20 November 2019

News Flash

हास्याची अद्भुत संजीवनी

माधवी कुंटेआपल्या मेंदूने काहीएक आडाखे पक्के केलेले असतात. आनंद, प्रसन्नता या भावस्थितीशी हास्य नेहमी जोडलेलं असतं. म्हणून रडण्याच्या बेताला आलेल्या किंवा रडणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक हसायचं

| November 8, 2014 12:22 pm

01-bodhiआपल्या मेंदूने काहीएक आडाखे पक्के केलेले असतात. आनंद, प्रसन्नता या भावस्थितीशी हास्य नेहमी जोडलेलं असतं. म्हणून रडण्याच्या बेताला आलेल्या किंवा रडणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक हसायचं ठरवलं, चेहऱ्याची ठेवण हसरी केली, क्षणभर त्यावर लक्ष केंद्रित केलं तर मेंदू असं ठरवतो की आता परिस्थिती चांगली आहे. त्यानुसार चेतापेशींना संदेश जातो. आजार, औदासीन्य, संकटे, तणाव या साऱ्या नकारात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी हास्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.

स र्वसामान्य माणूस आपले जीवन समाधानाने कसे जगू शकेल या संदर्भात ‘पीस ऑफ माइंड’ फाऊंडेशनचे श्रुतप्रज्ञ स्वामी यांनी सतत चिंतन केलं. चिंतन, अभ्यास, अनुभव, अवलोकन यातून सापडलेली तथ्ये त्यांनी जगासमोर मांडली. इतरांना सुधारण्याऐवजी स्वत:मध्ये योग्य बदल घडवीत आपला स्वभाव सुधारायला हवा. आपण प्रयत्न केला तर ते सहज शक्य आहे हे समजावताना त्यांनी चांगल्या स्वभावाचे काही नियंत्रक नमूद केले. त्यापैकी महत्त्वाचा नियंत्रक आहे नैसर्गिक हास्य! नैसर्गिक हास्य म्हणजे सहज स्वाभाविक प्रसन्नतेतून, मनाच्या निर्मळपणातून आलेले हास्य.

