22 April 2019

News Flash

पूवीधाम निसर्गावर प्रेम करणारी शाळा

सृजनाच्या नव्या वाटा

(संग्रहित छायाचित्र)

रेणू दांडेकर

तमिळनाडू राज्यातील धर्मपुरी जिल्ह्य़ातल्या नागरकोडल या तालुक्यात,  मीनाक्षी यांनी २००० मध्ये पूवीधाम ही शाळा सुरू केली. वेळापत्रक नाही. पाठय़पुस्तकं नाहीत. गृहपाठ नाही. शाळाभर वावरणारी मुलं. मधोमध झोपाळे, घसरगुंडय़ा, एका बाजूला साबण बनवणारी कार्यशाळेची खोली. तिथे वेगवेगळ्या वनस्पती. फळ्यावर इंग्रजीत लिहिलेली परिमाणे. एका कोपऱ्यात मातीकाम करायला माती नि प्लास्टिक बारीक करणारं मशीन. मुलं अतीव आनंदात सारं काही करत होती.

‘पूवीधाम’. शब्द वाचल्यावर मनात येणारच याचा अर्थ काय असेल? हा तमिळ शब्द. नि याचा अर्थ जमिनीसाठी, निसर्गासाठी, पृथ्वीसाठी प्रेम. किती छान वाटतं ना, अर्थ ऐकून. त्याहीपेक्षा छान वाटतं जेव्हा हे एका शाळेचं नाव आहे हे पाहून! या नावातच या शाळेचा आशय सामावला आहे. आदर्श, जीवन शिक्षण.. असं वाचायची सवय असलेल्या आपल्याला हे नाव सार्थ वाटतं अगदी. ही शाळा आहे तमिळनाडू राज्यातील धर्मपुरी जिल्ह्य़ातल्या नागरकोडल या तालुक्यात. गावापासून २ कि.मी. लांब. मीनाक्षी (ज्या शिक्षणानं आर्किटेक्ट आहेत. मुंबईत २० वर्ष होत्या.) यांनी २००० मध्ये आपली दोन मुलं आणि इतर चार मुलांसह ही शाळा सुरू केली.

आर्किटेक्ट असणाऱ्या मीनाक्षीताईंनी मानसशास्त्र विषयातही पदवी संपादन केलीय. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायलाच हवं. स्वतंत्रपणे लिहायला हवं. कारण एक व्यक्ती शिक्षणाबद्दल इतका वेगळा विचार करते, तो विचार कृतीत येतो याचं कारण, याची पाळंमुळं कुठं असतात? शाळेत असताना (इ. ९ वीत) ‘माझी शाळा’ असा जेव्हा निबंध लिहायला सांगितला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मीनाक्षीताईंनी तेव्हा आपल्या निबंधात लिहिलं, ‘या शाळेत परीक्षा असणार नाही, शिक्षा असणार नाही, शिक्षक असणार नाहीत, पाठय़पुस्तकंही नसतील. मुलं आपल्या मनाप्रमाणे त्यांना आवडेल ते करून पाहात शिकतील.’ याचा परिणाम तेव्हा अर्थातच शिक्षकांनी निबंध फाडून तुकडे करून कचरापेटीत टाकण्यात झाला. मीनाक्षी (ताई) गोंधळल्या. तशातच त्यांच्या वडिलांनी त्यांना विल डय़ुरॉट (ह्र’’ ऊ४१ंल्ल३) यांच्या तत्त्वज्ञानावरचं पुस्तक आणून दिलं नि जे जे समजत नव्हतं ते ते समजून द्यायला मदत केली. इथेच त्यांच्या मनातली शाळा तयार झाली. हीच ती ‘पूवीधाम’. एवढं शिक्षण घेऊन त्या अगदी अशा जागी आल्या आहेत जिथं त्यांचं स्वप्नं, स्वप्नातली शाळा साकार झालीय. कारण मीनाक्षी पर्याय शिक्षण व्यवस्थेच्या शोधात असताना ऑरोव्हेल, पाँडेचरीला पोचल्या. तिथं निसर्गस्नेही बांधकाम तंत्रज्ञानावर त्यांनी काम केलं. त्यांना मुलांमध्ये खूप रस, त्यातच त्या सतत  इसाई अंबालय स्कूलमध्ये जायच्या. तिथे उमेश यांच्याशी भेट झाली. उमेश आयआयटी चेन्नईचे बी.टेक., सेंद्रिय शेतीत रस असणारे, तेही जगण्याचा वेगळा पर्यायी मार्ग शोधत होते. यातूनच ‘पूवीधाम’चा शोध लागला. आज त्यांची जवळजवळ १२ एकर जागा आहे. सगळे शेतकरी आहेत. पाऊस कमी पडतो म्हणून लोक शहराकडे जाऊ लागले. मुलांचं काय? मीनाक्षींची शाळा सुरू झाली होती. बाहेर कामधंद्याला जाणारी अनेक माणसं इथे आली. आमच्या मुलांना इथे ठेवाल का? विचारू लागली. यातूनच ‘सुरभी निवास’ हे वसतिगृह सुरू झाले, २००३ मध्ये.

