मुग्धा बखले-पेंडसे

शुभांगी जोशी-अणावकर

Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Lok Sabha election 2024
राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक; नेमकं प्रकरण काय?

Jayjaykar20@gmail.com

‘‘आजकाल सगळ्यांना आय.टी.मध्ये नोकरी करायची असते. परदेशात शिकायला, नोकरी करायला जायचं असतं. त्यामुळे इंग्रजी माध्यमाची ओढ कमी होईल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी भाषेचा दर्जा वाढवणे, दहावीपर्यंत मराठी अनिवार्य विषय ठेवणे अशा गोष्टी करायला हव्यात. दहावीपर्यंत मराठी अनिवार्य विषय म्हणून शिकवली, तर मुलांना मराठी साहित्याशी अधिक ओळख आणि भाषेशी जास्त जवळीक निर्माण होईल. त्यांना आपल्या भाषेचा अभिमान, प्रेम पाहिजे, त्यांनी आपल्या पाल्यांनाही भाषेची गोडी वाटावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.’’

सोनाली पोंक्षे वायंगणकर ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’मध्ये पदाधिकारी असून सध्या मध्य प्रदेशात ‘महिला अर्थ विकास संघटने’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त आहेत. त्यापूर्वी त्यांनी नाशिक, जबलपूर, भिंड इत्यादी ठिकाणी जिल्हाधिकारी, आदिवासी विकास आयुक्त, ‘यशदा’च्या (राज्य सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था) उपमहासंचालक अशी विविध पदे भूषवली आहेत. २०११ मध्ये त्यांना नवीन कल्पना राबवून अंगणवाडय़ांच्या सुधारणेत प्रशंसनीय काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे .

सोनाली मूळच्या पुण्याच्या. त्यांचं तिसरीपर्यंतचं शिक्षण सोमण प्राथमिक शाळेत आणि त्यानंतर दहावीपर्यंत हुजुरपागा शाळेत झालं. त्या दहावीच्या गुणवत्ता यादीत १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. नॅशनल टॅलेंट सर्च शिष्यवृत्तीच्याही त्या मानकरी होत्या. बारावी झाल्यावर त्यांनी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीयिरगला प्रवेश घेतला आणि सुवर्ण पदकासहित पदवी मिळवली. त्यानंतर सोनालींनी ‘टेल्को’ कंपनीत काम करत असतानाच ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’ची परीक्षा दिली. त्यात त्या देशभरातून विसाव्या आणि महाराष्ट्रातून पहिल्या आल्या. त्यानंतर वर उल्लेखिल्याप्रमाणे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. या यशस्वी वाटचालीत मराठी भाषेतून शिकल्यामुळे काही अडचणी आल्या का आणि त्यावर त्यांनी कशी मात केली हे जाणून घ्यायला आम्ही त्यांची भेट घेतली.

प्रश्न  : सोनाली, इंग्रजीशी ओळख कधी झाली? सुरुवातीला काही दडपण आलं होतं? ते दूर  करायला काही विशेष प्रयत्न केले का?

सोनाली : इंग्रजी तिसरी भाषा म्हणून पाचवीमध्ये शिकवायला सुरुवात झाली. हिंदीही शिकायला सुरुवात झाली होती. दडपण वगैरे काही नाही, उलट खूप उत्साह वाटायचा  नवीन भाषा शिकायला मिळत होत्या त्याचा, आपण इंग्लिश बोलतो आहोत त्याचा. सुदैवाने आम्हाला चांगल्या शिक्षिका मिळाल्या होत्या. म्हणजे इडियम्सचा वापर, इंग्रजी निबंध यावर त्यांनी विशेष भर दिला. शिवाय त्या बोर्डात आलेल्या विद्याíथनींचे निबंध वाचून दाखवत असत. त्याचाही फायदा झाला. एकूण आमच्या शाळेचं शैक्षणिक वातावरण आणि समíपत शिक्षक यामुळे विषयांची भीती कधी वाटली नाही.

प्रश्न: आठवीत गणित, शास्त्र इंग्रजीत सुरू झाल्यावर कठीण गेलं का?