श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात, ‘‘आनंदी असणे, त्या त्या आनंदाचे प्रगटीकरण करणारे हास्य हे माणसाच्या स्वभावाचे मूळ रूप आहे. माणूस निसर्गाचा भाग आहे आणि आपण शांतपणे स्वत:ला निसर्गाशी जोडून घेतलं तर ती प्रसन्नता आपल्याला जाणवते. आपल्या आत झिरपत जाते. या प्रसन्नतेचं आणि आनंदाचं खुलं प्रगटीकरण करण्याची निसर्गदत्त देणगी फक्त मानवालाच प्राप्त झाली आहे; परंतु तणाव, चिंता, भीती यामुळे मानवजात हसणेच विसरली आहे. लहान मूल स्वभावत:च आनंदी असतं. लहान लहान गोष्टींनी त्याला हसू येतं. मोठय़ा माणसांचे ताण, राग हळूहळू त्याच्यात संक्रमित व्हायला लागली की मुलाचं नैसर्गिक हसू ओसरू लागतं.
काही झेनपंथी मठांमध्ये साधू दिवसाची सुरुवात हास्याने करतात आणि रात्री झोपी जाण्याआधी दिनचर्येची समाप्तीही हास्याने करतात. आपणही असं करायला हरकत नाही. श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात, ‘‘माझा असा अनुभव आहे की हसतमुख शरीर सदैव आरोग्यमयी राहते. मन आनंदी राहते, भावना सक्षम होतात आणि आत्मा तेजस्वी बनतो.’’
प्रसन्न अंत:करणाने दिवसाची सुरुवात केली की सर्व गोष्टी योग्य तऱ्हेने घडवण्यास मन अनुकूल होते. अडथळे आले तरी माणूस बिचकत नाही. वाईट वाटून घेत नाही. घाबरत नाही. चिडत नाही. हास्य अंगी बाणले की आणखी एक गोष्ट घडते. अगदी खोलवरून आतून उमटणाऱ्या शुद्ध निरागस हास्यामुळे अहंकार नाहीसा व्हायला लागतो. खूपशा नकारात्मक गोष्टींचे वेढे सुटू लागतात. हास्य घरामध्ये आनंद निर्माण करतं. उद्योगधंद्यात सदिच्छा आणि पत देतं. मैत्रीचं तर ते प्रतीकच आहे.
मात्र हे हसणं उपचारात्मक, वरवरचं मुखवटय़ाचं नसावं. मन त्या हास्यात गुंतून जायला हवं. मग त्या एका क्षणी भूतकाळ विसरला जातो. भविष्यकाळाची चिंता नाहीशी होते आणि त्या त्या वर्तमानाच्या क्षणात केवळ हास्य आणि त्यातून निर्माण होणारा आनंद तेवढा उरतो. तना-मनात पसरत जाणारा हा आनंद अमृताचं काम करतो. मन उल्हसित होतं. काम करण्यासाठी शरीराला चालना मिळते. मनावरचा आणि शरीरावरचा ताण नाहीसा झाल्याने आपलं काम आपल्याला नीट पार पडता येईल असा आत्मविश्वास निर्माण होतो.
फ्रेंच शास्त्रज्ञ इस्राएल वेनबाम यांनी अनेक प्रयोग व निरीक्षणांती असा निष्कर्ष काढला होता की चेहऱ्यावरील वेगवेगळ्या भावभावनांमुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यानुसार विचारही सकारात्मक किंवा नकारात्मक बनतात. आनंदाने केलेलं स्मित किंवा अनावर मुक्तपणे केलेले हास्य मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढविते, त्यामुळे मन:स्थिती आनंदी व उत्फुल्ल बनते. दु:खीकष्टी, गांजलेल्या चेहऱ्यामुळे प्राणवायू वाहून नेणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे मेंदूला आवश्यक ऊर्जा कमी पडते. त्यातून औदासीन्य येतं. ते सर्व शरीर-मनावर परिणाम करतं. म्हणजे पुन्हा रक्तप्रवाह कमी त्यामुळे ऊर्जा कमी.. हे सारं दु:खाला आमंत्रण देणारं ठरतं.
रॉबर्ट झाझोन्क या शास्त्रज्ञाने असं नमूद केलं आहे की, आपल्या मेंदूने काहीएक आडाखे पक्के केलेले असतात. आनंद, प्रसन्नता या भावस्थितीशी हास्य नेहमी जोडलेलं असतं. म्हणून रडण्याच्या बेताला आलेल्या किंवा रडणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक हसायचं ठरवलं, चेहऱ्याची ठेवण हसरी केली, क्षणभर त्यावर लक्ष केंद्रित केलं तर मेंदू असं ठरवतो की आता परिस्थिती चांगली आहे. त्यानुसार चेतापेशींना संदेश जातो. नैराश्याचं आवरण दूर होऊ लागतं. आजार, औदासीन्य, संकटे, तणाव या साऱ्या नकारात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी हास्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. हास्यामुळे कोंडलेल्या नकारात्मक भावनांचं विरेचन होण्यासाठी फार मोठं साहाय्य मिळतं. मन स्वच्छ, तरतरीत, प्रसन्न होतं. हसणाऱ्या, विनोद करणाऱ्या माणसाच्या सहवासात इतर माणसे मोकळी होतात. त्यातून स्नेहभावाचा तंतू जोडला जातो. अगदी गंभीर वादविवादाच्या प्रसंगीसुद्धा कुणी विनोद केला की सगळे जण हसतात. कडवटपणा दूर होतो. वातावरण निवळतं हे आपण सर्वानी कधी न कधी अनुभवलेलं असतं. स्मित करणारा किंवा हसणारा माणूस स्वीकार, सहमती, कौतुक, मान्यता, मैत्री अशा अनेक सकारात्मक भावना समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण करीत असतो.