आज शाळेचं वसतिगृह आहे. यात मुलं मुली मिळून सुमारे ५० जण आहेत. जाऊन येऊन शिकणारीही मुलं आहेत. प्रथमत: शेतमजुरांची मुलं शाळेत होती, आता मध्यमवर्गीय सुशिक्षितांची मुलंही इथे येतात. ‘पूवीधाम’चं काम इतकं वेगळं आहे की, पश्चिम बंगालहून अशा शाळेच्या शोधात एक आई (जया ताई) आपल्या मुलीला घेऊन इथे आली आणि इथलीच होऊन गेली. उच्चशिक्षित कुणी आपला प्रस्थापित व्यवसाय सोडून या ट्रस्टचे ट्रस्टी होऊन जातात (गीताआक्का आणि त्यांचे यजमान). गंमत म्हणजे गीताआक्का शाळेच्याही घटक आहेत. त्यांचं वर्षांचं बाळही इथेच जन्मलं. कसं काय? इथे गाई आहेत. त्यांची बाळंतपण मीनाक्षीताईंनी केली नि हे हे बाळ (निरल्या) इथे जन्माला आलं. अगदी घरचं वातावरण. मीनाक्षीताईंची याच शाळेत शिकलेली काया आर्किटेक्ट होऊन इथेच आलीय. त्यांचं घर कायम उघडं. कुणीही कुठेही फिरत असतं.

मी ‘पूवीधाम’ला पोचले तेव्हा दुपार झाली होती. एका बैठय़ा कडप्प्यावर नागलीची खीर, उपमा, इथेच पिकलेल्या लाल तांदळाचा भात आणि सांबार ठेवलं होतं. लहान-मोठी सगळी मुलं आपापलं जेवण वाढून घेत होती. लहान गोलात छान गप्पा मारत दंग झाली होती. शिक्षकही (आक्का नि अण्णा) गोलात जेवायला बसले होते. श्लोक वगैरे काहीच नाही. प्रार्थना नाही. एका झाडावर जिंगल बेल छान सुमधुर ध्वनी निर्माण करत होती. मुलांनी बनवलेला ओव्हन, मुलांनी चूल पेटवलेली त्यावर अंडी शिजवता शिजवता गोल बसून लोकगीतांचा आवाज येत होता. जेवण मुलांनीच बनवलेलं. वेगळ्या इमारती. जवळ पूर्वप्राथमिकचा हॉल. चटया टाकलेल्या. लहान मुलं जेवून झोपली. आणि गीताक्कांची निरल्या कुणाच्याही खांद्यावर खेळताना दिसत होती.

शाळेच्या इमारतीकडे जाऊ या आधी. गोल आकाराची इमारत वर डोमसारखी. लॉरी बेकर यांच्या बांधकामाची आठवण करून देणारी. मधोमध गोलाकार हॉल आणि कडेला लहान लहान वर्गखोल्या. एका बाजूला भिंतीऐवजी मोठी मोठय़ा मोठय़ा लांब अंतरावर काडय़ा असणारी खिडकी. ना वर्गात बाकं, ना ओळीत वगैरे बसलेली मुलं. ना त्यांची मोठीमोठी दप्तरं. समोर भिंतभर फळा. त्यावर मुलंच लिहीत होती काही वर्गात! कुठेतरी मुलांच्यात बसलेले अण्णा नि आक्का दिसतही नव्हते. एका रॅकमध्ये ‘पूवीधाम’चं शैक्षणिक साहित्य. यात होतं पझल मटेरियल – वुड कटर, सर्कस मॅन, सेल्फ करेक्टिंग नंबर पझल, जॉमेट्रिकल एरिया नेल बोर्ड, अँगल नेल बोर्ड, स्क्वेअर सिक्वेन्स सेट आणि ट्रँगल सिक्वेन्स, स्ट्रीचिंग बोर्ड, किचन हँगर, ब्रामा बोर्ड आणि किती तरी! मुलं साहित्य हाताळतात, त्यांना त्याची आवड आहे.

