मंदार भारदे

‘सासू-सासऱ्यांनी टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचा भागच आहे,’ असं मत एका निवाडय़ाच्या वेळी विशेष न्यायालयानं व्यक्त केलं खरं, पण तो एकूणच आपल्या संस्कृतीचा भाग असल्याचं आमच्या लक्षात आल्यानं त्याचे फायदे सांगण्यासाठीचा हा लेखप्रपंच. संसारात एकमेकांना टोमणे मारलेच गेले नसते तर आयुष्याला झणझणीतपणा आला असता का? किती सपक जगणं झालं असतं ते? तेव्हा जगण्यासाठी आवश्यक म्हणून टोमणे मारणं, टोचून बोलणं आवश्यकच आहे नाही का..  मग कुणी त्यामुळे दुखावलं जातं का, की कुणाचा आनंद त्यामुळे हिरावला जातोय याची काळजी कशाला करायची? काय? तेव्हा मंडळी, संसारातल्या झणझणीतपणासाठी शांतता, टोमणे सुरू आहेत..

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

टोमणे मारणे हा सामान्य वैवाहिक जीवनाचा भाग आहे आणि त्याबद्दल तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही, असे मत विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नोंदविल्याची बातमी मागच्या आठवडय़ात सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत वाचली. या महत्त्वपूर्ण खुलाशाबद्दल माननीय न्यायाधीशांचे अभिनंदन.  याच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आल्या होत्या, त्यात ‘टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचा भाग’ असे म्हटले होते. त्यात दुरुस्ती करून ‘टोमणे मारणे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे’ असे मला सुचवावेसे वाटते.

न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयांबद्दल काही वेळा माझ्या काही तक्रारी असतात, पण मी फारसे कुठे काही बोलत नाही. कारण न्यायालयासंदर्भात काही बोलणे म्हणजे ‘फट म्हणता बेअदबी’ असा सध्याचा काळ. त्यामुळे गपगुमान मूग गिळून बसणेच श्रेयस्कर. पण आज मला जे वाटतंय ते मी माझ्या मनातलं बोलतो आहे. अत्यंत खोलवर मानवी व्युत्पत्तीची आणि कुटुंबव्यवस्थेची समज असल्याशिवाय इतका महत्त्वाचा निर्णय देणे शक्य नव्हते. आज मला आपल्या आदिम पूर्वजांची आठवण येते आहे (हल्ली त्यांना बहुतेक ‘सेपियन’ वगैरे म्हणतात. ‘सेपियन’च्या मेहुणीला काय म्हणत असावेत याची मला राहून राहून उत्सुकता वाटत राहाते.. पण ते असो.) सेपियन भाऊ कमरेला झाडाच्या फांद्या, डहाळ्या गुंडाळून जेव्हा दगडावर दगड घासून आग वगैरे लागते आहे का, याचा अदमास घेत बसला असेल आणि तेव्हा काही काळ जर त्याचे सौ. सेपियनताईकडे दुर्लक्ष झाले, तर त्या काय करीत असतील? श्रीयुत सेपियन यांच्या ‘स्टाईल स्टेटमेंट’बद्दल त्यांचे काय मत आहे?  ‘‘माझे मेलीचे नशीबच फुटके. माझ्या माहेरचे कसे सगळे जरा आजूबाजूला फिरतात आणि छान केळीची हिरवीगार पाने तोडून आणून स्वत:च्या आणि घरच्यांच्या कमरेला गुंडाळतात. इथे आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस! जरा कष्ट नको करायला! दरिद्रय़ासारखे गुहेबाहेरच्या पिंपळाची पाने तोडतात आणि गुंडाळतात कमरेला. चिंचेची पाने तोडून अजून नेसायला लावली नाहीत हे नशीब आमचं! लाज कशी झाकायची आता हेही शिकवते मीच. लग्नाआधी काय एकाहून एक तालेवार सेपियन स्थळं आली होती मला, कोणी केळीची पाने गुंडाळणारे तर कोणी छान नारळाच्या झावळ्यांना आंब्याची पाने एकात एक गुंफून रुबाबात राहाणारे. बाबा म्हणाले ‘रूपाकडे पाहू नकोस, मुलगा हुशार वाटतोय’. कसला डोंबलाचा हुशार? दिवसभर दगडावर दगड घासत बसतो रिकामटेकडा. ठिणगी उडाली तर सेपियनचे जगणे बदलेल म्हणे. डोंबल माझं. आधी कमरेचे नीट गुंडाळून लाज राखायला शीक म्हणावं, चाललेत ठिणग्या काढायला!’’

