अर्चना जगदीश

वैश्विक वातावरण बदल आणि तापमानवाढ याबद्दल भले अ‍ॅमेझॉनमधल्या वायापी तसेच इतरही अनेक इंडियन आदिवासी जमातींना सांगता येत नसेल; पण या सर्व आदिवासींना त्यांच्या परंपरा आणि संस्कृती यांनी जंगलाशी कायमचं जोडलं आहे. म्हणूनच वायापी आदिवासी हे बलाढय़ खाण कंपन्या, सरकार आणि विकासाच्या नावाखाली त्यांना उद्ध्वस्त  करायला निघालेल्या सगळ्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या मोहिमेचं नेतृत्व करते आहे जमात प्रमुख अजारेटी वायापी ही आदिवासी स्त्री.

जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातल्या अतुलनीय विषुववृत्तीय घनदाट अरण्याला लागलेल्या भयंकर आगी, त्यात हजारो पशुपक्षी आणि वृक्षवल्लींचं झालेलं अतोनात नुकसान या बातम्या जुलैमधल्या. म्हणजे खरं तर ताज्या. जगभरातल्या निसर्गप्रेमींनी यासाठी हळहळ व्यक्त केली, त्याचे खरे-खोटे फोटो आणि बातम्या एकमेकांना पाठवल्या. काही सुप्रसिद्ध वाहिन्यांनीदेखील या अ‍ॅमेझॉनच्या आगीतून कडेवर ओरँगउटान घेऊन बाहेर येणारे किंवा ऑस्ट्रेलियन कोआलाला बाटलीने पाणी पाजणाऱ्या संशोधकांचे फोटो प्रसृत केले.

ब्राझीलमध्ये उत्तर अ‍ॅमेझॉन भागात जंगलांना प्रचंड आगी लागल्या होत्या हे वृत्त खरे असले तरी हे फोटो मात्र जुने इंडोनेशियाच्या जंगलातले आणि ऑस्ट्रेलियामधल्या प्राणिसंग्रहालयातले होते. त्यावरही चर्चा आणि हास्यविनोद झाले. थोडय़ाच दिवसांत अ‍ॅमेझॉनमधल्या आगीच्या बातम्या धूसर होत गेल्या. अर्थातच, या सगळ्या जागृत निसर्गप्रेमी आणि पृथ्वीप्रेमींपैकी अनेकांना अ‍ॅमेझॉनच्या जंगलात, याच आगी लागलेल्या भागात गेली शेकडो वर्षे प्रगत मानवसमूहांच्या संपर्कापासून दूर, आनंदाने जीवन जगत असलेल्या आदिवासी समाजाचं आणि त्यांच्या वाडय़ा-वस्त्यांचं काय झालं असेल आणि या वणव्यांमागची खरी राजकीय कारणं काय आहेत याबद्दल फारशी चिंता नव्हती किंवा खरं म्हणजे वरवरच्या समाजमाध्यमप्रणीत जगात, काय चाललंय हे आपल्याला माहीत आहे, यापलीकडे खोलवर विचार करणारे एक टक्कासुद्धा नसतात.

जानेवारी २०१९ पासून ब्राझील अ‍ॅमेझॉनच्या उत्तर खोऱ्यात १,२१,००० छोटय़ामोठय़ा आगी लागल्या. त्यामुळे फक्त २०१९ या वर्षांत आतापर्यंत साडेसात हजार चौरस किलोमीटर घनदाट एकमेवाद्वितीय अरण्ये आणि त्यातली जीवसृष्टी जळून खाक झाली. गेल्या वर्षीपेक्षा या वणव्यांमध्ये ८५ टक्के वाढ झाली आहे. हजारो वर्षे याच जंगलांत वायापी आदिवासी राहतात. ब्राझीलच्या अमापा राज्यात जंगलांच्या अंतर्भागात राहणारे हे आदिवासी आजही अश्मयुगीन मानवासारखं जीवन जगतात

आणि जगण्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी ते या जंगलांवरच अवलंबून आहेत. ब्राझीलमधल्या विकसित जगापासून त्यांनी स्वत:ला या आदिम जंगलांच्या आश्रयाने आजही सुरक्षित ठेवले आहे. १९७३ मध्ये या वायापी आदिवासींचा बाहेरच्या जगाशी सर्वप्रथम संपर्क झाला. तोपर्यंत आपल्या हद्दी आपण राखल्या पाहिजेत, त्यावर कुणा तरी सरकारचा अधिकार असतो हे त्यांच्या गावीही नव्हतं.

