01 October 2020

News Flash

सांगड सामाजिक भान आणि फॅशनची

फॅशन, पॅशन आणि सामाजिक भान याची उत्तम सांगड घालणाऱ्या मुंबईच्या सोनिया अगरवाल हिची ही प्रेरणादायी कथा. निव्वळ एक कल्पना ते सुप्रसिद्ध फॅशन ब्रँड हा तिच्या

| July 11, 2015 01:01 am

ch13फॅशन, पॅशन आणि सामाजिक भान याची उत्तम सांगड घालणाऱ्या मुंबईच्या सोनिया अगरवाल हिची ही प्रेरणादायी कथा. निव्वळ एक कल्पना ते सुप्रसिद्ध फॅशन ब्रँड हा तिच्या ‘व्हाईटनीफ’चा प्रवास, त्यातील आव्हाने व पर्यावरण संवधर्नासाठी उचललेले एक पाऊल अशी ही रंजक वाटचाल.
भा रतातच नव्हे तर परदेशातही पारंपरिक उंची सौंदर्याचे प्रतीक मानले गेलेले हस्तिदंत पूर्वापार आपल्यावर भुरळ पाडत आले आहेत. मात्र हस्तिदंतासाठी हत्तींच्या शिकारी होऊ लागल्या आणि हस्तिदंतांच्या व्यापारावर बंदी घातली गेली. म्हणूनच हस्तिदंतासारख्या कोरीव कलाकृती, अगदी हुबेहुब प्रतिमा तयार करण्याचा फॉम्र्युला विकसित करता आला तर.. असा पठडीबाहेरचा विचार करत फॅशन आणि उद्योग यांची सांगड घालणाऱ्या मुंबईच्या सोनिया अगरवाल या तरुणीच्या उद्योगाची सुरुवात तितकीच हटके झाली.
खरं तर हस्तिदंतावर केले जाणारे नाजूक, कलात्मक कोरीव काम म्हणजे आपल्या पारंपरिक कलेचा वारसा. पण या मौल्यवान हस्तिदंतासाठी हत्तींची अमानुष कत्तल केली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस हत्तींची संख्या कमी कमी होऊ लागली. हे पाहता भारतात, १९७२ साली वन्यजीव संरक्षक कायदा करण्यात आला, ज्यायोगे हस्तिदंताच्या विक्रीवर निर्बंध आले. मात्र मागणी असल्यामुळे हस्तिदंताची विक्री अवैधपणे होतच राहिली. अगदी आजही हस्तिदंताची ही तस्करी चालू आहे. म्हणूनच सोनियाचा आगळावेगळा शोध हा तिच्या उद्योजक नजरेचा आश्वासक आविष्कार मानला पाहिजे.
हस्तिदंताप्रमाणे दिसणारा व जवळपास ८९ टक्के त्यासारखाच गुणधर्म असणारा एक कृत्रिम पदार्थ सोनियाने हेरला व त्यावर हस्तिदंतासारखे कोरीव काम करता येते का याचा पाठपुरावा केला. या पदार्थाचे नाव ‘इल्फ’ असून युरोपातील जर्मनीमध्ये हा पदार्थ तयार केला जातो. मात्र योगायोगाने त्या पदार्थाबद्दल सोनियाला माहिती मिळाली व कल्पकतेने याचा वापर हस्तिदंती दागिने, शोभेच्या वस्तू व गृहसजावटीचे आलिशान फर्निचर वगैरे करण्यासाठी होऊ शकतो हे तिने पारखले व तात्काळ या पदार्थावर प्रक्रिया करण्याचे पेटंट घेऊन टाकले. हा खटाटोप केला तेव्हा सोनियाचे वय होते अवघे २३ वर्षे. मात्र मुळातच कला आणि फॅशनच्या दुनियेत काही आगळेवेगळे करण्याचा तिचा मानस होता, जो यामुळे यथावकाश पूर्ण झाला. आता हस्तिदंती वस्तूंचा लक्झरी बँड म्हणून तिची कंपनी नावारूपाला येत आहे.
