News Flash

संधिकाली या अशा..

नव्या वर्षांचं नवंकोरं पान उलटत, ताजीतवानी सकारात्मक सुरुवात करण्याचा ‘फॉर्म्युला’ सांगणारा लेख नव्या वर्षांच्या शुभेच्छांसह..

(संग्रहित छायाचित्र)

नीलिमा किराणे

जुन्या वर्षांचा निरोप आणि नव्या वर्षांचं स्वागत यांच्यामधले  संधिकालाचे काही दिवस म्हणजे वर्षभरात काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब मांडण्याचे दिवस.. म्हणूनच या संधिकालात अंतर्मुख होऊन स्वत:च्या स्वभावाकडेही त्रयस्थपणे पाहायला हवं, त्रासदायक असेल ते मागे सोडायला हवं, ते विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक नक्कीच करता येतं, स्वत:ला बदलता येऊ शकतं, हे सांगणारा.. नव्या वर्षांचं नवंकोरं पान उलटत, ताजीतवानी सकारात्मक सुरुवात करण्याचा ‘फॉर्म्युला’ सांगणारा लेख नव्या वर्षांच्या शुभेच्छांसह..

वर्ष संपत आलंय नि नवीन वर्ष सुरू व्हायला आता फक्त तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत.. जुन्या वर्षांचा निरोप आणि नव्या वर्षांचं स्वागत यांच्यामधले हे शेवटचे संधिकालाचे काही दिवस म्हणजे अस्वस्थता आणि उत्साहाचं वेगळंच मिश्रण असतं. जाणाऱ्या वर्षांतल्या आठवणींची हुरहुर मनात दाटलेली आणि नव्याची उत्सुकता असते.. निसर्गचक्रात या काही दिवसांनी अजिबात फरक पडत नाही, पण आपल्यासाठी एकेक वर्ष हा एकेक टप्पा असतो, मागच्या अनेक वर्षांच्या आठवणींचा संदर्भ घेत मोठं होण्याचा.

नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष आणि आतषबाजीची लहानपणी भारीच अपूर्वाई असते. मात्र मोठे होता-होता, आपण गेल्या वर्षभरात काय मिळवलं, काय गमावलं, याचा हिशोब यानिमित्ताने करायला लागतो. मनासारख्या झालेल्या वर्षभरातल्या गोष्टींचा आनंद असतो, तसंच काही चुका, चुकलेले अंदाज, यातून घडलेलं शिकणं सोबत असतं. यानिमित्तानं आपलं अनुभवांतून मोठं होत पुढे जाणं आपणच त्रयस्थपणे न्याहाळू शकतो. जुन्यातून उगवणाऱ्या नव्याची दिशा ठरवण्यासाठी, म्हणूनच ही वेळ योग्य.

मनाला बांधून ठेवणारी आणि मोकळ्या विचाराला अडवणारी प्रत्येक गोष्ट आत्ताच तपासून घेऊन, मनावरची जड ओझी मागच्या वर्षांतच सोडून द्यायला हवीत. उत्साहानं सळसळण्यासाठी मन हलकंच असावं लागतं. म्हणून या संधिकालात अंतर्मुख होऊन स्वत:च्या स्वभावाकडेही त्रयस्थपणे पाहायचं, त्रासदायक असेल ते मागे कसं सोडायचं, याचा आवर्जून विचार करायचा.. ते विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक नक्कीच करता येतं. चार्वीचंही असंच काहीसं झालं होतं. अशाच एका वर्षांअखेरीच्या काळात चार्वी भेटायला आली. नेहमी हसतमुख, प्रेमळ, पण काही बिनसलं, मनाविरुद्ध घडलं, की तावातावाने तुटून पडणाऱ्या चार्वीचे डोळे त्या दिवशी उदास होते. अस्वस्थ, विचारमग्न आणि खचलेलेही. ‘‘मला खूप राग आला होता.. वाट्टेल ते बोलले मी त्याला. खरं म्हणजे, त्याचा काही दोष नव्हता. माझ्यापेक्षा तो कामात चांगलाच आहे. आम्ही दोघंही एकाच प्रोजेक्टवर आहोत, बॉसनं त्याला ‘ग्रुप लीडर’ केलं. तेव्हा मला एकदम दुय्यम वागवल्यासारखं वाटलं..’’ ‘मी मुलगी आहे म्हणून तुम्ही शेवटच्या क्षणी त्याला निवडलं,’ असं त्या भरात बॉसलाही म्हणाले मी. खरं तर गेलं वर्षभर बॉयफ्रेंड आणि सहकारी अशा दुहेरी भूमिकांचा ताण आमच्या नात्यावर येत होता. कुठल्याही कारणावरून सतत वाद व्हायचे, तो बरेचदा समजून घ्यायचा. या वेळी मात्र माझा तोंडाचा पट्टा जास्तच सुटला आणि त्याचाही संयम संपला. तोही वाट्टेल ते बोलला. शेवटी ‘ब्रेकअप’ झाला, तरीही मी रागातच होते.

