सोमणबाई ऑफिसात आलेल्या पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. चेहऱ्यांवरून आश्चर्य ओसंडले. ‘‘अरे, इतक्यात? फक्त चार दिवसच झाल्येत. आजचा पाचवा. कमीत कमी दहाव्वं, तेराव्वं झाल्यावर हवं तरी यायचं..’’ आपापसात कुजबुज सुरू झाली. सोमणबाईंना हे अपेक्षितच होतं. कोणाकडेही न बघता त्या खुर्चीत जाऊन बसल्या. टेबलावरील कागदपत्रे चाळू लागल्या.
ऑफिसातले वातावरण स्तब्ध झाले होते. एरवीची गडबड, गप्पाटप्पा थंड पडल्या होत्या. जो तो आपापल्या कामात गर्क असल्याचे दाखवत असला तरी सोमणांच्या लक्षात येणार नाही, इतक्या सावधगिरीने त्यांच्याकडे विस्मयाने पाहात होता. त्यांच्यातील स्त्री सहकाऱ्यांना राहावत नव्हते. सोमणांच्या टेबलशी जाऊन चार शब्द बोलावेसे त्यांना फार वाटत होते, पण तसे करण्याचा धीर काही होत नव्हता.
तेवढय़ात शिपाई सोमणांच्या टेबलपाशी आला. मॅनेजरसाहेबांनी बोलावल्याचे त्याने सांगितले. हातरुमालाने चेहरा टिपत सोमण उठल्या. मॅनेजरांच्या केबिनकडे निघाल्या.
‘‘आत येऊ का?’’ दरवाजा हलकेच लोटत त्यांनी विचारले.
‘‘या, या,’’ मॅनेजर जठार खुर्चीतून उठले. समोरच्या खुर्चीकडे बोट करत म्हणाले, ‘‘बसा!’’
सोमण खुर्चीत बसल्यावर जठारांनी दिलगिरी व्यक्त केली, ‘‘आय अ‍ॅम एक्स्ट्रिमली सॉरी! फार फार वाईट झालं!’’
सोमणांची मान अजून खालीच होती. त्या काही बोलल्या नाहीत. बोलणे त्यांना शक्य नसल्याचे जठारांच्या लक्षात आले. त्यांनाही पुढे कशी सुरुवात करावी हे सुचेना. टेबलावर दोन्ही हात ठेवीत ते म्हणाले, ‘‘तुमच्या सहकारी काल तुमच्या घरी येऊन गेल्या. मीही एक-दोन दिवसांत तुम्हाला येऊन भेटणार होतो..’’
‘‘नको सर. सांत्वनासाठी कोणी येऊन भेटले की खूप त्रास होतो. काय बोलणार त्यांच्याशी? माझं दु:खं माझ्यापाशी. ‘आम्ही त्यात सहभागी आहेत,’ असं कोणी कितीही म्हटलं तरी ते औपचारिक असतं. इतरांना त्याची झळ कशी लागणार? स्पष्ट बोलते. रागावू नका. भेटायला येणाऱ्या काही जणांची भावना खरीपण असू शकते, पण त्या शाब्दिक मलमपट्टीमुळे दु:ख हलकं होत नाही, तर उलट भळभळतं.’’
‘‘तुम्ही म्हणता ते खरंच आहे. एक प्रथा, निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून समाचाराला जाण्याचा पायंडा पडला आहे. ही रूढी बंद झाली पाहिजे. नाही गेलं तर दखल घेण्याचे टाळलं अशीही समाजात टीका होऊ शकते. पण तशी ती झाली तरी हरकत नाही. पण ही भेटाभेटी नको. येणे-जाणे नको.’’
‘‘ते टाळण्यासाठीच मी आज ऑफिसात आले सर. काल ऑफिसातल्या बऱ्याच जणी घरी येऊन गेल्या, परंतु त्याचा मला मनस्तापच झाला. अगदी संध्याकाळ होता होता सोसायटीतल्या बायका आल्या. मी आत होते. सासूबाईंनी दार उघडलं. पुत्रवियोगाचं त्यांचं दु:ख फारच तीव्र होतं. तरीही त्या आलेल्या महिलांना म्हणाल्या, ‘‘ती आत जरा पडून आहे. मुद्दाम बाहेर बोलावत नाही. मीही बोलण्याच्या स्थितीत नाही. आलात, त्याबद्दल आभारी आहे. तुम्ही येऊन गेल्याचे सांगेन तिला.’’ मुद्दाम समाचाराला आलेला तो ग्रुप निघून गेला.
‘‘अगदी योग्य केलं तुमच्या सासूबाईंनी. भेटायला येणाऱ्या वर्दळीचा भयंकर त्रास होतो. त्यासाठी एक सोपा पर्याय म्हणजे साधं पोस्टकार्ड पाठवणं. ‘आपल्याकडलं दु:खद वर्तमान कळलं. प्रत्यक्ष येण्यापेक्षा पत्राद्वारे आमच्या सहसंवेदना व्यक्त करतो आहोत. नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. घडलं ते सहन करण्यास परमेश्वराने आपणास शक्ती द्यावी ही प्रार्थना,’ एवढं त्यात लिहिलं तरी पुरे. फोन वगैरे मात्र नको. कारण ते म्हणजेही बोलणंच. त्याचादेखील त्रास होतो. कारण संभाषण थोडक्यात थांबत नाही.’’
