News Flash

जगणं बदलताना : डोळे हे जुलमी गडे!

जगणं बदलत असताना अपरिहार्यपणे आपल्या आयुष्याचा भाग झालेल्या  समाजमाध्यमांचा खुसखुशीत भाषेत घेतलेला हा समाचार..

सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने त्यांचं धोरण थोडं लांबणीवर टाकलं असलं तरीही त्याविषयीचे तर्क वितर्क  सुरूच राहणार आहेत.

अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.com

‘व्हॉट्सअ‍ॅप’ची नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’ अर्थात नवं माहिती सुरक्षा धोरण जाहीर झालं आणि घराघरांत, माध्यमांवरही अगदी तीच चर्चा सुरू झाली. आश्चर्य, चीड, निराशा, फसवणूक या भावनांबरोबर काहींना तर त्यानिमित्तानं सततचं चॅटिंग तरी बंद होईल याचाही आनंद झालाय. मात्र सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने त्यांचं धोरण थोडं लांबणीवर टाकलं असलं तरीही त्याविषयीचे तर्क वितर्क  सुरूच राहणार आहेत. जगणं बदलत असताना अपरिहार्यपणे आपल्या आयुष्याचा भाग झालेल्या  समाजमाध्यमांचा खुसखुशीत भाषेत घेतलेला हा समाचार..

‘‘हॅलो.. देशपांडे बोलतायत का?’’

‘‘हो. आपण कोण?’’

‘‘मी गूगल ग्राहक सेवा केंद्राकडून बोलतोय. आपल्या पत्नीचा आज चाळिसावा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा! आपण त्यांना काही सोन्याची वस्तू गिफ्ट देणार असाल तर आमच्याकडे सध्या एक ऑफर..’’

‘‘एक मिनिट.. तुम्हाला कसं माहीत की, माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे?’’

‘‘सर, तुम्ही आमच्याकडे गेल्या वर्षी अंगठी घेतली होती.’’

‘‘तुमच्याकडे?.. काय सांगताय?’’

‘‘जगातील नव्वद टक्के  ‘गोल्ड बिझनेस’वर आमची बारीक नजर असते. त्यामुळे..’’

‘‘समजलं, पण मी सोन्याची खरेदी नाही करणार. धन्यवाद.’’

‘‘गेल्या वर्षी वाढदिवसाला ‘बेलाज’मध्ये डिनरला गेला होतात ना? मग या वेळी तुम्ही ‘एमराल्ड’ टेस्ट करून बघा.’’

‘‘मला काय करायचंय ते कृपा करून मला ठरवू द्या! मी कुठेही जाणार नाहीये.’’

‘‘पण आज घरी काहीच बनवलेलं नाही. आपल्या पत्नी मैत्रिणीकडे जेवायला गेल्या आहेत.’’

‘‘कमाल आहे! तुम्ही काय तिच्या मागे गुप्तहेर लावले आहेत का?’’ देशपांडे अस्वस्थ होऊन खुर्चीतून उठून उभे राहिले होते.

‘‘गुप्तहेर नाही. त्यांनी ‘स्टेटस’ला फोटो टाकले आहेत सर.’’

आता मात्र देशपांडे संतापून ओरडले, ‘‘तुम्हाला दुसरी कामं नाहीयेत का? हद्द झाली यार!’’ त्यांचा वाढलेला आवाज ऐकून ऑफिस बॉय पळत केबिनच्या दारापाशी येऊन थांबला.

‘‘चिडू नका सर. ब्लड प्रेशर वाढलं तर त्रास होईल.. शिवाय आपले नेहमीचे डॉ. साने सध्या युरोप टूरवर आहेत. आपण म्हणाल तर ‘ओझोन हॉस्पिटल’च्या डॉ. केशवानी यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवू?’’

‘‘मला काहीही झालेलं नाहीये.. तुम्ही फोन ठेवा आधी.’’

‘‘पण कालच्या तुमच्या ‘एक्स रे’मध्ये तर नाकाचं हाड वाढलेलं दिसतंय!’’

‘‘काय चाललंय तुमचं? का लोकांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसताय? मी पोलिसात तक्रार करीन तुमच्याविरुद्ध!’’ देशपांडे आता दातओठ खाऊन बोलत होते.

‘‘जर पोलीस स्टेशनला गेलात तर तुमचं मागच्या महिन्यातलं आर.टी.ओ. चलन भरणं बाकी आहे तेवढं भरून या सर. मागच्या महिन्यात सिग्नल तोडला होतात आपण.’’

धाडकन आवाज झाला. देशपांडय़ांनी फोन भिंतीवर फेकून मारल्यानं त्याचे दोन तुकडे झाले होते..

