22 November 2019

News Flash

कष्टाचे तत्त्वज्ञान

उद्याच्या  (१६ जून) ‘फादर्स डे ’ निमित्ताने या काही खास कविता बापपण जपणाऱ्या वडिलांना अर्पण..

(संग्रहित छायाचित्र)

कष्टाचे तत्त्वज्ञान

जन्मल्यापासून बघत आलो अब्बांना

मोसमी फळांचे डालगे वाहताना

मोहरभरल्या झाडांच्या बुंध्याखेटी

घामाघूम होऊन आळे खणताना

केळीचे घड कोयत्याने कापताना

खंडोबाच्या जत्रेत रेवडय़ा विकताना

फाटक्या चपलेत भाजणाऱ्या पायांनी

आईसकांडय़ांचा डबा डोक्यावर नेताना

कष्टात गेली हयात अख्खी

पोटाला घेत राहिले चिमटा

आमच्या हातातोंडाची भेट व्हावी म्हणून.

डालग्यांत ओथंबलेले जीवनसत्त्व

गिऱ्हाईकांच्या जिभेवर ओतताना

चुकून चाखला नाही त्यांनी

सीताफळातला गर मलईदार

गालावर दिसली नाही त्यांच्या

डाळिंबातली लालिमी रक्तीम

भाकरीवर खडा गुळाचा असायचा

फळांमधल्या चवी आश्चर्याने बघायच्या टकमक.

डललेल्या सीताफळात असते गोडी साखरेची

शेजारचा सरफराजनाना बोलला

अब्बा दीनवाणे हसले

शून्यात घुरत बसले

झुरका उंट छापचा घेत म्हणाले

फळांच्या जागी दिसते मला

नाणे एक रुपयाचे

डाळदाणा लेकराबाळांचा संध्याकाळचा

म्हणून मी लाड जिभेचे पुरवत नाही

भूक लागल्यावर हवी भाकर

सिताफळांनी पोट भरत नाही

आतडे पिळवटणारे व्यावहारिक तत्त्वज्ञान सांगून

हसत विझवायचे विडी

कष्टातच खपले रात्रन्दिन

आमच्यासाठी केली हाडांची शिडी.

सिताफळे विकून परतताना घरी

उठली पाठीत कळ एकदा

तळमळत पडले आडरानात

किंचाळत सरली रात्र दुखरी

कोल्हीकुत्री हुंगून गेल्याचा

मला कवेत घेऊन हसत ऐकवला किस्सा.

वयात आल्या, द्राक्षांच्या वेली

पिकली आमराई, मोहरल्या जांभळी

पपई झाली हळदओली

डोळे फुटले सीताफळांना

की, खेडय़ावरचा हरी घरी यायचा

गाभुळल्या ऋतूची अब्बांना वर्दी द्यायचा

खिशात कोंबायचा निमूट

इसार म्हणून मिळालेली शंभरी

अब्बा आणि हरी आयुष्यभर

सख्ख्या भावासारखे वागले

वाडवडिलांच्या शब्दाला जागले

इमानेइतबारे पाळला

खरेदी-विक्रीचा अलिखित करार

संबंधांच्या छाताडावर बसला नाही

रक्ताची नाती नासवणारा व्यवहार.

अब्बा डोंगराच्या पायथ्याखालची

सिताफळांची झाडं विकत घ्यायचे

बाडबिस्ताऱ्यासह रानात राहायला जायचे

जागून काढायचे रात्री काळ्या

फळांनी लदबदायच्या डहाळ्या

शुक्रवारच्या नमाजसाठी परतायचे घरी

आठवणीने पिशवीत आणायचे सीताफळांच्या पाडा

मोहल्ल्यातल्या मुलांनी गजबजायचा वाडा

मी अब्बांना बघून आनंदाने नाचायचो

दोन्ही हातांनी पाडांचा मलईदार गर चाखायचो.

फळे पिकली डांगोडांगी

की, बाजारात आणायचे

डोक्यावर ओझे मानेचा मणका मोडणारे

पाठीला घोडय़ाच्याही न पेलवणारे

जोरजोऱ्याने बाजारात वाचायचे

सीताफळांच्या गोडव्याचा पाढा

ढिगाभोवती गर्दी गिऱ्हाईकांची उसळायची

ओरडू ओरडू घशाला पडायची कोरड

सिताफळांची विक्री करायची

अब्बांची आतडे पिळवटणारी ओरड.

