03 August 2020

News Flash

कुटुंबातील एकटेपण

आत्महत्या ही वैश्विक मानवी समस्या आहे. जगात दरवर्षी जवळजवळ ८ लाख लोक आत्महत्येने मृत्युमुखी पडतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. शुभांगी र. पारकर

आत्महत्येच्या समस्येने जगाला ग्रासलेले असले तरी भारताच्या संदर्भात या समस्येचा वेगळा विचार करावा लागतो. त्याचं कारण आहे, आपल्या देशातली सामाजिक, सांस्कृतिक कौटुंबिक परिस्थिती. अलीकडेच्या ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या आकडेवारीनुसार शहरातील स्त्रियांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झालीय. आणि त्यातील बहुतांश कारणे ही वैवाहिक आहेत. कुटुंबात असूनही अनेकींना एकटेपण सहन करावे लागते..  काय आहेत त्यामागची कारणे ..

आत्महत्या ही वैश्विक मानवी समस्या आहे. जगात दरवर्षी जवळजवळ ८ लाख लोक आत्महत्येने मृत्युमुखी पडतात. याचाच अर्थ, दर ४० सेकंदाला एक आत्महत्या होते. ज्यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झालाय, त्यातील ९० टक्के लोकांमध्ये मानसिक रोगाचे निदान झालेले असते. अर्थात, हे पाश्चात्त्य देशांतील अभ्यासात आढळले आहे. आशियायी देशातही उदासीनता व चिंता यासारखे मानसिक आजार अधिक प्रमाणात आढळतात. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणाच्या निकषानुसार आपल्या शहरांतील स्त्रियांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याची कारणे वैवाहिक वा कौटुंबिक अधिक आहेत. वैवाहिक जीवनात स्त्रिया घटस्फोटाऐवजी आत्महत्येपर्यंत जात असतील तर त्याची कारणे नक्कीच शोधायला हवीत.

स्त्रियांमध्ये आत्महत्या आणि त्याचा प्रयत्न करण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आढळते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आत्महत्येचे प्रयत्न करण्याचे प्रमाण तीनपट अधिक असते. जगभरातील एकूण स्त्रियांपैकी १८ टक्के स्त्रिया भारतीय आहेत आणि जगातील सर्व आत्महत्यांच्या तुलनेत भारतातील ३६ टक्के स्त्रिया आत्महत्या करतात. भारतातले स्त्रियांमधील हे जीव दडपून टाकणारे आत्महत्येचे प्रमाण तरुण आणि मध्यमवयीन स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आहे. अलीकडच्या निरीक्षणांमध्ये वैवाहिक जीवनातील ताणतणाव हे त्यामागचे महत्त्वाचे कारण ठरू लागले आहे.

