19 September 2020

News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : प्रयोगशील शिक्षणातील मराठी शाळा

‘मुलांना पुढे इंग्रजीची अडचण यायला नको,’ हे बहुतेक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवण्याचं एक प्रमुख कारण दिसतं.

मुलांच्या घडणीत शाळा आणि त्यातील शिक्षक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘भाषा येणं आणि ती माध्यम म्हणून स्वीकारणं यात फरक आहे. ती भाषा म्हणून अवश्य शिकावी. माध्यम म्हणून स्वीकारली की तो सक्तीचा भाग होतो आणि त्यात सहजता राहात नाही. मातृभाषेतून शिकल्यानं शिक्षण सहज होतं, त्याचा ताण येत नाही, अनुभव समजून घेण्यावर लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे क्षमतेचा विकास चांगला होतो. मातृभाषेतून शिकलेल्या मुलांना आपल्याला विषय किती समजलाय याची जाण आपोआप येते. ’’ सांगताहेत कोल्हापूरच्या ‘सृजन आनंद’ या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या मानद शिक्षिका आणि सध्या प्रशासकीय सदस्य असलेल्या सुचिता पडळकर आजच्या शिक्षक दिनानिमित्ताने..

मराठीतून शिक्षण घ्यावं की इंग्रजीतून हा आजही अनेकांनी आपल्या प्रतिष्ठेचा विषय के ला असला तरी तो विषय बाजूला ठेवून विचार के ला, तर ‘मुलांना पुढे इंग्रजीची अडचण यायला नको,’ हे बहुतेक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवण्याचं एक प्रमुख कारण दिसतं. तरीही अजूनही अशा काही मराठी शाळा आहेत, की पालक आपल्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील असतात.  मुलांच्या घडणीत शाळा आणि त्यातील शिक्षक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजावर असलेल्या ऋणाबद्दल कृतज्ञता म्हणून आपण ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करतो. आजच्या याच दिनाच्या निमित्तानं शिक्षणाकडे वेगळ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून बघणाऱ्या प्रयोगशील शाळेतील शिक्षकांशी आम्ही संवाद साधला. कोल्हापूरमधील ‘सृजन आनंद विद्यालय’ या प्रयोगशील प्राथमिक शाळेत गेली तीस र्वष मानद शिक्षिका आणि सध्या प्रशासकीय सदस्य असलेल्या सुचिता पडळकर यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा –

सुचिताताईंचा बालशिक्षणविषयक अनेक उपक्रमांमध्ये कायम सहभाग असतो. ‘शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी’ या त्यांच्या पुस्तकाला २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार’ मिळाला आहे. शिक्षणविषयक मासिकं आणि नियतकालिकांतून त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असतं. या क्षेत्रातील ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ यांच्या आणि आचार्यकुल नागपूर यांच्या ‘मातृधर्मी’ पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. गप्पांच्या ओघात सुचिताताईंनी ‘सृजन आनंद’च्या संस्थापिका लीलाताई पाटील यांचे बालशिक्षणासंबंधीचे विचार सांगितले. ‘सृजन आनंद विद्यालया’च्या संस्थापिका लीलाताई पाटील बरीच वर्ष शिक्षकांच्या शिक्षणात कार्यरत होत्या. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचं प्राचार्यपदही त्यांनी भूषवलं होतं.  तिथून निवृत्त झाल्यावर त्यांनी हे विद्यालय सुरु केलं. ही शाळा सुरू करताना त्या प्रथमच बालशिक्षणाकडे वळल्या. शिक्षण हे बालककेंद्रित असावं, आनंददायी असावं, आणि अर्थपूर्ण असावं, यावर त्यांचा भर होता. त्यानुसार ‘सृजन आनंद विद्यालयात’ मुलांच्या नैसर्गिक क्षमतेला, सर्जनशीलतेला वाव मिळेल याची काळजी घेतली जाते. मुलं भोवतालच्या वातावरणातून हसतखेळत खूप गोष्टी शिकतात. त्यामुळे भोवतालची भाषा म्हणजे मराठी- हीच त्यांची शिकण्याची भाषा आहे, असं लीलाताई मानत असल्याचंही सुचिताताई सांगतात.

ही शाळा सरकारमान्य आहे, पण सरकारी अनुदान घेत नाही. समाजानं समाजासाठी चालवलेली शाळा, लोकसहभागानं चालवलेली शाळा, असं तिचं स्वरूप असल्यामुळे अनेक उच्चविद्याविभूषित पालक आणि नागरिक शाळेसाठी मानद सेवा देतात. शाळा प्रथम येणाऱ्यास प्रवेश या तत्त्वावर प्रवेश देत असल्यानं वर्गात सर्व आर्थिक स्तरातली, सर्व जातींची मुलं असतात. शाळेचा वर्ग हे समाजाचं प्रतिबिंब असावं हाही विचार त्यामागे आहेच. शाळेत स्वयंशिस्तीवर भर असतो त्यामुळे शाळा कमीतकमी नियमांमध्ये चालवली जाते.