गेल्या वर्षी याच काळात आम्ही केलेली धमाल आता आठवली, ते दिवस आठवले आणि फार एकटं वाटलं. मग ‘ब्रेकअप’च्या दिवशीची माझी बेफाम बडबड आणि मागचे अनेक प्रसंग आठवून अपराधीच वाटायला लागलं. घरातही सर्वाशी माझं असंच काही तरी होतं. माझा स्वभावच तसा आहे, त्याचीच भीती वाटतेय. स्वभाव बदलता येईल का हो..?’’ चार्वी काकुळतीनं विचारत होती. ‘स्वभाव बदलता येतो का?’ हा प्रत्येकाला कधी ना कधी पडणारा एक सनातन प्रश्न. कुठल्याही बदलासाठी आवश्यक असते ती ‘जाणीव’ आणि ‘प्रयोजन’. बदल ‘कशासाठी’ घडायला हवा? त्याची निकड समजणं. ‘ब्रेकअप’पर्यंत पोचल्यानंतर का होईना, चार्वीला निकड जाणवली. रागाच्या भरात आपणच काहीही बोलत सुटतो, त्यामुळे समोरचाही ‘सटकतो’, त्यावर आपण आणखी वार करतो आणि भांडण वाढत जातं याची तिला खोलवर जाणीव झाली. यापूर्वीही अनेक नाती अशीच दुरावल्याचं गांभीर्य जाणवलं.

‘आपलं कोणाशीच पटणार नाही, जोडीदार मिळणारच नाही.’ ही भीतीही असणार, पण त्यामुळे का होईना, स्वभाव बदलायला हवा, हे मान्य झालं. स्वत:ला बदलण्याचं प्रयोजन जेव्हा असं खोलवर उमजतं, तेव्हा स्वभावाचा ढाचा बदलणं शक्य असतं. स्वभावाचं धारदार टोक जखमी करणार नाही इतपत सुसह्य़ तरी करता येऊच शकतं. स्वभाव म्हणजे नेमकं काय? तर ‘विशिष्ट प्रसंगी आपण सवयीने देतो त्या विशिष्ट प्रतिक्रिया’. त्याचं मूळ सहसा आपल्या लहानपणात सापडतं. आपल्यावर होणारे संस्कार, प्रभाव असणारे पालक, व्यक्ती, त्यांच्या बोलण्या-वागण्याच्या, विचार करण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धती, आपल्या स्वत:बद्दलच्या कल्पना, समज, अपेक्षा, कम्फर्ट झोन, लेबल्स, अशा अनेक गोष्टींतून प्रसंगांना, परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपण नकळतपणे पाहत, शिकत असतो. त्या सवयी मोठेपणीदेखील तशाच राहतात. वर्षांनुवर्ष, तशा परिस्थितीत आपण आपोआप तसेच वागतो, वेगळ्या पद्धतीनं वागण्याचा विचारही सुचत नाही. त्यालाच आपण ‘स्वभाव’ म्हणतो.