वीणा उच्चविद्याविभूषित आहे. ती लग्नाआधीपासून नोकरी करायची. तिच्यासमोर उज्ज्वल भवितव्य होते. तिचा अजितशी प्रेमविवाह झाला होता. तोही उत्तम व्यवसायात होता, पण लग्नानंतर वीणा गरोदर राहिली तशी त्याने तिला नोकरी सोडायला सांगितली. त्यांना मुलगी झाल्यानंतर ती वर्षांची होईतोवर वीणा घरी थांबली. त्या काळात तिने एक अर्धवेळ प्रशिक्षण घेतले. मात्र नंतरही अजित तिला नोकरी करू द्यायला नकार देत होता. वीणा साहजिकच खूप चिडली. शिवाय त्याने त्याचा शब्द मोडला होता त्यामुळे वीणाला वाटत होते, की आपण फसवले गेलो आहोत, आपलं करिअर पणाला लागलं आहे. ती उदास राहू लागली आणि एके दिवशी अजितशी भांडण झाल्यावर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. वीणासारख्या अनेक स्त्रियांसाठी ‘करिअर सोडून द्यायचे म्हणजे आपले अस्तित्व नाकारायचे.’ असे भावूक द्वंद्व असते.  त्यांच्यासाठी जीवनमरणाइतकी ती महत्त्वाची बाब असते. कारण त्यामागे स्वप्नं असतात, कष्ट असतात. घराबाहेर पडून आपले भविष्य विकसित करायला पाहिजे या महत्त्वाकांक्षेने आज स्त्रिया करिअर करत आहेत. कर्तृत्व दाखवताना कुठलेही क्षेत्र तिने मागे ठेवले नाही. पण हे सर्व दिसते तितके सोपे नाही. यासाठी बऱ्याच कसरतींतून, स्वत:शी झगडून, प्रियजनांशी वाद-संवाद करत तिला पुढे जावे लागते. मात्र करिअरच्या दिशेने ही भरारी मारताना अनेकदा तिची गळचेपीही झालेली दिसते. माझ्याकडे आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केलेली २२ वर्षांची राबिया आली होती. तिने पदवी मिळवली होती. राबिया सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. स्वत: तर शिक्षणात अव्वल होतीच, पण आपल्या भावंडांनासुद्धा ती शिकायला प्रवृत्त करत होती. पण वय वाढू लागले तसे तिच्या कुटुंबीयांवर तिचे लग्न करून देण्यासाठी नातेवाईकांचा दबाव यायला लागला. राबियाला एम.ए., बी.एड. करण्याची इच्छा होती. आईवडिलांची त्याला मान्यता नव्हती. तिचे लग्न तिच्या काकांनी सुलतानपूरमध्ये ठरवले होते. राबिया काही महिन्यांपासून सततच्या या दबावामुळे चिडचिडी झाली होती. आईवडिलांशी भांडताना एकदा ती म्हणाली, की ‘मला शिकायला तरी द्या नाहीतर मारून तरी टाका. पण मला लग्न करायचं नाही.’ तिच्या शिक्षणाबद्दलच्या तळमळीविषयी खरंतर त्यांना आस्था होती. मनातून दोघाही आईवडिलांना खूप अपराधी वाटत होतं, पण त्यांचीही सामाजिक हतबलता होती. तिने अशा पद्धतीने टोकाचे उद्गार काढणे आईवडिलांना रुचले नाही. त्यांनी प्रसंग हाताबाहेर जातो आहे हे लक्षात येताच सुलतानपूरला जायचे निश्चित केले. जायच्या एक दिवस आधी राबियाने आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केला. तिची आई तिच्याबाबत सावध असल्याने ती तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेली आणि राबिया कशीबशी वाचली. नंतर राबियाशी बोलताना तिने सांगितले, की तिचे लग्न झाले असते तर तिचं करिअर संपलं असतं. आणि तिच्या दृष्टीने ते मृत्युवतच आयुष्य होते. तिने  तिच्या पदवीधर चुलत बहिणी आता कशा परावलंबी आणि निराश होऊन फक्त गृहस्थी सांभाळत बसल्या आहेत हे सांगितले. राबियाला यशस्वी करिअर करायचे होते. त्यासाठी ती जिवावर उदार झाली होती. अर्थात,  राबियाच्या आईने तिची साथ द्यायचे ठरवले, हे महत्त्वाचे.

आत्महत्या ही मदतीची हाक किंवा क्राय फॉर हेल्प म्हणून ओळखली जाते. बऱ्याचदा काही स्त्रियांच्या बाबतीत आत्महत्येचा हेतू हा या मार्गाने एखादी भावनिक समस्या वा वाद मिटवण्यासाठी असू शकतो. एका दाम्पत्याची त्यांच्या कौटुंबिक  मालमत्तेसंदर्भाने भांडणं होती. त्यांना अपत्य नव्हतं.

पतीला ती संपत्ती आपल्या भाच्यांना देऊन टाकायला काहीच अडचण वाटत नव्हती. किंबहुना, त्याला ती त्यांना द्यायचीच होती, पण पत्नीचे त्यांच्याशी पटत नव्हते. त्यामुळे हा विषय पटलावर आला की ‘आपल्याला जगावसंच वाटत नाही,’ अशा प्रकारचं बोलणं ती सुरु करत असे. त्यामुळे पती तो विषय तेथेच संपवत असे. यात तिची भूमिका नाटकी किंवा लबाडीची न मानता तिला तिच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी येणाऱ्या तणावाच्या दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे. कित्येक वेळा काही स्त्रिया घरच्या बिकट परिस्थितीला सांभाळून घेण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. माझी एक मध्यमवयीन स्त्री रुग्ण. नवरा कर्जफेडीसाठी लोकांकडून धमकावला जाऊ लागला, की आत्महत्येचा प्रयत्न करी. असा की थेट रुग्णालयात दाखल करावे लागे. त्यादरम्यान तिचा नवरा पूर्ण वेळ तिथे तिच्यासोबत राहायचा. खूप काळ कर्जाच्या ओझ्याखाली राहून तीसुद्धा खूप कंटाळली होती. शिवाय आपल्या नवऱ्याचा जीव धोक्यात असल्याने सतत उद्विग्न असायची. सततच्या तणावामुळे आत्महत्येचा विचार  सतत तिच्या डोक्यात  सुरू असे.

