; पण सरतेशेवटी शिल्पाताई आणि त्यांचं पॅनल या वेळीही जिंकून आलं. विजयी उमेदवारांची वाजतगाजत मिरवणूक निघाली. मिरवणुकीदरम्यान गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटवण्यात आला.

शाहापूर तसं चार प्रभाग असणारं १२०० लोकवस्तीचं लहानसं गाव. मिरवणुकीच्या वेळचा वाद मिटला, तरी गावात दबक्या आवाजात, ‘बाई काय कामं करणार?’ ही टीका होत होतीच. या शंकेला बळकटी मिळेल अशी घटना घडली. शासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोन बोअरवेल्समधून गावाला पाणीपुरवठा होत असे. ग्रामपंचायतीचं दोन्ही बोअरवेलचं प्रत्येकी पन्नास हजार म्हणजेच एक लाख रुपयांचं बिल थकलं होतं. पाणीपुरवठा विभागानं बिल भरण्याकरिता ग्रामपंचायतीला नोटिसा द्यायला सुरुवात केली; पण ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात शिल्लक शून्य होती. गावात करवसुली होत नव्हती. त्यामुळे ‘बिलाचा भरणा कसा करायचा’ हा प्रश्न सरपंच आणि नवीन सदस्यांसमोर होता. शेवटी पाणीपुरवठा विभागानं दोन्ही बोअरवेल्सची जोडणी कापली.

गावाचा पाणीपुरवठा बंद झाला. पाण्याची इतर कुठलीही सोय नाही. परिणामी, गावात प्रचंड गोंधळ सुरू झाला. शिल्पाताईंना निवडून येऊन दोनच महिने होत होते. गावात टीका होऊ लागली, ‘तुम्ही कामं करणार असं सांगितलंत, म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं; पण उलट आमचं पाणीच तुम्ही कापलं.’ कराची वसुली नाही, बँकेत शिल्लक नाही आणि गावातला दबाव वाढू लागला. शिल्पाताईंच्या पतीवर या सगळ्याचा खूप ताण येऊ लागला. शेवटी दोघा पती-पत्नीने राजीनामा देत निर्माण झालेल्या त्रांगडय़ातून सुटका करून घेऊयात, असा निर्णय घेतला.

मात्र महेश यांनी या सगळ्याचा प्रचंड ताण घेतला आणि एकदम टोकाचा निर्णय घेतला तो आत्महत्येचा. अचानक आलेल्या या आपत्तीला शिल्पाताई कशा सामोऱ्या गेल्या असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही. दोन लहान मुलं, सरपंच पदाची जबाबदारी, गावातली कामं, लोकांची टीका.. आणि आता नवऱ्याची आत्महत्या. शेवटी शिल्पाताईंनी राजीनाम्याचा निर्णय पक्का केला. या घटनेनंतर शिल्पाताईंना भेटायला स्थानिक खासदार, आमदार आणि पंचायत समिती सभापती आले होते. त्या कमालीच्या खचून गेल्या होत्या. कुटुंबाचा अजिबात पाठिंबा नव्हता. सगळ्या लोकप्रतिनिधींनी शिल्पाताईंची समजूत काढली. ते त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करू लागले. शिल्पाताई म्हणाल्या, ‘‘गावकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच मी पद ठेवेन, नाही तर राजीनामा देते.’’ गावकरीही आता शिल्पाताईंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. मग शिल्पाताईंनी आपला निर्णय बदलला. शिल्पाताईंनी सर्वात आधी गावकऱ्यांना कर भरण्याचं आवाहन केलं. कारण ग्रामपंचायतीचे कर भरले तरच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आणि मगच त्या काही तरी करू शकणार होत्या. याचा सकारात्मक परिणाम झाला आणि कराची काही रक्कम वसूल झाली.

पाणी हा सर्वाच्याच निकडीचा विषय. गावाचे चारही प्रभाग उंचसखल भागांत विभागले आहेत. उन्हाळ्यात तर पाण्याकरिता खूप हाल सहन करावे लागायचे. पाणीपुरवठा विभागाला विनंती केली, की एक लाख रुपये एकदम भरणं शक्य नाही. आम्ही आता यातली अर्धी रक्कम भरतो आणि मग दर महिन्याला थोडी-थोडी करत उरलेली रक्कम भरतो. गावचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करा. शिल्पाताईंच्या शिष्टाईने काम झालं. पाणीपुरवठा विभागाने त्यांची विनंती मान्य करून बोअरवेलची जोडणी पुन्हा सुरू केली. गावाचा पाणीपुरवठा सुरू झाला. याच दरम्यान चौदाव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला मिळू लागला. यातल्याच निधीद्वारे पाणीपुरवठा विभागाचं बिलंही भरलं जातं.

गावच्या पाणीप्रश्नावरच शिल्पातरईनी  लक्ष केंद्रित केलं. नवीन दोन बोअरवेल्स बांधण्यात आल्या. चारही प्रभागांमध्ये हँडपंप बसवले गेले. गावात नवी जलवाहिनी टाकण्यात आली. सर्व घरांना जोडणी देण्यात आली. प्रत्येक घरात पाणी पोहोचलं. आता गावाला रोज पाणीपुरवठा होतो.

