रेणू दांडेकर

१९८७ मध्ये गोपाळपुरी, जयपूर इथे सुरू झालेल्या ‘बोध’शाळेचं व्यापकत्व वाढलेलं आहे. ‘बोध’च्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत प्रत्येक विषयाला शिक्षक आणि मदतनीस शिक्षक आहे. या शिक्षकांना ‘बोध’चं ३० दिवसांचं प्रशिक्षण करणं बंधनकारक आहे. मुलं ज्या वातावरणातून येतात ते वातावरण इथले शिक्षक आधी समजून घेतात. त्यासाठी सुरुवातीला एकदम शिकवायला सुरुवात न करता मुलांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. प्रत्येक मुलांचं घर बघितलं जातं. त्यामुळे ‘बोध’च्या शिक्षणातील सामाजिक भान महत्त्वाचं आहे. आधी अडथळे पार केले जातात आणि मग मुलं शांत, आनंदाने अभ्यासाला लागतात. ‘बोध’शाळेवरचा हा अंतिम भाग.

मी ‘बोध’ची शिक्षणपद्धती समजून घेण्यासाठी शाळेत फिरत होते. बघता बघता १२ वाजले. मी पुन्हा शाळेच्या कार्यालयात आले. योगेंद्रसर कामातच होते. अनेक माणसं त्यांच्या भेटीगाठी घेत होती. मीनाक्षीदीदीसुद्धा कामातच होत्या. कुणीच रिकामं दिसत नव्हतं. संस्थेचा इतिहास त्या त्या व्यक्तींकडून जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटलं, कारण नोंदवली न गेलेली माहिती संस्थेतल्या माणसांकडूनच मिळते.

१९८७ मध्ये गोपाळपुरी, जयपूर इथे ही संस्था स्थापन झाली. योगेंद्रजी स्वत: कायद्याचे पदवीधर आहेत. समाजातली दुरवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. समाजस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हेच माध्यम आहे हा विश्वास होता. त्याच बळावर वकिलीचा व्यवसाय न करता त्यांनी शहरी भागातील सहा झोपडपट्टय़ांत शिक्षणाचं काम सुरू केलं. आज अलवर जिल्ह्य़ातील ४० शाळा ग्रामीण भागात चालतात. अलवर जिल्ह्य़ातील ज्या दोन तालुक्यांत या शाळा चालवल्या जातात तो परिसर दबलेला, अज्ञानी, रूढींनी गांजलेला होता. यातून बाहेर पडण्यासाठी शाळा सुरू केल्याच पण त्याहीपेक्षा मुलींमध्ये एक मानसिक ताकद निर्माण केली. शिक्षणामुळे जीवनमान उंचावतं, बदलतं हे सिद्ध झालं. विशेष म्हणजे या कोणत्याही शाळा सरकारी अनुदान घेत नाहीत आणि मुलींकडून भरमसाट फीसुद्धा घेत नाहीत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून संस्थेला अनुदान मिळतं. आज संस्थेत ६०० पेक्षा जास्त माणसं कार्यरत आहेत आणि सोडून जाण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. यावरून त्यांना पुरेसं मानधन मिळत असावं असं म्हणता येईल. ‘बोध’ शिक्षा समिती’नं मात्र सीएसआर घेताना तडजोड केली नाही. या संस्थेला जे काम करायचं होतं त्याचीच मांडणी त्यांनी केली. कोणत्याही संस्थेचं दडपण या संस्थेनं घेतलं नाही.

‘‘पारदर्शकता हा या संस्थेचा विशेष गुण आहे. त्यामुळे लोक येतात, काम पाहतात, पैसे देतात,’’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षीदीदी माहिती सांगत होत्या. काम सुरू झालं, काम वाढत गेलं, पैसे येत गेले. म्हणूनच की काय ‘बोध’चा सर्व पसारा चकचकीत आहे, असं जाणवलं. गुणवत्ता हाही संस्थेचा विशेष गुण आहे. आपल्या संस्थेपुरतंच काम मर्यादित न ठेवता संस्था राजस्थान सरकारबरोबरही काम करते. १९९४-९५ पासून शासनाच्या १० शाळांत ‘बोध’ने पाच वर्षे काम केलं. एक शिक्षक प्रत्येक शाळेत ‘बोध’ने दिला. या शिक्षकानं ‘बोध’चं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्याचं काम त्या त्या शाळेची गुणवत्ता वाढविणं हे होतं.