या संपन्न जंगलांना लागलेले वणवे हे मानवनिर्मित होते. कारण समशीतोष्ण कटिबंधात सूचिपर्णी झाडांमधल्या राळेमुळे वणवे आपोआप लागू शकतात. मात्र विषुववृत्तीय सदाहरित वनांमध्ये आगी आपोआप लागत नाहीत. या जंगलांना लावलेले आणि नंतर पसरलेले भयानक वणवे म्हणजे इथल्या समृद्ध वृक्षराजीचं आणि प्राण्यांच्या अधिवासाचं रूपांतर पशुसंवर्धनासाठी कुरणं तयार करणं आणि शेती वाढवणं हे आहेच; पण खरं तर या सगळ्या भागातून मूळ निवासी असलेल्या वायापींच्या जमिनी हडप करून त्यांना या भागातून कायमचं परागंदा व्हायला लावणं, हाच ब्राझीलच्या अध्यक्ष जॉईर बोल्सोनोरो सरकारचा खरा डाव आहे.

याच बोल्सोनोरो यांनी सत्तेवर आल्यावर सहा महिन्यांच्या आतच आदिवासींचे हक्क आणि पर्यावरण सुरक्षा बघणारी ब्राझील सरकारची खाती आणि संस्था बंद करून टाकल्या. शिवाय इथून पुढे कोणत्याही आदिवासी जमातींना त्यांच्या हद्दी कायम करून जमिनीवर किंवा एखाद्या पारंपरिक क्षेत्रावर हक्क सांगता येणार नाही, असा फतवाही काढला.

अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जंगल सरकारी मदत आणि कायदे नसतील तर असेच नष्ट होत राहील. ते असंच नाहीसं होत राहिलं तर काही वर्षांतच या जंगलांचं रूपांतर आफ्रिकेसारख्या गवताळ प्रदेशांमध्ये होईल. तिथली जैवविविधता तर नष्ट होईलच होईल, पण पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला काबूत ठेवणाऱ्या जंगलांचा नाश झाल्यामुळे वातावरण बदलाचा वेग वाढेल. कारण या झाडांमध्ये साठवून ठेवलेला लाखो टन कार्बन वातावरणात सोडला जाईल. म्हणूनच या अ‍ॅमेझॉनच्या महावनांना ‘पृथ्वीची फुप्फुसं’ म्हणतात.

अर्थात, सरकारप्रणीत जंगलविनाशामुळे सोयाबीनची शेती, गुरांच्या मांसाच्या पदाशीसाठी कुरणं तयार केली जातात. या सगळ्यासाठी फक्त ब्राझीलला जबाबदार धरता येणार नाही. इथलं लाकूड, गुरांचं मांस, हे सगळं मुख्यत: उत्तर अमेरिका, युरोप, चीन आणि जपानसारख्या विकसित तसेच दक्षिण आशियामधल्या अनेक विकसनशील देशांमध्ये जातं. तिथल्या मागणीला, बाजाराला अंत नाही. वेगाने वाढणाऱ्या जगाच्या अर्थव्यवस्था आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी बळी जातो तो अशा अनाघ्रात जंगलांचा. त्याला आपण सगळेच जबाबदार आणि कारणीभूत आहोत हे वास्तवदेखील नाकारता येत नाही.