स्वत:च्या स्वभावाबद्दल प्रत्येकाच्या मनात काही तरी कल्पना, स्व-प्रतिमा असते. त्यातून काही ‘विधानं’, मनात सतत वाजत असतात. उदा. चार्वीच्या मनात ‘स्त्रियांना दुय्यमपणानं वागवलं, की माझा संताप होतो, मग माझा बोलण्याचा पट्टा कोणी थांबवू शकत नाही.’ अशी विधानं वाजत असणार. म्हणजे, ‘मी झाशीची राणी’ ही स्व-प्रतिमा. त्या प्रतिमेला धक्का लागेल अशी शक्यता जरी वाटली, तरी सावध होऊन, जिभेच्या तलवारीनं ती सपासप वार करत सुटते. एखादा सांगतो, ‘‘मी चिडल्यावर तांडव करतो, असं लोक म्हणतात, पण ‘ते’ चुकीचं वागतात म्हणूनच मी भडकतो. आधी त्यांनी वागणं सुधारावं, मग मी आपोआपच बदलेन.’’ तर कोणी जगाचा दाखला देतात. ‘एखाद्याने एवढं काहीबाही बोलल्यावर ‘कोणीही’ चिडणारच ना?’ असं समर्थन शोधतात. ‘कसं वागणं योग्य ठरेल?’ हा मुद्दा बाजूला राहून, ‘चूक कोण? आधी कोणी बदलायचं? हे विषय का येतात? स्वभावामुळे होणारं नुकसान दिसत असूनही, पण काय करणार? माझा स्वभावच तसा पडला ना..’चं तुणतुणं आपण का वाजवत राहतो? अगदी टोकाचे परिणाम दिसल्याशिवाय बदलायला तयार का नसतो? कारण, मनाविरुद्ध घडल्यावर, ‘स्व’ला धक्का लागण्याची भीती वाटल्याबरोबर, लहानपणी नकळतपणे शिकलेल्या स्व-संरक्षण यंत्रणा खाडकन जाग्या होतात. आरडाओरडा, अंगावर धावून जाणं, कट्टी करणं, मान्यच न करणं, लपून बसणं, हे लहानपणीच तर शिकलेले खेळ!

त्याशिवाय आणखीही काही सुप्त कारणं असतात. आपण बदलायचं मान्य केलं, याचा अर्थ आपण एवढी वर्ष वागत होतो, ते चुकीचं होतं. असं कसं? ‘झाशीची राणी’ राहिले नाही, तर माझी ओळख काय? असा एक प्रकारे ‘आयडेंटिटी क्रायसिस’च होतो. बदलायचं म्हणजे कसं वागायचं? ते न कळून वागण्याचा ‘आत्मविश्वास’ संपतो. ‘गोंधळायला’ होतं. मग स्वत:ची ओळख संपवून, आत्मविश्वास घालवून, सवयीचा ‘कम्फर्ट झोन’ तोडून गोंधळलेलं वागण्यापेक्षा, ‘नकोच ना तो बदल’, हे सोप्पं असतं. आपल्या मनाच्या कार्यपद्धती एकदा नीट, अभ्यासासारख्या समजून घेतल्या, आपली विधानं, ट्रिगर पॉइंट, अर्थात आपल्याला चीड आणणाऱ्या गोष्टी आणि जीवनमरणाची भीती यांचा परस्परसंबंध समजावून घेतला, तर बदलाची दिशा नक्कीच सापडू शकते. ते काही ‘रॉकेट सायन्स’ नाही. स्वप्रतिमा आणि अपेक्षांमुळे प्रत्येकाच्या मनात काही विधानं पुन:पुन्हा उमटत असतात. काहींच्या ‘लोकां’बद्दल तक्रारी असतात. ‘माझी क्षमता असूनही चीज होत नाही, यांना माझी किंमत कळत नाही.’ हे तर जवळजवळ प्रत्येकाच्या मनातलं विधान. ‘मी चांगुलपणानं वागते, तर लोक फायदा घेतात, मला कायम गृहीत धरतात.’; ‘मी एक ‘डार्टबोर्ड’ असल्यासारखंच वाटतं मला. कितीही करा, कौतुक दूरच, बॉसकडून टाग्रेटच होतो’, इत्यादी. तर काहींची नाराजी स्वत:बद्दल असते. ‘माझा स्वभाव खूप काळजी करण्याचा आहे. त्यामुळे दडपण असतं’, ‘जिवापाड काम करूनसुद्धा आपण कमी पडू अशी भीती वाटते.’ ‘मी हळव्या स्वभावाची आहे, कुणी मला काही बोललं तर मला रडायलाच येतं.’ ..वगैरे.

