ch14रेडिओलॉजी तंत्रज्ञान हे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी वरदान ठरते आहे. एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआय तसेच अलीकडे आलेल्या स्पेक्ट्रोस्कोपीच्या तंत्रामुळे आजाराचे नेमके निदान करण्यास मदत होते आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे बारकावे पूर्णपणे आत्मसात केलेले प्रशिक्षित तज्ज्ञही हवे आहेत.
डोळ्यांना दिसतं ते माणसाचं बाह्य़रूप. त्याच्या आत काय दडलंय हा प्रश्न डॉक्टर मंडळींना नेहमीच पडत आलाय. १८९५ मध्ये प्रोफेसर रोन्टजेन यांनी सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर दिलं, जेव्हा त्यांनी स्वत:च्या पत्नीच्या हाताचा एक्स-रे काढला. वर्षभरातच या अभिनव साधनाचा उपयोग करून युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या शोधून सर्जन त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करू लागले. एक्स-रेमुळे मिळणारी प्रतिमा स्पष्ट होती, पण ती द्विमिती असल्यानं त्याच्या ‘खोलीचा’ अंदाज येत नव्हता. ही त्रुटी दूर केली १९७० साली प्रस्तुत झालेल्या सीटी स्कॅन यंत्रणेने.
एखाद्या वस्तूच्या शेकडो प्रतिमा वेगवेगळ्या कोनांतून काढायच्या आणि संगणकाच्या मदतीने त्यातून स्पष्ट (त्रिमिती) प्रतिमा दाखवायची याला म्हटलं गेलं, कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी ऊर्फ सिटी स्कॅन. आयोडिनयुक्त कॉन्ट्रास्ट इंजेक्शन शिरेतून दिल्यास प्रतिमांची सुस्पष्टता अधिकच वाढते. विशेषत: मेंदूच्या प्रतिमा मिळवण्यासाठी याचा उपयोग केला गेला.
१८८२ मध्ये आणखी एक क्रांतिकारी वैज्ञानिक संकल्पना उदयाला येत होती. निकोला टेस्ला या हंगेरियन संशोधकानं चक्राकार फिरणाऱ्या चुबंकीय क्षेत्राचा शोध लावला होता. मात्र या तंत्राचा वापर करून संपूर्ण मानवी शरीराची प्रतिमा मिळायला १९७७ साल उजाडलं. मजेची गोष्ट म्हणजे हा स्कॅन तब्बल पाच तास चाललेला होता. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ऊर्फ एमआरआय हे तंत्र आज सर्व प्रतिमा शोधक पद्धतींमध्ये निर्विवाद श्रेष्ठ समजलं जातं. अचूकपणा, स्पष्ट प्रतिमा आणि सिटी स्कॅनप्रमाणे क्ष किरणांचा धोका नाही, शिवाय आयोडिनयुक्त कॉन्ट्रास्ट (जो मूत्रपिंडावर घातक परिणाम करू शकतो) इंजेक्शन देण्याची गरज नाही म्हणून सुरक्षित, या सर्व फायद्यामुळे एमआरआयला हे स्थान मिळालं आहे. एमआरआयच्या काही त्रुटी पण आहेत. ही तपासणी करताना धातूची कोणतीही वस्तू अंगावर चालत नाही. ज्यांच्या शरीरात धातूची वस्तू बसवलेली आहे, उदा. अस्थिभंग जोडण्यासाठी बसवलेल्या पट्टय़ा, स्क्रू वगैरे, अशा रुग्णांचा एमआरआय करता येत नाही. कोंडल्यासारखं वाटतं, कानात आवाज येतो अशा तक्रारीही रुग्ण करतात. पण सतत चाललेल्या संशोधनामुळे त्या त्रुटीवर मात करून तंत्रज्ञान नवनवीन मैलाचे दगड गाठत आहे. अलीकडेच आलेल्या ‘अम्बियंट सिस्टिम’मुळे रुग्णाला कोंडल्याची भावना येत नाही , कानात लावलेल्या हेडफोन्समधून तो संगीत ऐकू शकतो, व्हिडीओ पाहू शकतो. तसंच स्कॅनला लागणारा वेळ ३० मिनिटांवरून १०-१२ मिनिटांवर आला आहे. रुग्णांच्या सहकार्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
एमआरआयचा सर्वात जास्त उपयोग मेंदू किंवा मज्जारज्जूची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी होतो. या स्कॅनमुळे या अवयवांचा पूर्ण आणि स्वच्छ नकाशाच असतो म्हणा ना! त्यात महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या स्पष्टपणे वेगळ्या दाखवलेल्या असतात. शस्त्रक्रिया करताना कोणता भाग काढायचा आणि कशाला हात लावायचा नाही हे सर्जनला नेमके दाखवणारा पथदर्शक म्हणजे एमआरआय.