ब्राझील म्हणजे जगाच्या वेगाने वाढणाऱ्या बिनीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा पन्नास टक्क्य़ांहून अधिक भाग आणि संपन्न जंगलं या देशात आहेत. दुर्दैवाने याच मौल्यवान जंगलांच्या खाली जमिनीच्या पोटात तांबे, सोनं आणि लोखंडाचे साठे आहेत. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी उद्योग पाहिजे याबद्दल कोणत्याही सरकारचं दुमत नसतं. विकासकामांना प्राधान्य देणारं सरकार, भ्रष्ट राजकारणी आणि उद्योगजगत यांचं साटंलोटं, म्हणूनच अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातली जंगलं आणि आदिवासींच्या मुळावर उठलं आहे.

वैश्विक वातावरण बदल आणि तापमानवाढ याबद्दल भले अ‍ॅमेझॉनमधल्या वायापी तसेच इतरही अनेक इंडियन आदिवासी जमातींना सांगता येत नसेल; पण या सर्व आदिवासींना त्यांच्या परंपरा आणि संस्कृती यांनी जंगलाशी कायमचं जोडलं आहे. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत बाहेरच्या जगाचा वाराही न लागलेल्या वायापी आदिवासींचं जीवन आणि जंगल एकच होतं. म्हणूनच वायापी आदिवासी हे बलाढय़ खाण कंपन्या, सरकार आणि विकासाच्या नावाखाली त्यांना उद्ध्वस्त करायला निघालेल्या सगळ्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.

या मोहिमेचं नेतृत्व करते आहे वायापी जमात प्रमुख अजारेटी वायापी ही आदिवासी स्त्री. जगाच्या वातावरणाला दरवर्षी २० टक्क्य़ांहून अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या या अजस्र जंगलाचे खरे राखणदार आणि मालक वायापी आदिवासी आहेत, असा तिचा ठाम विश्वास आहे. दुर्दैवाने आज एकूण फक्त १५०० वायापी लोक उरले आहेत आणि ते अमापा जिल्ह्य़ाच्या दाट अरण्यांमधल्या ९०-९२ वस्त्यांमध्ये राहतात. आपलं जंगल, पाणी आणि जीवन वाचवण्यासाठी आता सरकारविरुद्ध संघर्ष करताहेत. उत्तर अ‍ॅमेझॉनमधल्या फ्रेंच गयानाला लागून असलेल्या या भागात पूर्वी सरकारने खाण कंपन्यांसाठी शोधमोहिमा काढायचा आणि एक हमरस्ता तयार करायचा प्रयत्न केला होता; पण खनिजांचा शोध आणि रस्ता  दोन्हीही पूर्ण झाले नाहीत. या अर्ध्यामुर्ध्या रस्त्यामुळे वायपींच्या जागेपर्यंत पोहोचणं शक्य झालं. आता जेव्हा सरकारने पुन्हा खाण कंपन्यांना ही जंगलं द्यायचा घाट घातला तेव्हा आजारेटीने आपल्या जमातीच्या लोकांना याबद्दल जागृत करायला सुरुवात केली. आपली ओळख असलेलं प्राचीन जंगल आणि जमीन सरकारकडून कायमची हिरावून घेतली जाईल म्हणूनच आजारेटीच्या नेतृत्वाखाली सगळे उरलेले वायापी एकत्र आले आहेत.