सोनियामध्ये सळसळता उत्साह लहानपणापासूनच ठासून भरलेला. ‘व्हाईटनीफ’ ही हस्तिदंताला पर्याय देणारी स्वतची स्वतंत्र कंपनी सुरू करण्यापूर्वीही ती वडिलांच्या कंपनीत काम करायची. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षांपासून ती वडिलांसोबत कंपनीत जात असे व त्यांच्यासह छोटय़ा-मोठय़ा बैठकांना हजेरी लावत असे. एसी नेल्सनमध्ये तिने रिसर्चर म्हणून काम पाहिले आहे, तर कॉलेजला असताना एका वृत्तवाहिनीसोबत पत्रकार म्हणूनही तिने काम केलंय. शिवाय ‘व्हाईटनीफ’ स्थापन केली तेव्हा फ्रेशमेंटर्स या कंपनीची ही सहसंस्थापक होती. तिला फॅशनमध्येही खूप रस होता. त्यामुळे एक्सेसोराइज, नॉटिका या नामांकित ब्रँडसोबतही तिने काम केले आहे. ‘मला तर शाळेत असल्यापासूनच स्वतंत्र उद्योग करावा असे वाटे, पण ch12पदवी हातात हवी म्हणून रीतसर शिक्षण पूर्ण केले अन्यथा रुटीन शिक्षणाचा मला कंटाळाच आला होता’ असे ती म्हणते.
पण ‘इल्फ’चा शोध तिला योगायोगाने लागला. तिला निसर्गाची उपजत ओढ. म्हणूनच पर्यावरण संवर्धनासाठी काही ठोस करावे यासाठी ती आग्रही होती. दिल्लीच्या एका प्रयोगशाळेत चामडय़ाप्रमाणे दिसणारे हुबेहूब कातडे तयार करण्याच्या प्रकल्पात ती व्यग्र होती. पर्यायी चामडे तिने शोधलेही, त्याच्या विविध चाचण्या सुरू होत्या. त्याचवेळी योगायोगाने तिला युरोपातील ‘इल्फ’बद्दल माहिती मिळाली. ‘इल्फ’ या पदार्थाच्या शोधाचं पेटंट असणाऱ्या कंपनीने याचा उपयोग फक्त आलिशान फर्निचर बनवण्यासाठी करण्याचे योजले होते. पण हा पदार्थ अगदी हस्तिदंतासारखा दिसतो आणि म्हणूनच कृत्रिम हस्तिदंत म्हणून याचा वापर होऊ शकतो हे सोनियाने हेरले. शिवाय भारतात हस्तिदंताची होणारी अवैध तस्करीही हत्तींच्या जिवावर उठल्याचे तिच्या वाचनात होतेच. मग कुठलाही विलंब न करता तिने याचे पेटंट घेतले व पुढच्या कामाला लागली.
नुसता हस्तिदंताला पर्याय शोधून उपयोग नव्हता, जे कारागीर हे कोरीव काम करतात, त्यांच्यापर्यंत ‘इल्फ’ पोहोचवणे, त्यांना ‘इल्फ’बद्दल तितकाच विश्वास वाटणे गरजेचे होते. त्या आघाडीवरही सोनियाला खूप मेहनत घ्यावी लागली. ‘इल्फ’ आपल्या कसोटय़ांवर उतरते की नाही, हे तिने आधी रीतसर तपासून घेतले. मग तिने राजस्थान, गुजरात व केरळमधील हस्तिदंतावर कोरीव काम करणाऱ्या कुशल कारागीरांचा शोध घेतला व कामाला सुरुवात केली. नोव्हेंबर २०१२ साली तिच्या ‘व्हाईटनीफ’ कंपनीने देशभरातल्या विविध भागातल्या ८० कारागिरांशी करार केला. तिने कसून एक वर्षे हे कारागीर, त्यांच्या समस्या व त्यांची कला याचा जवळून अभ्यास केला. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिने खास अस्खलित लहेजा असणारी हिंदी शिकून घेतली.
