सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अनेक देशांत जाणं आलं. अनेक माणसं भेटली. मनात राहून गेली.. आज ती कुठे आहेत? सिनेमाच्या पोतडीतल्या या आणखी काही लघुकथा..

बार्सिलोनाचा चित्रपट महोत्सव.. या महोत्सवात अपुऱ्या, पूर्ण न झालेल्या चित्रपटांची स्पर्धा होती. त्याला रोख बक्षीस होतं. आम्ही तेव्हा ‘जिंदगी जिंदाबाद’ हा एड्सवरचा चित्रपट बनवत होतो. निम्मंसुद्धा शूटिंग पूर्ण झालेलं नव्हतं. काही शूट केलेले प्रसंग आम्ही स्पर्धेसाठी पाठवले. आम्हाला ते सीन्स दाखवण्यासाठी महोत्सवाचं निमंत्रण आलं आणि पारितोषिकही मिळालं. तिथे एलिझाबेथ भेटली. अत्यंत अशक्त, पांढरट गोरी दिसणारी, सतत हातात कुठले ना कुठले कागद घेऊन इकडेतिकडे पळत असलेली, पळत नसली तर टाइपरायटरवर काहीतरी टाइप करत असलेली.

हे वर्ष होतं १९९६. ती मूळची ब्रिटिश, पॅरिसमध्ये राहणारी आणि युरोपात वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये काम करणारी. आम्हाला म्हणाली, ‘‘तसा माझ्याजवळ वेळच नसतो. काम खूप असतं. पण तुमच्याशी मला बोलायचंय. कारण तुमचा चित्रपट एचआयव्ही- एड्सबद्दलचा आहे. म्हणाली, ‘‘या शरीराचं काय करायचं, हा प्रश्न किती अवघड आहे सोडवायला. मला तुमचा पूर्ण झालेला चित्रपट पाहायचाय; पण कोण जाणे बघायला मिळेल की नाही?’’ ‘जिंदगी जिंदाबाद’मध्ये आपल्या मित्राला एचआयव्हीची लागण कशी झाली, याचा शोध घेणारी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. ती तिच्या शोधाच्या प्रवासात एका कुंटणखान्यात जाऊन पोचते. तिथे अनेक वेश्या या ना त्या आजाराने ग्रस्त असतात. तिथली एक प्रौढ वेश्या (ज्योती सुभाषने हे काम फारच छान केलंय) ती म्हणते, ‘‘कैसे बताये, कहांसे कहां बहती है जिंदगी.’’ हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू असतं. निरोप घेताना एलिझाबेथ म्हणाली, ‘‘पुन्हा आपण नक्कीच भेटणार नाही. तुझे संवाद मला खूपच आवडले. तू पॅरिसला ये, असं मी तुला म्हणत नाही कारण तू येशील तेव्हा मी असेन याची खात्री नाही.’’ मग थोडा वेळ तशीच गप्प बसून खाली बघत ती म्हणाली, ‘‘मी एचआयव्हीग्रस्त आहे..’’

आता कुठे असेल एलिझाबेथ?