सोमण ऐकत होत्या. पण चार दिवसांआधीचा तो भयानक प्रसंग त्यांच्या दृष्टीसमोरून हलत नव्हता. त्यांचे यजमान स्कूटरवरून जात होते. ट्रकने त्यांना उडवले. जागच्या जागी ते गेले. त्यानंतर पोलीस केस झाली. जाबजबाब घेण्यात आले. पोस्टमार्टम झाले. सोमणबाईंची तर शुद्ध हरपली होती. पण सावध झाल्याक्षणी त्यांना सासू-सासऱ्यांची आठवण झाली. पाहता पाहता त्यांचा एकुलता एक मुलगा कायमचा नाहीसा झाल्याने ती दोघं पार हादरून गेली होती. कोणी कोणाची समजूत घालायची? घरात उरलेली ही तीन माणसं अबोलपणे एकत्र बसून होती. तिघांच्याही आयुष्यातला तो काळाकुट्ट दिवस!
त्यानंतरच्या चार दिवसांत सोमणबाईंनी प्रयत्नपूर्वक मन आवरलं. नुसतं विषण्णपणे विचार करत बसण्यापेक्षा कामावर जावं म्हणजे मन गुंतून राहील, अशा अपेक्षेने त्या ऑफिसात आल्या होत्या. त्यांच्या भावनांशी सहमत होऊन जठार जे बोलत होते, वेगळं काही सांगत होते. त्यामुळे त्यांना काहीसं हलकं वाटू लागलं.
स्वत: जठारही असह्य़ अशा दु:ख-संकटातून गेले होते. त्यांची पत्नी सहा महिन्यांआधी निवर्तली होती. त्याआधी दोन वर्षे कर्करोगाने आजारी होती. तो काळ जठारांना फार फार कठीण गेला. अडीच वर्षांची मुलगी होती. तिचेही बघावे लागत होते. कसलीही कुरकुर न करता ते आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडत होते.
‘‘सांत्वनाला येणाऱ्यांचं काही खरं नसतं,’’ जठार सांगत होते, ‘‘विमला गेली त्यावेळी ऑफिसमधील सर्व जण एकदा नव्हे तर दोन दोन वेळा समाचाराला माझ्या घरी आले होते. त्याशिवाय इतर नातेवाईकांचा व परिचितांचा ओघ सतत सुरूच होता. पत्नी गेल्याचे दु:ख विसरायला बघावे तर सांत्वनांच्या मलमपट्टय़ांमुळे जखम अधिक चिघळत होती. मनस्ताप वाढत होता. एकूणच या सांत्वन व्हिजिट्स बंद झाल्याच पाहिजेत.’’
जठारांनी चहा मागवला. ‘‘नको, खरच नको,’’ खुर्चीतून उठून सोमण उभ्या राहिल्या.
‘‘बसा. अशा जाऊ नका. चहा घ्या. काही बिघडणार नाही. तुम्ही आता ऑफिसातील कामाला सुरुवात करणार आहात ना, मग फ्रेश राहायला नको? अ‍ॅबनॉर्मल घडलं त्याने हताश होऊन बसण्यापेक्षा पुन्हा नॉर्मल लाइफ सुरू ठेवलं पाहिजे.’’
आणि खरंच. चहा घेतल्यावर त्यांना बरं वाटलं. त्याहीपेक्षा जठारांनी सहानुभूतीने जो सहज संवाद साधला. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. जठारांना ‘थँक्स’ म्हणत त्या आपल्या जागी परत आल्या. टेबलावरील कागदपत्रे त्यांनी पुढे ओढली.
सांत्वनाला किंवा विचारपूस करायला येणाऱ्या अनेकांना कसं टाळावं हाही कित्येकांसमोर उभा रहाणारा प्रश्न. प्रभाकर दामलेंना कसलंस दुखणं झालं. जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते अ‍ॅडमिट झाले. तेथल्या डॉक्टरांना बरोबर निदान करता आलं नाही. चुकीची ट्रिटमेंट दिली गेली. त्यामुळे दुखणेही बळावत गेले. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यासाठी दामल्यांच्या मुलाने डॉक्टरांकडे डिसचार्ज मागितला. पण डॉक्टर देईनात. उलट आधी अ‍ॅडव्हान्स म्हणून जमा केलेली मोठी रक्कम असूनही आणखी मोठे बिल दिले. ते भागवल्यावर मुलाने डॉक्टरांनी त्यावेळपर्यंत दिलेली ट्रिटमेंट व औषधयोजना यांची फाइल मागितली. कारण वडिलांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यावर तेथील डॉक्टरांना ती मेडिकल फाइल अभ्यासून पाहाणे आवश्यक होणार होते. पण येथील डॉक्टर फाइल देईनात. मुलगा चांगलाच भडकला. त्याने ती फाइल सरळ ताब्यात घेतली व गाडीतून वडिलांना नव्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी फाइल पाहिल्यावर चुकीचे निदान आणि त्यामुळे चुकीची औषधे व ट्रिटमेंट दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण प्रोफेशनल सिक्रेट म्हणून ते काही बोलले नाहीत. त्यांनी योग्य ती उपाययोजना सुरू केली. दामलेंना उतार पडला. पण अंडर ऑब्झर्वेशन म्हणून त्यांना आणखी १४ दिवस त्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची वेळ आली. आधीच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांच्यावर कोर्टात केस दाखल करण्याचे मुलाने ठरविले.