‘‘अहो, काय झालं तुम्हाला? ओरडताय काय? आत्ता चक्क फोन फेकणार होतात.’’ म्हणत वहिनींनी झोपेत बडबडणाऱ्या देशपांडेंना हलवलं. आपण सुरक्षित आपल्या घरात आहोत हे बघून देशपांडेंचा जीव भांडय़ात पडला आणि त्यांनी अतीव प्रेमानं आपल्या मोबाइलला कवटाळलं.

‘‘काय विचित्र स्वप्न पडलं होतं गं..’’

‘‘काढून टाका ते ‘कायप्पा’चं (म्हणजे ‘कसं काय अप्पा’- व्हॉट्सअ‍ॅप! ) खूळ डोक्यातून. त्या झुक्या भाऊजींनी त्यांच्या व्यवसायातला फायदा बघितला. सगळी माध्यमं त्यांचीच. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. तसंही फेसबुक, इन्स्टाग्राम ,स्नॅपचॅटवर आपली सगळी कुंडली असतेच की! परवा फेसबुकवर मोत्यांच्या हाराचं डिझाइन काय बघितलं बाई, माझ्यावर मोत्यांचे दागिने विकणाऱ्या सतरा ब्रँडच्या जाहिराती येऊन आदळल्या. गूगल उघडलं काय किंवा फेसबुक काय, त्याच जाहिराती. आम्हा बायकांना ‘ऑनलाइन खिडकी खरेदी’ (म्हणजे आपलं ‘विंडो शॉपिंग’) करताच येणार नाही का? तरीही कुणी फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमं वापरणं बंद करत आहे का? नाही ना? झोपा आता मुकाट.’’ वहिनींनी त्यांच्यापुरता हा विषय संपवला. आपल्यापैकी अनेकांची अवस्था  देशपांडे दांपत्यासारखीच झालेली आहे.

तन्मयचे आई-बाबा लगेच व्हॉट्सअ‍ॅप ‘उडव’ म्हणून त्याच्या मागे लागले होते. ‘‘व्हॉट्सअ‍ॅपनं त्यांची नीती बदलायची ठरवली म्हणून घाबरणं म्हणजे लहान मुलांबरोबर लपाछपी खेळताना त्यांनी ‘भॉक’ केलं की दचकण्यासारखं आहे. आपल्या नाडय़ा त्यांच्याकडे आहेत हे आपल्याला माहीत नव्हतं, असं म्हणणं वेडेपणा ठरेल. फक्त याआधी आपल्याजवळ  माहितीच्या सुरक्षेचे काही पर्याय उपलब्ध होते आणि आता त्यातील काही उपलब्ध नसतील हा मुख्य मुद्दा आहे.’’ इति तन्मय.

‘‘बापरे!’’

‘‘कसं आहे नं पप्पा, आतापर्यंत आपण बिनधास्त व्हॉट्सअ‍ॅप वापरत होतो, न्हाणीघरात दरवाजा बंद करून स्नान केल्यासारखं. कारण आंघोळ करताना अनेक बाजूंनी कॅमेऱ्यांचे डोळे आपल्याला बघत आहेत हे आपल्याला माहिती नव्हतं किंवा त्यांना दृष्टी नसावी किंवा ते डोळे बंद करून घेतात, असा आपला भोळा समज होता. आधी जाहीर केलेल्या धोरणानुसार त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, सगळे कॅमेरे डोळे रोखून तुमच्याकडे बघणार आहेत. इथे आंघोळ करायची की नाही ते तुम्ही ठरवा!’’

तन्मयची आई मात्र अस्वस्थ होती. ‘‘असं कसं करू शकतात हे? आम्हाला आता इतक्या वर्षांत फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपची सवय लागलीये. दारात रांगोळी काढली की, नवीन साडी नेसली की, काही पदार्थ बनवला की, अगदी झाडाला मिरची लागली तरी व्हॉट्सअ‍ॅपवर लगेच फोटो नाही टाकले की माझं डोकंच दुखतं. आधी सवय लावली आणि आता आपली फसवणूक करत आहेत ते.’’

‘‘हेच! हेच ओळखलं त्यांनी आणि मला सांग आई, आपल्याला फुकटात हे खेळणं किती र्वष द्यावं त्यांनी? ते त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी आपला वापर करणारच. शेवटी फेसबुक काय, इन्स्टाग्राम काय आणि व्हॉट्सअ‍ॅप काय.. त्यांचीच बाळं! याला लगेच फसवणूक नाही म्हणता येणार. त्यांनी का आपला वापर करू नये सांग? इतकंच वाटत होतं, तर का आपण आपलं असं एखादं सुरक्षित अ‍ॅप नाही तयार केलं, ज्यातून आपली माहिती कोणीही चोरून इतरांना विकणार नाही.. अशी आपली सोय आपण का नाही लावली? आज चाळीस कोटींच्या वर भारतीय वेडय़ासारखे ‘कायप्पा’च्या नादी लागले आहेत. आता त्या खेळण्याची चावी त्यांनी परत मागितली म्हणून भोकाड पसरतोय आपण.’’ तन्मय आईला वस्तुस्थिती समजावत होता.

