News Flash

लढा, चळवळी आणि आंदोलनं

रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख स्त्री-पुरुषांना त्याचा फायदा करून देणाऱ्या,

| May 18, 2013 01:01 am

रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख स्त्री-पुरुषांना त्याचा फायदा करून देणाऱ्या, पेणमध्ये दोन हजार घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र बोर्ड असावे यासाठी लढा उभारणाऱ्या, त्यासाठी वाघई घरकामगार संघटना उभारून तो लढा यशस्वी करणाऱ्या, काथोडी समाजाची अस्मिता जागृत व्हावी यासाठी लढणाऱ्या, कोकणातील कळणे गावातील खाणकामासाठी डोंगर कापण्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि आता जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाविरुद्ध लढणाऱ्या पेणच्या वैशाली पाटील यांचं आयुष्य म्हणजे लढा, चळवळी आणि आंदोलनं. त्याविषयीचे त्यांचे अनुभव.
लहानपणापासूनच माझी चौफेर घडण होत होती. त्याला कारणीभूत माझे आई आणि बाबा. मी मूळची पाचोऱ्याची. सध्या पेणमध्ये राहते. वडील अ‍ॅड. हिरालाल पाटील आणि आई सुमन, दोघेही समाजवादी विचारसरणीचे. आम्ही सहा भावंडं. सलग चार बहिणीतील मी चौथी! आमच्या घरात सामाजिक, राजकीय चळवळीचं वातावरण तर होतंच; पण साहित्यिक वाचनासही ते पूरक होतं. आई आणि वडिलांनी बालपणापासून वाचनाचे संस्कार घडवले होते, सर्व प्रकारचं वाचन मुंबई-पुण्यापासून दूर असूनही करावयाची सवय त्यांनी आम्हाला लावली होती. गावातल्या व्याख्यानमालांना ते आम्हाला आवर्जून घेऊन जात असत. एस्. एम्. अण्णा, ना. ग. गोरे, मधु दंडवते हे घरी येत असत, अ‍ॅड. दत्ता पाटील, बाळासाहेब धारकर हे वडिलांचे मित्र होते. व. पु. काळे, गोदूताई परुळेकर, जयवंत दळवी, बा. भ. बोरकर यांच्यासारखी माणसं ऐकायला, वाचायला मिळाली. प्रत्यक्ष घरातली मंडळी राजकारणात जनता पक्षाचा झेंडा घेऊन कार्यरत होती. त्यांचं पाहून आम्ही मुलंही काही उद्योग करत असू. माझ्या आयुष्यातील पहिला मोर्चा, मी दहा वर्षांची असताना वडलांचे ओंकार वाघ नावाचे मित्र, जनता पक्षाच्या तिकिटावर उभे होते तेव्हा, आळीतल्या मुलांना घेऊन त्यांच्या प्रचारासाठी काढला होता. अशी चौफेर घडण होत होती. अर्थात हे आता समजतंय.
