डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

अनेकदा नुसतं ‘सॉरी’ म्हणून गोष्टी ठाकठीक होतील, असं नाही. यात एक सहज करता येण्याजोगी महत्त्वाची बाब म्हणजे, आपलं चुकलं असेल, तर मोकळेपणाने त्या विषयावर, प्रसंगाबाबत समोरच्या व्यक्तीशी बोलणे. यातून त्या व्यक्तीला आपण नुसतंच म्हणायचंय म्हणून आणि विषय संपावा म्हणून ‘सॉरी’ म्हणतोय असे वाटणार नाही. शिवाय अजून काही त्याच विषयाच्या संदर्भात मनात, विचारात घोळत असेल, तर तेही बाहेर येऊन, सगळं छानपैकी स्वच्छ होऊन, मळभ निघून जाईल.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

‘सॉरी’ एक सतत वापरून गुळगुळीत झालेला शब्द. त्यातही काही नात्यांमध्ये अगदी परवलीचा. उदा. मुलं आणि पालक यांच्यात. दिवसांतून कमीतकमी आठ-दहा वेळा किंवा जास्तच ‘सॉरी-सॉरी’ म्हणत पुन्हा त्याच प्रकारची वर्तणूक चालू ठेवणे, ही मुलांसाठी अगदी दिनक्रमात आपसूक ओवली गेलेली बाब. तसंच, दुसरं उदाहरण म्हणजे कामाच्या ठिकाणी, ‘सॉरी, चुकून घडलं, नजरचुकीने झालं’ म्हणत तशाच चुका रेटत राहणारे आपणच. पण घरी मात्र, घरकाम करणाऱ्या किंवा घरीदारी आपले मदतनीस म्हणून काम करणाऱ्या फळीकडून एकसारख्याच चुका होत असतील, आणि त्या वेळी समोरून केवळ ‘सॉरी’ येत असेल तर मात्र याच शब्दाची आपल्याला तिडीक यायला सुरुवात होते.

या शब्दाने आयुष्य किती सोपं करून टाकलंय!

‘‘माझं चुकलं, मला क्षमा कर/ करा. माझ्याकडून पुन्हा असं कधीच होणारच नाही याची खात्री नाही, परंतु ते टाळायचा मात्र मी नक्की प्रयत्न करेन. माफ कर/ करा, माझ्यामुळे तुला/ तुम्हाला मनस्ताप झाला असेल किंवा त्रास झाला असेल. त्यासाठी म्हणून ही क्षमायाचना. शिवाय हा झालेला त्रास किंवा हानी मला कोणत्या पद्धतीने भरून काढता येईल का? येत असेल तर मी काय करू? हा माझा एक प्रयत्न आहे, झालेला त्रास कमी करण्यासाठी.’’

इतकं सगळं बोलणं याऐवजी, ‘सॉरी’ हा एक शब्द आणि या शब्दांत हा सगळा अर्थ अंतर्भूत आहे हे म्हणणाऱ्यापेक्षा, समोरच्याने समजावून घ्यावे ही म्हणणाऱ्याची अपेक्षा.

कमाल आहे ना? आणि कदाचित या शब्दांमागे दडलेले पदर किंवा माफी मागताना असावा लागणारा साहजिक नम्रपणा किंवा त्यात असणारं गांभीर्य हे सहजच नजरेआड केलं जातंय. त्याही पुढे जाऊन मी ‘सॉरी’ म्हटलं म्हणजे माझी त्या प्रसंगात असणारी गुंतवणूक संपली किंवा माझी जबाबदारी मी चोख पार पाडली. आता समोरच्या व्यक्तीने मात्र ते तसंच, सहज स्वीकारून, झालं- गेलं विसरून काहीच घडलं नाही असं भासवत पुढे चालत राहायचं, हीदेखील अपेक्षा. त्यामुळे बहुतांश वेळा हा एक शब्द तोंडावर टाकून सारं संपवूनच टाकलं जातं.