स्त्रीच्या नैराश्याची कारणे तिची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे यातूनही मिळू शकतात. आपल्याकडे सासूसुनांचे भांडण, हे खूप जुने दुखणे आहे. पूर्वी सुना या नात्यातल्या तणावामुळे जास्त प्रमाणात आत्महत्या करत असत. आज बऱ्याचदा वयोवृद्ध सासवा याच तणावामुळे आत्महत्या करतात. याशिवाय नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध पाश्चात्त्य देशात इतके त्रासदायक नसतात. आपल्या देशात मात्र हे संबंध  तिघांपैकी एकाच्या आत्महत्येपर्यंत पोचू शकतात. अशा रुग्णांमध्ये या नात्यांच्या गुंतागुंतीनंतर प्रगल्भ पातळीवरचे समुपदेशन खूप गरजेचे असते. सामान्यत: एखाद्या स्त्रीच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर शेवटी त्या घटनेमुळे काय परिणाम दिसून आला यावर स्त्रीच्या आत्महत्येचा उद्देशाचा अर्थ लावला जातो. पण तो अर्थसुद्धा नेहमीच बरोबर असेल, असे नाही.

माझ्याकडे पंचेचाळिशीची एक पदवीधर स्त्री आपल्या मत्रिणीबरोबर आली होती. तिने लग्नानंतर नोकरी सोडली होती. तिला महाविद्यालयात जाणारी दोन मुलं. गेली कित्येक वर्षे तिला झोप लागत नव्हती. ऊर भरून यायचा. सतत रडायला यायचे. पूर्वी ती ज्या जोमाने स्वयंपाक करायची तो जोम तिला जाणवत नव्हता. स्वभावातला नीटनेटकेपणा कमी झाला होता. जीवन नीरस वाटत होते. सततच्या रडवेल्या स्वभावामुळे सगळेच तिला फटकारत होते, दुर्लक्ष करत होते. तिला कळत नव्हते, की आयुष्य असे निर्थक असल्यासारखे का वाटते आहे. कित्येक वेळा जीव द्यावासा वाटत होता. त्यामुळे ती आणखी अस्वस्थ होती. बिथरत, घाबरत तिनं सांगून टाकलं, की दोनदा त्या आत्महत्येचा विचार करून रेल्वेरुळावरही जाऊन आल्या होत्या. ‘जीव नकोसा वाटतो’ या त्यांच्या भावनेला ना त्यांना उघडपणे व्यक्त करता येत होते, ना त्यांच्या या अव्यक्त भावनेला कुणाला ओळखता येत होते. लोकांनी त्यांना ‘आराम कर, फार विचार करू नको, डोके शांत ठेव,’ असे फुकाचे सल्ले द्यायचा धडाका लावला होता. ज्यांचा काहीच उपयोग होत नव्हता. अर्थात त्यांच्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शारीरिक होते. पण ते कळणे महत्त्वाचे असते. आत्महत्या रोखण्यासाठी त्या मागच्या कारणांना लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार करणे ही महत्त्वाची पायरी मानली जाते. त्यातही नैराश्य आत्महत्येच्या संदर्भाने अतिशय निर्णायक आहे.

स्त्रीच्या आयुष्यात विविध टप्पे असतात. अनेकींना या विविध टप्प्यांवर नैराश्येचा सामना करावा लागतो. ज्या स्त्रियांमध्ये आधीपासूनच मानसिक आजार दिसलेला आहे त्या स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर आत्महत्या करण्याचे प्रमाण इतर सामान्य स्त्रियांपेक्षा ७० टक्के जास्त असू शकते. मातामृत्यूच्या अनेक कारणांमध्ये आत्महत्येचे कारण हे संपूर्ण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे, तरुण मुलींमध्ये हे प्रमाण मध्यमवयीन स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. आत्महत्येचे प्रमाण वाढवणाऱ्या इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये या स्त्रिया जर अविवाहित असतील, एकटय़ा असतील किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल, त्या गरिबीत जगत असतील, कौटुंबिक आधार नसेल, तर गर्भारपणात आणि प्रसूतीनंतर त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण अधिक दिसून येते. आजच्या आधुनिक जीवनशैलीत लैंगिक स्वातंत्र्याच्या भ्रामक जाळ्यात अनेक तरुणी फसतात व नंतर गर्भपाताचा मार्ग स्वीकारतात. अशा तरुणींमध्येही गर्भपातानंतर आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

