29 March 2020

News Flash

गद्धेपंचविशी : आयुष्याच्या टोलेजंग इमारतीचा पाया

विशी ते तिशी हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. स्नेहलता देशमुख

वयाच्या विशी ते तिशीमध्ये मनाचं दार उघडं ठेवलं आणि मनाचा पाया भक्कम केला, म्हणूनच आज ८१ वर्षांची झाले तरी आनंदाचे जीवन जगते आहे. डॉक्टर होण्याचा निर्णय घेणे, स्त्री असल्याने सर्जरी करायला सुरुवातीला नकार मिळणे, पण निराश न होता काम करत राहणे, यामुळे त्यातील समाधानही अनुभवता आलं. या दरम्यान, चांगले शिक्षक मिळाले, त्यांनी दिलेले मंत्र आचरणात आणत गेले. डॉक्टर, सर्जन, रुग्णालयाची डीन आणि नंतर मुंबई विद्यापीठाची कुलगुरू या माझ्या आयुष्याच्या टोलेजंग इमारतीचा पाया घातला गेला तो माझ्या विशी ते तिशी या महत्त्वाच्या टप्प्याने..

विशी ते तिशी हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नुकताच तारुण्यात प्रवेश झालेला असतो, उत्साह भरपूर असतो, मित्रमत्रिणींमध्ये रमण्याचे हे दिवस, उंच उंच झोका घेण्याचे दिवस, स्वप्ने पाहाण्याचे आणि ती साकार करण्याचे, मनाच्या हिंदोळ्यावर बसून स्वप्नपूर्ती करण्याचे दिवस, आपण कुणाला आवडतो आहोत, यातच धन्यता मानायचे आणि त्याचबरोबर आपल्या मनासारखा जोडीदार मिळवण्याचे दिवस. पुढच्या आयुष्यात यशप्राप्तीसाठी मेहनत करण्याचे. नवीन उपक्रम राबवण्याचे, शक्ती, युक्ती आणि भक्ती यांची सांगड घालून कवींनी म्हटल्याप्रमाणे ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ असेच हे दिवस!

माझ्याही जीवनात असंच काहीसं घडलं. जन्म ३० डिसेंबर १९३८ चा. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले आणि ‘पहिली बेटी धनाची पेटी’ या म्हणीप्रमाणे वडिलांचा उत्कर्ष झाला. वडील डॉ. श्रीकृष्ण जोगळेकर के.ई.एम. रुग्णालयात काम करीत. त्यावेळची त्यांची वागणूक, कामाचा उरक व सचोटी पाहून त्यांना सायन रुग्णालयाचा कार्यभार सांभाळण्यासाठी बढती मिळाली. सायन रुग्णालय हे मिलिटरीच्या बॅरॅक्समध्ये होते. आजूबाजूला रानच होते. वडिलांनी ती जबाबदारी उत्तम पार पाडली आणि माझी डॉक्टर होण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. माझे शालेय शिक्षण ‘आय.ई.एस. गर्ल्स स्कूल’मध्ये झाले. मी एक साधारण क्षमता असणारी विद्यार्थिनी होते. मेहनत खूप केली आणि आजोबांच्या पुढाकारामुळे संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवले. जेमतेम ६२ टक्के मार्कस् मिळवून मी मॅट्रिक झाले व रुईया महाविद्यालयात सायन्स शाखेला प्रवेश घेतला. डॉक्टर होण्याकरता इंटर सायन्सला ६५-७० टक्के गुण असावे लागत. परंतु मला यश मिळाले नाही म्हणून नाराज झाले. मुंबईत अ‍ॅडमिशन मिळणार नाही, परंतु महाराष्ट्रात मिळेल याकरता मी बाहेरही अर्ज केले. आजोबा कर्मठ होते. मी माझ्या नातीला बाहेर पाठवणार नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. म्हणून मी बी.एस्सी.ला रुईयामध्येच अ‍ॅडमिशन घेतली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. दोन महिन्यांतच जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये दोन जागा रिक्त झाल्या आणि माझा नंबर तिथे लागला. आनंदाला उधाण आले आणि तीन महिन्यांत मी जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. डॉ. मंदा परचुरे ही माझ्याबरोबरच प्रवेश मिळालेली मुलगी माझी जिवलग मत्रीण झाली आणि अजूनही ते नाते टिकून आहे. याचे सगळे श्रेय मंदालाच जाते.