देशपांडेंची भीती किंवा तन्मयचं म्हणणं बरोबरच आहे. समाजमाध्यमं वापरणं ही एक मोठी नशा आहे आणि आपल्याला हवं तसं नाचवण्याची कला ही त्यांची सर्वात मोठी ताकद. भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ, इथल्या माहिती सुरक्षा कायद्यातील पळवाटा, याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलाय. त्यामुळेच त्यांची युरोपमधली नीती वेगळी आहे, कारण तिथे ‘डेटा सिक्युरिटी’साठी मजबूत कायदे आहेत. आज माहिती हे व्यवसायाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं भांडवल आणि हत्यार असताना त्यांनी ही शस्त्रं नाही वापरली तरच नवल. यापुढे  जर व्हॉट्सअ‍ॅप वापरायचं असेल, तर त्यांनी विचारलेली माहिती त्यांना द्यावी लागेल आणि ‘डिलीट’ करण्याआधी आपलं सगळं चंबूगवाळं आवरून ‘तेरी गलियो में ना रखेंगे कदम’ म्हणत अलविदा करावं लागेल. नंतर तसंच दुसरं एखादं ‘सिग्नल’ अ‍ॅपसारखं खेळणं शोधावं लागेल. अन्यथा ‘नंगे से खुदा डरे’ म्हणत गुपचूप जे चाललंय ते चालू द्यायचं. हे करताना आपल्याला ‘ऑनलाइन हायजीन’बद्दल जागरूक राहावं लागेल. ‘ऑनलाइन हायजीन’ म्हणजे काय, तर आपली वैयक्तिक, अतिसंवेदनशील माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर असणार नाही याची काळजी घ्यायची. आपण काय बोलतोय, काय माहिती वितरित करतोय, याचं भान ठेवायचं.

लक्षात घ्या मंडळी, आपण ‘गूगल’वर एखाद्या वस्तूची माहिती शोधली आणि यूटय़ूब सुरू केलं की लगेच त्याच वस्तूची नेमकी जाहिरात कशी समोर येते? तुमच्या जवळपासच्या विक्रेत्यांच्या जाहिराती लगेच दिसतात. कारण तुमचं ठिकाण, तुमची आर्थिक स्थिती, तुमची नेमकी गरज, याचा बारकाईनं अभ्यास करणारे तिथे बसले आहेत. फेसबुक वापरणाऱ्यांची इतकी प्रचंड संख्या आहे की तिथल्या ग्राहकांची  नेमकी गरज ओळखून त्यानुसार जाहिरात समोर वाढली तर किती तरी कंपन्यांना किती प्रचंड मोठा व्यवसाय मिळू शकतो या विचारातून व्हॉट्सअ‍ॅपनं आपली नवीन नीती आखली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त गप्पा मारणाऱ्या मंडळींनी याची फारशी चिंता करण्याची  गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस वापरणाऱ्यांना किंवा व्हॉट्सअ‍ॅपमार्फत ‘पेमेंट’ करणाऱ्यांना या नवीन नियमांचा त्रास होऊ शकतो.

ही अशी सगळी माहिती वाचून सुधा वहिनी काळजीत पडल्या. त्यांनी लगेच लेकीला विचारलं, ‘‘आता व्हॉट्सअ‍ॅप वापरताना मध्ये मध्ये जाहिराती येतील का गं?’’

‘‘ते तसं करू शकतात आई. म्हणजे तुमचा बायकांचा ‘बिझनेस ग्रुप’ आहे नं, त्यात हे होऊ शकतं. कंटाळवाणं वाटू शकतं. याला आमच्या भाषेत ‘डूम ऑफ स्क्रोल’ म्हणतात. हे सगळं ‘टॉक्सिक डाएट’ आहे गं. मेंदूला झिणझिण्या आणणारं डिजिटल खाद्य!’’

‘‘हा तर जुलूमच झाला.’’

‘‘फुकटात सगळं वापरलं नं इतकी र्वष.. त्याची किंमत आहे ही.’’ मागून आलेले बाबा म्हणाले. ‘‘सुधा, त्या झुक्याकडे बघून ते गाणं म्हण नं, ‘डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका’! लगेच सगळे नवीन नियम मागे घेईल तो!’’

‘‘काही तरीच!’’ म्हणत कसल्या लाजल्या वहिनी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:40 am

Web Title: social media become a important part of our life jagana badaltana dd70
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : आम्हा पुरुषांचे ‘प्रांजळ’ मनोगत..!
2 जोतिबांचे लेक : नव्या वाटा रुळवणारा संवादी!
3 गद्धेपंचविशी : स्वप्नांची ‘शोधयात्रा’!
Just Now!
X