नात्यांमध्ये, ती जगत असताना ती जपणं हाही तितकाच महत्त्वाचा भाग असतो. त्यात चढ-उतार किंवा रुसवेफुगवे हेदेखील ओघाने आलेच. किंवा काही वेळेस एखाद्या नात्यात झालेली गुंतवणूक आणि त्यातून भावना, विचार या साऱ्यातच, दुखावलं जाणं, अगदीच सहज. अगदी सरळसोट असा कोणत्याही नात्याचा प्रवास असत नाही. किंबहुना तसं झालंच तर त्या नात्यात खरंच अजूनही प्राण शिल्लक आहे का? हाच प्रश्न पडला पाहिजे. म्हणूनच घडलेल्या अप्रिय घटना, एखादवेळेस उच्चारलेले नको असलेले शब्द, अनाहूतपणे आलेल्या अनावश्यक प्रतिक्रिया याही मागे टाकताच आल्या पाहिजेत. त्यातूनच नाती निरोगी, सुदृढ राहतात. मग इथे ‘सॉरी’ श्रेयस्कर ठरत नाही का? हाच पुढचा प्रश्न विचारला जातो. नक्कीच. परंतु यात महत्त्वाचा भाग असा, की ती माफी, क्षमा, किती विचारपूर्वक मागितली जातेय. त्यासोबतच ती योग्य वेळेला मागितली जातेय की कसे. शिवाय ही क्षमा मागण्यापाठीमागे व्यक्तीचा, घटनेचा आणि सर्वात महत्त्वाचं नात्याचा किती सखोल विचार झालाय, हेसुद्धा.

आता हेच एका प्रसंगातून समजावून घेऊ.

‘‘डॉक्टर, मला ना याच्या या ‘सॉरी’ म्हणण्याचा अक्षरश: उबग आलाय. म्हणजे झालंय असं, की अनेकदा समजावून सांगूनही, हा मला ज्या गोष्टी खटकतात त्याच पुन्हा करत राहतो. कालची साधी गोष्ट. काल आमचं तीन वाजता भेटायचं ठरलं होतं. मी त्यानुसार, माझ्या इतर सगळ्या दिवसाची सोय लावली आणि ठरलेल्या ठिकाणी पोचले. तर हा आलाच नव्हता. मी पंधरा-वीस मिनिटं वाट पाहून, याला संपर्क करायचा प्रयत्न केला, पण तेही होऊ शकलं नाही. शेवटी तासभर वाट पाहून मी तिथून निघाले. पुढे काय करावं कळत नव्हतं. कारण याच्यासाठी मी पुढचा दिवस संपूर्ण मोकळा ठेवला होता. साधारण सहाच्या सुमारास याने एक मेसेज केला आणि त्यात लिहिलं, ‘सॉरी, कामात अडकलो होतो, कळवता आलं नाही!’ मी काहीच उत्तर दिलं नाही, तेव्हा हा माझ्यावरच चिडला आणि म्हणाला, तुला समजूनच घेता येत नाही. शिवाय मी माफीपण मागितली तुझी.’’

तिशी उलटून गेलेलं एक जोडपं. दोघांना एकत्र राहून तीनेक वर्ष झाली होती. आता त्यांना लग्नाचा निर्णय घ्यायचा होता, परंतु त्यांच्यात सतत खटके उडायला सुरुवात झाली, आणि त्याला कारण म्हणजे त्यांच्या नात्यातली सहजता जाऊन, तिथे खूप अपेक्षा, गृहीत धरणे आणि महत्त्वाचं, एकमेकांशी सततचा अबोला हे चालू झाले. तिची महत्त्वाची तक्रार अशी की, हा काहीही झालं की ‘सॉरी’ म्हणून पटकन विषय संपवतो. तर त्याचं म्हणणं असं, की ‘सॉरी’ म्हटलं तरीही हिचं काही समाधान होत नाही. ती त्या विषयालाच धरून ठेवते. पुढे जातच नाही. दोघांचंही म्हणणं अगदीच योग्य. इथे मूलत: त्यांच्या स्त्री-पुरुष या भिन्नतेमुळे असणाऱ्या भावना, विचार, प्रसंग यांच्याकडे पाहण्याचा संपूर्ण वेगळा दृष्टिकोन, यानेच गल्लत होत होती.

या प्रसंगाकडे नीट पाहिलं आणि याला आपण कोणत्याही इतर घटनेचं स्वरूप देऊन, कोणत्याही वयोगटातील, माणसांचा विचार केला तर, असं लक्षात येईल, की हे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचं चित्र. इथे स्त्री-पुरुष म्हणून लिंगसापेक्ष विचार करण्यापेक्षा, केवळ एक व्यक्ती म्हणूनही विचार केला तरीही, दोन व्यक्तींमधली असणारी भिन्नता ठळकपणे जाणवेल.

माफीकडे नेमकं कसं पाहायचं?