आपण प्रसूतीनंतर वा गर्भपातानंतरच्या आत्महत्येच्या धोक्याबद्दल बोलताना स्त्रीच्या जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलायलाच पाहिजे. तो म्हणजे, मातृत्व.  एक उच्चविद्याविभूषित स्त्री नैराश्येच्या उपचारासाठी माझ्याकडे येत होती. वयाच्या चाळिशीपर्यंत मूल होण्यासाठी वैद्यकीय आणि इतरही अनेक प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्या कमावत्या होत्या. आर्थिक परिस्थिती उत्तम होती परंतु समाजात किंवा त्यांच्या संसारात त्यांचे वंध्यत्वामुळे होणारे नैतिक खच्चीकरण कुणाला कळले नाही. संकोचामुळे त्यांनी त्यांचं हे आंतरिक दु:ख कुणाला बोलूनही दाखवले नाही. पण त्यांनी जेव्हा आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या मनाची कुतरओढ कुटुंबाच्या लक्षात आली. वंध्यत्व हे भारतीय स्त्रियांमध्ये आत्महत्येचे महत्त्वाचे कारण आहे. यात सामाजिक तणाव, नैराश्य, याबरोबरच स्त्रीचा स्वत:वरचा राग आणि आत्मसन्मानाचा घसरलेला दर्जा हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे स्त्रिया वंध्यत्वाचे उपचार आता सामाजिक भीड न बाळगता घेतात. बऱ्याचजणी पूर्वीच्या मानाने जागरूक झाल्यात. आधुनिक उपचारांबद्दल त्यांना माहिती असते. परंतु, या साऱ्या उपचारांतून जाताना मनावर एक निराशेचे मळभ असते. मनात साशंकता असते. अशा वेळी मानसिक आधाराची गरज असते. शिवाय, वंध्यत्वामध्ये सामान्य मानसिक आजार ओळखून त्यांचे उपचार घेणे तितकेच आवश्यक आहे.

स्त्रियांच्या शारीरिक समस्या आणि आत्महत्या यांचे महत्त्व समजून घेताना ‘प्रीमेनस्ट्रअल सिन्ड्रोम’ ही समस्यासुद्धा महत्त्वाची आहे. पाळी येण्याच्या आधी स्त्रीमध्ये अतिशय त्रासदायक असे शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात. अनियमित पाळी आणि भावनिक बदल, विशेषत: चिडचिड व औदासीन्य यामुळेही तरुणींमध्ये आत्महत्येचे विचार दिसतात. अर्थात, या तरुणींमध्ये सहनशीलता किती आहे, प्रगल्भता किती आहे याचाही प्रभाव त्यांच्या या बदलादरम्यान महत्त्वाचा असतो.

आजकाल स्त्रियांमध्ये अ‍ॅनोरेक्सिया नाव्‍‌र्होसासारखा खाण्याबद्दलचा आजार दिसून आला आहे. त्यात त्या आजाराच्या गंभीर त्रासांमुळे आणि मानसिक समस्येमुळे आत्महत्येची भावना स्त्रियांमध्ये बळावलेली दिसून येते. अनेक दीर्घकालीन आणि जीवनशैलीशी निगडित असे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार, हृदयरोग स्त्रियांमध्ये वाढलेले दिसतात. या दीर्घकालीन आजारांबरोबर होणारी शारीरिक गुंतागुंत आणि मानसिक तणाव यामुळेही येणारे नैराश्य आणि त्यातून वाढलेले आत्महत्येचे प्रमाण आज स्त्रियांमध्ये दिसते. बऱ्याच वेळा असे दुसऱ्यावर ओझे होण्यापेक्षा आणि त्रासदायक शारीरिक वेदनेतून जाण्यापेक्षा या सर्वातून सुटलेले बरे, असे स्त्रियांना वाटते. पूर्वी एवढा महत्त्वाचा नसलेला हा घटक आज मात्र हे आजार स्त्रियांमध्ये वाढल्यामुळे महत्त्वाचा ठरला  आहे.