आपल्या मनात अशी नाराज ‘विधानं’ वर्षांनुवर्ष फिरत असतात. त्यांच्यामुळे एकीकडे, ‘मी’ किती चांगली वा चांगला’ हा ‘स्व’ जोपासला जातो आणि दुसरीकडे एकटेपणा, ‘टाग्रेट’ झाल्याची, वापरलं गेल्याची, गृहीत धरलं गेल्याची, कमी पडल्याची, अशा दुखऱ्या भावना येऊन त्रास होतो. ‘मी बाई म्हणून..’, या चार्वीच्या विधानासोबत, ‘याच्यासोबत मी कायम दुय्यमच..असं नातं फार टिकणार नाही..’

अशी उपविधानं मनात घुमायला लागतात, तर ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर, ‘आपला स्वभाव असा, आपल्याला जोडीदार टिकवता येणार नाही, टिकला तरी भांडणंच होणार. संपूर्ण आयुष्य अशाच भीतीत जाणार.. त्या ज्योतिषानंही असंच सांगितलंय..’ असली उपविधानं प्रसंगाचं ‘भयंकरीकरण’ करतात आणि चार्वीच्या मनातली थोडी भीती, जीवनमरणाची भीती बनते.

सुरुवातीला ही विधानं अधूनमधून येतात, नंतर पुन:पुन्हा येत राहतात. गडद होऊन त्यांचे ‘ट्रिगर’ बनतात. म्हणजे, छोटंमोठं काहीही घडल्याबरोबर ते विधान, शब्द लगेच मनात येतात. त्यांच्यासोबत भीती, असुरक्षितता, अगतिकता, दुखावलं जाणं, अशा नकारात्मक भावनांचा अवाढव्य डोंगरही क्षणार्धात डोक्यावर येऊन बसतो. मुळातली थोडी भीती त्यामुळे जीवनमरणाची बनते आणि काही कळण्याच्या आत सवयीची प्रतिक्रिया येते – रागाचा उद्रेक, जिभेचा पट्टा आणि आरोप किंवा रडणं, गप्प बसणं, टोमणे मारणं इत्यादी.

पण मनाचं हे वागणं विचारांनी बदलता येऊ शकतं, कारण ते जन्मजात नसतं. अबोध वयात, अनुकरणातून किंवा परिस्थितीतून जुनं वागणं आपण नकळतपणे ‘शिकलेले असतो’. आता प्रौढपणी त्याच्या जागी विचारपूर्वक, तारतम्य वापरून, प्रौढांसारख्या प्रतिक्रिया ‘शिकायच्या’ असतात, एवढंच. प्रत्यक्षात ‘ट्रिगर’ होतो तेव्हा, भावनांचा उद्रेक एवढा जोरात असतो, की विचार वगैरे काही आठवत नाही. मात्र नंतर डोकं शांत असताना अशा प्रसंगांचं विश्लेषण आपलं आपणच करायचं.

भावनिक डोंगराच्या टोकावर नेणारे स्वत:चे ‘ट्रिगर’ शोधणं हे पहिलं काम, कारण तिथे पोचल्यावर कुठल्याही बाजूला गेलं, तरी कडेलोटच असतो. तिथे पोचणं थांबवण्यासाठी त्या विधानांची वैधता प्रामाणिकपणे तपासायची. जसं, ‘माझ्यापेक्षा तो कामात चांगलाच आहे,’ असं चार्वीनं शांत झाल्यानंतर मान्य केलं. याचाच अर्थ, बाई म्हणून आपल्यावर अन्याय झालेला नव्हता, आपल्याला हवं होतं ते न मिळाल्याचं तीव्र दु:ख होतं. भरीला, ‘आपण कायम दुय्यमच राहणार.’ ही भविष्यकाळातली भीती प्रबळ झाली; पण प्रत्यक्षात असंच घडेल असंही नाही. ती एक शक्यता आहे, इतकंच. त्यामुळे आपलं सगळं महत्त्व-अस्तित्वच संपल्यासारखी जीवनमरणाची भीती वाटण्याची गरजच नाही हे विवेकी मन ताळ्यावर असताना समजतं.