कोणतीही व्यक्ती, ज्या वेळेस इतर कोणत्याही व्यक्तीची क्षमा मागते, तेव्हा ती व्यक्ती महत्त्वाची आहे यासोबतच, आपलं नक्कीच काहीतरी चुकलेलं आहे, हेसुद्धा मनात मान्य केलेलं असतं. यातून, तोंडदेखली माफी मागणाऱ्या किंवा काहीतरी डावपेच, हेतू मनात ठेवून हा प्रसंग निभावून न्यायचा म्हणून तात्पुरती क्षमा मागून, सारवासारव करणाऱ्या व्यक्ती (उदा. बरेच राजकीय प्रसंग-घडामोडी, इथे सादर होणारे जाहीर माफीनामे किंवा केवळ समोरच्यावर कुरघोडी करण्याची इच्छा ठेवून, काही कौटुंबिक प्रसंगांत एकमेकांची मागितलेली माफी.), यातून अर्थातच बाद होतील. त्यामुळे डोळसपणे नात्यांकडे पाहणाऱ्या व्यक्ती आपण इथे गृहीत धरू. हेच बऱ्याच अंशी एखाद्या समूहात, बोलतानासुद्धा लागू होईल. उदा. सध्याचं विविध माध्यमांचं आभासी जग, तिथे घडणारे अनेक समज-गैरसमज यांचे नाटय़मय प्रसंग.

ही माफी मागण्याची योग्य वेळ. कित्येकदा काही घटना घडून गेल्यानंतर, त्याचे बरे-वाईट परिणाम उलटून गेल्यानंतर जाग्या होणाऱ्या काही व्यक्ती, तिथे पुढे येऊन, क्षमा मागू पाहतात. अशा वेळेस, आपली चूक समजली आणि आता ते समोरच्यालाही सांगावे त्यासाठी, कितीही उशीर झाला तरीही, अशी माफी मागावी हे योग्यच. परंतु इथे पुढील व्यक्तीचा विचार, त्याचबरोबर, झालेल्या घटनेमुळे नात्यावर झालेले परिणाम, याचा विचार, माफी मागणाऱ्या व्यक्तीकडून होणे आवश्यक. कारण अशा वेळेस, यातून काही निष्पन्न होईलच ही अपेक्षा ठेवणेच फोल. कित्येकदा जिची माफी मागावीशी वाटते, ती व्यक्ती, त्या नात्यातून बाहेर पडलेली असू शकते. कित्येकदा अशा वेळ निघून गेल्यानंतरच्या माफीविषयी, दुसऱ्या व्यक्तीला काहीच महत्त्व नसते किंवा त्याने फरकही पडणार नसतो. इथे केवळ माफी मागणाऱ्या व्यक्तीच्या मनावरील ओझे कमी होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ती माफी स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठीही योग्य तो वेळ दिलाच पाहिजे. इथे काही व्यक्ती ती स्वीकारून पुढे चालू लागतात. तर काही, त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात.

रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोटय़ा प्रसंगांना न डावलणे हे यातले गमक. त्यामुळे कोणत्याही बदलाकडे किंवा त्यातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष न होता, ते तिथल्या तिथे हाताळता येतात. त्यांच्या दुखऱ्या आठवणी तयार होत नाहीत.

काही सहज सुलभ नात्यांतदेखील, या माफी न मागण्यानेच किंवा सतत माफी मागण्यानेच कित्येकदा अढी निर्माण होताना दिसते. उदा. कित्येक स्नेह्य़ांमध्ये कोणा एकालाच सतत नमतं घेण्याची सवय असेल, परंतु मनात गोष्टी खदखदत राहत असतील, तर तिथे कालांतराने दुरावा निर्माण होऊ शकतो. याचाच दुसरा भाग म्हणजे यात एखाद्याला त्या बाबी तितक्या महत्त्वपूर्ण वाटत नाहीत, जितक्या दुसऱ्या व्यक्तीला वाटू शकतात. अशा वेळेस आपण त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखत असू तर तिथे पटकन ‘माझं चुकलंच इथे’ हे म्हणून नाजूकपणे तो प्रसंग हातावेगळा करता येईल.