डोमॅस्टिक व्हायलन्स किंवा घरगुती हिंसाचार हे एक महत्त्वाचे सामाजिक कारण आत्महत्येशी जोडलेले दिसून येते. स्त्रियांना सामाजिक संकोचापोटी सहज मदतीबाबत किंवा उपायांबाबत विचारता येत नाही. एक प्रचंड सामाजिक दबाव त्यांच्या मनावर असतो. शरीरावर जखमा असतातच, पण मनसुद्धा घायाळ झालेले असते. त्यात त्यांना सामाजिक आधार मिळू नये याची पूर्ण काळजी त्यांचा छळ करणारा घेतोच, पण दुर्दैवी गोष्ट अशी की त्याही लोकलाजेस्तव कुणाची मदत घेत नाहीत. जयंती ही माझी मध्यमवयीन विवाहित रुग्ण. दारुडय़ा नवऱ्याचा राक्षसी मार खाऊन अक्षरश: गलितगात्र झाली होती. नवऱ्याला घाबरून व चार मुलांना सावरून कशीबशी जीव मुठीत धरून जगत होती. असं म्हणतात, की मातेला कधी आत्महत्या करायचे धाडस होत नाही. कारण ती पोटच्या गोळ्यासाठी जगत असते. पण शेवटी तीसुद्धा माणूस आहे. याशिवाय नात्यांमधील समस्या हा खूप महत्त्वाचा घटक स्त्रियांच्या आत्महत्येमागे आढळतो. यामागचे मानसिक विश्लेषण महत्त्वाचे आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी काही रक्षक घटक आहेत. तेही स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. मातृत्व हा संरक्षक घटक आहे. यात स्त्रीला आवश्यक तो आधार दिल्यास स्त्री आत्महत्येपासून दूर राहील. स्त्रियांचे कौटुंबिक नाते भक्कम असेल, तिला साथ देणाऱ्या मत्रिणी, मिळणारे सामाजिक पाठबळ उत्तम असेल, तर तिला आपल्या आयुष्यातल्या गुंतागुंतीबद्दल बोलण्यासाठी संधी आणि नेमक्या बिकट क्षणी मानसिक आधार मिळाला तर स्त्रियांची निराशा सहन करण्याची ताकद वाढू शकते. शिवाय, स्त्रियांमध्ये मौखिक संवाद साधण्याचे आणि एकमेकांमध्ये सहज मिसळण्याचे सामाजिक कौशल्य मुळातच असते. त्यामुळे मानसिक आरोग्य केंद्रात त्यांना लवकर नेता आले तर त्या सहजपणे समुपदेशनाला प्रतिसाद देतात. त्यांचा कौटुंबिक आधार, सामाजिक नेटवर्क आणि सांस्कृतिक कौशल्य भक्कम केले, तर त्या आवश्यक मदतीचा लाभ योग्य पद्धतीने घेऊ शकतील.

आजची आधुनिक, वेगवान काळातली स्त्री एका वेळी अनेक भूमिका निभावत असते. त्यामुळे त्यांच्याकडून त्या त्या कर्तव्याची मागणीसुद्धा अधिक असते. त्या पारंपरिक आणि आधुनिक युगात वावरत असताना त्यांची स्थिती द्विधा, त्रिशंकू असते. त्यामुळे त्यांची तणावाची पातळी खूप प्रमाणात असते. साहजिकच त्यांना मानसिक ताण अधिक असतो. आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात कमीअधिक प्रमाणात येऊ शकतो. एखाद्या स्त्रीच्या आत्महत्येच्या प्रकट वक्तव्याला आपण गंभीरपणे घेतले नाही किंवा तिच्या आत्महत्येच्या पहिल्या प्रसंगाची योग्य दखल घेतली नाही तर आत्महत्येचा दुसरा प्रसंग रोखण्याची संधी बऱ्याचदा आपल्याला पुन्हा मिळत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी अशा बिकट प्रसंगी आपले कुटुंब आणि मित्रमत्रिणींसाठी सदैव जागरूक राहणे आवश्यक आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष न करता मनोरोगतज्ज्ञाचा सल्ला योग्य वेळी घेतलाच पाहिजे. त्यांना मदतीचा हात दिलाच पाहिजे. आत्महत्या बोलक्या असतात. मात्र त्याआधी त्यांच्या कृतीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. एक आयुष्य त्यामुळे वाचू शकतं.

pshubhangi@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 5:14 am

Web Title: social cultural family situation in the country and women abn 97
Next Stories
1 अवघे पाऊणशे वयमान : मी निसर्गसंवादी!
2 आरोग्यम् धनसंपदा : यकृताची भिस्त नियमित व्यायामावर
3 तळ ढवळताना : एका साहसाची सुरुवात ?
Just Now!
X