नीरजा

माझ्याच प्रतिबिंबाशेजारी बसून मी साधू पाहते आहे आज संवाद माझ्याशी. शोध घेते आहे मला हव्याशा वाटलेल्या पण न सापडलेल्या गोष्टींचा. अपेक्षित नसलेल्या, पण अचानक समोर उभ्या ठाकलेल्या अन् सारं आयुष्य व्यापून राहिलेल्या घटनांनी, गच्च भरलेल्या जगात डोकावून पाहते आहे.

कुठल्या तरी थांब्यावरून सुरू करतो आपण आपलं आयुष्य, तेव्हा कुठे नेऊन सोडायचं या पायात घुटमळणाऱ्या पोराला, हेही माहीत नसतं आपल्याला. खरं तर ठरवलेल्या असतात अनेक गोष्टी मनातल्या मनात, पण हे पोर तिथे जाईलच याची खात्री नाही देता येत. आपण ढकलू पाहतो त्याला आपल्याला हव्या त्या रस्त्यावर; पण ते फिरत राहतं, कधी गोल गोल स्वत:भोवती तर कधी डोळा चुकवून भलत्याच वाटेला घेऊन जाऊ लागतं.

जगण्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागला नाही मला. पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगताना समोर उभ्या ठाकलेल्या संकटांना तोंड देणाऱ्या आईवडिलांना पाहातच लहानाची मोठी झाले मी. सारं कुटुंब सांभाळताना आणि मुंबई व मालेगाव-मनमाड असे दोन संसार करताना होणारी आर्थिक कोंडी आणि ती फोडताना आईबाबांची होणारी दमछाक समजावून घेण्याइतका समजूतदारपणा होता आम्हा सगळ्या बहिणींमध्ये. त्यामुळेच कदाचित अतिशय मर्यादित स्वप्नं पाहिली आम्ही.

मला लेखक वगैरे तर नव्हतंच व्हायचं. डॉक्टर व्हावं असं वाटायचं लहानपणी. तेही उगाचच, सर्वाना वाटतं म्हणून. पण दहावीपर्यंत लक्षात आलं की हे आपलं काम नाही. घरात मराठी पुस्तकांचा खजिना असल्यानं, मराठी साहित्याची गोडी लागली आणि शाळेतही इंग्रजीचा पाया भक्कम करून घेणाऱ्या वैद्य मॅडम (आताच्या बक्षी मॅडम) असल्यानं, पुढे इंग्रजीचीही गोडी लागली. त्या काळात इतर पुस्तकांबरोबरच रहस्यकथाही बऱ्याच वाचल्या. त्यामुळे अधूनमधून इन्स्पेक्टर वगैरे व्हावंसंही वाटायला लागलं. विशेषत: रस्त्यात किंवा गर्दीत कोणा पुरुषानं शरीराला स्पर्श केला तर त्याच्या त्या हाताच्या चिंधडय़ा कराव्याशा वाटायच्या, हातात रिव्हॉल्व्हर वगैरे घेऊन. तेव्हा तर तोच एक पर्याय वाटायचा. पण मी यातलं काहीच केलं नाही. हे जे काही वाटत होतं ते होण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते नाही केले. दिवसभर ‘विविधभारती’ ऐकायचं आणि हाताला जे लागेल ते वाचत राहायचं. त्यामुळे केवळ एक अधाशी श्रोता आणि अधाशी वाचक याउप्पर मला स्वत:ला दुसरी ओळख नव्हती. आणि ती मिळेल असं वाटतही नव्हतं. दहावीला मराठी आणि इंग्रजीमध्ये सारखेच गुण मिळाले आणि ‘घरात सगळ्यांनीच मराठी घेतलं आहे, तर तू इंग्रजी घेऊन पदवी घे’, असा आईनं हट्ट केल्यानं, इंग्रजी घेतलं आणि एम.ए. झाले. पुढे बारावीनंतर कधी तरी लिहायला लागले, तेही वर्डस्वर्थने म्हटल्याप्रमाणे ‘ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स’ वगैरे झाल्याने.