प्रश्न : सुचिताताई, आजच्या स्पर्धाकेंद्रित जगात पालकांची शिक्षणाविषयीच्या अशा वेगळ्या विचारांबद्दल काय प्रतिक्रिया असते? ते शाळेला काही बदल करायला सुचवतात का? किंवा इंग्रजी आजच्या काळात आवश्यक असल्यामुळे ते शिकवा, असा दबाव आणतात का?

सुचिताताई : तसं होत नाही, कारण आम्ही शाळेत प्रवेश देण्यासाठी मुलांची मुलाखत घेत नसलो तरी पालकांची मात्र प्रवेशपूर्व सभा घेतली जाते. त्यात त्यांना शाळेचे विचार, मतं, आग्रह, हे आम्ही विशद करून सांगतो. त्याच्याशी ते सहमत असल्यासच आपल्या पाल्यास प्रवेश घ्यावा असं सुचवलं जातं. त्यामुळे नंतर विसंवादाचा प्रश्न येत नाही. २००० मध्ये इंग्रजीच्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं इंग्रजी पहिलीपासून शिकवावी  असा नियम केला. त्यामुळे आम्हीही इंग्रजी पहिलीपासून शिकवतो. परंतु आमचा विचार असा आहे, की भाषा येणं आणि ती माध्यम म्हणून स्वीकारणं यात फरक आहे. ती भाषा म्हणून अवश्य शिकावी. माध्यम म्हणून स्वीकारली की तो सक्तीचा भाग होतो आणि त्यात सहजता राहात नाही. आमच्याकडे इंग्रजी भाषा शिकवताना त्यात ताण येऊ नये यासाठी आम्ही जागरूक असतो. शब्दसंग्रह वाढावा यासाठी विविध वस्तूंवर त्यांची इंग्रजी नावं लिहिलेली असतात. इंग्रजी शिकण्यासाठी आमच्याकडे खेळही आहेत. पण पहिली एक-दोन र्वष नुसता शब्दसंग्रह तयार करणं, थोडंसं संभाषण, स्वत:बद्दल माहिती देणं किंवा फोनवर कसं बोलावं हे शिकणं, असं प्राथमिक इंग्रजी शिक्षण चालू असतं. पुढे तिसरी-चौथीपासून लेखी शिक्षण सुरू होतं. पालक सांगतात, की आमची मुलं जेव्हा पाचवीत जातात, तेव्हा त्यांचं इंग्रजी छान पक्कं  झालेलं असतं. त्यांना आठवीच्या पातळीवरचं इंग्रजी येत असतं.

प्रश्न : शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचे या संदर्भात काय विचार आहेत?

सुचिताताई : आम्ही अलीकडेच लीलाताईंच्या आठवणींवर आधारित ‘लीलाताई पाटील स्मरण सहवास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भात पहिल्या दहा वर्षांत शाळेतून शिकून पुढे गेलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एक गोष्ट आमच्या विशेष करून लक्षात आली ती म्हणजे ही मुलं समाधानी आहेत. आणि कोणत्याही प्रश्नाला तोंड द्यायची त्यांची तयारी आहे. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन व्यापक आहे. पर्यावरण, समाजाशी बांधिलकी याविषयी ती सजग आहेत. आयुष्यातली ही महत्त्वाची कौशल्यं त्यांनी आत्मसात केली आहेत. त्यात काही जणांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यात एका नृत्यांगनेनं तिचे विचार मांडले, की मातृभाषेवर उत्तम पकड असल्यानं नृत्याची स्वत:ची जी एक भाषा असते, ती तिला समजून घेता आली. एक माजी विद्यार्थी आता चित्रपटसृष्टीत कथा आणि संवादलेखक आहे. त्यानंही या मताला दुजोरा दिला. विद्यार्थी मातृभाषेतून शिकतात तेव्हा त्यांना शिकवण्या लावाव्या लागत नाहीत. त्यामुळे इतर छंद जोपासायला वेळ मिळतो. इंग्रजीतून शिकताना ती परकी आणि नवीन भाषा असल्यानं ती समजून घेण्याकडे लक्ष असतं आणि अनुभवावरील लक्ष कमी होतं. मातृभाषेतून शिकल्यानं शिक्षण सहज होतं, त्याचा ताण येत नाही. त्यामुळे अनुभव समजून घेण्यावर लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे क्षमतेचा विकास चांगला होतो. मातृभाषेतून शिकलेल्या मुलांना आपल्याला विषय किती समजलाय याची जाण आपोआप येते. आमच्याकडे तिसरी-चौथीतली मुलं आपण ‘अ’ गटाची प्रश्नपत्रिका निवडायची, की ‘ब’ गटाची, हे बरोबर ठरवतात. (‘ब’ गटाची प्रश्नपत्रिका अधिक कठीण असते) म्हणजे त्यांना स्वत:ला विषयानुसार त्यांच्या क्षमतेचा अंदाज असतो. आणि नेहमीच त्यांचं स्वत:चं मूल्यमापन हे शिक्षकांनी के लेल्या मूल्यमापनाशी जुळणारं असतं.

