27 September 2020

News Flash

सिल्डेनाफिल? नको गाफील!

‘या गोळ्या तुमच्याकडेच ठेवा. कोणा गरजूला लागत असतील तर द्या.’

| October 12, 2013 01:01 am

‘या गोळ्या तुमच्याकडेच ठेवा. कोणा गरजूला लागत असतील तर द्या.’ समोरील ज्येष्ठ नागरिकाने माझ्या टेबलावर काही गोळ्या ठेवल्या व वैतागून वरील वाक्य म्हटले. मी त्या गोळ्या पाहिल्या. सेक्सच्या गोळ्यांचा एक प्रसिद्ध ब्रँड होता तो. वैद्यकीय नाव सिल्डेनाफिल. त्या काळात अत्यंत महागडय़ा असणाऱ्या गोळ्या. (साधारण बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.) अत्यंत गाजावाजा झालेल्या.
‘काय झालं एवढं?’ मी त्या गृहस्थांना, दौलतरावांना विचारलं.
‘व्हायचंय काय. मी सत्तरीला पोचलेलो. आमचं ऑलिम्पिक सेक्स चालू होतं..म्हणून एका मित्राच्या सल्ल्याने या महागडय़ा गोळय़ा मिळवल्या. दोन दिवस फायदा झाला. पण नंतर मात्र दहा-बारा दिवस घेऊन काहीही उपयोग झाला नाही. म्हणून तुमच्या सल्ल्यासाठी आलोय.’ दौलतरावांनी कहाणी संपवली.
मी थोडासा अचंबित झालो होतो. ‘अहो, तुमचं ऑलिम्पिक सेक्स चालू होतं ना? मग कशाला अशा गोळ्या घेतल्या? वर्ल्ड चॅम्पियनशीप हवी होती का?’
‘तसं नाही सर, ऑलिम्पिक सेक्स चालू होतं म्हणजे चारएक वर्षांतून एखाद्यावेळी!’
मी गार! मग माझे मलाच सावरत मी विचारलं, ‘दोन दिवस झाला ना उपयोग? लागोपाठ दोनदा ऑलिम्पिक!’
‘काय डॉक्टर, चेष्टा करताय माझी.’ दौलतरावांचे वय आणि उतरलेला चेहरा यामुळे मी माझ्या जिभेला आवरले.
‘बरं मला सांगा, या एवढय़ा महागडय़ा गोळ्या आणि सेक्सवर रामबाण म्हणून मी ऐकल्या होत्या. मग माझ्या बाबतीत असं कसं झालं? माझा प्रॉब्लेम खूप वाढला आहे म्हणून का?’ दौलतरावांनी मूळ विषयाकडे माझे लक्ष वेधले.
‘नाही तसं नाही. या सिल्डेनाफिल औषधाच्या गोळ्या सेक्सवर रामबाण नाही, पण मर्यादित स्वरूपाच्या आहेत.’ मी थोडं त्यांना गांभीर्याने सांगितले.
‘अहो, डॉक्टर पण काही डॉक्टर तर वेगळंच सांगतात. असं कसं?’
मी दौलतरावांशी थोडेसे मोकळेपणाने बोलायचे ठरवले.
‘हे बघा, सिल्डेनाफिल हे औषध जेव्हा फायझर कंपनीने ‘वियाग्रा’ नावाने लाँच केलं ना, त्या सॅन फ्रन्सिस्कोच्या जागतिक परिषदेला मी उपस्थित होतो. या औषधाचा सखोल अभ्यास करूनच मी तुम्हाला सांगतोय दौलतराव. हे एक मर्यादित स्वरूपाचे औषध आहे.’
‘कसं काय?’ दौलतराव उत्सुक होते, पण त्यांची नाराजी कमी झाली, ती यामुळे की इतका वेळ त्यांना वाटत होते की सिल्डेनाफिलसारख्या जगप्रसिद्ध औषधाचाही उपयोग होत नाही म्हणजे आपणच आता या क्षेत्रात ‘कंडम’ झालोय.
महाभारत काळातील ययाती राजाची कथा आहे. अत्यंत विषयासक्त असणाऱ्या या राजाला वार्धक्य आल्याचे दुख अत्यंत असह्य़ होते. तो आपल्या मुलांकडे त्याचे वार्धक्य घेऊन त्या बदल्यात त्यांचे तारुण्य देण्याची गळ घालतो. त्याची सर्व मुले त्याला धुडकावून लावतात. परंतु त्याचा अनौरस पुत्र पुरू हा मात्र त्याची इच्छा पूर्ण करतो. त्यामुळे ययाती पुनश्च आपले विषयासक्त जीवन जगू लागतो. अनादी काळापासूनच तारुण्य आणि सेक्स यांची सांगड निसर्गदत्त असल्याचे मानवाला माहीत आहे. सेक्स करण्याची क्षमता कमी होणे म्हणजे म्हातारपण आल्याची चाहूल जाणली जाते. वयाने वृद्ध असणाऱ्याचे सेक्समधील स्वारस्य तसेच मनाचाही शृंगारिकपणा कमी होत असतो किंवा तो व्हावा अशीही मनोधारणा समाजामध्ये आढळते. परंतु खरे म्हणजे अशी कित्येक रोमँटिक बुजुर्ग जोडपी सेक्सची हृदय-संजीवनी अनुभवत एकमेकांना साथ देत आपले आयुष्यही दीर्घायुषी करत असतात. (बुजुर्ग हैं मगर बुढे नहीं!)