यामुळे गावकऱ्यांना ‘आता शिल्पाताई आपलं काम करणारच’ असा विश्वास वाटू लागला; पण तरीही काही विरोधक होते. त्यांची टीका सुरू होतीच. यातीलच एक जण एकदा दारू पिऊन थेट ग्रामपंचायतीत आला आणि शिल्पाताईंना शिवीगाळ करू लागला. ताईंनी पोलीस तक्रार दाखल केली. त्या व्यक्तीवर कारवाई झाली. शाहापूरची ग्रामपंचायत बस स्थानकाशेजारीच आहे. या भागात पोलिसांना एक चौकी उभारायचीच होती. शिल्पाताईंनी लगेचच ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातील ‘डीआरडी’ ग्रामीण विकास विभागाच्या खोल्यांपैकी एक खोली पोलीस चौकी उभारण्याकरिता दिली. यामुळे या भागात पोलीस चौकीही झाली आणि चौकीच्या भयामुळे ग्रामपंचायतीमधल्या गैरवर्तनालाही आळा बसला.

इतर विरोधकांबद्दल त्यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या सर्व गोष्टींमध्ये ताईंचं वेगळं व्यक्तिमत्त्व विकसित होऊ लागलं होतं. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढू लागला. गावकऱ्यांची कामं होऊ लागल्याने गावात चतन्य येऊ लागलं. कराची वसुली होण्याकरिता शिल्पाताईंनी काही पावलं उचलली. ताईंनी गावकऱ्यांना  ‘कराची थकबाकी भरली असेल तरच दाखला मिळेल’ असा पवित्रा घेतला. यामुळे कराची रक्कम पटापट वसूल होऊ लागली. कर भरण्याकरिता ग्रामपंचायतीचं वसुली पथक गावात फिरू लागलं. गाव पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. काही गावकरी म्हणू लागले, ‘सोयाबीन विकल्यावर, तूर विकल्यावर, अमुक एका तारखेला या. कर भरतो.’ वसुली पथकाचे लोक गावकऱ्यांनी सांगितलेल्या दिवशी संबंधित घरात वसुलीकरता जाऊ लागले. ही मात्रा चांगली लागू पडली. थोडाफार विरोध करणाऱ्यांची पंचायत समिती अधिकारी येऊन समजूत काढू लागले. गावातील विकासकामांना गती मिळू लागली. गावातील रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली. आवश्यक त्या भागात नवीन रस्ते बांधण्यात आले. गावात पथदिवे लागले. खासदार निधीमधून गावातल्या चौकात उंच, मोठे दिवे बसवण्यात आले.

या कामांमुळे संपूर्ण गाव शिल्पाताईंसोबत उभं राहिलं. विरोधकांचा विरोध मावळला आणि तेही आता शिल्पाताईंची साथ देऊ लागलेत. याच दरम्यान शिल्पाताई ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या प्रशिक्षणाला जाऊ लागल्या. त्यामुळे त्यांना गावकारभाराची आणि सरपंचांच्या अधिकारांची चांगली माहिती होऊ लागली. ग्रामसेवकही त्यांना प्रशासकीय कामांमध्ये चांगली मदत करायचे. गावातली महिला सभा सक्षम होऊ लागली. गावातल्या स्त्रियांकरिता पाणी, वीजपुरवठा, घरकुल आणि शौचालय हे महत्त्वाचे विषय होते. शिल्पाताईंनी या सर्व मुद्दय़ांकडे लक्ष दिलं. ही कामं करवून घेतली.

ताईंची मुलगी आता ११ वर्षांची आणि मुलगा ७ वर्षांचा झालाय. थोडी जमीन आहे त्यातून मर्यादित उत्पन्न निघतं. लोकसंख्येच्या निकषावर सरपंचांना मिळणारं मानधन आणि निराधार स्त्रीकरिता मिळणारं मानधन यावर त्या आपला संसाराचा गाडा ओढत आहेत. गावाकरिता शिल्पाताईंना आणखी खूप काही गोष्टी करायच्या आहेत. स्वत:चं वैयक्तिक दु:ख बाजूला सारून आज ताईंनी स्वत:मध्ये सकारात्मक बदल केला आहे. एके काळी ‘रबर स्टँप’ म्हणून ओळख असणाऱ्या शिल्पाताई आता आपल्या कर्तृत्वाची वेगळी मोहोर पंचायतराजवर उमटवत आहेत.

शिल्पाताईंच्या या जिद्दीला सलाम. ताईंना यापुढेही गावकारभारात, पंचायतराजमध्ये सहभागी होत ‘कारभारीण’ म्हणून काम करतच राहायचं आहे. भविष्यात मोठय़ा जबाबदाऱ्याही त्या यशस्वीपणे निभावतील यात शंका नाही. त्यांच्या स्वप्नाच्या पूर्तीकरिता खूप शुभेच्छा!

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com