त्या याचकाच्या चेहऱ्यावरचे भाव लाचार नव्हते. उलट माणसाच्या शोधात असणाऱ्याला साक्षात माणूस भेटल्याचे होते, म्हणूनच मुलानेही माझ्या ‘मासिक सामाजिक देणे निधी’ योजनेत सहभागी होण्याचे ठरविले आणि वडिलांकडून माझ्याकडे आलेला हा वारसा माझ्या मुलाकडे आपोआप गेला..

आमच्या घरात आम्ही रोज रात्री सगळे जेवायला एकत्र बसतो. अर्थात कामाच्या व्यापामुळे रोज ते शक्य होतेच असे नाही, तरीही बहुतेक वेळा रात्री एकत्र जेवण घ्यायचा प्रयत्न करतोच. त्या दिवशी रात्री जेवताना अचानक मुलगा म्हणाला, ‘‘बाबा, या महिन्यापासून माझे एक हजार रुपये तुमच्या ‘मासिक सामाजिक देणं निधी’मध्ये जमा करा.’’ मी सुखावलो, अंतर्मुख झालो..
हा निधी कसा सुरू झाला त्याची एक मोठी कहाणीच आहे. माझे आई-वडील आणि आम्ही तीन भावंडे गिरगावातल्या चाळीत राहायचो. माझे लग्न झाले आणि मी पाल्र्याला राहायला आलो. बहिणींची लग्ने होऊन त्याही आपापल्या सासरी स्थिरावल्या होत्या आणि यथावकाश वृद्धापकाळाने आई-वडील निवर्तले. चाळीतली खोली मात्र आम्ही ठेवली होती. असेच एकदा काही तरी आणण्यासाठी त्या खोलीवर गेलो आणि सहज माझे लक्ष माळ्यावर गेले. तेथे एक पत्र्याची ट्रंक होती. मी सहज कुतूहलापोटी ती खाली काढून पाहिली, त्यात माझ्या वडिलांनी लिहिलेल्या रोजखर्चाच्या असंख्य वहय़ा होत्या. त्यातल्या काही कुतूहलापोटी मी घरी घेऊन आलो. त्या वहीत रोजचा कौटुंबिक खर्च वडिलांनी सुवाच्य अक्षरांत लिहून ठेवला होता. त्यात काही वस्तूंचे भाव वाचून आमची मोठी करमणूक झाली. नारळाची वाटी त्या काळी दोन आण्याला मिळत होती आणि चार रुपयाला कोळशाचे अख्खे पोते भय्या घरपोच आणून देत होता. आता आश्चर्य वाटेल अशा सर्वच वस्तूंच्या किमती होत्या. तरीही नोकरपेशेवाला माणूस महागाईने त्रस्त होता, कारण खर्चाचा आकडा आणि मिळकतीचा आकडा अगदी हातात हात घालून चालत होते. जीवन काटकसरीचे होते, पण आनंदी,  तृप्त होते.
रोज खर्चाच्या त्या यादीत दर दिवशी ‘धर्म’ म्हणून दोन-पाच पैशांची नगण्य, पण हमखास रक्कम नोंदलेली होती. मला आठवले, बरेचदा मी आणि माझ्याबरोबर कधी कधी माझी धाकटी बहीण वडिलांचा हात धरून बाहेर जात असू. रस्त्यात कोणी भिकारी दिसला, की वडील उभे राहात, धोतराच्या कनवटीला लावलेली सुटय़ा पैशांची मोड हातावर काढून घेत आणि त्यातील दोन-चार नाणी त्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवत आणि पुढे जात. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नसत, अगदी निर्विकार चेहऱ्याने ते पुढे चालू लागत. खरं म्हणजे भिकाऱ्याला असे पैसे द्यावेत का? अशाने आपण त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करतो, असेही तत्त्वज्ञान मांडता येईल आणि ते खरेही आहे; पण मला मनापासून वाटते, आपल्यालादेखील न मागताच किती तरी गोष्टी आपल्या लायकीपेक्षा अधिकच मिळत असतात. त्या भीक स्वरूपात नसतील, पण समाजाकडून त्या आपल्याला कुठलीही अपेक्षा न ठेवताच मिळत असतात. आपण त्याला नशिबाचा भागही म्हणू शकू, पण त्या तशा मिळतात ही गोष्ट नाकारता येणार नाही. माझे वडील शिक्षक होते, मासिक पगारात पाच माणसांचा संसार