एक अब्बाच नाहीत

मोहल्लाभर आहेत माणसे रापलेली

टक्के टोणप्यांनी गवऱ्यांसारखी थापलेली

संघर्षांला दररोज पुरून उरणारी

आयुष्याच्या आखाडय़ात संकटांना लोळवणारी

मोहल्लाभर अनुभवत आलो मी

बारमाही उन्हाचा खळाळ

टपरेटुपरे, लोखंड बिखंड, बाटल्याबिटल्या

कॅरी बॅगा बिगा, पृष्टक फृष्टक

बॅटऱ्या बिटऱ्या निकामी

कष्टाळू हातांना दररोज

अडगळीतल्या मळकटांची सलामी

अब्बांसोबत मीही ऐकत आलो

अठराविशे दारिद्रय़ाचे केविलवाणे संगीत

म्हणून चढला नाही माझ्या कवितांवर

गुबगुबीत स्वप्नांचा चष्मा रंगीत.

– अजीम नवाज राही

 

समुद्र न पाहिलेला माणूस

बापानं समुद्र पाहिला नाही

मग त्याची गाज ऐकणं..

वाळूपात्रात शिंपले शोधणं..

लाटांशी बेधुंद खेळणं..

एकांत किनाऱ्यावरून न्याहाळणं..

या गोष्टींना पारखाच –

समुद्र न पाहिलेला माणूस.

पिंपळपारावरून येणाऱ्या जाणाऱ्याला

मुंबईत राहणाऱ्या लेकाचं कौतुक सांगताना

ढवळून निघायचा त्याचा तळ

भरून यायचे अथांग डोळे काठोकाठ

वाटेला आलेल्या अमवास्यांशी झुंजत,

रानात आभाळ भरून येताना..

वाघूरच्या पुराचा चहाळ घेताना..

चराईत टम्म फुगलेली गुरं पाहताना..

लुटूपुटूच्या खेळातला लेकरांचा आनंद न्याहाळताना..

मी बापाच्या चेहऱ्यावर

उधाणलेला समुद्र पाहिलाय..

– नामदेव कोळी

 

बाप होणं

सोप्पं नसतं

अवकाशाच्या निर्वात पोकळीत

भिरकावून देतो

तो सारे प्रश्न, चिंता दरवेळी,

पण विवंचनेचा वेताळ

सदैव येऊन बसतो

त्याच्या पाठंगुळी..

तो मातीत मिसळतो स्वत:ला,

ओव्हरटाईममध्ये डोळे

फोडून घेतो,

गुरामागं हिंडतो रानोमाळ,

किंवा चौकातल्या गल्लीत

काढत असतो पंक्चर..

पाखरांच्या पंखावरली नक्षी

तो रेखाटतो स्वतच्या रक्तानं..

घर कोमेजू नये

अभावाच्या ऊन्हात,

म्हणून भिजत राहतो खारट पाण्यात.

तो कुलदैवत पुजतो,

उंबरे झिजवतो..

लेक उजवतो..

जोडून ठेवतो नाळ गणागोताशी..

हवं ते पुढय़ात टाकून न्याहाळतो

पिलांच्या डोळ्यांतली चमक..

जीर्ण स्लीपरची गुंडी

पुन्हा पुन्हा लावत..

ओढत राहतो खपाट बलागत

संसार नावाची अवजड मोट..

सावलीचा पदर वितळत जाताना

उसवतो बऱ्याचदा आतल्या आत,

आलेले उमाळ्याचे कढ

पापण्यात गोठवण्याचं कसब

कोण्या देवाजीनं

त्याच्या पदरात असेल घातलं?

बाप नावाच्या धरणाच्या भिंतीत

कोणतं सिमेंट असेल ओतलं?

अंगणात नाचणारे मोर

दूर उडून जातात रानात,

कधी न परतण्यासाठी..

हे  ठाऊक असूनही तो

धरणीगत भेगाळत राहतो,

आशेची पालवं जखमांवर बांधून

आयुष्याच्या पाटय़ावर

स्वत:लाच उगाळत राहतो.

खरंच बाप होणं

इतकं  सोप्पं नसतं..!

– पुनीत मातकर

 

बाबा, फादर आणि

बरंच काही..

किती कल्ला करत असतेस गं

बाबा.. बाबा.. म्हणत,

नावानेच हाक मारत जा मला,

नकळत्या वयातही कळलं होतं

आपला बाबा वेगळाच आहे ते..