दामल्यांना ओळखणाऱ्यांसाठी हा भलताच इंटरेस्टिंग एपिसोड होता. त्यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी बरेच जण हॉस्पिटलमध्ये येऊ लागले. पण दामल्यांच्या मुलाने रिसेप्शनिस्टला सांगून जवळच्या नातेवाईकांखेरीज इतर कोणालाही भेटण्यास परवानगी न देण्याबद्दल बजावून ठेवले. त्याचा चांगला परिणाम झाला. चौदाऐवजी दहाव्या दिवशीच दामल्यांना डिसचार्ज मिळून घरी येता आले!
कोणी प्रेमभंगामुळे आत्महत्या केली, कोणाच्या घरी चोरी होऊन त्याचं सर्वस्व लुटलं गेलं, सासरच्या छळामुळे कोणाची मुलगी माहेरी परत आली, कोणाचा घटस्फोट झाला, यू.पी.एस.सी. परीक्षेत निश्चित पास होण्याची खात्री असलेल्या उमेदवाराला अपयश आले, अशा एक ना अनेक कारणांच्या निमित्ताने सांत्वनार्थ गाठभेट घेण्यास येणाऱ्यांमध्ये निरनिराळ्या वृत्ती प्रवृत्तींची मंडळी असतात. काही अडचण असली तर सांगा अशीही साखरपेरणी कधीकधी केली जाते.
एका व्यापाऱ्याला धंद्यात खोट आली. ते कळल्यावर नक्राश्रू ढाळणारा एक ‘हितचिंतक’ मित्र त्याच्याकडे आला. ‘काही प्रॉब्लेम असला तर सांग’ म्हणाला. तो धंदेवाला फटकळ स्वभावाचा होता. त्याने विचारले, ‘खरंच तू मदत करू शकशील?’ इथे प्रश्नकर्ता वरमला. त्याला अशा उलट प्रश्नाची अपेक्षा नव्हती. पण बोलून ‘चुकला’ असल्यामुळे होकारार्थी मान हलवणे त्याला भाग पडले. ‘तर मग दे मला उसनवार पन्नास हजार. दोन महिन्यांत व्याजासह परत करीन’ व्यापाऱ्याने मागणी केली. त्यावर मित्राचे, ‘त.त.प.प.’ सुरू झाले. व्यापाऱ्याला हे माहीतच होते. मित्र आता जास्त वेळ थांबणार नाही याचीही त्याला कल्पना होती. आणि तसेच झाले!
म्हणूनच निरक्षीरविवेकाने आपत्कालीन समाचारास जावे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे आणि असे कोणी आल्यास त्याला एन्ट्री द्यावी की नाही, हे ज्याच्याकडे येणे होते त्याने ठरवावे. मात्र काही अभ्यागतांची खरोखरीच काही कन्स्ट्रक्टिव्ह करण्याची इच्छा असू शकते. त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना अवश्य ‘वेलकम’ करावे.
   सुरुवातीला उल्लेख केलेल्या सोमणबाईंचे गृहचित्र, त्यांच्या खऱ्या हितचिंतकांच्या कृतिशील सहाय्यामुळे दोन वर्षांत पूर्णपणे पालटून गेले.
आता सोमण सौ. जठार झाल्या आहेत. अकाली पितृवियोग झालेली जठारांची कन्या पाच वर्षांची झाली आहे. तिला नुकताच भाऊ मिळाला आहे. आधीच्या लग्नात सोमणांना अपत्ययोग नव्हता. ती त्यांची इच्छा आता फलद्रूप झाली आहे. जठारांना पुत्रलाभ झाला. त्याशिवाय त्यांना अनुरूप सहचारिणी मिळाली. परस्परांचे सुखी व तृप्त जीवन सुरू झाले. दोघांच्या नोकऱ्या सुरू आहेत. फक्त आता जठार सोमणांचे बॉस नाहीत. सीनियर मॅनेजर म्हणून त्यांची दुसऱ्या ब्रँचमध्ये नियुक्ती झाली आहे. सौ. जठारही आता त्यांच्या आधीच्या ऑफिसात नाहीत. त्यांचीही ब्रँच ऑफिसात बदली झाली आहे, पण ती जठारांची ब्रँच नाही. जवळचीच पण तिसरी ब्रँच!
सांत्वन हवं ते नुसतं शाब्दिक नको, औपचारिक नको, तर कृतिशील हवं. सोमण व जठार या दोघांसारखं!    
chaturang@expressindia.com

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव