20 October 2020

News Flash

कोण होतीस तू?

माझ्या एका स्त्री रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेहोशीच्या इंजेक्शनांचा अंमल येत नव्हता. भूलतज्ज्ञांनी पुन्हा वाढवून डोस दिले

| October 19, 2013 01:01 am

माझ्या एका स्त्री रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेहोशीच्या इंजेक्शनांचा अंमल येत नव्हता. भूलतज्ज्ञांनी पुन्हा वाढवून डोस दिले; पण शस्त्रक्रियेच्या मध्यावर ती पुन्हा हलू लागली. पुन्हा डोस दिले गेले व ती शस्त्रक्रिया मी भराभर पूर्ण केली. ती दारू पीत असावी असा संशय भूलतज्ज्ञाने व्यक्त केला. त्यावर तिने तात्काळ होकारार्थी उत्तर दिले. ‘अगं तू आधी का सांगितलं नाहीस?’ या माझ्या प्रश्नावर ती उत्तरली, ‘कारण तुम्ही मला याआधी हा प्रश्न विचारलाच नाहीत.’.. यापुढे दारू, धूम्रपानाविषयी स्त्रियांनाही हा प्रश्न विचारायचा, हा नवीन धडा मी यानिमित्ताने शिकले.
आमच्या शालेय काळात मराठी चित्रपटातलं एक गाणं खूप गाजलं होतं, ‘कोण होतास तू? काय झालास तू?’ प्रत्येक सहलीला त्याच्या मूळ शब्दांत फेरफार करून मुलगे विरुद्ध मुली अशा सवाल-जवाबांना ऊत यायचा. आजच्या जगात वावरताना मात्र काही घटनांचे असे अनुभव येतात, की मला स्त्रियांना उद्देशून असं विचारावंसं वाटतं, ‘कोण होतीस तू काय झालीस तू.’
काही दिवसांपूर्वी आमच्या रुग्णालयात तिशीचा एक तरुण बेगॉन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने दाखल केला गेला. त्याची अवस्था चिंताजनक होती. पण सुदैवाने त्याला लवकर रुग्णालयात आणल्यामुळे भराभर उपचार करता आले व तो वाचला. नंतर या घटनेविषयी थोडे खोलात गेल्यावर मला कळले, तो इंजिनीअर होता व एका कंपनीत साधारण ४५-५० हजार रुपये पगार मिळवत होता. त्याचा पगार  ‘अपुरा’ आहे अशी त्याच्या बायकोची कायमची तक्रार होती व त्यावरून दोघांमधे नेहमी वाद होत. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा होता. बायको पदवीधर असूनही स्वत: नोकरी किंवा घरबसल्या कमाईचे काही उद्योग करायला तयार नव्हती. नवरा कमी कमावतो या कारणावरून ती एके दिवशी चक्क मुलाला घेऊन कायमचं घर सोडून निघून गेली. त्यानंतर नवऱ्याने महिनाभर वारंवार फोन करूनही ती परत आली नाही व त्याला मुलाशी बोलण्यास तिने मज्जाव केला. हे सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. त्याला घरी सोडताना मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलले तेव्हा कळलं, की त्याच्या संसारात तो पूर्ण समाधानी होता. त्याचं बायकोवर, मुलावर जिवापाड प्रेम होतं. तिच्या राहणीमानाच्या अपेक्षा प्रचंड होत्या, काही तर अवाजवी होत्या. आíथक मंदीच्या काळात वारंवार नोकरी बदलणं त्याला योग्य वाटत नव्हतं. अशा वेळी बायकोची समजूतदार, समाधानी वृत्ती त्याला किती ताकद देऊन गेली असती! अन्य काही जबाबदारी नसताना तीन जणांच्या कुटुंबाला हा पगार खरंच कमी होता का; ज्यासाठी आयुष्याच्या जोडीदाराबरोबर कायमचे संबंध तोडावेत? स्वत:ची स्वप्ने पुरी करायला स्वत:च्या शिक्षणाचा उपयोग करून अर्थार्जनाचा सोयीस्कर पर्याय मुलींना शोधता येऊ नये का?
माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ मत्रिणीला तर याहून टोकाचा एक अनुभव आला. सत्तावीस वर्षीय तरुणी लग्नानंतर पहिल्या वर्षांत नवऱ्याबरोबर तिच्याकडे तपासायला आली. एरवी तो मुंबईला असे, मधूनअधून गावी येई. तिच्या सासरच्या सर्वाना डॉक्टर गेली २० वष्रे ओळखत होत्या. आजच्या तपासणीत तिला दिवस गेले असून गर्भ आत निर्जीव झाल्याचे त्यांनी निदान केले, काही औषधे लिहून दिली व ‘पुन्हा दिवस राहतील, काळजी करू नकोस’ असा दिलासा दिला. त्यानंतर एकदा ती तब्येत दाखवायला आली होती, पण काही दिवसांत तिने आत्महत्या केल्याची बातमी कळली. हे कुटुंब डॉक्टरांच्या जवळच राहात होते. घरच्या लोकांबद्दल काहीही संशय घेण्याजोगी परिस्थिती नव्हती. शेजाऱ्यापाजाऱ्यांना पण या घटनेचे काही कारण कळले नाही. लग्नानंतर सात वर्षांपर्यंत काहीही कारणाने विवाहितेने आत्महत्या किंवा तसा प्रयत्न केल्यास सासरचे लोक दोषी धरले जातात. या कायद्यानुसार तिच्या सासऱ्यांना तुरुंगात टाकले गेले. सर्व परिचितांना हा कायद्याचा गरवापर झाल्यासारखे वाटले. एका व्यक्तीच्या आततायीपणामुळे निरपराध कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढवू शकतो! आपल्या दु:खांचे, अडचणींचे निवारण तिला अन्य मार्गानी करता आले नसते का? काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आत्महत्येच्या प्रयत्नातून ऐंशी टक्क्यांहून अधिक भाजलेली एक विवाहित स्त्री रुग्ण म्हणून आणली होती. नंतर एका आठवडय़ात तिचा मृत्यू झाला. नवरा अतिशय कष्ट घेऊन तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा; पण या जास्त कामाच्या खटाटोपामुळे तो घरी जास्त वेळ देऊ शकत नसे. या कारणासाठी तिने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी जावयाची बाजू जाणून घेतली, स्वत:च्या हट्टी मुलीच्या चुकीच्या वागणुकीची त्यांना कल्पना होतीच; त्यांनी आपल्या धाकटय़ा मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले, जे आज २१ वष्रे छान टिकून आहे. हा आश्चर्यकारक निर्णय सासऱ्यांनी घेतला नसता, तर या जावयाला विनाकारण तुरुंगवास झाला असता. जे लोक अशा दुर्दैवी घटनांना कारणीभूत आहेत, त्यांना शिक्षा हवीच; पण जे निरपराध आहेत, त्यांच्या आयुष्याचं काय? या दोन्ही घटनांमधे मुलींची लग्नामधून अपेक्षा काय होती, जुळवून घेण्याची तयारी किती होती; इतर कुटुंबीयांशी सुसंवाद होता की नाही; हे सर्व समुपदेशकाच्या साहाय्याने पडताळून त्यावर उपाय करता आले असते. त्यासाठी जीवन संपवण्याचे जे निर्णय घेतले गेले; ते सर्वासाठीच त्रासदायक होते.
‘डॉक्टरांच्या जगात’ वावरताना काही सरकारी रुग्णालयाच्या प्रसूतिकक्षात प्राणांतिक यातना भोगणाऱ्या स्त्रियांना -स्त्री कर्मचाऱ्यांकडून इतकी हीनतेची वागणूक दिली जाते, की कोणत्याही सुज्ञ, संवेदनशील स्त्रीला आíथक कमजोरीमुळेदेखील तिथे प्रसूती करून घेणे लाजिरवाणे, अपराधी वाटेल. अशा रुग्णालयातील एका दिवसागणिक होणाऱ्या प्रसूतींची प्रचंड संख्या बघता मला कर्मचाऱ्यांची दमणूक समजू शकते; पण कामाची वेळही आठ तासांचीच असते. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या इतक्या विकल अवस्थेतही तिला स्वच्छ करून दुसरे कपडे देण्यात अर्वाच्य बोलू कशी शकते, अशोभनीय वागू कशी शकते? निदर्शनाला आल्यास आम्हा डॉक्टरांना हे जातीने लक्ष देऊन थांबवावं लागतं. तीच गोष्ट रुग्णाला शस्त्रक्रियागृहातून बाहेर आणतानाची. रुग्णाचे कपडे ठाकठीक केल्याशिवाय दार उघडू नये, हे स्त्री कर्मचाऱ्यांनासुद्धा शिकवावे लागते. एका स्त्रीला जर दुसऱ्या स्त्रीच्या शारीरिक लज्जेविषयी अनास्था असेल; तर इतरांकडून आदरभावाची काय अपेक्षा करायची? ‘त्या जागी आपण असतो, तर आपल्याला काय वाटलं असतं?’ हा विचार मनाला शिवत कसा नाही?