     जीवनातील सेक्ससारख्या अत्यंत जिव्हाळय़ाच्या विषयाशी आपले घट्ट नाते सांगणाऱ्या सिल्डेनाफिल या औषधाचा प्रचंड गाजावाजा जगभर झालेला आहे. जणू काही सेक्ससाठीच्या ज्या जादूच्या औषधाची तळमळ होती त्याचाच शोध लागल्याचा दावा प्रचारातून सर्वसामान्यांवर िबबवला गेला आहे. माझ्या सुदैवाने वियाग्रा अर्थात सिल्डेनाफिल सायट्रेट (त्याचे वैद्यकीय नाव) हे औषध अमेरिकेतील सॅनफ्रन्सिस्को येथील नोव्हेंबर १९९६ च्या ज्या वैद्यकीय परिषदेत पहिल्यांदा चíचले गेले त्या नपुंसकतेवरील सातव्या जागतिक परिषदेला मी उपस्थित होतो. माझी औषधाशिवायची सेक्स-फिटनेस उपचारपद्धती मी त्याच अमेरिकी परिषदेमध्ये सादर केली. (किती हा विरोधाभास!). वियाग्राच्या चाचणींचा डेटा हा माझ्याकडे ते औषध भारतात उपलब्ध होण्यापूर्वीच सुमारे दोन एक वर्ष अगोदर मिळालेला होता. त्याचा अभ्यास केल्यावर या औषधाच्या मर्यादा स्पपष्ट झाल्या होत्या, ज्या वैद्यकीय तज्ज्ञांना व सर्वसामान्यांनाही माहीत होणे जरुरीचे आहे.
जेव्हा पुरुषाला सेक्सची उत्तेजना होते तेव्हा मेंदूतून त्या संवेदना िलगाकडे पोचतात. त्यामुळे िलगामध्ये सायक्लिक जीएमपी हे एक रसायन झपाटय़ाने वाढते. त्या रसायनाने िलगातील रक्तपुरवठा वाढतो व पुरुषाच्या िलगात ताठरता येते. (म्हणजे वीर्याचा संबंध िलग-ताठरतेशी नसतो!)
कालांतराने ही आलेली ताठरता नष्ट होऊन िलग पूर्वस्थितीला येण्यासाठी िलगातच नसíगकपणे एक वेगळी रसायन-प्रक्रिया सुरू होते. ती असते पीडीई ५ या एन्झाइमशी संबंधित. हे पीडीई ५  एन्झाइम सायक्लिक जीएमपीला नष्ट, कृतिशून्य करते व म्हणून िलगातील रक्त पुन्हा मूळ रक्ताभिसरणात जाऊन ताठरता जाते. पुरुषाच्या वीर्यपतनानंतर सर्व साधारणपणे हे घडते.
सिल्डेनाफिल सायट्रेट हे औषध पीडीई ५ या एन्झाइमला काही काळ रोखून धरते. त्यामुळे सायक्लिक जीएमपी रसायन लगेच नष्ट होत नाही व िलगातील रक्त काही काळ तसेच राहाते. म्हणजेच ताठरता काही काळ राहू शकते. जशी आहे तशी. बस इतकेच. परंतु ती टिकणे हे मात्र लैंगिक पीसी स्नायूंच्या सक्षमतेवरच असते हेही ध्यानात ठेवले पाहिजे.
मधुमेह व अथेरोस्केरॉसीससारख्या विकारांमध्ये सायक्लिक जीएमपी रसायनच कमी प्रमाणात निर्माण होत असते व त्यामुळे िलगातील रक्तपुरवठा कमी होऊन ताठरता कमी होत असते. सिल्डेनाफिल हे सायक्लिक जीएमपीचे प्रमाण वाढवत नसते म्हणजेच सिल्डेनाफिल ताठरता वाढवत नाही. हे जाणून घेतले पाहिजे. (वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्धा)
