बायका आणि त्यांची खरेदी हा खरं तर अनेकांच्या टिंगलीचा विषय. रंग, पोत यांच्याशी खेळत तासन्तास खरेदी करणारा, दुकानदारांना वीट आणणारा स्त्रीवर्ग आता बदलतो आहे, असं चित्र दिसत आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन दुकानांमधून वस्तू मागवण्याचं प्रमाण वाढतं आहे. या नव्या ऑनलाइन ग्राहकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे ७१ टक्के आहे. पुढच्या काळात ऑनलाइन दुकानांचा ओघ असाच वाढत राहून ही बाजारपेठ ६ पटीने वाढणार असं भाकीत या विषयामधले तज्ज्ञ करत आहेत.
खुल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने १९९० चं दशक अतिशय महत्त्वाचे. या दशकात भारताप्रमाणेच जगातल्या अनेक मोठय़ा बाजारपेठा या बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये पावले रोवण्यासाठी तयारी करत  होत्या. बाजारपेठांचा वाढलेला आकार, बदलते तंत्रज्ञान यामुळे खरेदीच्या पद्धतींमध्येही बदल होत होते. १९९४ मध्ये जेफ बेसोस या अमेरिकेतल्या एका तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकाने ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’ या कंपनीची स्थापना केली. या ‘अ‍ॅमेझॉन’ने परंपरागत खरेदीचे सारे आयामच बदलून टाकले. पुस्तके विकण्यापासून सुरू झालेली ही कंपनी आता स्वत:च सर्व प्रकारचा माल विकते आहे. एवढंच काय तर तो माल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वत:चे ड्रोन्सही बनवते आहे! अ‍ॅमेझॉन म्हणजे ‘तंत्रज्ञान आणि खुल्या अर्थव्यवस्थेमधील बाजारपेठ’ याचा उत्कृष्ट मिलाफ आहे. पण या बदलांना सुरुवात झाली होती ती या आधी काही वर्षे; मायकल अल्ड्रीच याच्यामुळे. मायकल अल्ड्रीच हा एक ब्रिटिश व्यावसायिक. त्याने पहिल्यांदा टेलिफोनच्या माध्यमातून, कोणत्याही प्रत्यक्ष कागदी पैशाच्या व्यवहाराशिवाय आर्थिक देवाण-घेवाण करण्याची पद्धत विकसित केली. हे टेलिशॉपिंग अनेक लोकांचं खरेदीचं, काही वेगळी उपकरणे वापरून पाहण्याचं साधन बनलं. त्यानंतर टीम बर्नर्स ली याने १९९० साली ‘वर्ल्ड वाइड वेब’ सर्वाना वापरायला खुलं केलं. आणि ‘ऑनलाइन’ व्यवहारांच्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या ‘वर्ल्ड वाईड वेब’ने अनेक प्रकारांच्या व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल केला. यातलाच कदाचित सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाइन वित्तीय व्यवहारांचा.
 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मोठे मॉल्स जसे सेन्ट्रल, शॉपर्स स्टॉप यांचा खप गेल्या दिवाळीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे आणि त्याच तुलनेत ऑनलाइन खरेदी गेल्या दिवाळीपेक्षा ८६ टक्क्यांनी वाढली आहे. ‘असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या आकडेवारीनुसार भारतातले ऑनलाइन खरेदीचे व्यवहार १०,००० कोटी रुपयांच्या घरात गेले आहेत. हे मागील वर्षांपेक्षा ३५० टक्क्यांनी अधिक आहेत. पुढच्या एका वर्षांत या व्यवहारांमध्ये ६ पटींनी वाढ होणार असं त्यांचं भाकीत आहे. पण हे अहवाल आणि आकडेवारी असंही सांगते की, या बदलत्या व्यापारामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांना फटका बसलेला दिसत नाही. भारतात आज जवळजवळ २५ कोटी लोक इंटरनेट वापरतात. यापैकी साधारण २ कोटी लोक हे कोणत्या ना कोणत्या इ-रिटेल संकेतस्थळाशी जोडले गेले आहेत.
