News Flash

हिमबिबटय़ाचे संरक्षण

हिमबिबटय़ा हा मार्जार कुळातील देखणा पण अतिशय दुर्मीळ प्राणी.

|| अर्चना जगदीश

हिमबिबटय़ा हा मार्जार कुळातील देखणा पण अतिशय दुर्मीळ प्राणी. लुप्तप्राय होत चाललेल्या या प्राण्याला वाचवण्यासाठी बायराने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळते आहे. २००५-०६ मध्ये तिची ‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’च्या ‘मंगोलिया हिमबिबटय़ा संशोधन प्रकल्प’ची संचालक म्हणून नेमणूक झाली. पण मंगोलियातले प्रयत्न अधिक चांगल्या पद्धतीने करता यावेत म्हणून २००७ मध्ये तिने ‘स्नो-लेपर्ड कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यातून अनेक योजना राबविणाऱ्या आणि हिमबिबटय़ा संरक्षणासाठी मानाचा ‘गोल्डमन पर्यावरण पुरस्कार’ मिळवणाऱ्या मंगोलियाच्या बायारजर्गाल आगावांतसारीन हिच्याविषयी..

जग बदलतंय आणि इथे वावरणाऱ्या सगळ्यात बुद्धिमान प्रजातीला, म्हणजे माणसाला, इतर प्रजातींची आणि प्राण्यांची  काळजी वाटते आहे. ही काळजी फक्त प्राणी-संशोधक, पर्यावरणप्रेमी-निसर्गप्रेमी यांनाच सतावते आहे असं नाही; तर अनेकदा सर्वसामान्य जनांनाही पर्यावरणाबद्दल काळजी वाटते. म्हणूनच आज प्रत्येकाला ‘लुप्तप्राय होत जाणारे प्राणी बघायलाच हवेत’ अशा लालसेने झपाटले आहे.

इतर प्रजातींचा हक्क वगैरे गोष्टी भावुकतेने आव्हान करणाऱ्या असल्या, तरी हव्यासापायी आपण इतर सर्व प्रजातींचा अधिवास नष्ट करत चाललोय याचं भान आपल्यापैकी बहुतेकांना नाही. एखादा प्राणी पृथ्वीवरून नाहीसा होण्याच्या मार्गाने जात असेल तर सर्वप्रथम त्याचा अधिवास वाचवण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. मात्र हे समजूनही त्याऐवजी नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिक संशोधन करण्याकडेच संशोधक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांचा कल दिसतो. भारतात ऐंशीच्या दशकात सुरू झालेला व्याघ्र प्रकल्प, त्यासाठी खर्च झालेले पैसे आणि पंचवीस-तीस वर्षांनंतर आजही कमी होणारी वाघांची संख्या हे बोलकं उदाहरण आहे. परंतु काही भानावर असलेले लोक आणि स्थानिक कार्यकत्रे मात्र यापलीकडे जात त्या प्राण्याचा अधिवास वाचवण्याचा अथक प्रयत्न करत त्या प्राण्याला लुप्तप्राय यादीतून बाहेर आणतात अशी उदाहरणेदेखील आहेत. यासाठी २०१९ मध्ये हिमबिबटय़ा संरक्षणासाठी मानाचा ‘गोल्डमन पर्यावरण पुरस्कार’ मिळवणाऱ्या बायरा म्हणजे बायारजर्गाल आगावांतसारीन या मंगोलियाच्या स्त्रीचं अफलातून काम समजून घ्यायला हवं.