श्रुतप्रज्ञ स्वामी सांगतात की, नैसर्गिक हास्य टिकवून ठेवायचं असेल तर माणसाने त्याचे भूतकाळातील कडवट अनुभव, प्रसंग विसरणे अत्यंत गरजेचे आहे. कटू आठवणी, प्रतिकूल घटना मनात जाग्या झाल्या तरी त्यावर प्रतिक्रिया उमटू न देता तटस्थपणे त्याच्याकडे पाहण्याची सवय करायला हवी. आपलं मन सदोदित उद्याच्या काळजीत गुंतलेलं असतं. त्यामुळे आपण आजचा आनंद हरवतो.
श्रुतप्रज्ञ स्वामींनी नॉर्मन कझिन्स या पत्रकाराचा उल्लेख केला आहे. त्याला ऑन्कोलाइझिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा दुर्धर रोग झाला होता. हा रोग आता बरा होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. पण हिम्मत न हरता त्याने वैद्यकीय उपचारांबरोबर हास्योपचार चालू ठेवले. त्यात यश येऊन तो आश्चर्यकारकपणे बरा झाला. हास्याचे अनेक लाभ समजावताना श्रुतप्रज्ञ स्वामी सांगतात की, हास्यात वेदनाशमनाची ताकद असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताण ओसरतो. शांत झोप येते. दुसऱ्याचे दु:ख दूर करण्यास हातभार लावता येतो. विधायक कार्याचे पाठबळ मिळते. समोरच्याच्या मनात विश्वास आणि मैत्री जागृत होते. हास्य ही मानवाला मिळालेली अद्भुत संजीवनी आहे.
जीवन सुंदर करणाऱ्या हास्याबद्दल श्रुतप्रज्ञ स्वामींनी अनेक गोष्टींचे विवेचन केले आहे. ते साररूपाने सांगायचे तर – हास्य ही जगभरात समान अर्थ पोहोचवणारी देहबोली आहे. एखाद्याची भाषा आपल्याला येत नसली तरी आपण स्मितहास्य केले तर समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरही हास्य उमटते. मत्रीचे हलकेसे तरंग मनात निर्माण होतात. * संवादाची सुरुवात प्रसन्न चेहेऱ्याने हलक्याशा स्मितहास्याने केली, अगदी फोनवर बोलताना आवाज हसरा ठेवला तर सकारात्मक वातावरण तयार होते.* हास्यासाठी एक क्षण पुरतो, पण परिणाम दीर्घकाळ टिकतो.* थकल्याभागल्या जीवाला हास्य ही नसíगक आनंद देणारी गोष्ट आहे. शिणवटा दूर करण्यासाठी कृत्रिम साधनांचा आधार घेण्याची गरज नाही.* आपल्याला पटत नसलेली गोष्ट एखादी व्यक्ती आग्रहाने मांडत असते आणि आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करीत असते तेव्हा हसून विषय टाळणारी माणसे चतुर म्हणायला हवीत.* एखाद्याच्या व्यंगावर, दु:खावर, अपयशावर, कुरुपतेवर हसणं किंवा मृत्यू, अपघात यांसारख्या प्रसंगी हसणं मात्र अगदीच वज्र्य करायला हवं. तेव्हा तो वातावरण प्रसन्न करणारा इलाज न ठरता ते असंवेदनशील आणि माणुसकीला सोडून होईल.* रुग्णाला भेटायला जाताना फुलाफळांऐवजी हास्यविनोदाची पुस्तके किंवा सीडीज द्याव्यात असं डॉक्टरसुद्धा सांगतात कारण हास्य वेदनाशामक असतं.* आपण जेव्हा सतत तणावग्रस्त असतो तेव्हा सहज कपाळावरून हात फिरवला तर आठय़ा आढळतात, आपण आपल्या शरीराला ओढून धरल्याचं लक्षात येतं. ही नकारात्मक सवय काढून टाकून काम करताना आनंदी अवस्था मिळविण्यासाठी हास्य फार उपयोगी आहे.* हास्य आणि प्रसन्नता माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवतात. श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात,
फूल बनकर मुस्कुराना जिंदगी है मुस्कुराकर गम भुलाना जिंदगी है।
सफलतापर खूश हुए तो क्या हुवा हारकर खुशीयाँ मनाना जिंदगी है।।

First Published on November 8, 2014 12:22 pm

Web Title: smiling face is the best medicine
Just Now!
X