कोण आहेत हे ग्राहक? कसे बदलले हे आर्थिक व्यवहार? या बदलत्या खरेदीशी ते कसं जुळवून घेत आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांवर भारतातले अनेक अर्थपंडित सध्या ऊहापोह करत आहेत.
या दोन कोटी इंटरनेट ग्राहकांपैकी तब्बल ७१ टक्के महिला ग्राहक आहेत. ‘स्नॅपडील’च्या (Snapdeal) एका ग्राहक वृत्ताप्रमाणे त्यांच्याकडे बहुसंख्य ग्राहक या स्त्रिया आहेत. त्यामुळे त्याच्या जाहिराती आणि एकूणच विक्रीची कार्यनीती ही स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून आखली जाते. ‘फ्लिपकार्ट’ या भारतातील सर्वात प्रसिद्ध ऑनलाइन रिटेल वेबसाइटही साधारण अशीच आकडेवारी समोर आणते.
‘अमेरिकन सोशोलॉजिकल (Sociological) रिव्हू’च्या एका शोधनिबंधामध्ये काही वेगळी निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते स्त्रिया आपल्या आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपली मते बनवतात. सध्याच्या ऑनलाइन सोशल नेटवर्किंगमुळे एकमेकांचे विचार, प्रतिक्रिया जाणून घेणं अतिशय सहज शक्य होत असतं. स्त्रियांची खरेदीच्या विषयीची मतेही तिथेच तयार होतात. नीता रोलीन्स या मनुष्यविज्ञान शास्त्राच्या प्राध्यापिका. त्या या ऑनलाइन खरेदीचं मूळ आपल्या पूर्वजांमध्ये बघतात. त्यांच्या मते, गुहेत राहणारे, शिकार करणारे आपले पूर्वज सतत नव्या जंगलांच्या आणि सुरक्षित निवाऱ्यांच्या शोधात असायचे. पुरुष मंडळी शिकारीला गुहेतून बाहेर पडल्यावर स्त्रियांचं मुख्य काम हे आपल्या टोळीला सुरक्षित ठेवणं आणि मुलांचा सांभाळ करणं असं असायचं. त्यातल्या काही स्त्रिया या आजूबाजूच्या प्रदेशात नवीन जंगलं, नवी फळे धुंडाळायला जायच्या. त्या परत येऊन बघितलेल्या दृश्यांचं वर्णन आपल्या टोळीसमोर करायच्या. त्या वर्णनावरून टोळीचे तिथे फळे, झाडे शोधायला जायचं की नाही याचे निर्णय व्हायचे. रोलीन्स याच अनुभवाचं रूप सध्याच्या सोशल नेटवर्किंग आणि ऑनलाइन खरेदीच्या निर्णयामध्ये बघतात.
सध्याची जंगलं वेगळी. पण अनुभव साधारण तसेच. म्हणूनच, आज ७१ टक्क्यांच्या वर महिला या एकमेकींच्या मदतीनं, साक्षीनं ऑनलाइन खरेदीचे निर्णय घेत आहेत. २४ वर्षांच्या मेधाचा अनुभव फारच बोलका आहे. मेधा स्वत: एक व्यावसायिका आहे. स्वत:च्या हातांनी तयार केलेल्या, डिझाइन केलेल्या, पर्सनलाइज्ड वस्तूंची ती विक्री करते. तिचं स्वत:चं दुकान नाहीये. पण, केवळ ‘फेसबुक’च्या जोरावर तिने दोनच वर्षांत ५०० च्या वर नियमित ग्राहकांची मोळी बांधली आहे. ‘फेसबुक’वरचे फोटो बघून आणि एकमेकींचे अनुभव ऐकून तिच्याकडे ग्राहक येतात असं ती सांगते. तिच्या ग्राहकांपैकी ९५ टक्के ग्राहक या महिला आहेत. आणि तिला ७५ टक्क्यांवर ऑर्डर्स या केवळ ऑनलाइन फोटो बघून मिळतात असंही ती सांगते.