मध्य आणि दक्षिण आशियामधल्या अफगाणिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया, भारत, चीन, भूतान, ताजिकिस्तान, नेपाळ, पाकिस्तान आणि मंगोलिया अशा बारा देशांमध्ये हिमबिबटय़ा हा मार्जार कुळातील देखणा आणि अतिशय दुर्मीळ प्राणी आढळतो. हिमालयात हे बिबटे साधारणत: १२ ते १६ हजार फूट उंचीवर आढळतात तर मंगोलियाच्या गवताळ प्रदेशांमध्ये ३००० ते ४००० फुटांवर आढळतात. हिमबिबटय़ा हा आपल्याकडे दिग्भ्रमित करणारा प्राणी आणि ‘हिमालयातलं भूत, अदृश्य आत्मा’ म्हणून ओळखला जातो. याचं कारण म्हणजे ते त्यांच्या अतिउंचीवरच्या कोरडय़ा, थंड अधिवासातील, अतिउंचीवरच्या तपकिरी कबऱ्या गवतात बेमालूम मिसळून जातात. अगदी काही फुटांवर असले तरी लक्षात येत नाहीत. मधेच दिसतात तर अचानक पुढच्या क्षणी नाहीसे होतात. तिबेट, नेपाळ, लडाखसारख्या थंड वाळवंटी प्रदेशात राहणारे हिमबिबटे अतिउंची आणि थंड हवामानाशी मिळते-जुळते घेतात. एका हिमबिबटय़ाला साधारणत:

५० चौरस किलो मीटर ते १००० चौरस किलो मीटपर्यंतचा परिसर आवश्यक असतो. हे मुख्यत: त्यांचं भक्ष्य आणि एखाद्या परिसरातील हिमबिबटय़ांची संख्या यावर अवलंबून असतं. भरल, आयबेक्स आणि अर्गलसारखे अतिउंचीवर आढळणारे मेंढी-शेळीच्या जातीतले वन्य प्राणी हे त्यांचं मुख्य भक्ष्य.

हिमबिबटे उंच कडय़ांवर, उंचीवरच्या छोटय़ा दऱ्या आणि कुरणांमध्ये लीलया वावरतात. लांबलचक शेपूट आणि मऊ तळव्यांमुळे समतोल राखतात. बिबटय़ापेक्षा छोटा पण गुबगुबीत, पांढऱ्या कातडीवर काळे पोकळ ठिपके असलेला हिमबिबटय़ा मार्जारकुळातला सर्वात सुंदर दिसणारा प्राणी आहे. पण हे दिसणं आणि सुंदर कातडीच त्याच्या मुळावर आली. गेली अनेक दशकं त्यासाठी त्याची अव्याहत शिकार सुरू आहे. मंगोलिया आणि चीनच्या छोटय़ा गावांमध्ये हिमबिबटय़ाची कातडी सहज विकत मिळायची. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर हिमबिबटय़ा वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून हे प्रमाण कमी होताना दिसतं आहे, पण तरीही ते पूर्णपणे थांबलेलं नाही.

मंगोलिया आणि इतरही भागांमध्ये शेळ्या-मेंढय़ा घेऊन फिरणाऱ्या भटक्या गुराख्यांचे प्राणी हिमबिबटय़ांना सहज मिळतात आणि तिथूनच हिमबिबटे आणि माणूस यांच्यातला संघर्ष वाढत गेला. दरवर्षी वन्यजीव संरक्षण करणाऱ्या अनेक संस्था लुप्तप्राय किंवा अस्तंगत होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजातींची यादी जाहीर करतात. २००० पासून हिमबिबटय़ा लुप्तप्राय यादीत होता पण सुदैवाने गेल्या वर्षीपासून त्याचा समावेश फक्त धोकादायक गटात झाला आहे. म्हणजेच अनेक संस्था करत असलेल्या प्रयत्नांना यश येऊन त्यांची संख्या वाढलीय. ‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’ या हिमबिबटय़ा संरक्षणासाठी अनेक वर्ष काम करणाऱ्या संस्थेच्या अंदाजानुसार आज सर्व बारा देशांत मिळून ४ ते ७ हजार हिमबिबटे आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी अधिवास संरक्षण गरजेचं आहे. माणूस आणि वन्यजीव संघर्षांवर उपाययोजना आणि चोरटय़ा शिकारीला आळा घालणं गरजेचं आहे. बायरा आणि तिच्या छोटय़ाशा गटाने हिमबिबटय़ांचा मंगोलियातला अधिवास वाचवला, तिथले प्रस्तावित खाण प्रकल्प थांबवले आणि जुन्या खाणीदेखील बंद केल्या. ‘गोल्डमन पुरस्कार’ तिच्या कर्तृत्वाला सलामी म्हणून दिलाय.