मी म्हणतोय साधारण असे जर ‘डायलॉग’ तेव्हा ‘होमो सेपियन’चे किंवा त्यांच्या चुलत्यांचे  झाले असते तर ते चार पायांवरून दोन पायांवर येणे, शेपूट गळून पडणे, जंगलावर अवलंबून न राहाता शेती करायला लागणे, या सगळ्यांत जो पिढय़ान्पिढय़ांचा वेळ वाया गेला तो नक्की वाचला असता. विचार करू शकणे ही जर प्रगत अवस्था असेल, तर टोमणे मारू शकणे ही त्याही पुढची अत्यंत प्रगल्भ अवस्था आहे. अतिशय वेगाने ज्यांना बघता येते, ऐकता येते, ऐकता ऐकता विचार करता येतो, विचार करता करता बोलता येते, बोलता बोलता ऐकता येते आणि जे ऐकतो आहे त्यावर ऐकता ऐकता परत बोलता येते आणि हे सगळे करीत असताना जेव्हा विचारांचा वेग कायम राखता येतो, त्यालाच टोमणा मारता येतो. जनावरांनाही भाषा काही प्रमाणात तरी येत असावी असे मानायला वाव आहे. पण एक अस्वल दुसऱ्या अस्वलाशी ‘शिकेकाई लावतोस की शाम्पू’ किंवा एक वाघ दुसऱ्या हरणाशी ‘खाऊ की गिळू?’ असले जेमतेम  ख्यालीखुशालीचेच संभाषण करीत असणार. भिंतीवरची एक पाल दुसऱ्या पालीला ‘चाललीये बघा कशी ठुमकत! जशी काय हिच्या बापाने हुंडय़ात ही भिंत दिलीये’ असे काही ठसक्यात म्हणत असेल असे काही वाटत नाही .

टोमणे मारण्याने माणसाच्या प्रगतीचा वेग अतिशय वाढला असेच माझे निरीक्षण आहे. मी असे वाचले आहे की पूर्वी जनावरांसारखी माणसाच्याही हाताची बोटे चिकटलेली होती आणि ही चिकटलेली बोटे सुटी होण्यात जवळ जवळ दहा-वीस हजार वर्षांचा काळ गेला. काय करुण आहे हे! वेळीच बोटे सुटी झाली असती तर चार पायांवरून दोन पायांवर आल्या आल्या शेपूट गळून पडायची वाट न पाहता माणसाने गायछाप मळायची सिद्धी प्राप्त केली असती आणि मानवजात फार पूर्वीच आत्मनिर्भर झाली असती. तर सांगायचा मुद्दा हा, की खूप अप्रगत अवस्थांमधून प्रवास करीत करीत आताशी कुठे गेल्या पाचशे-हजार वर्षांत मानवी सभ्यता ही ‘टोमणे मारू शकणे’ या अतिप्रगत, प्रज्ञावान अवस्थेला येऊन पोहोचली आहे.