परवा माझ्या एका स्त्री रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेहोशीच्या इंजेक्शनांचा अंमल येत नव्हता. भूलतज्ज्ञांनी पुन्हा वाढवून डोस दिले; पण शस्त्रक्रियेच्या मध्यावर ती पुन्हा हलू लागली. पुन्हा डोस दिले गेले व ती शस्त्रक्रिया मी भराभर पूर्ण केली. ती दारू पीत असावी असा संशय भूलतज्ज्ञाने व्यक्त केला, कारण बेहोश होण्यासाठी लागलेले डोस नेहमीपेक्षा फार जास्त होते. मी संध्याकाळी तिला हा प्रश्न अंदाज घेत घेत विचारला, त्यावर तिने तात्काळ होकारार्थी उत्तर दिले. ‘अगं तू आधी का सांगितलं नाहीस?’ या माझ्या प्रश्नावर ती उत्तरली, ‘कारण तुम्ही मला याआधी हा प्रश्न कधी विचारलाच नाहीत. ‘यापुढे दारू, धूम्रपानाविषयी स्त्रियांनापण प्रश्न विचारायचे’, हा नवीन धडा मी यानिमित्ताने शिकले.
माझ्या घराजवळ सध्या माहिती तंत्रज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नवरा-बायको राहायला आले आहेत. लग्नाला पाच वष्रे झाली तरी मूलबाळ नाही, यासाठी त्यांनी जवळच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवले. सर्व तपासण्या नॉर्मल आल्या. दोघांचे कामानिमित्त घराबाहेर असण्याचे १४-१६ तास बघितले, तर वाटतं, ‘यांना एकमेकांना देण्यासाठी वेळ तरी आहे का? तासंतास काम करून मिळवलेला गलेलठ्ठ पगार, आलिशान घर, गाडय़ा  हे तर वयाच्या पस्तिशीतच मिळतं, पण एकमेकांसाठी देण्याचा वेळ कुठून आणायचा? मग ‘घर’ चालवण्यासाठी करियरमधे तडजोड कोणी करायची? तिने का त्याने? घरासाठी, त्यानंतर मुलांसाठी पसे, श्रम, वेळ, आस्था या साऱ्याची गुंतवणूक करायला आजची शिक्षित स्त्री तयार आहे का? किंवा हे करण्यासाठी करियरमधे तडजोड करण्याची जर नवऱ्याने तयारी दाखवली, तर ते स्वीकारण्याची, त्याला एक व्यक्ती म्हणून-पूर्वीइतकाच मान, प्रेम देण्याची तिची मानसिक तयारी आहे का? एकीकडे घरकाम, बालसंगोपनात पुरुषांनी समान वाटा उचलावा अशी रास्त अपेक्षा ती करते, तर दुसरीकडे शिकलेली, अर्थार्जन करणारी स्त्री लग्नाच्या वेळी पहिल्या दिवसापासूनच- आíथकदृष्टय़ा पूर्ण स्थिर व परिपूर्ण वस्तूंनी घर सुसज्ज केलेला मुलगा नवरा म्हणून हवा असा हट्ट धरते. मग स्वकर्तृत्वावर व अर्थार्जनावर विश्वास ठेवून ‘घर’ दोघांनी मिळून हळूहळू मोठं करू, सजवू; असा विचार ती का करत नाही? किती उच्चशिक्षित मुली लग्नसोहळ्याच्या अवाजवी खर्चाला, भरमसाट दागिन्यांच्या मोहाला आळा घालतात? असे प्रश्न मनाला त्रास देऊ लागले आहेत.
एरवी स्त्रीविषयक अन्यायाच्या सत्यकथा लिहिताना नाण्याची ही दुसरी बाजू मांडणंही आवश्यक आहे; नाही तर ते लिखाण अर्धसत्यच राहील. लंबकाचा लोलक स्त्री दुय्यमतेकडून निघून स्त्री-पुरुष समानतेवर आंदोलित न राहता पुढे स्त्री बेदरकारीकडे झुकत जाईल का? या घटनांचे प्रमाण जरी कमी असले, तरी गरज आहे एका आरशाची-आत्मभानाची, स्वपरीक्षणाची! नक्की आपल्याला खूप शिकून, पसे मिळवून हेच हवं होतं का? खूप पसे मिळवण्यालाच आपण सुख समजतो आहे का? थोडा विचार करू या!                                                           
vrdandawate@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2013 1:01 am

Web Title: smoking and ladies
Next Stories
1 बँकिंग क्षेत्रातली स्त्रीशक्ती
2 ‘कोई लौटा दे मेरे.. ’
3 प्रश्नांकित उत्तरायण
Just Now!
X