नकोशा परिस्थितीला आपण लहान मुलांसारखं हाताळलंय, ‘मला फुगा पाहिजे’ म्हणून रस्त्यावर हातपाय झाडणाऱ्या लहान मुलांसारखं आकांडतांडव केलंय, असं लक्षात आल्यानंतर, ‘‘जीवनमरणाच्या प्रतिक्रियेची गरज नव्हती, सौम्यपणा चालला असता.’’ हे बुद्धीला पटतं. ‘माझ्यावर बाई म्हणून अन्याय होतो.’ या विधानाचा वर्षांनुवर्षांचा गडद लेप त्यामुळे फिकट होतो. आणखी काही प्रसंगांचं आणि विधानांचं असंच ‘विवेकीकरण’ केल्यानंतर तो आणखी फिकट होतो. प्रतिक्रियेतला आक्रस्ताळेपणादेखील त्यासोबत सौम्य होत जातो.

याउलटदेखील, समजा चार्वीवर खरंच थोडाफार अन्याय झालेला असता, तरीही आकांडतांडव केल्यामुळे घडलं काय? तिच्यावरचा अन्याय दूर होणं लांबच, वर ‘ब्रेकअप’ झाला, बॉसचाही अनादर झाला. त्यापेक्षा बॉसशी नीट चर्चा करून मार्ग शोधणं श्रेयस्कर ठरलं असतं. बॉयफ्रेंडवर भडकण्याची तर गरजच नव्हती, हेही लक्षात येतं. लहानपणी भीतीनं आरडाओरडा केला, रडारड केली, बोलता आलं नाही, मारामारी केली, तरी सोडवायला आई-वडील असतात. आताही तसेच वागलो, तर कोणी ‘तारणहार’ येणार नाहीये, हे खोलवर समजणं, स्वत:च्या वागण्याची जबाबदारी घेणं, म्हणजेच तर मोठं होणं असतं. हे ज्यांना उमगतं, ते प्रगल्भ होतात, न कळणारे स्वत:च्याच भावनांशी झगडत आयुष्य काढतात.

आता प्रश्न येतो तो ऐन वेळी, डोकं बिथरलेलं असताना, हा विवेक आठवण्याचा. त्याचा मात्र सरावच करावा लागतो. सुरुवातीला सवयीनं आगपाखड, रडारड सुरू होईल, पण ज्या क्षणी विवेकविचार आठवेल, त्या क्षणी ‘आक्रस्ताळेपणा थांबवायचा, बस!’ एवढंच फक्त बघायचं. ताबडतोब गप्प बसायचं, पाच मिनिटांसाठी तिथून निघून जायचं, एक ते पन्नास आकडे मनात म्हणायचे किंवा डोळ्यासमोर एखादं व्हिज्युअल, डोंगराचा कडा आणायचा किंवा लाल स्टॉप सिग्नल डोळ्यासमोर आणायचा. काही वेळा असं जमल्यानंतर, शांत होण्यासाठी कमी वेळ लागायला लागतो. उद्रेकाची उंची कमी झाली, की वागण्याचे इतर पर्याय सुचतात. त्यातला एक असतो, आरोप किंवा समर्थन दोन्ही न देता आपल्या भावना, वाटणं ‘संबंधित व्यक्तीकडे’ शांतपणे व्यक्त करण्याचा. ते जमायला लागलं, की वागण्याची नवी पद्धत अंगवळणी पडायला लागते.