या संस्थेचं हेच वैशिष्टय़ आहे, की ही संस्था शासनाबरोबर फटकून न वागता शासनाला मदतीचा हात देते. एसआयक्यूई (स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ क्वालिटी एज्युकेशन) अंतर्गत ‘बोध’ने ३ हजार प्राचार्याना प्रशिक्षण दिलं आहे. आतापर्यंत किमान १२ हजार मुख्याध्यापक ‘बोध’ने प्रशिक्षित केले आहेत. गुणवत्तावाढीसाठी निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचा अधिकार या प्राचार्याना आहे. डिस्ट्रिक्ट सपोर्ट फेलो म्हणून पूर्ण राजस्थानात ‘बोध’चा एकेक शिक्षक प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आहे. मात्र अशा शिक्षकांची भेट झाली नाही. शिवाय ज्या संस्था ‘बोध’प्रमाणे हेतू ठेवून काम करतात त्यांनाही ‘बोध’ सहकार्य करते.

‘बोध’मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं दरवर्षी जूनमध्ये २१ दिवसांचं प्रशिक्षण होतं, वार्षिक कार्यशाळा होते. प्रत्येक शाळेचा गतवर्षीचा आढावा घेऊन नववर्षांचं नियोजन केलं जातं. यात मुख्यत: ‘कपॅसिटी बिल्डिंग’चं काम होतं. साहित्य साधननिर्मिती, अभ्यासक्रम विकसन, गरजेनुसार नवीन पाठय़पुस्तकं तयार केली जातात. प्रशिक्षण हा ‘बोध’च्या गुणवत्तापूर्ण कामाचा पाया आहे. विशेष म्हणजे सर्व शाळांचं जाळं विणलं आहे. दर महिन्याला सर्व शाळांतील सर्व शिक्षक एकत्र भेटतात, अनुभवांची देवाणघेवाण करतात याची नोंद केली जाते. वर्षांच्या शेवटी शिक्षकांचा वार्षिक अहवाल केवळ नोंदीच्या स्वरूपात तयार न होता वेगळं काय केलं, उणिवा कोणत्या, परिणाम काय अशा टप्प्यातून सादर केला जातो. सीसीई (कंटिन्युअस अ‍ॅंड कॉंम्प्रेहेन्सिव इव्हॅलूएशन)  येण्यापूर्वी ‘बोध’चे आपले नियम, अभ्यासक्रम होता. सीसीई आल्यावर मात्र शासनाचे नियम पाळूनही ‘बोध’ने आपला दर्जा राखलाय. आपण स्वत: तयार केलेलं साहित्य वापरून शासनालाही ‘बोध’ तांत्रिक मदत करते.

‘बोध’च्या या सर्व शाळांची वैशिष्टय़ं काय आहेत ते पाहू या. ज्या ज्या ठिकाणी ‘बोध’च्या शाळा आहेत त्या सर्व स्थानिक समाजाच्या मदतीतून उभ्या आहेत. समस्या शोधणं नि समस्या सोडवणं हे स्थानिकच करतात. ‘बोध’ या शाळांना शिक्षक देते, साधन साहित्य देते, मुलांना लागणारी साधनसामुग्री देते. शालेय इमारत, स्वच्छतागृहे इत्यादी स्थावर मालमत्ता त्या त्या ठिकाणचे लोक पुरवतात. राजस्थानातील ‘बोध’च्या सर्व शाळांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा शिक्षकांचे प्रश्न समजून घेणं आणि सोडवणं हे काम तज्ज्ञ मंडळी करतात.

‘बोध’च्या प्राथमिक शिक्षणाचं स्वरूप कसं आहे? याचा विचार करता चौथीपर्यंत प्रत्येक विषयाला शिक्षक आणि मदतनीस शिक्षक आहे. ‘बोध’ने नेमलेल्या शिक्षकांना ‘बोध’चं ३० दिवसाचं प्रशिक्षण करणं (सुट्टीत) बंधनकारक आहे. मुलं ज्या वातावरणातून येतात ते वातावरण इथले शिक्षक मूलत: समजून घेतात. त्यासाठी सुरुवातीला एकदम शिकवायला सुरुवात न करता मुलांच्या समस्या आधी जाणून घेतल्या जातात. प्रत्येक मुलांचं घर बघितलं जातं. इथे शिक्षकांच्या असं लक्षात येत गेलं की आपल्या विचारांपलीकडे मुलांच्या समस्या आहेत. या शाळेत येणाऱ्या मुलांचा स्तर जसा वेगळा आहे तसे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. ‘बोध’च्या लक्षात आलं की मुलांच्या कोणत्याही स्वरूपाच्या समस्या मुलांच्या शिकण्यात अडथळा आणतात. त्यामुळे ‘बोध’च्या शिक्षणातील सामाजिक भान, महत्त्वाचं आहे. हे अडथळे पार केले जातात, मगच मुलं शांत,आनंदी होतात. विषय शिकवताना आलेले अनुभव नोंदवले जातात. समस्या ऐकून सोडून देण्यापेक्षा समस्येची उत्तरं शोधताना शिक्षकांमध्ये जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी जाणवली.