स्पेक्ट्रोस्कोपी या तंत्राने मेंदूच्या कोणत्या पेशी चयपचयामध्ये कोणतं रसायन निर्माण करत आहेत हे कळू शकतं. उदा. टय़ूमर असेल तर कोलिन नावाचं रसायन दिसून येईल, तर झीजजन्य आजार असल्यास एन.ए.ए. हे रसायन कमी झालेलं दिसेल. अगदी लहान बालकांत क्वचित जन्मजात चयापचयाचे रोग असतात. अशा वेळी विशिष्ट रसायनाचे साठे अंतर्गत अवयवात, विशेषत: मेंदूच्या स्पेक्ट्रोस्कोपी स्कॅनमध्ये दिसून येतात, त्यावरून रोगनिदान केलं जातं.
पफ्र्युजन एमआरआयची कल्पना अशी आहे- शरीरात सर्वत्र रक्तप्रवाह चालू असतो. ज्या ठिकाणी पेशींचा दाह होतो किंवा टय़ूमर वाढतो तिथे रक्त जास्त प्रमाणात खेचलं जातं. याउलट जो भाग मृत आहे, तिथे केवळ दोऱ्यासारखा निर्जीव पदार्थ शिल्लक राहिल्याने रक्ताचं अभिसरण थांबतं. पफ्र्युजन एमआरआय नेमकी हीच माहिती देतो. आधी पुष्कळ रक्त असणाऱ्या विकृतीचं निदान, आणि उपचार झाल्यानंतर पुन्हा स्कॅन केल्यास त्या प्रतिमेतून दिसणारा अभिसरणातला फरक. विशेषत: मस्तक आणि गळा या भागातले टय़ूमर ओळखण्यासाठी आणि त्यांचा उपचारांना दिलेला प्रतिसाद अजमावण्यासाठी स्कॅन महत्त्वाचा ठरतो.
शरीराच्या इतर अवयवांचीसुद्धा उत्कृष्ट प्रतिमा एमआरआयवर बघता येते. उदा. अल्ट्रा साऊंड तंत्राने दिसलेल्या यकृतातल्या गाठी. पूर्वी अशा गाठींचं नेमकं स्वरूप कळण्यासाठी सुई घालून बायोप्सी करावी लागे. तर कधी अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया केली जाई. रक्तस्रावाचा धोका असे. पण आता एमआरआयवर अशा गाठींचं नेमकं स्वरूप त्याच्या सर्व वैशिष्टय़ांसह उघड झाल्याने त्या गाठी कर्करोगाच्या आहेत की निरुपद्रवी असून त्यांना उपचारांची गरज नाही हे सहजपणे कळून येतं.
दोन्ही मूत्रपिंडांवर बसलेल्या स्युप्रा रीनल ग्रंथींची स्पष्ट प्रतिमा अल्ट्रासाऊंडसारख्या अन्य साधनांनी मिळणं मुळातच अवघड असतं. ग्रंथीमध्ये गाठ आहे असं कळलं तरी ती साधी की कर्करोगाची हा प्रश्न राहतोच. या ग्रंथी उदर पोकळीत बऱ्याच खोलवर असल्याने सुई घालून बायोप्सी करणं अशक्य असतं. शस्त्रक्रिया करून पोट उघडायचं आणि प्रत्यक्ष पाहायचं एव्हढाच पर्याय पूर्वी डॉक्टरांसमोर असे. पण आता एमआरआयच्या ‘इन फेज, आउट ऑफ फेज’ प्रतिमांवरून गाठींचं स्वरूप कळून गाठ निरुपद्रवी असल्यास शस्त्रक्रिया टाळता येऊ लागली आहे.
पुरुषांमधील कर्करोगात प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. याची शंका प्रथम नेहमीचा अल्ट्रा साऊंड आणि वाढलेली पीएसए या टय़ूमर मार्करची पातळी यावरून येते. कर्करोगनिदान आणि तो प्रोस्टेट पुरताच आहे की बाहेर पसरला आहे हे बघण्यासाठी आता एमआरआय तंत्रज्ञान सर्व सामर्थ्यांनिशी सज्ज आहे. ग्रंथीची रचना, रक्ताभिसरण, स्पेक्ट्रोस्कोपी इत्यादी सर्व प्रतिमांचा अभ्यास करून कर्करोगाचं नेमकं स्वरूप शस्त्रक्रियेपूर्वी समजतं आणि त्याप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं ‘रोबोटिक’ शस्त्रक्रिया करता येते, आणि अर्थातच ती यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. अर्थात निश्चित निदानासाठी बायोप्सी करावीच लागते. पण आता अगोदर स्कॅन आणि मागाहून स्कॅनने दर्शवलेल्या संशयास्पद भागातून घेतलेली बायोप्सी आणि त्यानंतर सर्जरी अशा क्रमाने या गोष्टी केल्या जातात.