सुझान दुश्का ही कॅनडातल्या व्हॅन्क्यूवरची. मला पहिल्यांदा पुण्यात भेटली. पुण्यात ती एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ग्रामीण भागात स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या कार्यक्रमांचं मूल्यमापन करण्यासाठी आली होती. भारतीय ग्रामीण बाईचे कष्ट, अनेक बाजूंनी होणारा सांस्कृतिक छळ सोसूनही तिचा जागा असलेला आत्मसन्मान, यानं ती स्तिमित झालेली होती. म्हणाली, ‘‘पाश्चात्त्य स्त्री इथल्या ग्रामीण स्त्रीपेक्षा कदाचित जास्त सुशिक्षित असेल. आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित असेल पण भारतीय स्त्रीची समजूत आणि आत्मसन्मान पाश्चात्त्य स्त्रीने शिकण्याजोगा आहे.’’ त्यानंतर सुझानच्या निमंत्रणावरून मी व्हॅन्क्यूवरला ‘देवराई’ चित्रपट दाखवण्यासाठी गेले होते. तिच्या घरीच राहिले. ती त्या वेळी मुलाच्या खूप चिंतेत होती. तसा तिचा संसार सुखाचा असावा पण त्याविषयी थोडय़ा कोमट भावनेत होती. मुलगा व्यसनग्रस्त होता. मुलगी आपल्या मित्राबरोबर बाहेर राहत होती. नवरा परगावी गेलेला. सुझान म्हणाली, ‘‘माझ्या स्त्रियांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मत्रिणींना, एक-दोन लेखिकांना मी तुम्हाला भेटायला बोलावलंय.’’ सुझानने सगळ्यांसाठी जेवणाचा मोठा बेत केला होता. ती म्हणाली, ‘‘बाहेरून तयार अन्न न आणता मी आणि माझी मुलगी भारतीय पद्धतीने तुमच्यासाठी स्वत: स्वयंपाक करणार आहोत. माझी मुलगी माझ्या चिंता आणि ताण ओळखते. वेळेला आणि गरजेला नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.’’ आणि खरंच पार्टीला पाहुणे जमल्यावर तिच्या मुलीने कंबर कसून सगळी मांडामांड केली. ती रूपानेही उंचीपुरी, धिप्पाड होती. तिने आग्रहाने चवदार जेवण सगळ्यांना वाढलं आणि जेवण झाल्यावर सगळी भांडीकुंडी घासूनपुसून मगच ती गेली. निरोप घ्यायला आली तेव्हा मी तिला म्हटलं, ‘‘दमली असशील किती काम केलंस!’’ तर ती हसून म्हणाली, ‘‘तशी मी आळशी आहे. अनेक बाबतीत माझं आईशी पटतही नाही. पण मी जग हिंडले आहे. भारतातही एकदा आले होते. भारतीय बाई, दुसऱ्याचं अगत्य कसं करते मला माहीत आहे. मला तुमच्यासाठी हे सगळं करण्यात खूप आनंद झाला.’’

सुझानला योगाभ्यास करण्यात रस होता. ती दलाई लामा यांना भेटली होती. तिची बोलायची पद्धत खूप मजेदार होती. जवळ बसून खालच्या आवाजात साध्यासुध्या गोष्टीसुद्धा खूप खासगी, खूप महत्त्वाचं सांगत असल्यासारखं सांगायची. घशातल्या आवाजात कुजबुजल्यासारखं बोलायची. मला म्हणाली, ‘‘आपण दोघी तिबेटला एकटय़ाच जाऊयात. मला ते ठिकाण या पृथ्वीतलाच्या पलीकडचं वाटतं. तिथे जाताना नुसतं कुणीतरी बरोबर आहे, असं नको. तर तू आणि मी आपण जाऊया.’’ आम्ही काही तिबेटला गेलो नाही. सुझान, तिचा मुलगा-मुलगी कसे आहेत? अजूनही ती एनजीओच्या मूल्यमापनासाठी जग हिंडते का, मला माहीत नाही. मध्यंतरी डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘‘व्हॅन्क्यूवरच्या फिल्म फेस्टिव्हलला आपण ‘दिठी’ चित्रपट पाठवू शकू.’ आणि क्षणभरच माझे डोळे चमकले.

मेलबर्नच्या ‘फ्रिंज’ फेस्टिव्हलमध्ये माझा ‘पाणी’ नावाचा लघुपट दाखवला जाणार होता. एरवी मोठय़ा महोत्सवांना गेलं तर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत एकामागोमाग एक चित्रपट लावलेले असतात. त्यातून स्वत:ला बाहेर काढून बाकी काही बघणं अवघडच होतं. पण ‘फ्रिंज’  फेस्टिव्हलचं तसं नव्हतं. त्याची रचना आणि हेतूच वेगळा होता. पाण्याचा प्रश्न मांडणारा आणि त्याला सामूहिक कृतीने उत्तर सांगणारा आमचा लघुपट या महोत्सवानं नुसताच दाखवला नाही तर तिथल्या विद्यापीठांच्या वेगवेगळ्या विभागांमधे वेगवेगळ्या अंगाने चर्चा घडवून आणल्या. हे वर्ष होतं १९८७.