एकूण मेडिकलचे शिक्षण साडेचार वर्षांचे आणि एक वर्ष इंटर्नशिप म्हणजे साडेपाच वर्षे.

मी १९६० मध्ये डॉक्टर झाले आणि आमच्या कुटुंबात वर संशोधनाची मला चाहूल लागली. परंतु मला तर पुढे शिकून सर्जन व्हायचे होते. मी सर्जरीचा अभ्यास जास्त करून कॉलेजमध्ये त्या विषयात पहिला क्रमांक मिळवला आणि टाटा मेमोरिअल रुग्णालयात ‘हाऊसमन’ म्हणून फॉर्म भरला. मात्र तेव्हाच्या डीननी मी मुलगी असल्याचे कारण सांगून ‘टाटा’मध्ये पोस्ट देण्यास नकार दिला. मला खूप वाईट वाटले. मी डीनना म्हटले, ‘‘मला ही पोस्ट मिळावी म्हणून मी प्रयत्न केले आहेत. मला गुणही चांगले मिळाले आहेत.’’ परंतु मला ही पोस्ट देण्याबद्दल त्यांनी असमर्थता व्यक्त केली आणि ‘आम्ही स्त्रियांना सर्जरीची पोस्ट देऊ शकत नाही. कारण आमच्या रुग्णालयात स्त्रियांकरता हॉस्टेल नाही आणि डॉक्टर २४ तास उपलब्ध हवेत म्हणून आम्ही स्त्रियांना पोस्ट देऊ शकत नाही,’ असे कारणही सांगितले. मी डॉक्टर होताना स्त्री आणि पुरुष असा विचारच केला नव्हता. त्यामुळे हा धक्का सहन करून त्यातून बाहेर यायला वेळ लागला. पण आईने समजावले व ती म्हणाली, ‘जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या मोलाचं.’ उच्च गगनाकडेच पाहू नकोस, त्या धरित्रीकडे बघ आणि काम चालू कर. नक्की यशस्वी होशील. आईच्या सल्ल्याने धीर आला. के.ई.एम.मध्ये काम चालू केलं. ३ वर्षांनी एम.एस.ची परीक्षा दिली. पहिल्याच परीक्षेत उत्तम पास झाले. माझ्या आयुष्यातल्या विशी ते तिशी या टप्प्यातला हा महत्त्वाचा निर्णय होता, मीच माझ्यासाठी घेतलेला. नकार मिळाला तरी त्याने निराश न होता जे हातात आहे, ती उत्तम रीतीने पार पाडण्याचं ठरवलं. हा निर्णय किती योग्य होता ते काळाच्या पुढच्या टप्प्यात मला सर्जरीचे काम करायला मिळाल्यानंतर लक्षात आले.

पण एम. एस. होण्याआधीच माझ्या आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा मी ओलांडला होता. लग्नाचा! डॉ. शामराव देशमुख यांच्याशी माझा विवाह झाला होता. लग्नानंतर अभ्यास करणे आणि डय़ुटी करणे अशा दोन्ही आघाडय़ा सांभाळताना थोडे कठीण गेले. पण तोही माझ्यासाठी धडाच होता. आयुष्यात आपण अधिकाधिक खंबीर होत जातो त्यासाठी योग्य वेळी असे टप्पे येणंही आवश्यक असतंच. आपण सारं निभावून नेतोच. चांगली गोष्ट म्हणजे सासरची माणसेही समजून घेणारी होती. मुख्य म्हणजे डॉ. शामराव प्रगतशील होते. शिवाय आईचा खंबीर आधार होताच.