तिच्याच ग्राहकांपैकी एक आहे केतकी. केतकी स्वत: फॅशन डिझाइनर आहे. लोकांसाठी खरेदी करणं हा तिचा पेशा आहे. तिच्या मते, या ऑनलाइन रिटेलमुळे तिला सध्याचे प्रचलित ट्रेंड्स बघायला मिळतात आणि त्यानुसार ती तिच्या ग्राहकांना सल्ला देऊ  शकते. ट्रेंडसबरोबरच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे विविधता. तिला ‘फ्लिपकार्ट’ किंवा ‘म्यांत्रा’ (Myantra) वरून ती तिच्या ग्राहकांना त्यांना काय चांगलं दिसेल अशा प्रकारचे पोषाख ती दाखवू शकते. पण प्रत्यक्ष खरेदी करताना मात्र ती तिच्या ओळखीच्या शिंप्याची, दुकानदाराचीच मदत घेते. कारण या दुकानांमधल्या मालामध्ये तिला तिच्या शिंप्याच्या हाताची सफाई मिळत नाही. कपडे जरी केतकी या ऑनलाइन दुकानांमधून डिजाइन्स बघून  त्यात चेंजेस करून स्वत: शिवून घेत असली तरी पर्सेस, वॉलेटस मात्र ती ऑनलाइनचं खरेदी करते.
मानसीचा अनुभव मात्र केतकीपेक्षा थोडा वेगळा आहे. ती स्वत: एका सल्लागार कंपनीमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करते. पुस्तकांशी तिचा रोजचा संबंध. ‘फ्लिपकार्ट’शी तिची मैत्री ही तिच्या याच प्रकारच्या कामामुळेच झाली. २००७ साली सुरू झालेलं हे दुकान तेव्हा फक्त पुस्तकांची विक्री करत होतं. त्यातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये बघून, वाचून कोणतं पुस्तक घ्यायचं आणि कुठलं नाही हे ती ठरवते. तिची कंपनी महिन्याला ७ ते १० नवी पुस्तकं  विकत घेते त्यातली. ही पुस्तकं मिळतात अगदी घरपोच. पुस्तकाची दुकानं नामशेष होत चालली आहेत म्हणून हळहळ व्यक्त होत असली तरी तिथे अनेक पुस्तकं सहज मिळतीलच असं नसतं. यामध्येच ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’ तिची साथ देतं. प्रसिद्ध न झालेलं, संग्रहात नसलेलं पुस्तकदेखील तिला केवळ ऑनलाइन खटपट करून मिळू शकतं. मानसी आता ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’वर मनसोक्त पुस्तकं चाळत असते. पण मानसी फक्त पुस्तकांसाठीच इथे येते असं नाही. तिची या वेबसाइटसशी ओळख जरी पुस्तकांमुळे झाली असली तरी ती आता तिच्या मुलाच्या कपडय़ांपासून ते दिवाळीसाठी द्यायच्या भेटवस्तूंपर्यंतची खरेदी इथेच करते. त्यामुळे जेव्हा ‘फ्लिपकार्ट’ने गृहोपयोगी वस्तूंची विक्री करायला सुरुवात केली तेव्हा तिला काय आनंद झाला होता!  मानसी म्हणते, ‘‘दिवसभर ऑफिस, सुटीचा एक दिवस मिळतो, त्यामध्ये घराची कामं; त्यामुळे शॉपिंगला जायला तसा वेगळा वेळच मिळत नाही. म्हणून हे ‘फ्लिपकार्ट’ वगैरे बरं पडतं! परत आता एवढय़ा गर्दीत बाहेर पडायला नको वाटतं, परत दुकानदाराशी घासाघीस, ‘एकदा विकलेले माल परत घेतला जाणार नाही’ वगैरे अ‍ॅटीटय़ूड कोणाला हवंय हे सगळं; त्यामुळे वस्तू नक्की झाली आणि झटपट ऑर्डर केली की काम झालं.’’ खूपशी खरेदी ‘फ्लिपकार्ट’वरून करत असली तरी मानसी आपली हौस भागवण्यासाठी अनेक विशेष प्रदर्शनांना आवर्जून जाते, कधी शॉपिंगचा ‘फील’ हवा असला तर एखाद्यी रविवारी दुपारी तुळशीबागेत जाऊन आली की तिला बरं वाटतं.