मन भरून वाहायला लागलं की अस्वस्थ व्हायला लागतो आपण. दुथडी भरून वाहणारं मन पुराच्या शक्यता घेऊन येतं. असे पूर रोजच यायला लागले आणि मग शब्दांशिवाय पर्याय उरला नाही. वाचणं जेवढं प्रिय होतं तेवढंच लिहिणंही होत गेलं हळूहळू. कविता, कथा, ललित आणि चक्क नाटकही. मी लिहिलेली ‘अदृष्टाच्या वाटेवर’ ही एकांकिका ‘कल्पना एक आविष्कार अनेक’च्या अंतिम फेरीत आली होती. कुसुमाग्रज यांच्या ‘पायरीचा पाषाण’ या रूपक कथेवर आधारित लिहायचं होतं. जे काही लिहिलं ते बरं झालं असावं. त्यामुळे हुरूप येऊन दोन नाटकंही लिहिली आणि चक्क विजय तेंडुलकर यांनाच वाचायला दिली. त्यांनी वाचली. ‘चांगली झाली आहेत पण नाटकाचं तंत्रही समजून घे’, असं म्हणाले तेव्हा त्यांना काय सुचवायचं होतं हे कळलं आणि लक्षात आलं प्रत्येक गोष्ट जमतेच असं नाही.

मी लिहायला सुरुवात केली त्या दिवसापासून आजपर्यंतच्या प्रवासावर नजर टाकली तर खूप मोठा पट डोळ्यांसमोर येतो. या प्रवासात काय काय मिळवलं आणि काय काय निसटून गेलं हातून ते असं नाही सांगता यायचं. मनात उसळलेला कल्लोळ व्यक्त करण्यासाठी शब्द हाती लागले आणि मग आधारच होऊन गेले कायमचे. वाचन करताना मनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा मार्ग माझा मीच शोधून काढला. कधी माझ्या मनातलं बोलू लागली माझी पात्र, तर कधी व्यक्त करू लागली माझी घुसमट. आणि हो, लिहिता लिहिता हेही जाणवत गेलं की आपलं आपलं म्हणून जे काही जगणं असतं त्यापलीकडंही एक मोठं जग असतं. आपल्याला भेटलेली माणसं ही केवळ आपल्या रोजच्या जगातली असतात असं नाही, तर ती आपण वाचलेल्या कथा-कादंबऱ्या, आपण पाहिलेली नाटकं, चित्रपट यांमधली देखील असतात. त्या काळात मला गौरी देशपांडे, सानिया यांच्या नायिकांनी भुरळ पाडली होती. अ‍ॅना कॅरेनिना, मादाम बोव्हारी यांनी अस्वस्थ केलं होतं. ‘उंबरठा’मधल्या नायिकेनं बळ दिलं होतं, ‘कमला’मधल्या नायिकेसारखे प्रश्न पडायला लागले होते. खरं तर त्याग आणि समर्पणाच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांतील नायिका किंवा जोत्स्ना देवधरांच्या ‘कल्याणी’सारखी आदर्श स्त्री लहानपणी माझ्याही डोक्यात फिट्ट बसली होती. पण पुढे या अशा, सर्वस्व उधळून देणाऱ्या, आपल्या जगण्याचा, आपल्या स्वत्वाचा विचार करणाऱ्या नायिका आयुष्यात आल्या आणि त्यांची अस्वस्थता माझ्या आत कधी शिरली मलाही कळलं नाही. सानेगुरुजींचा शाम आणि त्याची आई आदर्शच होते माझ्यासाठी. पण अल्बर्ट कामूचा ‘मेरसॉ’ भेटला आणि मूर्तीतून दगड होण्याची प्रक्रिया सुरू झाली. निर्थकाचे पक्षी आकाशात उडू लागले, परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी प्रश्न पडू लागले. परंपरांच्या नावाखाली काय काय लादलं आहे आपल्यावर याची जाणीव व्हायला लागली आणि वेगळी ‘नीरजा’ घडायला लागली.