पण आणखी एक अडचणीची गोष्ट याच काळात सामोरी आली. मी सर्जन तर झाले, पण  पुरुष रुग्ण माझ्याकडून तपासून घ्यायला तयार नसत. याचा कमीपणा वाटून दुख होई. मी जिद्दीने काम करीत होते. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जायचे हे माझे ध्येय. तेव्हा आई संस्कृत सुभाषित ऐकवत असे. ‘उद्यमं साहसं धर्य बुद्धि शक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तते तत्र देवाही सहाय्यकृत.’ ‘सतत धर्याने वाग, उद्यमशील हो, साहस कर, धीर धर, बुद्धीचा वापर कर, शरीर शक्तिमान असू दे आणि पराक्रमी हो.’ मी तसंच केलं. धर्याने पुढे गेले. दरम्यान,  नवजात बालकाचे व्यंग शस्त्रक्रियेद्वारा दुरुस्त करून त्यांचं आयुष्य सुसह्य़ करणारे दोन सर्जन मला भेटले आणि माझ्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. मला वाटू लागले, या शस्त्रक्रियेत जर मी पारंगत झाले तर मलाच नाही तर या नवजात बालकांना त्याचा फायदा होईल. डॉ.आर. के. गांधी आणि डॉ. सुभाष दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी शस्त्रक्रिया करू लागले. माझे पहिले गुरू डॉ. प्रफुल्लकुमार सेन ह्रदय शल्यविशारद होते. त्यांच्याकडून सर्जरीचा श्रीगणेशा मी गिरवला. डॉ. सेन हे नुसतेच सर्जन नव्हते तर त्यांनी पेंटिगमध्येसुद्धा नाव कमावले होते. रवींद्रनाथ टागोरांच्या गोष्टी ते आम्हाला ऑपरेशन करता करता सांगत असत. माझे दुसरे शिक्षक म्हणजे डॉ.आर्थर डिसा. त्यांच्याकडून मी शिकले, कसे वागावे, विद्यार्थ्यांना कसे शिकवावे. ‘इंडियन जर्नल ऑफ सर्जरी’ची एडिटोरिअल सेक्रेटरी झाले आणि मोठय़ा आत्मविश्वासाने पहिले पत्र डॉ. डिसांकडे घेऊन गेले. छानसं हसून त्यांनी पत्र वाचले आणि म्हणाले, ‘‘चांगलं लिहिले आहेस. मी थोडय़ा सुधारणा सुचवू का?’’ मी लगेच खूश होऊन म्हटलं, ‘‘सर तो तुमचा अधिकारच आहे.’’ सरांनी पहिल्या मायन्यापासून शेवटच्या शब्दापर्यंत जवळजवळ सगळेच शब्द बदलले आणि म्हणाले,‘‘थोडे बदल सुचवले आहेत. काम करत राहा आणि यशस्वी हो.’’ हा त्यांनी दिलेला धडा मी कधीच विसरणार नाही.

डॉ.आर. ए. भालेराव, प्रचंड अभ्यासू व्यक्ती, एकपाठी. संदर्भ त्यांच्या अगदी जिभेवरच असत. सुश्रुत चरकापासून ते इंग्लंड-अमेरिकेतल्या सर्जनापर्यंत अनेकांच्या गोष्टी ते आम्हाला शिकवीत. त्या माझ्या शिक्षकाने शिकवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेला संदेश. ‘रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला आपलेसे करून घ्या. त्याला त्याच्या नावाने संबोधित करा, बेड नंबरने नाही. त्याला जगण्याची उमेद द्या. जगणं मरणं यात एका श्वासाचे अंतर असतं.  शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यावर उपचार कराच, पण मायेचा आधार जरूर द्या आणि हात देऊन लढ म्हणा.’ त्यांनी सांगितलेला हा मंत्र आजही मी तंतोतंत आचरणात आणते.