खरं तर कौटुंबिक न्यायालय ही संकल्पनाच मला मान्य नाही. नवरा-बायको, सासू-सून यांच्यातल्या वादांवर न्यायालय काय करणार, असेच मला वाटत राहाते. सासू-सुनेचे भांडण झाले, तर आपण सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात जातो का?.. का नाही जात? तर या विभागांचा आणि सासू-सुनेच्या वादांचा काही संबंध नाही आणि या वादात ते काहीही करू शकणार नाही अशी आपल्याला खात्री असते. मग न्यायालय तरी काय करेल या सगळ्यात आणि पोलीस तरी काय करतील? ‘‘मनस्ताप होऊन माझे ‘बीपी’ वाढते, हे माहीत असतानाही माझी सून मुद्दाम मला अजिबात न आवडणारे अळणी वरण करते. ते अळणी वरण मला दिसले की मी चिडेन आणि मला हार्ट अटॅक येऊन मी ठार होईन, असे ते कारस्थान आहे- जे माझ्या सुनेने आणि तिच्या बहिणीने रचले आहे. तेव्हा सुनेला ताबडतोब माझ्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करा.’’ अशी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेली सासू तर मीच पाहिली आहे. आता यात पोलीस काय तपास करणार आणि न्यायालय काय न्याय करणार? एकमेकांना टोमणे मारणे, टोचून बोलणे, या सगळ्याचा ‘उद्धार करणे’ असा उल्लेख करतात हे सत्यच आहे. टोमणे मारायच्या क्षमतेने मानवी प्रज्ञेचा खरोखर उद्धार झाला आहे आणि ती एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे. नणंदेने माहेरी येण्याचा संकल्प जाहीर करणे, सासूने दुसऱ्या सुनेबद्दल किंवा लेकीबद्दल कौतुकाचे चार शब्द उच्चारणे, सुनेने आपल्या माहेरच्या लोकांचे कौतुक करणे, अशा घटना घडायला लागल्या, की ही कला गुणवत्तेच्या चरम सीमेवर पोहोचते. शांतता, सौहार्द, समजूतदारपणा याने कुटुंबे जोडलेली राहात नाहीत, त्याने फार तर ती समाधानी राहू शकतात. टोमणे मारणे, टोचून बोलणे याने जगण्याला एक झणझणीतपणा येतो. जेवणात आणि जगण्यात जसा गोडवा हवा तसा झणझणीतपणादेखील हवा. टोमणे मारण्याने नातेसंबंधांत ‘क्लॅरिटी’ राहाते. जे म्हणायचे आहे ते अत्यंत नेमकेपणाने समोरच्यापर्यंत पोहोचते आणि मग कोणताही गोंधळ नातेसंबंधांत राहात नाही. माझी एक रशियन सहकारी आहे. तिला इंग्रजी येत नाही आणि मला रशियन भाषा. त्यामुळे ती माझ्याशी रशियन भाषेतच बोलते आणि मी तिच्याशी मराठीत बोलतो. आम्ही इंग्रजीत बोललो असतो तर जितके गोंधळ झाले असते त्यापेक्षा कमी होतात आणि संभाषण पूर्ण होते, असा माझा अनुभव आहे.  एकमेकांच्या भाषेचा एकही शब्द कळत नसतानाही मला माहीत आहे की तिची मोठी सून शिष्ट आहे आणि तिला माहेरच्या श्रीमंतीचा फार फार गर्व आहे. तिचा मुलगा बायकोच्या आहारी गेला आहे (खरं म्हणजे बायकोच्या पदराखालचे मांजर आहे, असे तिला म्हणायचे आहे पण तिकडे पदर नसतात हा एक भाषिक पदर सुज्ञांनी लक्षात घ्यावा) आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतील. यातून माझ्या हेही लक्षात आले की सासुरवासाचे ग्लोबलायझेशन हे डंकेलच्या खूप आधीच झालेले असावे आणि सुनांबद्दल तक्रारी करायच्या असतील तर सासवांना कोणतेही व्याकरण कधीही अडवू शकत नाही. ‘तुझ्या माहेरचे सगळे लोक सुलक्षणी आहेत. अगदी उचित असे संस्कार त्यांनी तुझ्यावर केले आहेत. मी शेजारच्या काकूंना नेहमी सांगते, की मला जशी सून मिळाली अशी सून कोणाला शोधूनही सापडणार नाही. तुझा भाऊ ‘पुरुषोत्तम’असून असा चांगला भाऊदेखील शोधूनही सापडणार नाही. तुझी वहिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी. तुझी आई जाणती आहे आणि अगदी कर्तव्यदक्ष आहे.  तुला हवे तितके फोन तू तुझ्या आईला आणि बहिणीला करीत जा. इकडची प्रत्येक गोष्ट तिकडे सांगत जा. त्यांना इथली प्रत्येक गोष्ट माहीत हवी, त्यांचीही मते महत्त्वाचीच आहेत.’