मोहांना शरण जात जा

रमणीय असतात ते..

अडकू नकोस पण कुठेच अभिमन्यूसम,

भेदत जा चक्रव्यूह निर्भीडपणे.

स्वीकार आडवळणांची आव्हानं

हे सांगताना न चुकता रॉबर्ट फ्रॉस्टची

कविता ऐकवायचास.

आयुष्य सापशिडी असेल तर

सापालाच धरुन वर चढ अन् गाठ आभाळ,

तुझं भन्नाट तत्त्वज्ञान!!

टोकाचे वाद, दोघांचा अहंपणा, स्वकेंद्री असणं,

काळजातल्या अनावश्यक निरगाठी,

यातूनही माझ्यातल्या अनिष्टततेच्या खिडकीचं

अलिप्तपणे व्यापक  भान होतंच तुला.

सामान्य होतास पर्याय शोधणारा.

माझ्या वांझोटय़ा व्यक्तिमत्त्वाला नवतेनं फुलवायचास.

मागे वळून बघताना जाणवतं,

तू, तुझं जगणं कालजयी होतं.

तुझी बांडगुळ बांडगुळ बांडगुळ अशी हुकमी हाक

चिरंजीवी बनून कानात घुमत रहावी अविरत!

– विशाखा विशाखा.

 

वडिलांएवढीच आता प्रिय वाटते कविता ..

वडिलांचे आणि कवितेचे नेमके नाते काय?

हे स्पष्ट होत नाही वडील गेल्यानंतरही

तरी वडिलांएवढीच आता प्रिय वाटते कविता

वडील गेले तो दिवस आठवत नाही

पण वडील गेल्यानंतरचा आईचा आक्रोश

अजूनही घुमत राहतोय कानात

तेव्हापासून आजतागायत

वडील गेलेल्या क्षणाच्या वेदनेएवढीच

अवस्थ करत राहतेय

न सुचणाऱ्या कवितेच्या वेदनेची गाज

पण न सुचणाऱ्या कवितेची अस्वस्था

आणि वडिलांच्या निधनानंतरची अस्वस्था

याची घालता येत नाही सांगड

तरी याचं नातं कुठे तरी असेलही माझ्या अंतर्मनात आत

वडील म्हणायचे,

शब्दांचा खेळ करून जगण्याचा डाव

मांडता येत नाही आयुष्याच्या पटावर

तुमची निष्ठा, तुमचे कष्ट घडवत राहते आयुष्य

विचारांचा दृष्टिकोन ठेवावा स्पष्ट

आणि उभं राहावं नजरेला नजर भिडवून

म्हणजे लक्षात येत राहतं

कळपा कळपातून कधीच घालू शकत नाही

आपण शब्दांच्या आकाशाला गवसणी

झालंच तर संकुचितच होत जातो आपण

अखेर वडिलांच्या या उद्गारामुळेच तर

जगाला साद घालण्याची ऊर्मी मिळत गेली कवितेतून

तरीही वडिलांनी कधी केली नाही

माझ्या शब्दांची मानहानी

माझ्या शब्दांशीच जोडत राहिले आपल्या आयुष्याचा सत्संग

आणि शिकवत राहिले सदैव

पुढचा काळ चाल करून येणारच आहे तुझ्यावर

तेव्हा जगण्याच्या प्रत्येक कसोटीवर

माणूस म्हणून उभं राहता येईलच असं नाही

पण अशा वेळी

लढणाऱ्या तळाच्या समूहाचाच होऊन जावं एक आधार

आणि ज्यांना कोणाचाच नसेल आधार

जे शाबूत ठेवू पाहतायत आपला स्वाभिमान

बळी जाण्याच्या शक्यतेपासून दूर राहताना

भुकेच्या कल्लोळातही स्पर्श करणार नाहीत

त्यांच्या भाकरीच्या तुकडय़ाला

अशांसाठीच लढावी आपल्या अक्षरांची लढाई

आता वडील गेले त्याच काळात इतरांसाठी

लढण्याचा मागे पडला काळ

म्हणून तर वडिलांच्या उद्गाराची

अशी आपसूक होत राहते आठवण

वडील म्हणायचे,

तुमच्या पूर्वजांच्या जगण्याचा संदर्भ

लावला जातो तुमच्या जगण्याला

आणि तुमच्या प्रगतीबरोबरही वाढत जातात तुमचे दुश्मन

अशा वेळी विस्तारावं आपलं मन,

विस्तारावं आपलं जगणं

वाढत्या वयाचं आयुष्य चालताना

खरं तर तसं जगणं विस्तारलं वयही वाढलं

पण विस्तारली का कविता?