आणखी दोन अनुभव मनात घट्ट रुतून आहेत. राजकारणी असले तरी माणुसकी जगणारे, मनोहर जोशी आणि शरद पवार यांचे अनुभव. मुंबईचे तत्कालीन महापौर मनोहर जोशींचा पुतण्या आमच्या के.ई.एम. रुग्णालयात दाखल झाला होता. अत्यवस्थ होता. डोक्याला मार लागला होता. ४२ दिवस तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होता. रोज न चुकता मनोहर जोशी फोन करीत व त्याच्या तब्येतीची चौकशी करीत असत. फक्त म्हणत, ‘‘डॉक्टर तुम्ही तुमचे आटोकाट प्रयत्न करता आहात, मी तुमच्या प्रयत्नांना यश येऊ दे, अशी प्रार्थना करतो.’’  त्यावेळी आमच्याकडे सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. अशा सुविधा नव्हत्या. परंतु औषधे, इंजेक्शने आणि नìसग केअर सगळं व्यवस्थित केलं आणि ४२ व्या दिवशी हा मुलगा शुद्धीवर आला व ६० व्या दिवशी आपल्या पायांनी चालत घरी गेला. त्यावेळी सरांना व आम्हाला झालेला आनंद काय सांगावा? दोन दिवसांनी सरांनी मला बोलावून, ‘‘तुम्हाला मी काय देऊ?’’ असे विचारले.  मी त्यांना म्हटले, ‘‘आम्हा डॉक्टर लोकांना दुसरं काय हवं असणार? आम्हाला रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी अत्याधुनिक सुसज्ज इन्टेन्सिव्ह केअर युनिटची आवश्यकता आहे.’’ त्यांनी खर्च विचारला. मी म्हटलं, ‘‘साधारण २५ लाख रुपये खर्च येईल.’’ दुसऱ्याच दिवशी महापौर निधीतून आमच्या रुग्णालयाला ३० लाख रुपयांचा धनादेश मिळाला आणि वर्षभरातच इन्टेन्सिव्ह केअर युनिटची सुविधा मिळून अनेक बालकांचे प्राण वाचवता आले.

शरद पवारजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी सायन रुग्णालयाची डीन होते आणि त्याचवेळी १९९३ चा बॉम्बस्फोट झाला. मुख्यमंत्री शरद पवार जखमींना भेट देण्यासाठी आले आणि राऊंड घेता घेता मला म्हणाले, ‘‘आज मला रक्तदान करायचे आहे. मी रक्तदान केले तर अनेक लोक रक्तदान करतील आणि तुमच्या ब्लड बँकेला रक्ताची कमतरता पडणार नाही.’’ त्यांचे शब्द खरे झाले. एकाच दिवशी ७०० बाटल्या रक्त जमा झाले आणि रुग्णांना त्याचा खूप उपयोग झाला.

आमचे आयुक्त शरद काळे, सीताराम कुंटे आणि बी.जी. देशमुख व मादुस्कर यांच्याकडून मी व्यवस्थापनाचे धडे घेतले. लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन येथे अधिष्ठात्री म्हणून ५ वर्षे काम करताना त्याचा मला खूप उपयोग झाला.  मादुस्करसर एकदा ऑफिसमध्ये आले असताना एका मृत रुग्णाचे नातेवाईक चिडून माझ्या ऑफिसमध्ये येऊन आरडाओरड करू लागले. मी त्यांची माझ्या पद्धतीने समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. पण ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. मादुस्करसर मात्र शांत बसून होते. काही वेळाने ती मंडळी ऑफिसमधून गेली. मादुस्करसरांना मी विचारले, ‘‘सर तुम्ही इतके शांत कसे राहू शकलात.’’ त्यांचे उत्तर माझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप काही शिकवून गेलं. ते म्हणाले, ‘‘मलाही राग आला होता. परंतु तो चेहऱ्यावर दिसू नये म्हणून मी काल रात्री ऐकलेला बागेश्री राग मनात घोळवत होतो.’’ शास्त्रीय संगीताचे महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, हे मी त्या दिवशी शिकले आणि ते आयुष्यभर आचरणातही आणलं.