हृदयाची अंतर्गत रचना, कार्य आणि रक्त पुरवठा यांची माहिती आजवर २-डी एको, डॉप्लर स्टडी आणि एंजियोग्राफी यावरून मिळवली जाई. आता रुग्णाला न टोचता, कॉन्ट्रास्टचा वापर न करता हृदय रोहिणीचं अचूक सविस्तर चित्र सीटी कॉरोनरी अँजिओग्राफीने मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीला हृदय विकार असणार नाही हे या प्रतिमांवरून निश्चित सांगता येतं. तसंच उपचारांनंतर स्टेंट घातलेल्या किंवा बायपास सर्जरी केलेल्या रुग्णाच्या रक्तवाहिनीची परिस्थिती सीटी एंजियोग्राफीवरून नेमकी समजते.
अलीकडे हृदयाचा एमआरआय स्कॅन हे अतिशय प्रभावी साधन डॉक्टरांना उपलब्ध झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्टेंट अथवा बायपास शस्त्रक्रियेचा फायदा रुग्णाला किती प्रमाणात होऊ शकेल? त्याच्या हृदयाचे स्नायू किती प्रमाणात पुन्हा काम करायला लागतील? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या स्कॅनमधून मिळू शकतात. हृदयाच्या पोकळीत वाढणारा टय़ूमर, आतल्या आवरणाला चिकटलेली रक्ताची गुठळी, स्नायूची एकाच ठिकाणी वाढलेली जाडी, हृदयाला किंवा महारोहिणीला आलेला फुगा (अन्युरिझम)अशा तुलनेने दुर्मीळ गोष्टींचं निदान एमआरआयवर सुलभतेनं होऊ शकतं.
एमआरआय तंत्रज्ञान पूर्णतया पदार्थविज्ञान आणि संगणकीय गणितावर आधारलेलं आहे. यासाठी अव्वल दर्जाची (३ टेस्ला क्षमतेची)यंत्रणा पाहिजे. तसंच या तंत्रज्ञानाचे बारकावे पूर्णपणे आत्मसात केलेले प्रशिक्षित तज्ज्ञही पाहिजेत. याशिवाय गरज आहे ती गोळा केलेली सर्व माहिती, सर्व प्रतिमांसह साठवून ठेवण्याची (डेटा स्टोअरेज). यासाठी प्रचंड प्रमाणात माहिती-तंत्रज्ञान लागेल, खर्च पुष्कळ येईल, पण आजच्या प्रतिमांची तुलना जुन्या प्रतिमांशी करता आली तर अचूक रिपोर्ट देणं शक्य होणार आहे.
लेखाच्या शेवटी एका वेगळ्याच तंत्राचा उल्लेख करणार आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षांत प्रस्तुत झालेली, भारतात केवळ ३-४ ठिकाणी उपलब्ध असलेली ही अभिनव प्रकारची स्तन-तपासणी ऊर्फ मॅमोग्राफी आहे. टोमो सिंथेसिस पद्धतीच्या या स्तनाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये रुग्णाला होणारा किरणोत्सर्ग एरवीच्या मॅमोग्राफीच्या तुलनेत बराच कमी असतो. तसंच स्तनावर दाब पडल्यामुळे होणारी वेदनासुद्धा सौम्य असते. मिळणाऱ्या प्रतिमा मात्र सीटी स्कॅन इतक्या सुस्पष्ट आणि त्रिमितीमध्ये असतात. लहानात लहान, त्वचेपासून दूर असलेला टय़ूमरही लक्षात येतो. एवढंच नाही तर टय़ुमरची जागा ‘स्टीरिओ टेक्टिक’पद्धतीने निश्चित करून निर्वात उपकरणाने त्याची बायोप्सी करता येते, किंवा तो तसाच संपूर्ण बाहेरसुद्धा काढता येतो. स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगात वरच्या क्रमांकावर असून निदान व उपचार लवकर झाल्यास ती स्त्री पूर्ण बरी होऊ शकते ही गोष्ट महत्त्वाची.
मानवी शरीराच्या वेगवेगळ्या पद्धतींनी काढलेल्या प्रतिमांचा अभ्यास म्हणजे प्रतिमाशास्त्र. गेल्या १-२ वर्षांत प्रतिमाशास्त्रात झालेल्या प्रगतीबद्दल आजचा हा लेख आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा प्रतिमांचा खेळ वास्तवाशी अधिकाधिक जुळत चालला आहे. ल्ल
(या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ. आशीष अत्रे, एमडी., डीएनबी. रेडिओलॉजी, प्रमुख, स्टार इमेजिंग आणि रिसर्च सेंटर , पुणे)
डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…