त्रयस्थाच्या नजरेतून कॅमेरा रोखून स्वत:कडे आणि त्या प्रसंगाकडे नंतर बाहेरून पाहिलं, तरीही घटनेतली आपली जबाबदारी ‘दिसते’. आपण समोरच्याला जो ‘आहेर’ दिला तो त्याने आपल्याला दिला असता, तर आपण कसे वागलो असतो? एवढा विचारही भान देतो. चित्रपट पाहिल्यासारखा त्या प्रसंगाचा मनात ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ केल्यास, चित्रपटातल्या त्या पात्रानं कसं वागायला हवं होतं? कुठे बदलायला हवं होतं? इथे उत्तर बरोबर सापडतं.

बदलाच्या वाटेत ‘आपल्याच मनातले शत्रू’ मधूनमधून काटे पेरतात, तिथे विशेष सावध राहावं लागतं. कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहताना दुसऱ्याची न्याय्य बाजूही जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसते, तेव्हा आपल्या वागण्याची लाज वाटते. अपराधी भाव झेलण्यापेक्षा जुनी इमेज बरी वाटते. दुसरं म्हणजे, आपण जेवढे जास्त हुशार, तेवढा आपल्याला बदलही वेगाने जमायला हवा असतो. तसं जमलं नाही तर आपल्याच ‘मंदपणा’चा ताण येऊन, ‘हुशार’ लोकं मागे फिरू शकतात. अशा दोन्ही वेळी स्वत:ला माफ करायला शिकायचं, वेळ द्यायचा. बदलण्याचे प्रयत्न इतरांना जाणवलेच नाहीत तर, ‘गेल्या काही दिवसांत मी एवढी बदललेय, पण लोकं माझं जुनं वागणंच धरून बसलेत. मग कशाला बदलू?’ अशी कलटी मारावीशी वाटते. तेव्हा स्वत:लाच विचारायचं, ‘बदलण्याचा प्रयत्न स्वत:चे मनस्ताप आणि नुकसान थांबवण्यासाठी चाललाय, की लोकांसाठी?’ आणखी एक सबब येते, ‘दरवेळी एवढा विचार, किती वेळखाऊ आणि कंटाळवाणा..’ तेव्हा ‘इतकी वर्ष जुनी सवय खोल रुजलीय. नवं वागणं निदान रुळायला किती दिवस दिलेयस तू?’ हा प्रश्न बदलाचे प्रयत्न टिकवून ठेवतो. चार्वीला यातलं बरंचसं जमलं, कारण बदलायचंच हे तिनं पक्कं ‘ठरवलं’ होतं.

स्वत:ला बदलणं म्हणजे लहानपणीपासून रुजलेली विचारांची पद्धत बदलणं, मग प्रतिक्रिया आपोआप बदलतात. त्रयस्थपणे निरीक्षण करत, दडपण न घेता मजेनं बदल करत राहायचे. लवचीक राहून उमजायला वेळ द्यायचा. एकदा नवी सवय रुळायला लागली, ‘जमतंय’ असा विश्वास आला, की अनेक छोटय़ा-मोठय़ा उप-सवयी दिसायला लागतात आणि बदलणं ‘ट्रॅपीझ’च्या खेळासारखं बनतं. या झोक्यावरून त्या झोक्यावर, स्वत:च्याच धुनकीत मजेत विहार करता येतो. मात्र कुठलंही कौशल्य मिळवण्यासाठी ‘सराव’ लागतोच. तो करायचा, कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि आपल्याला ते आनंदात जगायचं असतं. तर मग आनंदाची, समाधानाची आणि प्रगल्भ प्रौढत्वाची एकेक पायरी पार करायला सुरुवात करायची ना?

संपूर्ण नवं वर्ष वाट पाहतंय, प्रयोजन मिळण्याची. गरज आहे, ती जुन्यातलं नकोसं ते सोडून देऊन, नव्याला कवेत घेण्याची.. ‘हग’ करायची..

नव्या वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा!

neelima.kirane1@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:30 am

Web Title: start new year positive start up formula abn 97
Next Stories
1 चांगला सामाजिक विषय
2 सूक्ष्म अन्नघटक : निसर्ग जपा,आरोग्यासाठी!
3 विचित्र निर्मिती : मी चित्रपट का बनवते
Just Now!
X