बायराचा जन्म उत्तर मंगोलियात एका साध्या घरात झाला. तरुणपणी तिने रशियन आणि इंग्लिश शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ती पर्यटन गाइड म्हणूनही काम करत असे. त्या सुरुवातीच्या काळात १९९८ मध्ये ‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’च्या एका संशोधन प्रकल्पात दुभाषी म्हणून काम करायची तिला संधी मिळाली. त्यावेळेपासूनच ती हिमबिबटय़ांच्या प्रेमात पडली आणि त्यांचं संरक्षण हेच तिच्या जीवनाचं ध्येय बनलं. हिमबिबटे स्थानिक मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढय़ा मारतात म्हणून मंगोलियाच्या गोबी वाळवंटात त्यांच्या शिकारी सर्रास होत. बायका हिमबिबटय़ांचा अक्षरश: द्वेष करत. कारण कुटुंबाच्या मालमत्तेचा नाश त्यांना सहन होत नसे. त्यातूनच चोरटय़ा शिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असे. बायराने या बायकांशी बोलायला सुरवात केली. शेळ्या-मेंढय़ा मारल्या तर त्यासाठी नुकसानभरपाई आणि ‘शेळ्या-मेंढय़ांचा विमा’ यासारख्या योजना सुरू केल्या. तोस्त पर्वतांमधल्या कळप राखणाऱ्या बायकांचा विश्वास तिने कमावला.

‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’च्या  संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू होतं आणि २००५-०६ मध्ये तिची ‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’च्या मंगोलिया हिमबिबटय़ा संशोधन प्रकल्पाची संचालक म्हणून नेमणूक झाली. पण मंगोलियातले प्रयत्न अधिक चांगल्या पद्धतीने करता यावेत म्हणून २००७ मध्ये तिने ‘स्नो-लेपर्ड कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यानंतर तिने अजिबात मागे वळून पहिले नाही. मंगोलियामधल्या भटक्या जमातीच्या स्त्रियांना लोकरीपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार करता येतात आणि त्यांना त्याचं पारंपरिक ज्ञान आहे. मग बायराने अशा लोकरीच्या वस्तू तयार करणं, त्यात जंगल आणि प्राण्यांची, संस्कृतीची प्रतीकं आणि अर्थातच हिमबिबटय़ा या सगळ्याचा समावेश केला. ही सगळी उत्पादनं ‘स्नो लेपर्ड ट्रस्ट’च्या माध्यमातून इंटरनेटच्या साहाय्याने विकायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या स्पर्धेत टिकून राहतील अशा दर्जेदार वस्तू तयार करण्यासाठी बायकांना प्रशिक्षण दिलं. २००७ मध्ये सुरू झालेल्या तिच्या प्रयत्नांना मोठं यश आलंय. तिच्या फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘स्नो लेपर्ड एंटरप्राइज’ची उलाढाल आज १० लाख डॉलर्सच्या पुढे पोहोचलीय. या वस्तू विकत घेणाऱ्यांना त्यातला फायदा, स्थानिक गुराखी स्त्रिया आणि हिमबिबटय़ा संरक्षणासाठी वापरला जातो याची खात्री आहे.

अर्थात बायराच्या कामाला झळाळी प्राप्त झाली ती तिच्या आणखी मोठय़ा विजयाने. मंगोलियाची अर्थव्यवस्था मुख्यत: खाण व्यवसायावर आधारलेली आहे. या संपन्न प्रदेशात भूगर्भामध्ये तांबे, मँगनीज, युरेनियम अशी अनेक मूलद्रव्ये सहज सापडतात. बायरा ज्या तोस्त पर्वतराजीत काम करत होती त्या सुमारे १८ लाख वर्ग किमी परिसरात अनेक गुरख्यांचे पारंपरिक हिंडायचे मार्ग तर होतेच पण हा परिसर म्हणजे वीसहून आधिक हिमबिबटय़ांचा अधिवास आहे. याच परिसरात मंगोलिया सरकारने २०१२ च्या सुमारास मोठय़ा प्रमाणावर खाणींना परवाने देण्यास सुरुवात केली. अर्थातच लोक आणि हिमबिबटय़ा यांना धोका उत्पन्न झाला. बायराने स्थानिक पत्रकारांच्या मदतीने याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. पण तिने खाणमालकांविरुद्ध संघर्ष करण्याऐवजी स्थानिक लोकांच्या माध्यमातून सरकारला या प्रदेशाचं महत्त्व पटवायला सुरुवात केली. स्थानिक मेंढपाळांमध्ये त्यांच्या उपजीविकेसाठी, कुरणांसाठी खाणकाम हानीकारक आहे याबद्दल जाणीवजागृती सुरू केली.