‘सगळ्या स्तरांतली मुलं. पण साहित्य नीट हाताळत होती. कुणीच कुणाला म्हणत नव्हतं, ‘ए! नीट हाताळा. व्यवस्थित ठेवा. शिस्तीत राहा..’ आरडाओरडा नाही. शिक्षकांचं किंचाळणं नाही. गप्प बसा नाही. मुलं अतीव आनंदात. वेळापत्रक नाही. पाठय़पुस्तकं नाहीत. नेहमीचा गृहपाठ नाही. शाळाभर वावरणारी मुलं. मधोमध झोपाळे, घसरगुंडय़ा, झाडाला बांधलेले दोर, हर्डल्स आदी एका बाजूला साबण बनवणारी कार्यशाळेची खोली. तिथे वेगवेगळ्या वनस्पती. फळ्यावर इंग्रजीत लिहिलेली परिमाणे. अंगाचा आणि भांडय़ाचा साबण, शाम्पू, कपडय़ाचा साबण आणि हे सारं मुलांच्या वापरात दिसलं. एका बाजूला ग्रंथालय. साबण कार्यशाळेची जमीन बांबूच्या साकाटय़ांची. त्याखाली बारीक केलेलं (क्रश) प्लास्टिक आणि हो! एका कोपऱ्यात मातीकाम करायला माती नि प्लास्टिक बारीक करणारं मशीन. मुलांनी इकडे तिकडे कचरा नव्हता केलेला! तिथून खालच्या बाजूला गोठा. गोबर गॅस. त्याखालच्या टप्प्यावर वसतिगृह. एका खालच्या मजल्यावर मुलगे, वरच्या मजल्यावर मुली. सर्व इमारतींना वेगळेपणाचा बाज. देखण्या इमारती.

इतक्यात एका मुलाला विचारलं. वॉशरूम? त्यानं विचारलं ड्राय टॉयलेट की वेट टॉयलेट. म्हणजे काय? ड्राय टॉयलेट म्हणजे उघडय़ावरचं टॉयलेट! नकोच. वेट टॉयलेटनंतर ड्राय टॉयलेट बघायला गेले. शेजारी माती भरलेली बादली. त्या मुलानंच कसं वापरायचं, त्याची स्वच्छता, सगळ्याबद्दल तो आत्मविश्वासाने बोलत होता. ‘पाणी कमी लागतं म्हणजे निरंवतही होतं’ असंही चौथीतल्या मुलानं सांगितलं. संध्याकाळ झाली. मुलं वसतिगृहाकडे आली. विशेष म्हणजे कुणीही न सांगता आपापल्या कामाला लागली. रात्री जेवण, भांडी आवरणं नि ८.३०ला निजानीज.

सकाळी नव्हे पहाटे ४.३० पासून सगळीकडे मुलांचा चिवचिवाट ऐकू आला. आम्ही जिथे झोपलो त्या गेस्ट रुम्स. झोपायला चटया, दोन शाली, एक चादर, स्पेशल बेड. शेजारच्या रुमच्या बाहेर हायहिल्स दिसल्या. आर्किटेक्टची एक मुलगी या पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा आणि इमारतींच्या अभ्यासासाठी आली होती. कुणीही आलं तरी मुलांच्यात जेवतं नि इथे या व्यवस्थेत झोपतं.  सगळंच वेगळे. काही मुलं गटात अभ्यास करत होती. काही तरी बनवत होती. सकाळचा नाष्टा तयार होत होता. गीताक्का, मीनाक्षी आक्कांच्या घरातच राहतात. मीनाक्कांची एक मुलगी गोठय़ातल्या गुरांना चरायला सोडत होती. दुसरी दत्तक कनिष्का शेण कालवत होती. मोठी काया गीताक्काच्या मुलीला भरवत होती. या सगळ्यात मीनाक्का तिथे नव्हत्याच. पण प्रत्येक जणच मला मीनाक्का वाटल्या. हे विशेष होते. गीताक्कांशी गप्पा झाल्या. काम करता करता जो तो बोलत होता, त्यांना हे नेहमीचं असावं. आणि तेच खूप वेगळं होतं.. शिवाय मुलं शिकतात म्हणजे काय, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो त्याविषयी पुढील लेखात.

(उत्तरार्ध २३ फेब्रुवारीच्या अंकात)

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 9, 2019 1:12 am

Web Title: shrujanachya navya vatta article by renu dandekar 2