१९९५ मध्ये माझी नेमणूक मुंबई विद्यापीठाची कुलगुरू म्हणून झाली. हा शिक्षणक्षेत्रातला एक मोठा पुरस्कारच मी मानते. त्याचबरोबर हा काटेरी मुकुट आपल्याला किती कठीण प्रसंगातून जायला लावील याची खात्री नव्हती. सायन हॉस्पिटलची डीन म्हणून माझा कार्यकाल संपायला दीड वर्ष होतं. मी आयुक्त शरद काळे यांना भेटले, तेव्हा त्यांनी मला आताच्या डीनच्या पोस्टवर ‘लीयेन’ ठेवायचा आहे का, असे विचारले असता मी दोन मिनिटे विचार केला आणि नकार दिला. कारण मला वाटत होते की, मला जर कुलगुरू म्हणून काम झेपले नाही तर पुन्हा या पोस्टवर परत येणे म्हणजे आपला कमकुवतपणा दिसेल. कुलगुरू असताना अनेक मानसिक आघात झाले, पण ‘मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन.’ हे लक्षात ठेवून काम करीत राहिले. डॉ. प्रधान, डॉ. नरेशचंद्र व डॉ. वेलिंग यांची खूप सकारात्मक मदत झाली आणि विद्यार्थ्यांकरिता नवीन कोस्रेस सुरू करता आले. बी.एम.एस. हा मिडल मॅनेजर्स कोर्स तर मुलांना उपयुक्त झाला. त्याचबरोबर मास मीडिया आणि मराठी पत्रकारिता याचाही मुलांच्या करिअरसाठी चांगला उपयोग झाला. विद्यापीठाच्या सर्टिफिकेटमध्ये वडिलांच्या बरोबर आईचेही नाव यायला हवे, असा प्रस्ताव मी माझ्या कार्यकालात अधिसभेपुढे मांडला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर मुख्यत: कुलपती पी.सी. अलेक्झांडर यांच्या पाठिंब्यामुळे प्रस्ताव पास झाला. १९९८ पासून आपल्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये आईचे नाव येऊ लागले. आईचा गौरव याहून तो काय असणार? कुलगुरूंचा काटेरी मुकुट अशा काही चांगल्या गोष्टींमुळे फारसा टोचला नाही हेही नसे थोडके. कवयित्री लता गुठे आपल्या कवितेत म्हणतात,

मना मना दार उघड, होऊ नको निराश असा

हरुन असं चालेल कसं, टाकू नको कर्तव्याचा वसा

असं हे मनाचं दार उघडलं की, सर्व अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. परंतु ते उघडण्यासाठी सजग राहून काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. मनाला जाणून घेतल्याशिवाय मनापर्यंत पोहोचता येणार नाही. मनाचं दार उघडलं की स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो हे मात्र नक्की.

असं मी वयाच्या विशी ते तिशीमध्ये मनाचं दार उघड ठेवलं आणि मनाचा पाया भक्कम केला. म्हणूनच आज ८१ वर्षांची झाले तरी आनंदाचे जीवन जगते आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माझे कुटुंबीय आणि सर्व सहकारी. मला विशी ते तिशीमध्ये कुठलेच बक्षीस किंवा पुरस्कार मिळाला नाही. पहिला पुरस्कार ४५ व्या वर्षी मिळाला, तो मेडिकल काउन्सिलचा

डॉ. बी.सी. रॉय हा मानाचा पुरस्कार आणि त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले.  तिशी ओलांडली आणि मी लिहिती झाले. आता माझी १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

विशी ते तिशी हे वय पाया मजबूत करण्याचे, आणि पाया भक्कम असला की आयुष्याची इमारत टोलेजंग उभी राहते, हे मात्र माझ्या आयुष्यातील अनुभवातून नक्की सांगू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 4:00 am

Web Title: snehlata deshmukh gadhe panchvishi chaturang abn 97
Next Stories
1 इच फॉर इक्वल २०२० : जागर समानतेचा!
2 मानवतावादी!
3 इच फॉर इक्वल२०२० : योग्य निर्णयाचं धाडस
Just Now!
X