News Flash

एस.एन.डी.टी. एक अश्वत्थ!

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर समाजसुधारकाने जुल १९१६ मध्ये रोवलेल्या शिक्षणरूपी बीजाचा आता महावृक्ष झाला आहे, अश्वत्थाप्रमाणे लक्षावधी स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश

| July 26, 2014 03:30 am

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर समाजसुधारकाने जुल १९१६ मध्ये रोवलेल्या  शिक्षणरूपी बीजाचा आता महावृक्ष झाला आहे, अश्वत्थाप्रमाणे लक्षावधी स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पोहोचला आहे. उच्च आणि व्यावहारिक शिक्षण देऊन स्त्रीला आत्मनिर्भर करणाऱ्या त्या वेळच्या ‘भारतवर्षीय महिला विद्यापीठ’ आणि आत्ताच्या श्रीम. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पूर्वशताब्दी स्थापना दिनाच्या निमित्ताने खास लेख.

डॉ. कविता इनामदार (ज्यांच्या नावावर २५० फॉम्र्युलेशन्स,२७ एएनडीज्, ५० ईयू डॉसियर्स, ५०० इतर डॉसियर्स आहेत), डॉ. गीता यादव (हिंदी भाषेतील विद्यावाचस्पती पदवी, तरीही वेटलिफ्टिंगमध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर रौप्य पदकाची मानकरी), संगीता धायगुडे (वसई-विरार क्षेत्रीय उपायुक्त),      राजश्री शिर्के (राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा नृत्य क्षेत्रातील पुरस्कार मिळविणाऱ्या, कथ्थक आणि भरतनाटयम् नृत्य शैलींचा मेळ साधणाऱ्या व लास्य अकादमीच्या सर्वेसर्वा), पंडिता शुभदा पराडकर (आपल्या शास्त्रशुद्ध अभिजात गायकीचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या पंडिता) या सर्वामध्ये साम्य एकच. त्या सर्व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत. माजी विद्यार्थिनी.
५ जुल २०१४ रोजी पाटकर सभागृहात साजरा झालेल्या ९९व्या (पूर्वशताब्दी) स्थापना दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाने या पाच तेजस्वी शलाकांचा गौरव केला गेला. त्या सर्वाचे मनोगत ऐकताना सर्व प्रेक्षकवर्गाचे मन हेलावले, डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. समस्यांवर मात करून, परिश्रमपूर्वक आपले ध्येय, श्रेय गाठताना या पहिल्या महिला विद्यापीठाचे त्यांच्या जीवनातील महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. श्रीम. ना.दा.ठा.(एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या लक्षावधी स्नातकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या पाच स्त्रिया.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर समाजसुधारकाने जुल १९१६ मध्ये लावलेल्या या बीजाचा आता महावृक्ष झाला आहे, अश्वत्थाप्रमाणे लक्षावधी स्त्रियांच्या जीवनात शीतलता आणली आहे. डिसेंबर १९१५ मध्ये महर्षीनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. जपानमध्ये १९०० साली स्थापन झालेल्या आणि अतिशय वेगाने वाटचाल करीत असणाऱ्या महिला विद्यापीठाच्या माहितीमुळे महर्षी अतिशय प्रभावित झाले होते. त्यांनी या भाषणात प्रस्तावित महिला विद्यापीठासाठी चार महत्त्वाची प्रमेये मांडली.
१. आपण जबाबदार व्यक्ती आहोत ही भावना व आपल्या सामर्थ्यांविषयी आत्मविश्वास ज्यायोगे उत्पन्न होईल असे पुरुषसामान्य शिक्षण स्त्रियांना देणे.
२. आपल्या देहाचे घटक ज्याप्रमाणे भिन्न भिन्न पेशी, त्याप्रमाणे समाज किंवा राष्ट्ररूप देहाचे घटक जी कुटुंबे ती जोमदार व मनोहर बनविणे, हे मुख्यत: कुटुंबाच्या सूत्रधार ज्या स्त्रिया त्यांच्यावर अवलंबून आहे. तसे सामथ्र्य ज्या शिक्षणाच्या योगाने स्त्रियांमध्ये उत्पन्न होईल असे शिक्षण त्यांना देणे.
३. आपण राष्ट्राचा घटक आहोत ही भावना ज्या शिक्षणाने उत्पन्न होईल, असे शिक्षण स्त्रियांना देणे.
४. स्त्रियांनी अमुक करावे किंवा तमुक करू नये अशा रीतीचे कायद्याने किंवा समाजाने घातलेले र्निबध काढून टाकले पाहिजेत. कोणत्याही स्त्रीला अमुक विद्या आपण शिकावी किंवा अमुक उद्योग आपण करावा असे वाटेल तर कायद्याची अगर समाजाची बंधने तिच्या मार्गात आडवी येऊ नयेत. (आत्मवृत्त, १९५८)