पूर्व प्राथमिक क्षेत्रातही ‘बोध’चं काम वैशिष्टय़पूर्ण आहे. ज्या गावात अंगणवाडी नाही तिथे ‘बोध’ अंगणवाडी सुरू करते. जिथे अंगणवाडी आहे त्या ठिकाणी ‘बोध’चा शिक्षक काम करतो नि असलेली ताई निरीक्षकाचं काम करते. ‘बोध’ची शिक्षिका त्याच परिसरातील पण किमान बारावी उत्तीर्ण असते. तिला ५ हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जातात. या ताईचं प्रशिक्षण ‘बोध’मार्फत होतं. यात कामाची पद्धत, तत्त्वज्ञान, साहित्यनिर्मिती, शरीर-मानसशास्त्र, यांचा अभ्यास असतो. गाणी, गोष्टींचं सादरीकरण फारच वेगळं आहे. या अंगणवाडीत येणाऱ्या, शाळेत येणाऱ्या बऱ्याच मुलांचे पालक शेतमजूर आहेत. त्यांच्या वारंवार सभा घेऊन त्यांच्याशी बोलावं लागतं.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासह गुणवत्ता वाढण्यास ‘बोध’चं प्रशिक्षण कारणीभूत आहे. या प्रशिक्षणांचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात चालतात. ‘बोध’बाहेरील अनेक प्रशिक्षक हे शिक्षण घेतात. सरकारी यंत्रणेसाठी सहा दिवसांचं प्रशिक्षण असतं. राज्यभरातून शिक्षक येतात. टेक्निकल एजन्सी म्हणून ‘बोध’ काम पाहते. इतर स्वयंसेवी संस्थांबरोबर १५ दिवसांचं प्रशिक्षण होतं. यात सात दिवस साधनसामुग्री निर्मितीवर आणि उरलेले सात दिवस त्याच्या वापराबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. एकूणच ‘बोध’च्या कामात करून पाहण्यावर, समजून घेण्यावर भर आहे. या प्रशिक्षणात काही घटक असे निवडले जातात ज्यात फक्त ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निग’ असते. शाळेत गृहपाठ वेगळ्या पद्धतीने दिला जातो.

इथे शिक्षा नाही हे सांगायला नकोच. वर्गाचे दोन गट पाडले जातात. एक गट पाठय़क्रमावर काम करतो. दुसरा गट कमी क्षमतेचा असतो, त्यासाठी १५ दिवसांच्या कामाचं नियोजन केलं जातं. कधी ग्रुपची विभागणी अधिक लहान गटात होते. इथे शिक्षक अधिक काम करतात. प्रत्येक मुलाबरोबर व्यक्तिगत पातळीवर काम केलं जातं. ‘बोध’च्या शाळांचं वेळापत्रक सात तासांचं असतं. पहिले पाच तास ५० मिनिटांचे तर नंतरचे दोन तास ४५ मिनिटांचे असतात. शाळा सुटल्यावर एक तास साधननिर्मितीचा असतो. एका महिन्यात दोन वेळा नोंदी होतात.