हा एका दिवसात झालेला बदल नव्हता. खूप काळ जावा लागला त्यासाठी. खरं तर मी माझ्याच कोशात रमणारी मुलगी होते. थोडी संकोचीही. जमेल तसं व्यक्त व्हायचं आणि बाबांना दाखवायचं. मला खास वाटणारं सगळंच बाबांना नव्हतं वाटत. पण त्यांनी तासलेल्या माझ्या शब्दांनी मला श्रेयसाकडे नेण्याचा मार्ग दाखवला. ते नसते तर कदाचित लिहिलेल्या प्रत्येक शब्दाच्या प्रेमात पडले असते मी. पुरस्कार, शाबासकीच्या थापेनं हुरळून गेले असते. मंचावरील माझ्या छबीवर खूश झाले असते. पण बाबांमुळे कायम जमिनीवर राहिले मी. आपण लिहिलेला प्रत्येक शब्द हा शेवटचा असतो असं म्हणणारे लोक आजूबाजूला असण्याच्या या काळात वाटतं, आपलं बरं आहे. ज्याची नजर आपण लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर असते असा ‘म. सु. पाटील’ यांच्यासारखा बाप आपल्याकडे आहे. त्यामुळे शब्द तासून घेण्याची धडपड तरी करत राहते.

कवी हा आपल्या आणि इतरांच्याही जगण्याविषयी लिहीत असतो. ज्या समाजात तो राहात असतो त्या समाजाच्या चौकटींनी बद्ध असला तरी त्या मोडण्याची तीव्र आस त्याच्यात असते. अन्याय, शोषण यांच्या विरोधात कोणताही संवेदनशील माणूस बोलत असतोच आणि कवी तर याबाबतीत जास्त संवेदनशील असतो. जगण्याच्या साऱ्या अंगांना तो भिडत असतो, मग ते प्रेम असेल नाहीतर वेगवेगळ्या आघाडय़ांवर करावी लागणारी लढाई असेल. पण तो जे लिहील त्याला काव्यमूल्य हवं. कवी संमेलनात जायला काहीच हरकत नाही पण लोकानुनय करू नये, जशा सामाजिक चौकटी मोडायला हव्यात तशाच जुन्या लेखक-कवींनी घालून दिलेल्या चौकटी मोडून वाचकांना आणि श्रोत्यांना नवं काही तरी द्यायला हवं, असं बाबांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळेच कदाचित मागणी आहे म्हणून खरडली कविता आणि दिली मासिकांना असं झालं नाही.

माझी कविता आणि कथा वाचकांना आवडू लागली तसा माझा एकटीचा कोनाडा सोडून मी बाहेरच्या जगात वावरायला लागले. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. कविता कथा यांविषयी बोलू लागले. हळूहळू हेही प्रिय वाटायला लागलं. पण हे असं वाटणं हा थांबा होता श्रेयसाकडे नेणाऱ्या वाटेवरचा.