   महर्षीनी १९१५ साली मांडलेली स्त्री शिक्षणविषयक प्रमेये आजच्या एकविसाच्या शतकातील भारतीय स्त्री शिक्षणालाही तितक्याच प्रखरतेने लागू पडतात. ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली, परंतु पाच विद्याíथनींचा पहिला वर्ग मात्र ५ जुल १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या खऱ्या कामाला आरंभ झाला (आत्मवृत्त). महर्षीच्या द्रष्टेपणाची महती अशी की, ज्या काळी स्त्री साक्षरतेचा दर  १.८१ टक्के होता, त्या गहिऱ्या अंधाराच्या काळात त्यांनी स्त्रियांना उच्चशिक्षणाची दारे खुली केली. १९१६ साली स्थापन झालेले हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ ५  जुल २०१५ या दिवशी शतसांवत्सरिक वर्षांत पदार्पण करील. या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या विद्यापीठाने खूप मोठी झेप घेतली आहे, लक्षावधी स्त्रियांचे जीवन उजळले आहे, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी साथ दिली आहे, उंच आकाशात भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले आहे.
  महर्षीच्या या मोलाच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याने प्रभावित होऊन सर विठ्ठलदास ठाकरसी या उदारमनस्क उद्योगपतींनी १५ लाख रुपयांची मोठी देणगी दिली आणि स्त्री शिक्षणाच्या कार्याला वेगाने चालना मिळाली.
महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू अशा भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या महनीय व्यक्ती विद्यापीठाच्या विसाव्या पदवीदान समारंभास आवर्जून उपस्थित होत्या. यातच त्यांना महिलांच्या उच्च शिक्षणाच्या प्रति असलेली कळकळ दिसून येते. आज एसएनडीटी महिला विद्यापीठ आपल्या तीन प्रांगणांतून (चर्चगेट, जुहू आणि पुणे) महिला शिक्षणाचे कार्य पुढे नेत आहे.
३९ पदव्युत्तर विभाग, १३ संस्था, ४ सेंटर्स आणि सात राज्यांतील १७४ संलग्नित महाविद्यालये यांच्यामार्फत २२८ अभ्यासक्रम आज या विद्यापीठांतून स्त्रियांना उपलब्ध आहेत. गृहविज्ञान या महत्त्वाच्या विद्याशाखेपासून सुरुवात करून आज विद्यापीठाच्या १२ विद्याशाखा  (आर्टस्, फाइन आर्टस्, कॉमर्स, सायन्स, सोशल सायन्स, एज्युकेशन, होम सायन्स, लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, लॉ अॅण्ड सोशल वर्क) नवनवीन अभ्यासक्रम आखून एकविसाव्या शतकातील स्त्री समाजाच्या शिक्षणविषयक गरजा पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.
 महिला विद्यापीठाची वैशिष्टय़े
भारतातील या महिला विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी पहिली नवीन पायवाट निर्माण केली, आज तिचा राजमार्ग झाला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रात आज दूरस्थ आणि मुक्त  शिक्षणाची संकल्पना रुजली आहे. महर्षीनी महिलांच्या महाविद्यालयात येण्यावर बंधने असतील हे ओळखून त्याकाळी स्वयंअध्ययनाचा पर्याय आपल्या विद्यापीठात उपलब्ध करून दिला. विद्याíथनी अभ्यासक्रम स्वत: अभ्यासून परीक्षेस बसत. विद्यापीठाने स्त्रियांची गरज ओळखून अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रेही सुरू केली. आज विद्यापीठाचे दूरस्थ शिक्षण केंद्र हजारो विद्याíथनींना २८ पदवी/पदविका अभ्यासक्रम देत आहे. केवळ छापील स्वयंअध्ययन साहित्यावरच भर न देता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून Video lectures, Internet Radio, Online learning  यांच्या माध्यमातून विद्यार्थिंनींपर्यंत गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
पायाभूत अभ्यासक्रम (Foundation Courses)
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात पायाभूत अभ्यास विषय शिकवले जातात. यातील पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आहे. परंतु विद्यापीठाने स्त्रियांना त्यांचे समाजातील, जगातील स्थान, स्त्रीविषयक महत्त्वाचे प्रश्न, नवनवीन वैश्विक करारांचा स्त्रियांवर होणारा परिणाम आणि अशा स्त्री जीवनावर, समाज जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्याच्या दृष्टीने पायाभूत अभ्यासक्रमाची आखणी करून त्यांना सजग बनविण्याचे कार्य केले आहे.
तिसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे माध्यमभाषा. महर्षीनी मातृभाषा ही बोध-भाषा (Medium of Instruction) मानली. त्यामुळे इथे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा अनेक भाषांतून अभ्यासक्रम देण्यात येऊ लागले. मात्र महर्षीनी इंग्रजी हा विषय ‘आवश्यक’ विषय मानून अभ्यासक्रमात ठेवला होता, ते त्या काळी अनेकांना रुचले नव्हते. इंग्रजी हा आवश्यक विषय का ठेवला, याबद्दलची महर्षीची मते अगदी स्पष्ट होती. ते म्हणतात, ‘‘त्या वेळी माध्यमिक शिक्षणात देखील कोणताही विषय शिकताना इंग्रजीचा उपयोग आवश्यक होता. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्याíथनींना ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले पाहिजेत. इंग्रजी भाषा ही अध्र्या जगाची भाषा झाली आहे. कोणत्याही विषयाचे विशेष ज्ञान करून घ्यावयाचे असले अगर कोणत्याही गोष्टीची विशेष माहिती पाहिजे असेल तर ती आज इंग्रजीच्या ज्ञानावाचून होणे शक्य नाही.’’महर्षीचे हे विचार आजच्या जगात तर किती तरी चपखल वाटतात. आज विद्यापीठात अनेक बोधभाषा वापरल्या जात असल्या तरीही इंग्रजी ‘अनिवार्य’ विषय आहे.