सोनाली : हो, आठवीत थोडं जड गेलं. तरी आमच्या बाई इंग्रजीतून शिकवल्यावर थोडंसं मराठीतूनही शिकवायच्या. गणितात तुम्ही समीकरणं वगैरे सोडवत जाता, मराठी, इंग्लिश काही फार फरक पडत नाही. पण शास्त्रात तुम्हाला स्पष्टीकरणं लिहायला लागतात, ते जड  गेलं. मला आठवतं, पहिल्या जीवशास्त्राच्या चाचणीत मला चाळीसापैकी २४ गुण मिळाले. इतके कमी गुण मला कधीच मिळाले नव्हते.

प्रश्न : मग तुम्ही त्यावर मात कशी केली?

सोनाली : मला जीवशास्त्रच कठीण जात होतं. नंतर लक्षात आलं की फक्त आमच्या तुकडीला हे विषय इंग्रजीमधून शिकवले जात होते. बाकी तुकडय़ांमध्ये मराठीतून शिकवले जात. मग मी दुसऱ्या तुकडीतल्या एका मत्रिणीकडून तिचं जीवशास्त्राचं पुस्तक आणलं. मग माझ्या पुस्तकातून इंग्रजीतून धडा वाचायचा आणि मग तिच्या पुस्तकातून मराठीतून धडा वाचायचा असं मी केलं. त्यामुळे विषय नीट समजला. मग राहिलं इंग्रजीतून उत्तर देणं ते सरावाने येतं, पण विषय समजणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे सगळं झालं तरी मी कुठलाही क्लास लावला नव्हता. माझा मीच अभ्यास करून, मराठी पाठय़पुस्तक वाचून त्या अडचणींवर मात केली. विषय लक्षात आल्यावर हळूहळू इंग्रजीतून उत्तर लिहायची सवयही झाली. नववीमध्ये तर काहीच त्रास झाला नाही.

प्रश्न : त्यानंतर फग्र्युसन कॉलेजला सायन्सला तुम्ही गेलात.

सोनाली : हो, पण तोपर्यंत आमचा पाया चांगला भक्कम तयार झाला होता. शिवाय सायन्स विषयात तुम्हाला फक्त शास्त्रीय संज्ञा (टर्मिनॉलॉजी) आली की पुरते. त्यामुळे एन.टी.एस. ची परीक्षाही मी इंग्रजीतूनच दिली आणि मला ती शिष्यवृत्ती मिळालीही.

प्रश्न : म्हणजे शिकण्याचा दृष्टीने तुम्हाला कोणीच तोटा झाला नाही, पण मित्र-मत्रिणी, विशेषत: इंग्रजी माध्यमातून आलेल्या, अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या, त्यांच्याबरोबर बोलताना न्यूनगंड आला का?

सोनाली : हो, असं वाटलं मला थोडंसं. काय आहे, पहिल्यापासून इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना इंग्रजी बोलण्याचा अनुभव जास्त असतो. आपल्याला तो अनुभव फारसा किंवा अजिबातच नसतो. त्यामुळे आपण जरा घाबरतच बोलतो. शिवाय चूक झाली की आपल्यालाच जास्त जाणवतं इतरांपेक्षा. त्यामुळे थोडा न्यूनगंड, थोडी मागे मागे राहायची प्रवृत्ती होते. इंग्रजी माध्यमातील मुलंसुद्धा बोलताना सर्रास चुका करतात, पण प्रचंड आत्मविश्वासाने बोलत असतात. आपल्यालाही ते शिकायला पाहिजे. आपल्या चुका होतील म्हणून घाबरून बोलायचं नाही, असं नाही करायचं. मराठी माध्यमातून शिकल्याचा न्यूनगंड आयुष्यभर बाळगावा इतकं काही इंग्रजीचं महत्त्व नाहीये. तसं बघितलं तर हाय-फाय इंग्रजी रोजच्या जीवनात लागतही नाही. कोणा इतर भाषिकाने मराठीचे दोन शब्द बोलले की आपण कोण कौतुक करतो! मग आपण आपली मातृभाषा नसलेली इंग्रजीसारखी भाषा बोलताना न्यूनगंड का बाळगावा? शेवटी संवाद महत्त्वाचा, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकतो हेच खूप आहे, नाही का?

प्रश्न: हो, खरंय, अगदी पटतं मला. मग कॉलेजमध्ये सेमिनार, तोंडी परीक्षा वगैरे देताना कसं वाटलं?