सिल्डेनाफिलमध्ये ते गुणधर्मच नाहीयेत. ज्यांना तसा अनुभव आला असेल तो केवळ आपण औषध घेतल्याने आता प्रॉब्लेम जाणवणार नाही या भाबडय़ा आशेने लैंगिक परफॉर्मन्स एॅन्झायटी, कार्यचिंता कमी झाल्याने आलेला प्लॅसेबो इफेक्ट, श्रद्धेचा परिणाम. असे प्लॅसेबो इफेक्ट कालांतराने नष्ट होत असतात व औषध मग निरुपयोगी वाटते. दौलतरावांच्या बाबतीत तेच घडले होते.
 सिल्डेनाफिल मेंदूतील सेक्सच्या केंद्रावर कुठलाही परिणाम करीत नाही म्हणजेच सेक्सची इच्छा वाढवत नाही. उलट हे औषध पोटात घेण्याचे असल्यामुळे रक्तातून सर्व अवयवांकडे जात असते. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ िलगापुरताच सीमित न राहता जिथे जिथे पीडीई ५ एन्झाइम काम करीत असेल त्या त्या अवयवांवरही होत असतो.
अशा अवयवांमध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत, डोळे व हृदय. डोळय़ांमध्ये पीडीई ५ एन्झाइम सिल्डेनाफिलने रोखले गेले तर रंगदृष्टीमध्ये गडबड होऊ शकते व निळसर छटेचा, ब्लू टींटचा त्रास जाणवू शकतो. हे एकवेळ फार धोकादायक नाही. परंतु हृदयाचे पंिपग, आकुंचन-प्रसरण हे हृदयातील सायक्लिक जीएमपी रसायन नियमितपणे कार्यान्वित-अकार्यान्वित (एॅक्टीवेशन-डीएॅक्टीवेशन) होण्यावर असते. पीडीई ५ एन्झाइमने हे काम नसíगकपणे, नियमितपणे व चोखपणे होत असते. यात सिल्डेनाफिलने गडबड केल्याने हृदयाचे पंिपगच गडबडू शकते. केवढा हा धोका!
आणि कोणामध्ये तो कधी उद्भवू शकेल हे ‘देवो न जानाति कुतो मनुष्य:?’
सिल्डेनाफिल, टाडालाफिल ही कामेच्छा, सेक्सची भावना, वाढवणारी सेक्स-टॉनिक्स नाहीत. लैंगिक समस्या नसणाऱ्या पुरुषांमध्ये केवळ कामजीवन जास्त रोमांचक करण्यासाठीही यांचा उपयोग होत नाही. लैंगिक समस्या असणाऱ्या हृदयरुग्णांच्या बाबतीत सिल्डेनाफिल धोकादायक ठरू शकते. म्हणून डॉक्टरी सल्ल्याशिवाय नायट्रो-व्हाजोडायलेटर व कॅल्शियम-चॅनल ब्लॉकर औषधे घेणाऱ्या हृदयरुग्णांनी सिल्डेनाफिल न घेणेच इष्ट. डॉक्टरांनीसुद्धा पेशंटमधील सिल्डेनाफिल, टाडालाफिल यांच्या फायदा-तोटय़ाची नोंद हृदय व दृष्टी यांच्यावरील त्यांचे परिणाम लक्षात ठेवूनच घेणे उपयुक्त. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शन, िलग-ताठरतेची समस्या (नपुंसकता) हा रोग नसून विविध घटकांवर (पती-पत्नी नाते, संबंधांचे प्रमाण, मधुमेह, लठ्ठपणा, व्यसने इ.) अवलंबून असणारी समस्या आहे. केवळ कुठल्याही औषधी गोळीने ती दूर होणे शक्य होत नसते.
लैंगिक समस्यांबाबत तरी इसवी सन चौथ्या शतकापासून कामशास्त्राचा व तंत्रयोगाचा सखोल व शास्त्रीय वारसा असणाऱ्या आपण भारतीयांनी तरी इन्स्टंट थेरपींमागे धावणाऱ्या अशा पाश्चात्त्य मनोवृत्तीच्या आहारी जाणे योग्य नव्हे. शेवटी िलगातील सायक्लिक जीएमपी हे शृंगारिक क्रीडा व कल्पनांनीच वाढत असते. म्हणून ‘बी रोमँटिक’, शृंगारिक बना.’
 दौलतरावांना हे सर्व लक्षात आणून दिल्यावर त्यांना वेळीच आपण औषधांपासून दूर झाल्याने हायसे वाटले. या विषयीचा आपला गाफीलपणा धोकादायक ठरू शकतो हे सुज्ञांना सांगणे न लगे.    
shashank.samak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2013 1:01 am

Web Title: sildenafil tablets
टॅग Chaturang
Next Stories
1 सेकंड हनिमून
2 बलात्काराची मानसिकता
3 शून्य विवाह
Just Now!
X