आम्हा बहिणींना वडिलांनी शिकवले होते. त्यांना वाटलं, शिकलेल्या मुलींची लग्नं पटकन होऊन जातील. पण मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी आम्हाला आमचा जमिनीचा तुकडा विकावा लागला, आणि दुसऱ्या बहिणीसाठी पाचोऱ्यात मोठय़ा हौसेने बांधलेलं घर विकावं लागलं. त्या घरात तर आम्ही राहायलाही गेलो नव्हतो. आमच्याकडे फारसे पसेही नव्हते. सारे पसे सार्वजनिक कामात आणि मोठय़ा कुटुंबात उडून गेले. ते घर म्हणजे माझ्या आईचं स्वप्न होतं. पण ते स्वप्न उद्ध्वस्त झालं. त्यावेळी डोळ्यातून टिपं काढणाऱ्या माझ्या आईला मी म्हणाले होते, ‘‘ मी मोठ्ठी झाले की तुझ्यासाठी घर घेईन!’’ बाईला स्वत:चं हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही खूणगाठ तेव्हापासून कदाचित माझ्या मनात कोरली गेली असावी. कारण रायगड जिल्ह्य़ात मी पहिली घरठाणाची चळवळ उभी केली, त्यामागे कदाचित हा प्रसंग असावा. ‘कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर’ याची अधिसूचना २९ मे २००० रोजी निघाली होती. मूळ ठराव होऊन ५६ वष्रे लोटली होती. अधिसूचनाही अवघ्या चार ओळींची. त्या अधिसूचनेचा कागद घेऊन मी निवृत्त तहसीलदार श्री. रा. भि. भुस्कुटे यांच्याकडे गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा नीट अभ्यास केला. महिलांना गोळा केलं आणि झोपडीखालील जागा मालकीची हे सूत्र धरून त्यांना संघटित केलं. ‘‘सावित्रीच्या लेकी आम्ही, आता मागे राहाणार नाही,’’ असा पुकारा करत सावित्रीबाईंचा फोटो डोक्यावर घेऊन आम्ही रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ६ मार्च २००६ रोजी मोर्चा काढला. १०० दावे दाखल केले. प्रारंभी लोकांनी आम्हाला वेडय़ात काढलं. आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही शांततेनं आंदोलन करत राहिलो. मोच्रे काढले, धरणे धरली, आंदोलने झाली, विधानसभेत प्रश्न उपस्थित करायला लावले. जनमताचा रेटा त्यातून निर्माण झाला. आणि एक दिवस, पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख स्त्री-पुरुषांचा फायदा झाला. माझ्या आईच्या दु:खातून ही वाट मला सापडली.
मी प्रवरानगरला अभियंता पदविकेचं शिक्षण घेतलं. पण माझं मन त्यात रमेना, अन्य क्षेत्रे मला खुणावत होती. मनोर, तलासरी येथे मी काम करण्याचा अनुभव घेतला. नंतर सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या एका बहि:शाल अभ्यासक्रमाबरोबर मी रायगडात गेले. आम्ही पेणमध्ये काम करू लागलो, ते प्रथमत: काथोडी समाजासाठी. तिथे बालवाडी सुरू करायची होती. पण कोणी मदत करे ना. मी काथोडी बांधवांना म्हटलं, ‘‘संस्थेचा वाटा पिठाचा तुम्ही मिठाचा तर द्या’’. तर एक जण हसला व म्हणाला, ‘‘बॉबकटवाल्या बाईला कळूचा नाय. तिला काथवडी कथवा सुधारूक नाय ते तिला ठाव नाय’’ पुन्हा तो हसला. मी अस्वस्थ झाले. मी समाजातल्या बायकांशी बोलले. तेव्हा जाणवलं. ‘या समाजाकडे बघण्याचा अन्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. काथोडी माणूस हा दारुडा, चोरटा, घाणेरडा आहे, हा दृष्टिकोन बदलायला हवा, त्यांची स्वत:ची अस्मिता जागी करायला हवी. ‘आम्ही काथोडी’, ‘आम्ना शिक्षण’ अशा काथोडी भाषेतल्या पुस्तिका मी लिहिल्या. नंतर मी काथोडय़ांचा इतिहास शोधू लागले. त्यात रायगडच्या गॅझेटमध्ये चिरनेरच्या सत्याग्रहात पहिला बळी पडला तो नाग्या महादू कातकरी याचा! पण त्याचे नाव चिरनेरच्या स्तंभावर नव्हतं की त्याचा पुतळा नव्हता. हुतात्मा नाग्या कातकऱ्यांच्या निमित्ताने काथोडी समाजाची अस्मिता जागृत करायला हवी. त्यांचे एकही चित्र उपलब्ध नव्हतं. जे. जे. च्या एका विद्यार्थ्यांने नाग्या कातकऱ्यांचा मुलगा, नातवंडे यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचे एक कल्पनाचित्र काढले. ते घेऊन वाडय़ावाडय़ांत जाऊन काथोडी समाजाला स्वत:ची जाणीव देत देत आम्ही अखेर २५ सप्टेंबर १९९७ रोजी हुतात्मा नाग्या कातकऱ्यांच्या नावाने एक मोर्चा पेणमध्ये काढला, त्यांना सार्वजनिक मानवंदना दिली. पाच वर्षांत ही एक सांस्कृतिक चळवळ बनली. हुतात्मा नाग्या कातकरी यांचे नाव स्तंभावर आले, त्यांचा पुतळा बसवण्यात आला. ही सांस्कृतिक चळवळ आता काथोडय़ांच्या हक्काची चळवळ बनली.