नैसर्गिक रंगाने रंगवलेलं आणि जंगलांतल्या धाग्यापासूनच तयार केलेलं एक धडुतं ते कमरेभोवती गुंडाळतात, पारंपरिक पद्धतीने चेहरे रंगवतात आणि आपले तीरकामठे घेऊन गटागटाने या अर्ध्यामुर्ध्या रस्त्यावर गस्त घालतात. खाणकामाच्या दृष्टीने चाचपणी करायला आलेल्यांना अडवतात, इतरही प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करतात आणि काहीही वेगळं आढळलं तर हल्ला करायलाही मागेपुढे बघत नाहीत. आजारेटी आता साठीपार आहे; पण पन्नाशीत असताना तिने शहरी शाळेत जाऊन पोर्तुगीज भाषा शिकली. ब्राझीलची मुख्य भाषा शिकण्याचं कारण म्हणजे आपला विनाश करायला टपलेल्या, प्रगत ब्राझीलमधल्या गोऱ्यांना आपलं म्हणणं सांगता आलंच पाहिजे आणि प्रसंगी हक्कांसाठी भांडता आलंच पाहिजे, हे होतं. शाळेत शिक्षकही तिची टर उडवायचे; पण जिद्दीने ती पोर्तुगीज शिकली आणि आता ब्राझीलचे धोरणकत्रे तसेच जगभरातल्या संस्था-संघटना यांच्याशी ती वायापींच्या भविष्याबद्दल, जंगलांबद्दल चर्चा करते, प्रश्न मांडत राहते. त्याच्या हद्दीतले काही भाग खाणकामासाठी देण्याचा डाव लक्षात आल्यावर तिने वायापींची गावं, त्यांची जंगले-नद्या दाखवणारे नकाशे तयार करणं, प्रत्यक्ष जागेवर हद्दी आखणं हे सगळं इतर स्वयंसेवी संस्था संघटनांच्या मदतीने करून घेतलं. कारण जर असे हद्दीचे नकाशे असतील तर आदिवासींचे पारंपरिक विभाग म्हणून त्याला ब्राझीलमध्ये सरकारी मान्यता मिळते आणि तिथे आदिवासींच्या परवानगीशिवाय काही करता येत नाही.

जंगलात ‘अपनी धुनमें’ निसर्गाबरोबर राहणाऱ्या वायापींचा १९७३ मध्ये पहिल्यांदा बाहेरच्या जगाशी संबंध आला, त्यानंतर दोन-तीन वर्षांत गोवर- कांजिण्यांच्या विषाणूंमुळे त्यांची सर्व जमात नष्ट व्हायची वेळ आली होती, कारण रोगाच्या तडाख्यातून फक्त १५० वायापी वाचले होते. पुन्हा असं होऊ नये म्हणून आजारेटी आणि तिचे सहकारी इतर जमात प्रमुख सतत काळजी करतात, प्रत्यक्ष काम करतात आणि ‘जंगलाशी जोडलेलं आपलं आरोग्यदायी आयुष्य महत्त्वाचं’ हे सगळ्या वायापींना शिकवत राहतात. आपल्या पुढच्या पिढय़ांना जंगल समजलं पाहिजे, या अरण्यांचं आणि आपलं नातं काय आहे, ते टिकवलं पाहिजे यासाठी ती तिच्या मुलींना, सुनांना मासेमारी शिकवते, मर्यादित जंगल साफ करून शेती कशी करायची ते शिकवते आणि स्थानिक कापसापासून सूत काढायलाही शिकवते. बाहेरच्या जगातल्या अतिक्रमणामुळे त्यांच्यावर संकट येत असलं तरी उत्सव करायला हवेत आणि आनंद साजरा करायला हवा हे ती शिकवते. कारण निराश माणसं संकटाचा सामना करू शकत नाहीत हे तिच्या आदिवासी परंपरेने तिला शिकवलं आहे. ती स्वत: आपल्या नातवाला पारंपरिक जगणं शिकवते आणि वस्तीतल्या तरुण मुलींना गाणी आणि वायापी संस्कृतीची ओळख करून देते. त्यात जंगल आणि त्यांचं जीवन असतंच; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाश्वत काही असेल तर तो म्हणजे निसर्ग, हेच ती पुन:पुन्हा सांगत राहते.

वायापींचं एक पारंपरिक गाणं असंच हृदयाला हात घालणारं.. ‘आपण सगळे फुलपाखरांसाठी गातो आहोत कारण वायापी दंतकथेनुसार फुलपाखरं अवती-भवती सतत उडत आपल्या पृथ्वीला धरून ठेवणारे अदृश्य धागे गुंफत असतात.’ याचा आधार घेऊन आजारेटी सांगते, जर आपण ही फुलपाखरं आणि त्यांची घरं (म्हणजे झाडं-वेली-जंगलं) जपली नाहीत तर हा समतोल बिघडेल आणि आपली पृथ्वी कोसळेल.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com