कार्यक्रमांच्या निमित्तानं माझा बाहेरच्या जगातला वावर सुरू झाला आणि त्यातूनच ‘ग्रंथाली’, ‘सानेगुरुजी स्मारक ट्रस्ट’ यांसारख्या संस्थांना मी जोडले गेले. कवयित्री उषा मेहता मला घेऊन गेल्या दोन्ही ठिकाणी. आणि मी तिथली झाले. ‘ग्रंथाली’चं विश्वस्तपद घ्यावं असं दिनकर गांगलकाकांनी सुचवलं तेव्हा सुरुवातीला ‘नाही बुवा’ असंच म्हणाले. बाबांचा तर ठाम नकार होता या सगळ्या गोष्टींना. ‘तुझी कविता हरवून जाईल’, असं म्हणायचे ते. पण नंतर मी स्वीकारलं ते. त्याला कारणंही तशीच होती. सत्तर ऐंशीच्या दशकात साहित्य, संस्कृती आणि समाज या सगळ्यांतच एक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या या माणसांना जवळून पाहिल्यावर मी भारावून गेले होते. बाबा मनमाडला असताना अनेक लेखक कवींना ऐकायला मिळालं, त्यांचा सहवास लाभला. पण त्या काळात मुंबईत ज्या विविध चळवळी चालू होत्या त्याचा भाग मात्र होता आलं नव्हतं. आता माझ्याभोवती वावरणाऱ्या मंडळींत सेवा दलातील माणसं होती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि पुढे आणीबाणीत सक्रिय सहभाग घेतलेली माणसं होती.  ग्रंथाली वाचक चळवळीचा भाग झालेली माणसं होती. जवळपास चाळिशीत पोचल्यावर ही विविध चळवळींत भाग घेतलेली माणसं भेटली. ती भेटेपर्यंत मीही माझ्या कवितेतून माझं असं एक विधान करत होते हे माझ्या डोक्यातही नव्हतं. कारण कवीनं ठरवून एखाद्या विचारसरणीचं मुखपत्र व्हावं आणि कवितेला अशा एका चौकटीत बांधून घ्यावं असं मला कधी वाटत नव्हतं. माणसाला, त्याच्या जगण्यासकट कवितेनं सामावून घ्यायला हवं. कोणत्याही कवीच्या कवितेतून ज्याप्रमाणे त्याचे विभ्रम, त्याची अस्वस्थता, त्याचे दुभंगलेपण, त्याची घुसमट, त्याचे आनंद आणि उद्वेग व्यक्त होत असतात त्याचप्रमाणे आजूबाजूचं सामाजिक, राजकीय वास्तवही प्रवाहित होत असतं. ते तसं व्हायला हवंच पण ठरवून नाही तर अगदी सहज तुमच्या जगण्याचा एक भाग होऊन ते वाहायला हवं. कविता त्याचं स्वत:चं आणि समष्टीचं जगणं विस्कटून दाखवते आणि आपसूकच आपलं असं एक विधान करत जाते. मीही ऐन पंचविशीत ते केलं होतंच की,

दानात पडलेले आयुष्य

शेवटच्या क्षणापर्यंत

निर्थक जगायचे

हा आपला अस्तित्ववादी बाणा.

परमेश्वर लापता,

संस्कृती बेजार,

आपले हात आपणच छाटलेले,

गंज चढलेले शब्द.

अशा वेळी

कोणत्या ताऱ्याचा आधार घ्यायचा

ऐन वादळात

या भरकटलेल्या चेहऱ्यांनी?

मला माझ्या स्वत:च्या अशा भूमिका होत्या. मार्क्‍सवादातील वर्गाधिष्ठित समानता, स्त्रीवादातील सर्व पातळीवरील स्त्रीपुरुष समानता, महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, आंबेडकरांचा जातीयवादाविरोधातील लढा, त्यांनी केलेलं मनुस्मृतीचं दहन आणि बुद्धाच्या करुणेचा केलेला स्वीकार हे माझ्या जगण्याचे भागच होते. ते लहानपणापासून घडत गेले होते. सानेगुरुजींचा जगाला प्रेम अर्पिण्याचा पाठ तर सकाळी प्रार्थनेसोबतच घेत होते. पण मी स्वत:ला कोणत्याही वादाच्या चौकटीत बांधून घेतलेलं नव्हतं.

अनेकदा या चौकटीत जीव घुसमटत जातो आपला आणि आपण केवळ प्रवक्त्यासारखे त्याविषयी तेच ते बोलत राहतो. एकूणच जगण्यात आणि वागण्यात एकारलेपण येत जातं. काळाच्या ओघात प्रश्न बदलले नसले तरी त्यांचं स्वरूप बदलत जातं. अशा वेळी या विचारसरणींचं पुनर्लेखन करण्याची, पुनर्बाधणी करण्याची गरज भासू लागते हे आपण विसरून जातो.