या सगळ्यांमध्ये अनघा अतिशय चोखंदळपणे आपल्या खरेदीचे निर्णय घेताना दिसते. तिला मोबाइल फोन घ्यायचा असू दे, एखादा ब्रँडेड परफ्युम असू देत की हात पुसायचे टॉवेल्स सगळं तीन तीन ठिकाणी तपासून घेते ती. या सगळ्याच्या किमती ‘ऑनलाइन’ चेक केल्याशिवाय ती वस्तू विकतच घेत नाही. तिच्याकडे असलेलं मोबाइल कव्हर, घरातले टॉवेल त्यामुळे कायमच अतिशय वेगळे असतात. तिच्या नेहमीच्या दुकानदाराकडे पण ती, ‘अहो, हाच ३ टॉवेल्सचा सेट मी फॅब फर्निशिंग मध्ये अध्र्या किमतीला पाहिला!’ अशी घासाघीस सुरू करते. आणि जिथून योग्य किमतीला वस्तू मिळेल तिथून खरेदी करते.
साठी पार केलेल्या सुधा गोडबोले खरं म्हणजे एकदम नेट सॅव्ही आहेत. सुधाताई ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअप’वरून त्या अनेक लोकांच्या नियमित संपर्कात असतात. वेगवेगळ्या वस्तूंची प्रदर्शनांनाही त्या आवर्जून जातात. पण अजून त्यांना ‘फ्लिपकार्ट’ किंवा तशा कोणत्याच वेबसाइटवरून खरेदी केली नाहीये. कॉम्प्युटरवरून पैशांचे व्यवहार करणं त्यांना अजून थोडं जोखमीचं वाटतं. त्यांच्या या काळजीला तसं कारणही आहे. अनेक वेळा कोणत्या तरी अज्ञात ई-मेल मुळे लोक फसवले गेले. वस्तूसाठी पैसे दिले, पण वस्तू घरी पोहोचलीच नाही, वगैरे उदाहरणं ऐकत असतो.
या सर्व स्त्रियांशी बोलताना काही महत्त्वाचे आणि बदलत्या खरेदीचे ट्रेंड प्रकर्षांने जाणवले. यामध्ये वस्तूच्या किमतीपेक्षा ती वस्तू मिळण्यातली सहजता महत्त्वाची ठरते आहे. परंपरागत खरेदीमध्ये आपण त्या वस्तूंच्या शोधात बाहेर पडतो, आता याच वस्तू ऑनलाइन जाहिरातींच्या स्वरूपाने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्याला आवडल्या तर ऑनलाइन दुकानांमध्ये त्याबद्दलची माहिती आपण पाहू शकतो. अनेक स्त्रिया दिवसातले १० तास घराबाहेर असतात, खरेदीसाठी त्या वेगळा वेळ काढू शकत नाहीत, म्हणून त्यांची खरेदीची हौस त्या अशा ई-दुकानांमार्फत भागवताना दिसतात.  
या ऑनलाइन दुकानांमुळे वस्तू घेण्याचं प्रमाणही वाढलेलं दिसतं. अनेकदा आपण एरवी कधी न वापरलेले प्रॉडक्टस वापरून बघू शकतो.