शिवाय या परिसरात आधीपासून अधिकृतरीत्या सुरू असलेल्या खाणी होत्याच. पुढचा प्रवास लोकसहभाग, सरकारवर दबाव आणणं आणि सतत पाठपुरावा असाच होता. पण तब्बल सहा वर्षांनंतर बायराच्या प्रयत्नांना यश आलं आणि मंगोलियाच्या सरकारने या परिसरातील खाणींचे प्रस्ताव रद्द केले. इतकंच नाही तर तोस्त पर्वतराजींतील हा १८ लाख वर्ग किमीचा परिसर २०१६ मध्ये सरकारी हिमबिबटय़ा अभयारण्य म्हणून घोषित केला. पुढे या परिसरातील सुरूअसलेल्या खाणीचे परवाने रद्द केले आणि हिमबिबटय़ाला खऱ्या अर्थाने अभय मिळालं. स्त्रियांना हिमबिबटय़ा बरोबरचं सहजीवन महत्त्वाचं आहे हे पटलं आणि त्या अधिक उत्साहाने संरक्षणाच्या कामात सहभागी होऊ लागल्या.

बायराने ‘गोल्डमन पुरस्कार’ स्वीकारताना केलेल्या भाषणात सांगितलं, ‘‘या सुंदर प्राण्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणं मला सहज जमलं, कारण सुरुवातीला केलेल्या छोटय़ाशा कामामुळे मी आपोपाप या प्राण्याशी जोडले गेले. संशोधन आणि माहितीपेक्षा आधी त्याचा अधिवास वाचवणं गरजेचं आहे हे मला जाणवलं आणि मग मार्ग सुचत गेले. वन्यजीव संरक्षण हे एकटय़ा-दुकटय़ाचं काम नक्कीच नाही पण स्त्रियांना एखादी गोष्ट पटली, आपल्या कुटुंबाची काळजी घेत काही उपाय करायला जमले, सोबतच त्यातून आत्मविश्वास आणि आर्थिक फायदा मिळाला तर काहीच अवघड नसतं.’’

म्हणूनच आज हिमबिबटय़ा संरक्षणाच्या हकिकती अभिमानाने सांगताना ‘यूटय़ूब’वरचे लघुपट, वेगवेगळे अहवाल आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा या सर्व ठिकाणी ‘स्नो लेपर्ड एंटरप्राइझ’च्या माध्यमातून काम करणाऱ्या मंगोलिया, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान इत्यादी देशांतल्या स्त्रियाच दिसतात. ‘स्नो लेपर्ड एंटरप्राइझ’ म्हणजे फक्त हिमबिबटय़ा संशोधन प्रकल्प नाही, तर बायकांनी आपल्या समजुतीतून सुरू केलेला आणि चालवलेला उद्योग आहे. त्यामागे  माणसं, वन्यप्राणी आणि परिसर या सगळ्याची स्त्रीसुलभ काळजी आहे. हे सहजीवन पुन्हा पूर्वीसारखं झालं, प्राण्यांबद्दलची शत्रुत्वाची भावना नाहीशी झाली तर ते फक्त हिमबिबटय़ा आणि त्याच्या परिसरासाठीच नाही तर आपल्या सर्वाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे हेच या स्त्रियांनी अधोरेखित केलंय.

godboleaj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:04 am

Web Title: snow leopard protection vedh bhavtalcha archana jagdish mpg 94
Next Stories
1 आयुष्याच्या संध्याकाळी
2 चालते बोलते विद्यापीठ
3 दोन पिढय़ांतील वाढतं अंतर
Just Now!
X