सोनाली : फग्र्युसन कॉलेज, इंजिनीयअिरग कॉलेजमध्ये किंवा यू.पी. एस. सी.च्या परिक्षांमध्ये,  शास्त्रीय विषयांवर लिहिताना मला काही त्रास झाला नाही. पण समाजात चालू घडामोडींवर निबंध लिहायची वेळ आल्यावर मात्र वाटलं की आपला शब्दसंग्रह मर्यादित आहे. यू.पी.एस.सी. परीक्षेसाठी मी मुद्दाम इंग्रजी वर्तमानपत्रे वाचून इंग्रजीची सवय केली, शब्द संपदा वाढवली.

प्रश्न: आजकाल पालकांना सारखी चिंता असते की मराठी माध्यमामुळे आपल्या मुलांचा किती तोटा होईल, ती मागे पडतील वगैरे, तर तुमच्या उदाहरणावरून ही भीती किती अनाठायी आहे हेच सिद्ध होतंय.

सोनाली : माध्यमापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे कष्ट घ्यायला तयार आहात आणि यश मिळवण्यासाठी किती समíपत आहात यावर तुमचं यश अवलंबून असतं. पुढच्या टप्प्यात तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात, तुम्हाला भाषा येते का हे अगदी गौण मुद्दे होतात. तुमची बुद्धी आणि कष्टांची जोड यावर  तुमचे यश अवलंबून असते. आणि त्यावर तुम्हाला नवीन भाषा शिकता येतात आणि नवीन आव्हाने झेलता येतात.

प्रश्न : मग आता मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं, मराठी माध्यम, सेमी-इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यम यावर तुमचं काय मत आहे?

सोनाली : खरं तर इतक्या वर्षांचा विचार केला तर माध्यमामुळे काही फारसा फरक पडला नाही असं वाटतं मला. सेमी-इंग्रजीची संकल्पनाही चांगली आहे. आठवीत थोडासा त्रास झाला पण तो अगदीच थोडा वेळ आणि नगण्य. एक गोष्ट मात्र मला जाणवत असे की आपली शब्दसंपदा कमी पडते. पण तो काही माध्यमाचा दोष नाही.  ती जाणीवपूर्वक प्रयत्न करून वाढवू शकतो.

प्रश्न : आजच्या मराठी  इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या दर्जामध्ये फरक आहे असं वाटतं का?

सोनाली : दर्जामध्ये फरक आहे की नाही त्याबद्दल साशंक आहे. आमच्या वेळेला बहुतेक हुशार मुलं मराठी माध्यमातूनच बाहेर पडायची असं मला वाटतं. त्यामुळे माध्यमामुळे काही न्यूनत्वाची भावना आमच्या मनात नव्हती. अलीकडे बहुतेक पालकांना आयसीएससी, सीबीएससी किंवा आयबी बोर्डाच्या शाळा हव्या असतात आणि त्या इंग्रजी माध्यमाच्याच असतात.

प्रश्न:  हे बोर्ड मराठी माध्यमात आणणं शक्य आहे असं वाटतं का?

सोनाली :  इतक्या सगळ्या राज्य भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरित करणे हे मोठंच काम होऊन बसेल. आणि आजच्या काळात आपण बघतोय की पालकांचा ओढा आहे इंग्रजी माध्यमाकडे. त्यामुळे स्थानिक भाषांमधून शिकायला फारशी मागणी नसणार. मागणी असल्याशिवाय इतकं मोठं काम कोण हाती घेणार? आणि कशासाठी?

प्रश्न: आता थोडंसं जरा तुमच्या पालकांच्या विचारसरणीबद्दल विचारते. कारण सत्तर- ऐंशीच्या दशकात हळू हळू इंग्रजी माध्यमाचं लोण आपल्याकडे पसरायला लागलं होतं. मग तुमच्या पालकांनी तुम्हाला मराठी माध्यमात घालताना काय विचार केला?

सोनाली : आमच्या आजूबाजूची काही मुलं जात होती ना इंग्रजी माध्यमात. पण आमच्या आईवडिलांनी विचार केला की मराठी शाळेत शिकताना अडचणी आल्या तर आम्ही मदत करू शकतो. ते जास्त महत्त्वाचं वाटलं त्यांना.