झाली का ती प्रौढ?

हे मात्र निश्चित सांगता येत नाही

एवढं सहज आयुष्य पकडता येत नाही शब्दात

म्हणून तर साऱ्या जगण्याच्या पसाऱ्यात

वडिलांएवढीच कवितेचीही उंची मोठी वाटत राहतेय आता!

– अजय कांडर

 

सिगरेटच्या धुरात विस्कळलेलं मोहळ

आम्ही दोघं भावंडं

सायकलला आवळून बसलोय

मागं आणि पुढं

सायकल हाकत वडील

गर्द रानाकडे निघालेय

जिथे झाडा.. झाडाला

मोहळ असतात

वडिलांच्या तोंडातली सिगारेट

एकसारखी मोहळांवर धूर सोडतेय.

मधमाश्यांची गुणगुण त्यांच्या

अवतीभोवती सुरूच आहे

अर्ध्या भाकरीएवढय़ा मोहळांच्या पिवळ्या पोळ्या

जमिनीवर पडल्यांय

ज्यांतून मधमाशीच्या पिल्लांची

डोकी आतबाहेर होत आहेत

मधाने भरलेला अडकित्ता

आणि घट्टे असलेला वडिलांचा

जाडशीळ तळवा आम्ही

उपाशी मांजरीसारखा साफ करतोय

सिगारेटचा धूर सोडून देखील

वडिलांच्या हाताला कडकडून

झोंबलेल्या मधमाश्या

आम्ही मातीत चिरडून टाकायचो

वडिलांचे भप्प सुजलेले दोन्ही हात

थरथरत राहायचे

आम्ही चिडलेल्या मधमाशीसारखेच

तरी वडील आमची चिगट हाततोंडं

धुवण्यासाठी एका विहिरीतून

पितळी बादलीने पाणी शेंदत असायचे

त्याच विहिरीत एक दिवस

जीव दिलेली बाई पाठीवर तरंगलेली आहे

जी बहिणीने मला मागे ओढून धरत दाखविली होती

सिगरेटच्या धुरात विस्कळलेलं मोहळ

पाठीवर पडलेल्या प्रेतासारखं

पाठलाग करीत राहतंय..

– अनिल साबळे

 

बाप

बलवानी राबणारा बाप गाईवानी होता

हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता

दिसे फाटका तुटका लई अंगावर  मळ

बाप मळला म्हणून झाले लेकरू निर्मळ

अनवाणी पायांनीच दिले काटय़ांना उत्तर

किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर

बाप नापास शेतांना पास करीत राहिला

शेणा मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला

रंग माझा उजळून त्याचे काळे झाले अंग

त्याच्या काळ्या रंगामधी आहे माझा पांडुरंग

काबाडाचा कारभारी बाप धस्कटाचा धनी

तरी त्याच्या बिवडात झाली माझी आबादानी

माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामानं

त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान

– भरत दौंडकर

 

बापू

दाढीची खुरटं वाढू दिली नाहीत

तुम्ही

मिशीतल्या केसांवरही करत राहिला

शिस्तीचे संस्कार

पांढऱ्या शुभ्र वस्त्रात

अंतर्मन शोधत होतात जणू

म्हणून चुरगळू दिला नाहीत

धोतराचा काठ

इथल्या किनाऱ्यावरही भेटता

तेव्हा रेतीवर

अधांतर असतात तुमचे पाय

तुम्हाला माहीत होतं

पाय रोवण्यातच

दडलेला असतो अपाय

तुम्ही म्हणालात

रोवणं आलं की झडणं आलं

झडणं आलं की सडणं आलं

सडणं आलं की मरणं आलं

म्हणून शोधून ठेवावा

रोवण्याला पर्याय

होती तेवढी उर्जेची बीजं

पेरलीत चारपाच भावंडात

अन् निघून गेलात

स्वत:ला हरवू न देता

निर्मात्याच्या जगङव्यापात

हल्ली पाय रोवलेली आई

रोज झडताना दिसते

तेव्हा खरंच वाटतं

बरं  झालं

पायाला भिंगरी लावलेला

होता बाप.

– योजना यादव

First Published on June 15, 2019 1:51 am

Web Title: special poem on the occasion of fathers day
Just Now!
X