गतिमंद मुलांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) हा त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे; पण यामध्ये जर झोपेचा विकार असेल तर दुर्दैवाने भावनिक बुद्धय़ांकदेखील कमी होतो! त्याचे परिणाम नुसते त्या व्यक्तीलाच नाही, तर सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. – ‘गतिमंद मुलांची झोप’ याविषयीचा हा भाग पहिला.

ना शिकमध्ये ‘प्रबोधिनी’ ही मतिमंद मुलांकरिता एक प्रख्यात शाळा आहे. या शाळेच्या संचालिका रजनी लिमये यांनी मला एक अंतर्मुख करणारी सत्य गोष्ट सांगितली. त्यांच्या शाळेमध्ये धावण्याची स्पर्धा होती. सर्व मुले आणि मुली उत्सुकतेने भाग घेत होते. एकदा धावताना एक मुलगी अडखळून पडली तेव्हा पुढे गेलेली आणि पाठून येणारी सर्व मुले अंतिम रेषेकडे पोहोचण्याऐवजी त्या मुलीकडे गेली आणि तिला उठवून मग परत धावायला लागली! परमेश्वराने बौद्धिक उंची दिलेली नसली तरी भावनिक उंची असल्याचे हे लक्षण आहे. परपीडा ‘जाणणे’ हे प्रत्येक माणसाला जमतेच असे नाही. ही मुले सहसा पटकन विश्वास ठेवणारी असतात आणि त्यांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे. कदाचित ही एक प्रकारची भरपाई निसर्गत: दिली गेली असावी; पण यामध्ये जर झोपेचा विकार असेल तर दुर्दैवाने भावनिक बुद्धय़ांकदेखील कमी होतो! त्याचे परिणाम नुसते त्या व्यक्तीलाच नाही, तर सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. एका प्रत्यक्ष उदाहरणाने स्पष्ट करतो.
 भारतात आल्यावर पोलिसांमधील आणि मतिमंद मुलांमधील निद्राविकारांचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यावर आमच्या संस्थेमध्ये संशोधन चालू होते (अजूनही चालू आहे). मुंबई विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाच्या दोन पीएच.डी. स्कॉलर्स यांचा हा विषय होता. अठरा वर्षांचा ओमकार हा थोडा लाजरा मुलगा, बुद्धय़ांक (IQ)) ६५, म्हणजे गतिमंदत्वाची पातळी ही माइल्ड (अल्प) मानली जाते! त्यांच्या झोपेची चाचणी ही अॅक्टिवॉच (एक झोप मोजणारे स्पेशल घडय़ाळ) लावून घेतली होती. त्यात असे आढळले की, तो फक्त पाच तासच झोपतो. झोपेची वेळ उशिरा, मध्यरात्रीनंतर होती. आम्हाला असे वाटले की, कदाचित रात्री टी.व्ही. बघत असेल म्हणून उशिरा झोपतो; पण ‘उशिरा का झोपतोस?’ असे विचारल्यानंतर त्याने निरागसपणे उत्तर दिले की, दिवसभर काम केल्यावर आईचे पाय दुखतात, म्हणून तिने सांगितल्यावर पाय चेपतो. मग कितीही उशीर झाला तरी तिच्याकरिता थांबतो.
सर्वसामान्य माणसांमध्येदेखील निद्राविकार असेल तर त्याच्या दिवसाची रयाच बदलते. गतिमंद मुलांमध्ये हाच परिणाम किती तरी पटीने वाढलेला दिसतो. आमच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टी आढळल्या त्या शोधनिबंधाच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्राला तर कळतीलच; परंतु सर्व समाजाला हे समजणे महत्त्वाचे आहे. यामुळे जागृती होऊन या मुलांच्या जगण्यात सकारात्मक परिणाम व्हावा, हाच या लेखाचा उद्देश आहे. संध्या धारणे (नाव बदललेले आहे) आणि तिची आई, या प्रोजेक्टमध्ये आम्हाला भेटली. संध्या त्या वेळेला वीस वर्षांची असली तरी मानसिक वय वष्रे पाच होते. सकाळी उठल्यापासून तिच्या आईला सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागे. एक तर उठायला वेळ लावे. मग अंथरुणावरच गुळाच्या गणपतीसारखी बसून राही. तोंड धुण्यापासून, आंघोळ, वेणीफणी इत्यादी छोटय़ा गोष्टींतसुद्धा तिचा पुढाकार नसे. आईचा दिवस तिचं सगळं करण्यातच जाई. संध्या शाळेतदेखील काही करत नसे;  पण ती शांत असल्याने त्याचा त्रास नसे. दुपारी जेवणानंतर मात्र तिला झोप आवरत नसे आणि नेमकी तीच कार्यशाळेची वेळ असायची. त्यामुळे फारशी कौशल्ये शिकणेदेखील तिला शक्य झाले नव्हते. तिचा बुद्धय़ांक (आयक्यू) कमी असल्याने ती असे करते किंवा काहीच करत नाही, अशी नुसती तिच्या आईचीच नव्हे तर सर्वाचीच समजूत होती. त्यामुळे ही अशीच कायम वागत राहणार हे गृहीत होते. आमच्या वैद्यकीय तपासणीत सुरुवातीला तेहतीस प्रश्न असलेली एक प्रश्नावली आम्ही वापरतो. मुळामध्ये ही प्रश्नावली अमेरिकेतील बालनिद्रारोगतज्ज्ञ डॉ. ज्युडीथ ओवेन्स यांनी सिद्ध (व्हॅलिडेट) केलेली आहे. तिचे भाषांतर करून आणि भारतीय जीवनरचनेनुसार प्रश्नांत फेरफार करून आम्ही ती सिद्ध  केली आहे. या प्रश्नावलीमध्ये संध्याला काही तरी निद्रारोग असावा असे निदर्शनास आले. मग तिची रात्रीची निद्राचाचणी झाली. या मुलांचा विश्वास संपादन करून त्यांना अंगभर इलेक्ट्रोड्स लावणे व त्यावरून त्यांच्या झोपेचा अभ्यास करणे ही एक कलाच असते. आमच्या भाऊराव गावीत या तंत्रज्ञाने यात नपुण्य दाखविले.