प्रश्न : आता तुमच्या मुलांबद्दल थोडंसं.. तुम्ही महाराष्ट्राबाहेर राहता, त्यामुळे आणि बदलीच्या नोकरीमुळे मुलांना इंग्रजी माध्यमात घालणं जरूर आहे. बाहेर व्यवहारात हिंदी भाषा.. मग तुम्ही मुलांची मराठीशी नाळ कशी टिकवून ठेवता?

सोनाली : अगदी छान प्रश्न आहे. मराठीतून शिकल्यामुळे आपला समृद्ध मराठी साहित्य आपल्याला सहज उपलब्ध होतं. पण इंग्रजी माध्यमातून शिकताना ते जरा कठीण होतं. आम्ही घरी जरी मराठीच बोलत असलो तरी ती बोलीभाषा पडते. म्हणून मुली लहान असताना आम्ही रोज त्यांना एक मराठी गोष्ट वाचून दाखवायचो. मध्यंतरी आम्ही मुद्दाम महाराष्ट्रात नेमणूक करून घेतली. त्यामुळे शाळेत माझ्या दोन्ही मुलींना तिसरी भाषा म्हणून मराठी घेता आली आणि भाषेशी थोडी औपचारिक ओळख झाली. आम्ही मराठी वृत्तपत्र घेतो. त्यात छान लेख असेल तर त्यांना मोठय़ाने वाचायला लावतो आणि सगळे एकत्र बसून तो ऐकतो.

प्रश्न : अरे वा! फार छान! मग आता महाराष्ट्रातील पालक मराठी माध्यमाकडे वळतील का, किंवा त्यासाठी काही विशेष प्रयत्न करता येतील का?

सोनाली : आजकाल सगळ्यांना आय. टी.मध्ये नोकरी करायची असते, परदेशात शिकायला, नोकरी करायला जायचं असतं. त्यामुळे इंग्रजी माध्यमाची ओढ कमी होईल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी भाषेचा दर्जा वाढवणे, दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य विषय ठेवणे अशा काही गोष्टी कराव्यात. सध्या मराठी आठवीपर्यंत असते. पण अजून दोन वर्षे अनिवार्य विषय म्हणून शिकवली, तर मुलांना जरा मराठी साहित्याशी अधिक ओळख आणि भाषेशी जास्त जवळीक निर्माण होईल. पालकांनीसुद्धा मुलांना मराठी नाटके दाखवणे वगैरे गोष्टी जाणीवपूर्वक करायला पाहिजे. त्यांना आपल्या भाषेचा अभिमान, प्रेम पाहिजे, त्यांनी आपल्या पाल्यांनाही भाषेची गोडी वाटावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यांना मराठी आणि अनुवादित पुस्तकं वाचायला देता येतील. तुम्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालता, त्यांना त्या भाषेवर त्या भाषेत बोलता यावं म्हणून क्लास लावता पण आपली स्वत:ची भाषा नाही आली तरी चालेल हा दृष्टिकोन बरोबर नाही. ‘आमच्या मुलांना नं मराठी येत नाही,’ असं जर पालकच काहीशा अभिमानाने सगळ्यांना सांगत असतील तर मुलांनाही त्यात भूषण वाटणार. मग ती कशाला प्रयत्न करतील त्या भाषेत बोलायचं, वाचायचा? त्यापेक्षा अभिमानाने सांगायला पाहिजे की ‘इंग्रजी माध्यमात गेली तरी मराठी पुस्तकसुद्धा वाचतात आमची मुलं!’

प्रश्न : आता शेवटचा प्रश्न, मराठीतून शिकल्याने काय गमावलं आणि काय कमावलं?

सोनाली : गमावलं तर काहीच नाही. पण कमावलं खूप. म्हणजे मराठी साहित्य, संस्कृतीशी जास्त जवळून ओळख झाली. आपले सण, ते साजरे करण्याची कारणं, कसे साजरे करायचे वगैरे गोष्टी आम्ही शाळेत शिकलो. संस्कार अधिक दृढ झाले. त्यासाठी आमच्या शाळेला खूप श्रेय द्यायला हवे. ही संस्काराची शिदोरी मला आयुष्यभर पुरणार आहे.