भारतभरात संलग्नित महाविद्यालये हे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्टय़. १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना ‘भारतवर्षीय महिला विद्यापीठ’ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटि) या नावाने झाली, कारण महर्षीच्या अनेक सुहृदांना हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्राचे न राहता त्याला व्यापक स्वरूप द्यावे असे वाटत होते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बाहेरही काही संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यात आली.
  विद्यापीठाचे नाव श्रीम. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ असे झाले. त्यानंतर १९५१ मध्ये महाराष्ट्र सरकारची विद्यापीठाला मान्यता मिळाली तरीही विद्यापीठाची ही व्यापकता कायम राहिली. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्र. १०५) केवळ श्रीम. ना.दा.ठा. महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मात्र काही जिल्ह्य़ांपुरतेच मर्यादित असते.
निरंतर शिक्षण प्रक्रिया
मानव समाजासाठी अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे आपण या ज्ञानयुगात पदोपदी अनुभवत आहोत. महिला विद्यापीठाने हे १९७० सालीच ध्यानात घेऊन निरंतर शिक्षण विभागाची स्थापना केली, त्याला भारत सरकारचेही पाठबळ मिळाले. गेल्या ४ दशकांत या केंद्राने लाखो स्त्रियांना निरंतर शिक्षणाचा वसा आपला ‘कौशल्य विकास आणि अर्थोत्पादन शिक्षण’ या (Skill development & Income Generating activities)   कार्यक्रमांतर्गत दिला. आजही या विभागातर्फे स्त्रियांसाठी जवळ जवळ १०० विविध अभ्यासक्रम दिले जातात.
एकविसाव्या शतकातील स्त्रीला स्वत:चा मार्ग आखण्यासाठी, त्या मार्गावर चालण्यासाठी तसेच त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी महिला विद्यापीठ कायम सजग आहे. शतक महोत्सवानिमित्त अनेक नवीन प्रकल्पांचे आयोजन होत आहे. विद्यार्थिंनींना अध्ययन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानकेंद्राची (Knowledge Centre) स्थापना, विज्ञान संस्था (Institute of Science, डिझाइन संस्था, (Institute of Design) जनसंपर्क आणि माध्यम अभ्यास संस्था ((Institute of Mass Communication & Media Studies) अशासारख्या नवीन संस्थांची स्थापना, तसेच ई-लर्निंग सेंटर, मध्यवर्ती यंत्रसामग्री साहाय्यता(Central equipment  facility) संशोधन संस्था (Advance Research Institute)    अशा  स्वरूपात विद्यापीठीय शिक्षक वर्गाला, विद्यार्थिनींना, अध्यापन अध्ययनात साहाय्य करण्याचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.
इनक्युबेशन केंद्र  
पदवी घेतल्यानंतर विद्यार्थिनींनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करावा हा विचार आजच्या काळात प्रकर्षांने समोर येतो. व्यवस्थापनशास्त्र (Management), तंत्रज्ञान Technology), संगणकशास्त्र  (Computer Science) या क्षेत्रांत पदवी घेणाऱ्या विद्याíथनींसाठी इनक्युबेशन केंद्र सुरू करणे तुलनेत प्रचलित आहे. परंतु याबरोबर सामाजिकशास्त्रे (Social Science), समाजकार्य (Social Work), तसेच गृहविज्ञान क्षेत्रात पदवी घेणाऱ्या विद्याíथनींसाठी विद्यापीठ इनक्युबेशन केंद्र सुरू करीत आहे.
१९५८ मध्ये महर्षीच्या स्त्री शिक्षणाच्या युगप्रवर्तक कार्याबद्दल भारत सरकारने महर्षीच्या शंभराव्या वाढदिवशी त्यांना ‘भारत रत्न’ ही सर्वोच्च पदवी देऊन गौरव केला.
श्रीम. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाने ९९ वर्षांत पदार्पण केले आहे. अश्वत्थाच्या पारंब्या जशा मूळ वृक्षाला सशक्त ठेवतात, कार्यक्षम ठेवतात, तद्वतच या विद्यापीठरूपी अश्वत्थाच्या लक्षावधी पारंब्या म्हणजेच माजी विद्याíथनी जगाच्या नकाशावर आपली मोहोर उमटवून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. या महिला विद्यापीठाची माजी विद्यार्थिंनी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:30 am

Web Title: sndt women university role in women education
Next Stories
1 स्कूल चले हम ..
2 देता मातीला आकार : मदर
3 मदतीचा हात : रुग्णसेवक
Just Now!
X