१९९२-९३च्या सुमारास जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला. त्यामुळे मालक-मजूर, कातकरी-मालक, अशा संघर्षांचं स्वरूप बदललं. नव्या संस्कृतीत समस्त कष्टकऱ्यांचे लढे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. सेझचं आगमन झालं. इतिहासात पहिल्यांदाच शासनाने खाजगी कंपनीसाठी ४५ गावांतली ३५००० एकर जमीन संपादन करण्यास प्रारंभ केला. मग २००५मध्ये आम्ही एन्. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करायला सुरुवात केली. या संघर्षांमध्ये छोटे जमीनदार, कनिष्ठ मध्यमवर्गीय, शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी असे सारे उभे राहिले. कारण, हळूहळू सेझची व्याप्ती व घडू शकणारे दुष्परिणाम यांची जाणीव त्यांना झाली. भातगिरणीवालेही यात उतरले. आम्ही पेण तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण केले. एक महिना ते सुरू राहिले. आम्हाला तुरुंगवास झाला. आम्ही पेणमध्ये सरकारला सार्वमत घ्यायला लावले. असं करायला लावणारा पेण हा देशातला पहिला परिसर होता. मग बाकीच्यांनी अनुकरण केलं.
या सवार्ंत माझ्या कुटुंबाची मोठी साथ होती. माझा नवरा राज बंगळुरुला होता. एका अनिवासी भारतीय कुटुंबातला राज, माझ्यासाठी पेणमध्ये येऊन राहिला. तो घर सांभाळतो. लग्नानंतर बाईनंच का पुरुषाच्या घरी जायचं? या दृष्टिकोनातून तो पेणमध्ये आला. आम्हाला दोन मुली आहेत- गार्गी व मत्रेयी. घरी असले की मी सारे करते. पण समाजहिताचं काम करणं ही माझी पहिली जबाबदारी. श्वासही घ्यायला फुरसत नसते. सतत नवे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी लढे. २००८ मध्ये कोकणातील कळणे नावाच्या गावातील खाणकामासाठी डोंगर कापायला सुरुवात झाली. बडी राजकीय शक्ती त्यामागे होती, डोंगरातून वाहत येणाऱ्या पाण्यावर तो परिसर सुजलाम होता. पण आता ते हरवणार होते. त्या परिसरात उभं राहणारं आंदोलन दडपलं गेलेलं. आंदोलकांना तुरुंगात टाकलेलं. मला कळल्यावर मी तेथे गेले. लोकांना विचारलं, तुम्ही तुमचं गाव वाचवण्याचा प्रयत्न करताय यात तुमची चूक काय? तुम्ही पोलिसांना का घाबरता? तर तिथल्या बायकांनी मला विचारलं, उद्या आम्हाला पोलिसांनी अटक केली तर तुम्ही येणार आहात का? अर्थात, हो असं माझं उत्तर होतं. आंदोलन उभं राहिलं. सहा महिने सुरू राहिलं. पण अखेरीस खाणकाम सुरू झालंच. हा लढा वरकरणी अपयशी वाटतो. पण तसे नाही. आपल्या समाजातील लढे हे मुद्यांवर आधारित आहेत. समाजपरिवर्तनाचे, आíथक उदारीकरणाचे लढे आहेत. सेझ, अणू ऊर्जा, खाणविरोधी लढा या साऱ्यांची गुंफण करायला हवी. हे सारे एकाच अर्थव्यवस्थेचा भाग आहेत, ते जोडता यायला पाहिजेत, हे हळूहळू माझ्या लक्षात आले. मग मी आमच्या अंकुर ट्रस्टच्या बाहेर जाऊन तो लढा निर्माण करण्यास प्रारंभ केला. जागतिकीकरणात छोटय़ा छोटय़ा शेतकऱ्यांवर दडपण येते. ते जमिनी विकतात, त्यातून आलेले पसे नीट गुंतवणूक करून ठेवत नाहीत. व्यसनांवर उधळतात, सोन्या नाण्यावर उधळतात आणि शेवटी कफल्लक बनतात. अशा वेळी त्या घरातील बाई उठून बाहेर पडते व घरकाम करू लागते. एकटय़ा पेणमध्ये २००० घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत, असे आमच्या ध्यानात आले. त्या पेणमध्येच नाही तर दूरवर कामासाठी जातात. त्या सकाळी सहाला घर सोडतात व संध्याकाळी सहाला परततात. त्यांच्या मागण्या सरकापर्यंत पोचविण्यासाठी म्हणू्न आम्ही आंदोलन उभे केले. घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्र बोर्ड असावे असा आग्रह आम्ही धरला. यासाठी वाघई घरकामगार संघटना उभी केली व हा लढा यशस्वी झाला.