माझ्या ज्या काही राजकीय वा सामाजिक भूमिका तयार झाल्या होत्या त्या भूमिकांशी सुसंगत असा विचार करणारी माणसं मला भेटली आणि मी हळूहळू त्यांच्यातली एक होऊन गेले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकानं आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संवादात मी इंदिरा गोस्वामी यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी माणगाव येथील छत्तीस एकरांत उभ्या राहिलेल्या छोटय़ाशा कौलारू घरानं आणि त्याच्या बाजूला असलेल्या पुरातन वडाच्या वृक्षानं मला त्याच्या सावलीत घेतलं आणि मला एक नवा परिवार मिळाला. ‘अपना बाजार’ चळवळीचे संस्थापक सदस्य असलेले गजानन खातू, सामाजिक कार्यकर्त्यां आणि विचारवंत पुष्पा भावे, गांधीमय झालेले आणि अनुवाद सुविधा केंद्राची कल्पना मांडणारे लेखक-प्रकाशक रामदास भटकळ अशा लोकांचा सहवास लाभला. खातूभाई आणि पुष्पाबाई यांना ऐकण्याची, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. सतत नवा विचार करणारे आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजावून घेताना समाजवादाच्याही जुन्या चौकटी मोडू पाहणारे आणि नव्यानं मांडणी करणारे खातूभाई मला माझे जवळचे मित्र वाटायला लागले.

आज जे काही शोषितांच्या, मग ते दलित असोत, स्त्रिया असोत की आर्थिकदृष्टय़ा पिडला गेलेला कामगार किंवा मजूर, अदिवासीवर्ग असो, यांच्या बाजूनं उभे राहणारे कायदे तयार करण्यासाठी ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यामागे आज ज्यांची पुरोगामी किंवा डावे, अथवा समाजवादी म्हणून खिल्ली उडवली जाते त्यांचंच योगदान अधिक आहे हे लक्षात आलं. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी चळवळी उभ्या केल्याचं फारसं ऐकिवात नाही. त्यांनी समाजासाठी कामं केली पण ती मदतीच्या स्वरूपात. ज्यांना मदत केली त्या लोकांना आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ दिल्याचे फारसे ऐकिवात नाही. कारण कायम स्टेटस्को राखण्याकडे त्यांचा कल होता. समाजात आमूलाग्र बदल आणण्यासाठी काही करावं हा त्यांचा विचार कधीच नव्हता. ज्या संस्कृतीविषयी आपण अभिमान बाळगतो ती प्रवाही असते, नवनव्या धारा ती आत सामावून घेत असते हे अनेकांच्या गावीही नव्हतं. परंपरांना चिटकून बसणाऱ्या आणि हीच आपली संस्कृती आहे म्हणून डांगोरा फिटण्यात समाधान मानणाऱ्या या विचारसरणीला बदल कधीच अपेक्षित नव्हते याची जाणीव व्हायला लागली. आणि मग विज्ञाननिष्ठ, बुद्धीप्रामाण्यवादी, शोषणविरहित अशा समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या विविध चळवळींत मी प्रत्यक्षपणे ओढले गेले.

मला वाटतं माझा हा सगळा प्रवास प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाण्याचाच होता.

आज मागे वळून पाहताना एवढंच वाटतं, माझी कथा, कविता, माझं लेखन मला माझी ओळख देतं आहे, पण त्याचबरोबर मला ठामपणे व्यक्त होण्याचं बळही देतं आहे. एखादा पुरस्कार तुम्हाला प्रेयसाकडे घेऊन जातो पण शब्दांतून मी जेव्हा या समाजाशी स्वत:ला जोडून घेते तेव्हा ते शब्द मला त्या श्रेयसाकडे घेऊन जातात. त्यामुळेच कदाचित मी वारंवार व्यक्त करू शकते एक ‘निरंतर आशा’ माझ्या कवितेतून आणि म्हणू शकते,

नरसंहारानंतर अक्राळविक्राळ हसणारी माणसं

आजूबाजूला असण्याच्या काळात

मलाही लावायचा आहे छोटासा दिवा

या घनदाट अरण्यात.

कोणत्या झाडाच्या पानात लपले असतील

शब्द

बुद्धाच्या मुखातून उमटलेले

ते शोधून काढायला हवं आता.

कदाचित त्या शब्दांनी उजळून निघेल

हे सावटलेलं आभाळ

आणि

सुसह्य़ होईल जगणं

या काळातही.

n neerajan90@yahoo.co.in