प्रश्न : इतर शाळांनी तुमचा कित्ता गिरवावा म्हटलं, तर त्यांना त्यांच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करणं कदाचित शक्य होणार नाही. अशा वेळेस मराठी शाळांची पटसंख्या रोडावू नये आणि मराठी पालकांनी मराठी शाळांकडे वळावं, यासाठी शाळांना काय करता येईल?

सुचिताताई : काही बदल हे सहज करण्यासारखे आहेत. मुलं सर्जनशील व्हायला हवी असतील, तर शिक्षकांनीही तसंच राहायला हवं. उदाहरणार्थ- आमच्या शाळेत गेल्या ३५ वर्षांत आम्ही एकही उपक्रम दोनदा केला नाही. उपक्रमातून मुलांनी शिकावं आणि शिकता शिकता उपक्रम व्हायला हवा. त्यात नावीन्य हवं आणि संवेदनशीलताही हवी. म्हणजे दर वर्षी ‘माझी आई’ निबंध लिहिण्याऐवजी कधी ‘माझे बाबा’, ‘माझी आजी’ असा विषयांचा बदल केला, तर मुलं अधिक निरीक्षण करतात, जास्त विचारक्षम होतात. त्यांना सहजपणे संवेदनाक्षम कसं करता येईल, यावर लक्ष द्यायला हवं. उदाहरणार्थ, आम्ही एका वर्षी मुलांना आहार आणि पोषणाबद्दल शिकवताना स्वत:बरोबर आपल्या आईच्या आहाराकडे लक्ष द्यायला सांगितलं. तेव्हा या छोटय़ा मुलांच्या लक्षात आलं, की आई कित्येक वेळा घरातल्या सगळ्यांना ताजे पदार्थ खाऊ घालते, पण स्वत: मात्र शिळं अन्न संपवते. शिक्षणात असे बदल सहज करता येऊ शकतात. पण त्यासाठी शाळेचं व्यवस्थापन आणि शिक्षकवर्ग यांच्यात एकमत  हवं. पालकांचाही यात सहभाग हवा. आमच्या शाळेत आम्ही शिक्षक, मुलं आणि पालक यांच्या आपसातील संवादावर विशेष लक्ष देतो. याशिवाय शिक्षकांनी स्वत:सुद्धा शिकत राहायला हवं.

शिक्षक प्रशिक्षणाच्या दिवशी शिक्षकांना खरोखर शिकायला मिळेल याचा विचार व्हायला हवा. भाषेच्या बाबतीत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो- तो म्हणजे कोणत्याही भाषेचे लेखी भाषा आणि बोली भाषा असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे बोली भाषांचे अनेक बाज आहेत. लहान मुलांच्या बोली भाषेत बदल करायचा प्रयत्न करू नये. त्या भाषेला कमी लेखू नये. बोलीभाषा या भाषेचं सौंदर्य वाढवतात. मुलं जशी मोठी होतील तसं हळूहळू त्यांना लेखी भाषा किंवा प्रमाण भाषा शिकवावी. पण अगदी सुरुवातीपासून त्याचा आग्रह धरू नये. त्यामुळे मुलांमध्ये नाराजी, नावड निर्माण होऊ शकते. असे छोटे, पण महत्त्वपूर्ण बदल के ले आणि शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांला आजच्या काळात आवश्यक झालेलं इंग्रजीही उत्तम येईल अशी पालकांची खात्री झाली, तर माझ्या मते पालक पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळांकडे वळू लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 12:56 am

Web Title: shrujan anand marathi school teacher suchita padval garja marathicha jayjaykar dd70
Next Stories
1 हेल्पलाइनच्या अंतरंगात : सुरक्षा वनं, वन्यजीव आणि नागरिकांचीही !
2 चित्रकर्ती : रुक्ष वाळवंटातील ‘हरीजरी’
3 महामोहजाल : ‘सोशल’ युगातल्या ‘ट्रोलधाडी’!
Just Now!
X