सन्मानाने चालविणे त्या वेळी मोठे कठीण काम होते. तरीही त्याही परिस्थितीत माझे वडील त्यांना शक्य होईल तितकी मदत एका गरीब व्यक्तीला रोज करत होते आणि ते ‘धर्माचे’ म्हणजे ‘माणूसधर्माचे’ काम म्हणून निर्विकारपणे कसलाही गाजावाजा न करता कर्तव्यभावनेने करत होते. हे वाचून मी मनाशी त्या दिवशी ठरविले, आपणही दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातील काही रक्कम गरजू व्यक्तीला औषधपाण्यासाठी वा गरजू विद्यार्थ्यांला शिक्षणासाठी किंवा कुटुंबाने आणि समाजाने नाकारलेल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीसाठी खर्च करायची आणि आज सेवानिवृत्तीनंतरही ती प्रथा मी चालू ठेवली आहे. त्यांच्यासारखी रोज कौटुंबिक खर्च लिहिण्याची शिस्त माझ्या अंगात नाही. त्यासाठी माझी लंगडी सबब अशी असते, की मी कधीही गैरमार्गानी पैसा मिळवला नाही, नीतिमत्ता सोडून कुठलाही व्यवहार केला नाही आणि खर्चदेखील कुठल्याही गैर गोष्टीवर कधीही केला नाही. मग हिशोब ठेवायचा कशाला?
माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना कधीही कसलाही उपदेश केला नाही, कारण माणूस उपदेशांनी नाही, तर जीवनात त्यांनी ठरविलेल्या उद्देशांनी घडतो किंवा बिघडतो, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांचीच ही नीती मी माझ्या कुटुंबात पुढे चालू ठेवली. मी माझ्या मुलांना कधीही कसलाही उपदेश केला नाही. चुकूनही वाईट गोष्टींना प्रोत्साहन दिले नाही आणि गैरवर्तणुकीची भलामण चुकूनही केली नाही.
त्या दिवशी माझा मुलगा, आमच्या फॅमिली डॉक्टरकडे प्रकृती बरी नव्हती म्हणून गेला होता. तेथे एक अत्यंत गरीब रुग्ण आला होता. डॉक्टरांनी त्याच्याशी माझ्या मुलाची ओळख करून दिली. डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले, ‘‘यांच्या वडिलांनी मदत केली म्हणून आपण तुमच्या महाग चाचण्या करून घेऊ  शकलो.’’ हे ऐकताच त्या गरीब माणसाने चटकन माझ्या मुलाचे पाय धरले. माझ्या मुलाने त्याला वर उठवले व म्हणाला, ‘‘अहो बाबा, असं करू नका. आम्ही फार काही केलं असं नाही. आम्ही माणुसकीला जागलो इतकेच. अजून काही मदत हवी असेल तर सांगा, काळजी करू नका.’’ त्या गरीब माणसाच्या डोळ्यांत माझ्या मुलाला वेगळेच भाव दिसून आले. ते भाव लाचार नव्हते, अजून काही मागण्यासाठी याचना करणारे नव्हते, मतलबी वा केविलवाणे नव्हते. ते भाव होते माणसाच्या शोधात असणाऱ्याला, दैवयोगांनी साक्षात माणूस भेटल्याचे. त्यामुळे माझ्या मुलानेही माझ्या ‘मासिक सामाजिक देणे निधी’ योजनेत सहभागी होण्याचे आपणहून ठरविले होते.
वडिलांकडून माझ्याकडे आलेला वारसा माझ्या मुलाकडे आपोआप गेला होता, कारण वारसा ही पुढील पिढीवर सोपविण्याची किंवा पुढील पिढीच्या हातात बळेबळे कोंबण्याची गोष्ट नाही. दुसऱ्या पिढीने पहिल्या पिढीचा आधारासाठी धरलेला हात सुटताना नकळतपणे अगदी अलगद, दुसऱ्या पिढीच्या हातात जाणारी ती माणूसपण जपण्यासाठी मिळालेली ऊर्जा असते. माझ्या मुलाच्या हातात, माझ्या पुढच्या पिढीकडे, नकळतपणे ती माझ्या हातातून हस्तांतरित झाली होती..     
मोहन गद्रे – gadrekaka@gmail.com