आता या ‘सॉरी’च्या थोडंसं पुढे जाऊया. अनेकदा नुसतं ‘सॉरी’ म्हणून गोष्टी ठाकठीक होतील, असं नाही. यात एक सहज करता येण्याजोगी महत्त्वाची बाब म्हणजे, आपलं चुकलं असेल, तर मोकळेपणाने त्या विषयावर, प्रसंगाबाबत समोरच्या व्यक्तीशी बोलणे. यातून त्या व्यक्तीला आपण नुसतंच म्हणायचंय म्हणून आणि विषय संपावा म्हणून ‘सॉरी’ म्हणतोय असे वाटणार नाही. शिवाय अजून काही त्याच विषयाच्या संदर्भात मनात, विचारात घोळत असेल, तर तेही बाहेर येऊन, सगळं छानपैकी स्वच्छ होऊन, मळभ निघून जाईल. मात्र समोरच्याने विषय काढल्यानंतर आपण, ‘सॉरी’ म्हणून विषय संपवलाय या भ्रमात राहून, त्यावर बोलणं टाळणं किंवा समोरच्या व्यक्तीच्या अनेक प्रतिक्रिया, संवेदना सहज समजत असूनदेखील त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे किंवा त्याला बगल देत पुढे जाणे, यातून ती व्यक्ती जास्तच दुखावते. आपल्या लेखी हे नातं महत्त्वाचं असेल, तर तिथे असं वागून, आपणच दुरावा निर्माण करत राहू. त्यानंतर अमुक एक व्यक्ती का तुटली, किंवा का लांब गेली, यावर विचार करण्यात अर्थ नाही.

काही व्यक्ती, ‘माझं चुकलंय, परंतु मला त्यावर अधिक बोलता येत नाही, किंवा बोलायचं नाही,’ असा पवित्रा घेतात. ही तर सशर्त माफी झाली. म्हणजे आपल्याकडून इजा झालेली असताना, त्यावर मलमपट्टी करण्याऐवजी, आपण त्यातून चक्क पळून जाऊ पाहतोय का? हा प्रश्न स्वत:लाच विचारावा. बोलणं अवघड जात असेल, तर लिहून व्यक्त व्हावं. परंतु ‘समोरच्याला आपण पटवून दिलंय. आता करण्यासारखं काही नाही,’ हे टाळता येईल.

मुळात माफी मागणे, म्हणजेच बिनशर्त माघार. हेच या व्यक्ती विसरतात. तिथे ‘माझं चुकलं परंतु तुझ्याकडूनही या गोष्टी घडल्याच,’ हे पटवत राहणे म्हणजे झालेला झालेला घाव अधिक खोल  करण्यासारखेच. ते नक्कीच सांगायला हवं, परंतु योग्य वेळ पाहून.

आता या माफीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तींनीदेखील प्रसंग काय आहे, वारंवार घडतोय का? किंवा असंच वागणं योग्य आहे का, याचा सारासार विचार करावा. आपल्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बाबी, नात्यात असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीसाठीही तितक्याच महत्त्वाच्या असतील, एकंदरीत, आपले विचार, मूल्ये त्या व्यक्तीशी जुळत असतील, तर अशी व्यक्ती सहसा जाणूनबुजून आपल्याला त्रासदायक वागणार नाही हे मनात पक्के बांधून ठेवावे. प्रत्येक वेळेस, चूक झाल्यावर माफी मागितलीच पाहिजे असेही न ठेवता, कित्येक गोष्टी सहज, सामंजस्याने सोडून देता येतील. शिवाय काही व्यक्ती बोलण्यापेक्षा कृतीतून व्यक्त होतात, त्याचाही आदर करावाच. आपण ज्या गोष्टींसाठी आग्रही आहोत ते स्पष्ट असेल आणि नात्यातील दुसरी व्यक्ती ते टाळू पाहत असेल, तर ते निदर्शनास आणून द्यावे. हे करूनही त्यावर काहीच संवाद घडला नाही तरीही, काही काळ नक्कीच थांबावे. ‘कोणासाठी आणि किती’ हे मात्र ज्याचे त्यालाच ठरवता आले पाहिजे.

मुळात कोणत्याही नात्यात, सतत चूक-बरोबर असे करत जगण्यापेक्षा, आहे त्या क्षणांचा आनंद घेणंही महत्त्वाचंच. इथे नजरचुकीने किंवा अभावितपणे काही घडलेच तरीही दोन परिपक्व  व्यक्ती, त्यातून मार्ग काढून पुन्हा सातत्याने, आनंदाने, सहज एकत्र, सोबत राहू शकतात. आपल्यापेक्षा थोडासा इतर व्यक्तीसाठी केला गेलेला जास्त विचार, नात्याला, व्यक्तीला, कधीच गृहीत न धरता, त्यांचा राखलेला आदर, हे कोणत्याही नात्यातली वीण घट्ट टिकवून ठेवते.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com