‘बोध’च्या शिक्षकविषयक कामात ‘डेमोक्रेटिक’ या शब्दाला फार महत्त्व आहे. हा शब्द मुलांच्या जगण्यात कसा आणला जातो? मुलं बाहेर पडल्यावर हा शब्द कसा वापरतात? तिथल्या ताई म्हणतात, ‘‘मुलं इथे जे शिकतात ते नक्कीच वेगळं असतं, त्यामुळे साहजिकच बाहेर पडल्यावर त्यांना जरूर त्रास होतो पण ही मुलं आवाज उठवताना दिसतात. कारण या शाळेतील मुलांना शिक्षणातून जो आशय दिला जातो तो ‘बोध’ने निर्माण केलेला आहे. इथे इतिहास-नागरिकशास्त्र हे विषय नसून जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. शिक्षणातील ही लोकशाही मूल्यात रुजवण्यात मुलांच्या कुटुंबालाही समाविष्ट केलं जातं. आपल्या शिक्षणाकडून असलेल्या आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात ‘बोध’ प्रयत्नशील आहे. कदाचित ‘बोध’च्या या यशामुळे राजस्थानातील प्रत्येक जिल्ह्य़ात आजही ‘बोध’चे सल्लागार आहेत. राज्यातील शाळांना ‘बोध’ सल्ला देते. डीपीईपीसारख्या योजनेतून ‘बोध’ १५ राज्यांना मार्गदर्शन करते. बिहारमधील ‘निहार’, काश्मीर-पंजाबमधील काही संस्था, सीएफआयसारखी संस्था यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ‘बोध’ मदत करते. जवळजवळ शंभर संस्थांना ‘बोध’चा आधार आहे. अनेक कॉपरेरेट कंपन्याही ‘बोध’चे मार्गदर्शन घेतात. योगेंद्रजींनी गप्पा मारताना ‘बोध’चं तत्त्वज्ञान, इतिहास सांगितला. माणसांना आपल्या अस्तित्वाची जाण येण्यासाठी ‘बोध’ काम करते. माणसं मोठी झाल्यावर दृष्टिकोन, विचारप्रणाली तयार होते, पूर्ण विचार ताकदीचे असतात. लहान मुलांचं तसं नसतं. म्हणूनच मुलांनी लोकशाही पद्धतीनं जगायला हवं. मुलांच्या बाबतीत विचार करताना ‘बोध’ एका व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून नसून अनेकांचं संशोधन, विचार, निर्णय यांना ‘बोध’ स्वीकारतं. संस्थेची रचनाच लोकशाहीवादी तत्त्वांवरची आहे.

या संस्थेत कोअर ग्रुप आणि जनरल ग्रुप अशी विभागणी केलेली असली तरी शिक्षणविषयक निर्णयात सर्व शिक्षकांच्या सूचना, संमतीचा विचार केला जातो. या सर्व शाळांतून जाणीवपूर्वक मुक्तोत्तरी प्रश्नांची रचना मुलांसाठी केली आहे. त्यांच्या नोंदी केल्या जातात. मुलांबरोबर सर्वाचा संवाद मला जास्त महत्त्वाचा वाटला. हा संवाद संतुलित  आणि संवेदनापूर्ण होतो. वय वाढेल तसं मुलांचं विचार करणं बुद्धिनिष्ठ होण्यासाठी ‘बोध’चा प्रयत्न होतो. इतका प्रयत्न केल्यावर मुलं बाहेर पडली, की त्यांना वास्तवाशी संघर्ष करावा लागतो. ‘काय बना, काय बनू नका’ हे सांगितलं तरी बाहेरच्या वातावरणाचा, मूल्यव्यवस्थेचा प्रभाव मुलांच्या वर्तनावर पडतोच. मात्र मुलांमध्ये जीवनमूल्यं  रुजवण्याचा कसोशीनं प्रयत्न ‘बोध’ करते, तर दुसऱ्या बाजूला बाहेरच्या वास्तवाला नाकारतही नाही.

अभ्यासक्रम, साहित्यसाधनांची निर्मिती, शिक्षकरचना (एक मुख्य + एक साहाय्यक), वर्गरचना, संस्थाचालकांचा अध्यापनात सहभाग, संशोधन विभाग, स्वतंत्र नोंद विभाग (डॉक्युमेंटेशन डिपार्टमेंट), अध्यापन पद्धती, मूल्यमापन अशा अनेक क्षेत्रांत ‘बोध’चं काम वेगळं आहे. संस्थेला मिळणारं आर्थिक पाठबळ विकासाला  पूरक आहे. म्हणूनच ‘बोध’वृक्ष बहरतोय.

‘बोध’ शिक्षा समिती’चं प्रकाशित साहित्य वाचल्यावर ‘बोध’च्या कामाची अधिक माहिती मिळते. यात ‘बालगीतं’ (भाग १ आणि २), ‘त्रिआयामी आकृतियोंका पृष्ठीय विकास एवं संपूर्ण पृष्ठीय शिक्षा के पहले कदम’, ‘पाठय़चर्या एवं पाठय़क्रम’, ‘बच्चे, ज्ञान और सिखने सिखाने की प्रक्रिया’, अशी पुस्तकं ‘बोध’ ने प्रकाशित केलीत. ही पुस्तकं आणि शिवाय तेथील समृद्ध ग्रंथालयाचाही उपयोग शिक्षक-मुलांकडून मोठय़ा प्रमाणात केला जातो. ‘बोध’ रुजवत असलेली ही शिक्षणसंस्कृती नक्कीच उद्बोधक आहे.

शाळेचा पत्ता- बोध शिक्षा समिती / कुकर्सजवळ / जयपूर (राजस्थान)

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com