पालक ही सर्व काळ आणि सर्वत्र मिळणारी अनेक गुणांनी परिपूर्ण अशी भाजी आहे. ती ‘लो कॅलरी’ असूनही त्यात प्रोटिन, फॉस्फरस आणि झिंक आहे. त्यातल्या कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते आणि लोहामुळे अ‍ॅनिमिया कमी होण्यास मदत होते. पालकात जीवनसत्त्व अ, क आणि ब २ असून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
पालकातले फ्लॅवनॉईड्स हृदयाचं आरोग्य राखतात, तर मधुमेही व्यक्तींसाठी रक्तातली साखर कमी करण्यास मदत करतात. पालक शिजवून त्याबरोबर लिंबाचा रस, चिंच किंवा ताक यांचा उपयोग केल्यास जास्त चांगलं. फक्त पालक वापरताना तो चांगला धुऊन घ्यायला हवा.
पालक हरभरा चाट
साहित्य : दोन वाटय़ा चिरलेला पालक, एक वाटी भिजवून शिजवलेले हरभरे, चवीला मीठ, प्रत्येकी एक मोठा चमचा पुदिना- मिरची- कोथिंबीर यांची तिखट चटणी, खजूर-चिंच चटणी, सजावटीसाठी- शेव, कांदा, तेल आणि दही.
कृती : तेल तापवून त्यावर पालक परतावा, त्यात शिजलेले हरभरे घालून परतावे, मीठ घालावं, त्यात दोन्ही चटण्या, कांदा, शेव आणि दही घालून खायला द्यावं.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com