‘इल्फ’ हा नैसर्गिक हस्तिदंतासाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्यावर तितक्याच सूक्ष्मतेने व कलाकुसरीने नक्षीकाम करता येते. शिवाय ‘इल्फ’वर रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे विघटन होण्याचा वा हस्तिदंताप्रमाणे ऱ्हास होण्याचा कोणताही धोका नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हस्तिदंतांच्या १० टक्के कमी किमतीत ‘इल्फ’ आपल्याला उपलब्ध होते. ‘इल्फ’चा पोत, त्याची चकाकी, वजन आणि घनता हे सारेच गुणधर्म ‘इल्फ’चं महत्त्व वादातीत असल्याचा पुरावा देतात, असे सोनिया सांगते. त्यावर अगदी ०.१ मिलिमीटरचं अचूक नक्षीकाम यावर करता येतं.
अल्पावधीत तिच्या ‘व्हाईटनीफ’ या कंपनीला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांचे मेणबत्ती स्टँड, आकर्षक दागिने व खिडकीच्या जाळीदार नक्षीच्या फ्रेम्स कलासक्त चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या. मग सोनियाने या पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी कल्पक डिजायनर्सची टीम नेमली. त्यांच्याकडून काही नव्या कल्पना घेत, नव्या-जुन्याचा सुरेख मेळ साधत २०१४ मध्ये ‘आर्ट विथ एलिगन्स’ हे तिचे पहिले प्रदर्शन भरवले.
सोनियाच्या ‘व्हाईटनीफ’मुळे अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य झाल्यात. यामुळे हस्तिदंताच्या तस्करीला आळाही बसू शकेल आणि ज्या कारागिरांचा हा परंपरागत उपजीविकेचा व्यवसाय होता, त्यांनाही हक्काचे काम मिळणार आहे. जयपूर व जोधपूरच्या तर कितीतरी कारागिरांनी काम नाही म्हणून इतरत्र स्थलांतर करत दुसरे काम शोधले होते. त्यांना यामुळे दिलासा मिळतो आहे व चांगला मोबदलाही मिळतो आहे. काही ठिकाणी तर हस्तिदंताच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूकही केली जात होती. हस्तिदंताऐवजी उंटाच्या हाडांवर कोरीव काम करत अनेक शोभेच्या वस्तू लाखो रुपयांमध्ये विकल्या जात होत्या. त्याचीही मागणी आपोआप घटू शकेल, कारण त्याहून निम्म्या किमतीत ‘इल्फ’च्या कलाकृती ग्राहकांना मिळणार आहेत.
फक्त जोधपूरनजीकच्या भागात तीन लाखांच्या वर हस्तिदंतावर कोरीव काम करणारे कारागीर आहेत. ‘इल्फ’पासून एकाहून एक सरस कलाकृती ते साकारत आहेत. ६० सेमी हस्तिदंतावर राजघराण्यांच्या युद्धाचे प्रसंग हुबेहूब साकारणारी कलाकृती किंवा राजस्थानातील राजे महाराजांचे बुद्धिबळाचे भव्यदिव्य पट व आखीव-रेखीव प्यादे, झूल पांघरलेले कोरीव हत्ती किंवा आकर्षक मेणबत्ती स्टँड अशा एकाहून एक कलाकृती इल्फपासून आपले लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. यापाठोपाठ, फॅशनमध्ये रस असल्याने सोनियाने हस्तिदंताच्या पारंपरिक दागिन्यांवर लक्ष केंद्रित केले. पाना-फुलांच्या नाजूक बुट्टी, हत्ती, उंट यांच्यासारख्या प्रतिमांचा वापर करत साकारलेले एकाहून एक सरस दागिने घडवून घेतले. बांगडय़ा, कानातले, गळ्यातले दागिने सोन्याप्रमाणे इतर मौल्यवान दागिन्यांमध्ये मढवून ‘इल्फ’ने आकर्षक दागिन्यांची मोठी रेंज बाजारात आणली. त्यातूनच फॅशनच्या दुनियेत तिचा बोलबाला झाला. नुकतेच त्यांनी चित्रकार सुविग्य शर्मा यांच्या मिनिएचर पेंटिंग्ज ‘इल्फ’वर साकारत त्याचे प्रदर्शन भरवले.