 संध्याच्या निद्राचाचणीमध्ये काही अनपेक्षित गोष्टी आढळल्या. सहा तासांच्या झोपेत संध्याचा मेंदू तब्बल दोनशे सात वेळेला जागा होत होता! दहा सेकंदांत परत झोपत होता. म्हणजे ताशी सरासरी पस्तीस वेळेला अथवा दर दुसऱ्या मिनिटाला जाग येत होती! मागच्या लेखांमध्ये निरोगी माणूससुद्धा झोपेत दर तासाला पाच वेळेला तरी उठतो हे उल्लेखले होते. आपल्याला हे उठणे लक्षात राहात नाही, कारण ते साठ सेकंदांपेक्षा कमी असेल तर स्मरणात साठवले जात नाही. याच कारणाने आपण रात्री संध्यासारखे दोनशे वेळेला उठलो, पण दहा सेकंदांत परत झोपलो तर त्याचे स्मरण राहणार नाही आणि एकदाही उठलो नाही असेच उत्तर द्याल! पण दुसऱ्या दिवशी या खंडित (फ्रॅग्मेंटेड) झोपेचे दुष्परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.
संध्याच्या बाबतीत तिच्या पायाची थोडीशी हालचाल दर तीस ते चाळीस सेकंदांने होत होती आणि या चाळवाचाळवीने मेंदू उठत होता. या निद्राविकारास ‘पिरिऑडिक लिम्ब मुव्हमेंट डिसऑर्डर (PLMD)’ असे म्हणतात. हा आगळा निद्राविकार आहे हे लक्षात घ्या. बहुतेक वेळेला मेंदू काही कारणाने उठवतो आणि त्यानंतर आपण हालचाल करतो. इथे बरोबर उलट होताना दिसते. मेंदूतील एका विशिष्ट भागामध्ये (बेसल गॅग्लीया) लोहाची कमी, आनुवंशिकता, डोपामीन या मेंदूतील एका रसायनाशी संबंधित असलेले रीसेप्टर्स यांचे बदललेले गुणधर्म वगरे यामुळे हा रोग उद्भवतो. भर झोपेत असे पाय हलणे होते, तर काही लोकांना झोप लागण्यापूर्वी पायामध्ये, मांडय़ांमध्ये कधीकधी एक विचित्र संवेदना जाणवते. ती जाण्यासाठी त्यांना पाय किंवा गुडघे चोळावे लागतात, काही काहींना तर पलंगावर पडल्यापडल्या पाय हलवावे लागतात अथवा चक्क उठून फिरावे लागते. यालाच रेस्टलेस लेग सिंड्रोम (अस्थिर पाय) असे म्हणतात. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.. संध्यामध्ये हा PLMD तीव्र स्वरूपाचा होता. तिच्या रक्ताच्या चाचणीमध्ये खूपच कमी लोह आढळले, शिवाय तिच्या आईलादेखील वर वर्णन केलेली ‘अस्थिर पायाची’ लक्षणे होती. संध्याला त्याप्रमाणे औषधं देण्यात आली. एका महिन्यानंतर फॉलोअपला आलेली वेगळीच संध्या आम्हाला दिसली. आज ती हसरी, तरतरीत दिसत होती. तिची आई कौतुकाने सांगत होती की, आमच्या आयुष्यात असे काही छान होईल, अशी आम्ही अपेक्षाच केली नव्हती!
संध्या स्वत:हून उठते, पांघरुणाच्या घडय़ा करते, स्वत: आंघोळ करते आणि कपडय़ांना इस्त्री करते. वर्गात ती दुपारी झोपत नाही. कार्यशाळेत भाग घेते. काही जणांना हा काही विशेष फरक वाटणार नाही, पण वाचकहो, त्या मुलीच्या पालकांच्या मते हा खूप मोठा बदल आहे. भले आपण त्यांचा बुद्धय़ांक (आयक्यू) बदल शकणार नाही, पण दिवसभरातील त्यांचे वर्तन बदलू शकलो तर तेही नसे थोडके..
पुढील लेखात याच मुलांमध्ये आढळलेले काही निद्राविकार, प्रत्यक्ष उदाहरणे आणि समाज म्हणून आपण काय करू शकतो याबद्दलचे आवाहन..

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?