भारतात जैतापूर येथे जगातला सगळ्यात मोठा अणू ऊर्जा प्रकल्प उभा राहतोय. त्या विरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत. हा लढा स्थानिक स्वरूपाचा नाही तर तो जागतिक स्वरूपाचा आहे. अमेरिका-भारत अणुसामंजस्य करारानंतर हा लढा उदयास आला. अणू ऊर्जा प्रकल्प हे सर्वात धोकादायक असतात. सर्वाधिक सुरक्षित असणाऱ्या प्रकल्पांमध्येही अपघात घडू शकतात हे चेर्नोबेल, फुकोशिवा घटनांनी सिद्ध केले आहे. जगभरात अणू ऊर्जेचा पुनर्वचिार होतोय अन् आपण अणू ऊर्जानिर्मितीत उतरत आहोत! किमान आणि समान वीजवाटप, व्यवस्थित वीज वितरण, वीजगळतीचं प्रमाण कमी करणं, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर यातून मोठय़ा प्रमाणात वीजप्रश्न सुटू शकतो. आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य जनतेला याविषयी काहीही वाटत नाही हा मोठा प्रश्न आहे. मी हे प्रश्न घेऊन उभी राहिले आहे. सोबत अनेक सोबती, मार्गदर्शक आहेत. जागतिकीकरणाचा लढा हा केवळ भारतापुरता मर्यादित नाही, तर सर्वच देशांत आहे. मी २०१०मध्ये अमेरिकेत गेले होते. तेथे व्हरमाँटमधला अणू ऊर्जाविरोधी लढा मला माझ्यासारखाच वाटला. या संघर्षांत स्त्रिया पुढे आहेत. संघर्षांच्या रचना आहेत आणि रचनात्मक संघर्ष उभारायचा आहे. नव्या रचना घडताहेत, त्या पाहायला हव्यात, अनुभवांना वाटय़ाला यायला हवे आहे आणि हे सारे नव्या पिढीला द्यायलाही हवे. हे सर्व करत असताना एक माणूस म्हणून मी माझ्या जबाबदारीला निभावण्याचा प्रयत्न करते आहे. त्यात आनंदही आहे आणि माणूसपणाचं भानही आहे. प्रत्येक क्षणी आयुष्याचा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न करते. तो अर्थ समृद्ध आहे.    ल्ल
शब्दांकन: प्रा. नितिन आरेकर
संपर्क- वैशाली पाटील, अंकुर ट्रस्ट,
 शंकर रामा कॉम्प्लेक्स, पेण
भ्रमणध्वनी- ०९४२२६९६९७६
ई-मेल – vaishraj4@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2013 1:01 am

Web Title: social activist vaishali patil of ankur trust fighting for environmental disaster in konkan
Next Stories
1 सडा फुलांचा नि आठवणींचाही!
2 … अन् मन निर्मळ तृप्त अवस्थेत जातं
3 माझी आई
Just Now!
X