सोनिया नवनवीन गोष्टींचा शोध घेतच राहते व उत्पादनात नवे काही आणत राहते, पण तिची सामाजिक नाळही सुटलेली नाही. कंपनीला होणाऱ्या नफ्यातून ठरावीक टक्के नफा प्राण्यांच्या संवर्धनासाठी देण्याचा तिचा सुरुवातीचा संकल्पही तिने काटेकोरपणे पाळला आहे.
२०१३ च्या जून महिन्यापासून सोनियाने जगाच्या बाजारपेठेकडेही लक्ष वळवले. जपानमध्येही ‘इल्फ’साठी मोठी बाजारपेठ आहे. जपानी स्त्रिया जे पारंपरिक वस्त्र परिधान करतात, त्याची बटणं हस्तिदंतापासून केलेली असतात. चीनमध्येही हस्तिदंती वस्तूंना मोठी मागणी आहे. त्यामुळे परदेशी ग्राहकांच्या गरजा व त्यानुसार उत्पादने विकसित करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे ती सांगते.
खरं तर सोनियाच्या रक्तातच व्यवसाय आहे. सुप्रसिद्ध डोनियर टेक्सटाइल इंडस्ट्रीचे मालक विश्वनाथ अगरवाल म्हणजे तिचे वडील. पण वडिलांच्या व्यवसायाला पुढे नेण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्यात तिला रस होता. तिच्या आत्तापर्यंतच्या यशाचे श्रेय, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय लावणारे पालक, शाळा-कॉलेजचे शिक्षक यांना ती देते. उद्योगाची पाश्र्वभूमी असणाऱ्या घराण्यात जन्मल्यामुळे सोनियाला सगळे सोपे सरळ होते असे नाही. ‘इल्फ’ हा पदार्थ हस्तिदंताला पर्यायी वापरण्याच्या विचारापासून प्रत्यक्ष उत्पादन तयार होईपर्यंतचा प्रवास खूप मेहनतीचा आणि खडतर होता. सुरुवातीला कारागीरांनी तिचे साधे म्हणणेही ऐकून घेतले नव्हते. परदेशात शिक्षण झाल्यामुळे तळागाळातील लोकांबरोबर काम करण्याचा कोणताच अनुभव तिच्याकडे नव्हता. पण पर्यावरण संवर्धनासाठीचे एक पाऊल ते फॅशनमधील नामांकित ब्रँड हा प्रवास तिने साकारला, तो जबर इच्छाशक्तीच्या जोरावर.
म्हणूनच ‘एक किलो सोन्याहूनही एक किलो हस्तिदंताचा भाव जास्त आहे, हस्तिदंताच्या तस्करीत खूप जणांचे हितसंबंध अडकलेले आहेत, त्यामुळे किती गुंतागुंतीचे व आव्हानात्मक काम मी पेलले आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे.’ असे जेव्हा सोनिया सांगते तेव्हा तिच्या आत्मविश्वासाला दाद द्यावीशी वाटते. नुकताच कैरोस सोसायटीने ‘टॉप ५० मोस्ट इनोव्हेटिव्ह पर्सन्स’च्या यादीत तिला व ‘व्हाईटनीफ’ ला स्थान दिले. तिच्या कर्तृत्वाला ही साजेशी दाद मिळाली असे वाटते.
भारती भावसार – bharati.bhawasar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2015 1:01 am

Web Title: sonia agarwal whitenife
Next Stories
1 काकडी
2 ‘संपादकीय : संवादाचा नवा अविष्कार’
3 तिला सावरायला हवंय..
Just Now!
X