‘सासूबाई तुम्ही होतात म्हणून तुमचा संसार निभावला. फार खडतर आयुष्य तुम्ही जगलात. तुम्हाला जितके सांगावेसे वाटेल तितक्या वेळेला तुम्ही तुमच्या संसाराच्या आणि त्यात तुम्ही खाल्लेल्या खस्तांच्या त्याच त्याच गोष्टी पुन:पुन्हा सांगत राहा, मला त्या अगदी ऐकत राहाव्याशा वाटतात. तुम्ही नसता तर माझा नवरा गुंड बनून वाईट मार्गाला लागला असता, तुम्ही आमच्या लग्नाला होकार दिला नसता तर मला उजवणे माझ्या आई बापाला जमलेच नसते. तुम्ही होतात म्हणून आमचा संसार झाला, नाही तर काय झाले असते याची कल्पनादेखील करवत नाही. तुमच्या मुली आपल्याकडे आल्या की मला तर त्यांनी परत जाऊच नये असे वाटते.’

आता इतकी सरळ शाकाहारी संभाषणे घरातल्या दोन प्रमुख स्त्रियांमध्ये व्हायला लागली तर काय होईल? मुळात असे काही असू तरी शकेल का? आधी एकमेकांना आणि मग घरातल्या दोन इतर बिनमहत्त्वाच्या व्यक्तींना त्यांनी जर टोमणे मारणे बंद केले तर घराचे ‘आस्था चॅनेल’ होऊन जाईल याला जबाबदार कोण? टोमणे घशात अडकून राहिल्याने जर गुदमरून मृत्यू झाला तर जबाबदारी कोणाची? दोन किंवा अधिक जावा जर एकत्र राहात असतील तर या सगळ्याला जी एक नवी मिती मिळते आणि प्रांतिक विविधता लाभते ती न्यायालयाने जर बंदी घातली असती तर आपण गमावून बसलो असतो .

फक्त स्त्रियांपुरती आणि त्यातही सासू-सून अशा काही निवडक नात्यांपुरती मर्यादित आहे अशी वाटणारी टोमण्यांची देवघेव आता सर्वव्यापी बनली आहे. पुरुष मंडळींनीही उशिरा का होईना, या कलेत पारंगतता मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे हे मोठे शुभंकर आहे. टोमणे मारायची सवय असणाऱ्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही, असा माझा अनुभव आहे. टोमणे खाणाऱ्या काही लोकांना अजूनही दुखावले जाणे, मनाला लागणे, असे काही वेळा होते. आपण अजूनही उत्पत्तीच्या प्रवासात असल्याने असे होते आहे, हे आपण समजून घ्यावे. प्रगत अवस्था ही टेनिसच्या मॅचसारखी असेल. इकडून टोमणा आला, की तिकडून पण तितकाच त्वेषाने टोमणा येईल आणि यातला ‘वाईट वाटून घेणे’ नावाचा थांबा निघून जाऊन, समोरच्याला चितपट करण्यासाठी पुन्हा तुटून पडायचे बळ मानव प्राण्यांकडे येईल आणि लोक स्टेडियममध्ये बसून मस्त ‘टूर्नामेंट’ बघत राहातील.

‘टोमणे मारणे’ हे एका प्रगत मेंदूचे लक्षण आहे. सुमार ‘आयक्यू’ असलेला माणूस टोमणे मारूही शकत नाही आणि समजूही शकत नाही. ज्या दिवशी सगळी प्रजा सटासट टोमणे मारायला लागेल आणि ज्याला मारले, तो उगाच मनाने दुखावले वगैरे न जाता तितक्याच त्वेषाने त्याला उत्तर देईल, तेव्हा माणूस मेंदूने जास्त विकसित आणि हृदयाने जास्त खंबीर झालेला असेल आणि हा शेपूट गळून पडण्याइतकाच महत्त्वाचा टप्पा असेल!

या सगळे नेमके लक्षात ठेवून हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचे म्हणूनच मी अभिनंदन केले.

mandarbharde@gmail.com