ऑनलाइन दुकानांमधील वस्तूंच्या किमती प्रत्यक्ष दुकानापेक्षा थोडय़ाफार फरकाने कमी असू शकतात. याचं मुख्य कारण म्हणजे या दुकानांना त्या वस्तू मांडण्यासाठी, व्यवस्थित लावण्यासाठी जागा घेण्याची, सेल्समनची गरज नसते. केवळ गोडाऊ न असलं तरी पुरे. ‘फ्लिपकार्ट’सारख्या कंपन्या तर अनेकदा माल स्वत:कडे न ठेवता तो त्यांच्या स्थानिक पुरवठादाराकडून ग्राहकाकडे पोचवतात. त्यामुळे त्यांना जागेसाठी किंमतही मोजावी लागत नाही आणि माल वेळेवर पोचतो!
ऑनलाइन दुकानांमुळे ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू बघायला मिळतात. या अमाप विविधतेमुळे योग्य वस्तू निवडायलाही चांगला वाव मिळतो. याचा एक तोटा असा की अनेकदा थोडा मोकळा वेळ मिळाला की या ऑनलाइन दुकानांमध्ये जाऊन खरंतर आपल्याला नको असलेल्या गोष्टी धुंडाळत बसण्यात वेळ जातो. अशामुळे अनेक मोठय़ा कंपन्यांनी फेसबुक, ट्विटरबरोबरच या ऑनलाइन दुकानांच्या साइट्सही बॅन करून टाकल्या आहेत.
भारतातील स्त्री ग्राहक या ऑनलाइन दुकानांना का पसंती देतात याची मुख्यत दोन कारणं समोर येतात. एक ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ म्हणजे वस्तूंची किंमत माल घरी पोहोचल्यावर देण्याची सोय आणि दुसरी एखादी वस्तू आवडली नाही, पटली नाही, त्यात काही बिघाड निघाला तर दुकानदाराला काही दिवसांच्या मुदतीत परत करण्याची सोय. अनेकदा आपलं नेटबँकिंग अकाउंट नसतं किंवा आपल्याला असे व्यवहार करताना खात्री वाटत नसते. अशा परिस्थितीमध्ये ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ ही सोय महत्त्वाची ठरते. या सोयीमुळे कित्येकदा ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकारही टाळता येतात. याबरोबरच घेतलेली वस्तू परत करण्याच्या सोयीमुळे स्त्री ग्राहकांना वस्तू खरेदी करताना, मला हा ड्रेस घातल्यावर आवडला नाही तर, ही चप्पल नीट बसलीच नाही किंवा कम्फर्टटेबल वाटली नाही तर माझे पैसे वाया तर जाणार नाहीत ना, अशी कोणत्याच प्रकारची धाकधूक वाटत नाही. आणि त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष माल बदलला नाही, तरी मला हा माल बदलता येऊ  शकतो, आणि त्यामुळे माझे पैसे वाया जाणार नाहीत ही खात्री ऑनलाइन खरेदी करताना महत्त्वाची ठरते. जगभरात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, माल तयार करण्याच्या पद्धतींमध्ये झालेल्या बदलांमुळे आपल्या कळत-नकळत आपल्या जीवनसरणीवर परिणाम होत असतो. उपभोक्तावाद हे त्याचंच एक फलित. यामुळेच मग अशा ऑनलाइन दुकानांमधला खप वाढतो, आणि अशी दुकानं असण्याची गरजही वाढते. हाच प्रकार आपल्याला भारतातही वाढताना दिसतो आहे. पुढच्या काही वर्षांत या ई-दुकानांचा खप आणि व्याप्ती ६ पटीने वाढणार असं सांगण्यात येत आहे. खरेदीचं पूर्वापार माहीत असलेलं रुप त्यामुळे बदलणार आहे. आजच्या  व्यग्र स्त्रीचं खरेदीसाठी वाया जाणारे अनेक तास त्यामुळे वाचू शकतील.  आधुनिक तंत्रज्ञानाचा हा म्हणावा तर फार मोठा फायदा ठरणार आहे.