मानववंशशास्त्र विभागामधलं एक प्राध्यापक जोडपं मला भेटलं. ते दोघं म्हणाले, ‘‘आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तुला काय आवडेल?’’ मी म्हणाले, ‘‘तुम्हाला प्रवास करायला आवडतो का?’’ ते म्हणाले, ‘‘तुला कुठे जायची इच्छा आहे?’’ तर ऑस्ट्रेलियाचा भूगोल बघताना मी फिलिप आयलॅन्डचं नाव वाचलं होतं. हिंदी महासागरातलं ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला टेकलेलं ठिपक्यासारखं छोटं बेट. खरं म्हणजे अंटार्टिक महासागराच्या किनाऱ्यावर दक्षिण ध्रुवाकडे पेंग्विन्सची वस्ती असते. पण फिलिप आयलॅन्ड त्याला अपवाद आहे. फिलिप आयलॅन्डच्या किनाऱ्यावर पेंग्विन्स राहतात. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा वाडय़ाच आहेत म्हणा ना. या वस्त्या आणि ते पेंग्विन्स बघण्याची मला खूप उत्सुकता होती. मी अशी काही मागणी करीन अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. ते एक क्षणभर घोटाळ्यात पडले आणि मग म्हणाले, ‘‘त्यासाठी आपल्याला एक सबंध दिवस काढावा लागेल.’’ मी म्हटलं, ‘‘तुमची तयारी असेल तर मी महोत्सवाच्या संचालकांशी बोलते.’’ आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही फिलिप आयलॅन्डची सहल जमवली. जाता जाता ‘स्त्रीमुक्ती चळवळ, भारतीय आदिवासी आणि ऑस्ट्रेलियन अबओरिजिनल्स यांचे पृथ्वीतलाला संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य’ अशा अनेक विषयांवर जीव तोडून गप्पा झाल्या. फिलिप आयलॅन्डला पोचायला दुपार झाली. अगदी किनाऱ्यावर पेंग्विन्सच्या या वाडय़ा आहेत. वाळूखाली त्यांची खोदलेली  घरं. दुपारी सगळा किनारा शांत शांत असतो. संध्याकाळी अचानकपणे ऑफिसला गेलेली मंडळी परतावीत तसे पेंग्विन नर-मादी समुद्राच्या लाटांवर झुलत अलगद किनाऱ्यावर येतात. आणि किनाऱ्यावर पाय टेकले की हातात जड ब्रीफकेस असल्यासारखे निमूटपणे डुलत डुलत आपापल्या घरांकडे जाणाऱ्या नागमोडी छोटय़ा पाऊलवाटांनी खाली मान घालून चालायला लागतात. त्यांना प्रदर्शनीय वस्तू म्हणून घाबरवून टाकू नये हा हेतू असल्याने आमच्यासारखे इतरही अनेक प्रेक्षक थोडय़ा दूर अंतरावरून त्यांचा हा प्रवास बघत असलेले. तिथे फोटो काढायला परवानगी नव्हती. फ्लॅशलाइट्सनी पेंग्विन्सना घाबरवू नये, अशी अपेक्षा. पेंग्विनविषयी मला फार कौतुक. कारण पेंग्विन जमातीत नर-मादीत समानता आहे. दोघे नवराबायको मिळून गरोदर आईची काळजी घेतात. दोघे मिळून जन्म दिलेल्या पिल्लांची काळजी घेतात. तेव्हा तर आई अन्न आणायला समुद्रात गेली तर बाबा छोटय़ा बाळांना सांभाळतात. एवढंच नाही तर काही वेळा नक पेंग्विन छोटय़ा पिल्लांसाठी पाळणाघरही चालवतात.

अशा या पेंग्विन्सना ‘मेलबर्न फ्रिंज फेस्टिव्हल’मुळे मला डोळे भरून जवळून बघता आलं. इतक्या वर्षांनी ‘कासव’ चित्रपट बनवताना त्या कासवांच्या आत्ममग्न असूनही अहिंसक आणि संथ जीवनशैलीबद्दल मला फार कुतूहल वाटत होतं आणि या जबाबदार संवेदनशील पेंग्विन मंडळींची आठवण येत होती.

(क्रमश:)

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com