..अशी नाती सगळ्यांपासून लपवूनच पुढे न्यावी लागतात. त्या लपवण्यातनं दररोजची जी अनेक छोटी दडपणं तयार होत असतील त्यातनं तिचं काय होत असेल? त्याला त्याची बायको-मुलं सगळं आहे, तिला तिनं तिच्याशिवाय कुणी असू दिलं आहे का? तिला खरोखर जेव्हा जेव्हा त्याची गरज असते तेव्हा जोडीदार म्हणून तो किती वेळांना तिच्यापाशी येऊ शकतो? त्याच्या येण्याच्या वेळांपेक्षा न येण्याच्याच जास्त असतील आणि सतत जरी ती त्याबद्दल स्वत:ची समजूत घालत राहत असेल तर त्यातल्या किती वेळांना तिची खरंच समजूत पटेल? जेव्हा पटत नाही तेव्हा त्या न पटलेल्या समजुतीचं ती काय करते? या सगळ्या प्रश्नांना आत दडपून ती तिचं-त्याचं एक भातुकलीचं नातं जोडू, जपू पाहते आहे. त्याचं पुढे काय होईल?
तीएका विवाहित पुरुषाच्या प्रेमात आहे. गेली कितीतरी वर्षे. काही वर्षांपूर्वी एका कामाच्या निमित्तानं आम्ही दोघी भेटलो तेव्हा खूप जवळ होतो एकमेकींच्या. एकमेकींना एकमेकीचं जिवाभावाचं खूप काही माहीत असायचं. पण नंतर ते काम संपल्यावर तेवढय़ापुरते हातात घेतलेले हात सुटले. मधनंच एखाद्या फोनपुरतेच संबंध राहत गेले. आता तर तेही नाही. पण दुरून आमचं एकमेकींवर लक्ष असतं. तसं लक्ष दुरून का होईना कायम ठेवत राहण्याइतकी देवाणघेवाण त्या कामाच्या थोडक्या का होईना दिवसांमध्ये आमच्यात झाली आहे. माझं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे. तिचं आडनाव बदललं की नाही याकडे. तिचं लग्न झालं की नाही याकडे.. सगळ्यांना लग्न करूनच सुख मिळतं असं काही नाही. काही माणसं एकटी आनंदात मजेत धुंदीत असतात. (खरा आनंद डोळ्यांत लगेच दिसतो, त्याचं सोंग आणता येत नाही.) नाती किती वेगवेगळ्या प्रकारची असतात, लग्नाची, बिनलग्नाची. लग्नच सगळ्याचं उत्तर नाही हे मीही जाणते. पण नातं मग ते कुठलंही असेल, जेव्हा लपवावंसं वाटतं तेव्हा काही खरं नव्हे. मला बिनालग्नाची ‘औरस’ नाती पण माहीत आहे. नीना गुप्तानं व्हिव्हियन रिचर्ड्सबरोबरच्या तिच्या नात्यातनं ‘मसाबा गुप्ता’ नावाच्या एका सुंदर मुलीला जन्म दिला. नीना आणि रिचर्ड्सचं लग्न झालं की नाही याविषयी मला माहीत नाही, पण त्यांनी त्यांचं नातं, त्यांची मुलगी काहीच लपवलं नाही. ही झाली वेगळी गोष्ट. माझी मैत्रीण मला जी दिसते ती वेगळी आहे. काही मुली या लग्नासाठीच बनलेल्या असतात. तशी ती आहे. तसं ती म्हणायचीसुद्धा. तिला खूप आवड आहे स्वयंपाकाची, मुलांची, घर टापटीप ठेवायचीसुद्धा. खूप प्रेमळ आहे. कुठलंही मूल तिच्या मांडीवर पटकन सुखावतं, तिचं स्वत:चं असल्यासारखं! तिला उपजतच संसार येतो. ती आमच्या क्षेत्रात आहे खरी, तिच्या कामात खूप माहीरही आहे, पण तिच्या आत मला तेव्हापासून या क्षेत्राविषयी एक बेफिकिरी दिसत आली आहे. गेल्या कित्येक वर्षांत तिनं फार काही कामही केलं नाही. ती माहीर आहे, पण महत्त्वाकांक्षी फार नाहीये. तिला खरंतर एक जोडीदार हवा आहे. मला हे तिला स्पष्ट सांगणं शक्य नाही, कारण गोष्टी काही इतक्या काळ्या पांढऱ्या नसतात. हे हवं म्हणजे ते नको का? तसं काही नसतं. सगळंच हवं असतं. कधीकधी टोकाच्या दोन गोष्टी एकदम हव्या असतात. एकाच वेळी पांढरा आणि काळा दोन्ही रंग हवेसे वाटतात, रडायचंही असतं आणि हसायचंही असतं. झोपायचंही असतं आणि जागंही राहायचं असतं. हे विरोधाभास प्रत्येकाच्याच जगण्याचा भाग. त्यांच्यामध्ये वाहवत जाण्याचं. पण एक समजुतीचं वयही यावं एका टप्प्यावर.. ज्यात अनुभवाच्या शहाणपणानं सगळ्याची सांगड घालत जावी.. आपण आपल्यापाशीच थांबावं, ऐकावं आपलं आपल्यालाच.. अवघड प्रश्नांना धीरानं सामोरं जावं बळ गोळा करून.. या धावत्या पण एकुलत्या एक आयुष्यात कधीतरी हाही टप्पा यावा असं वाटतं. मला शहाणपण शिकवायचं नाही. कारण मला जे दिसतं तेच खरं असं तरी कसं म्हणू? तिचीही एक बाजू आहे, माझ्या मैत्रिणीची.. ती मला दिसणाऱ्या बाजूपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. एका खोलीला वेगवेगळ्या ठिकाणी उघडणाऱ्या खिडक्या असतील, तर मी माझ्या समजुतीनुसार ज्या ठिकाणी उभी राहीन त्या जागी जी खिडकी असेल, त्यातून जे दिसेल ते माझं त्या वेळचं ‘सत्य.’ तिच्या खिडकीतनं काय दिसतं आहे मला माहीत नाही. पण तरी ‘मला जे दिसतं आहे तेच तूही बघ’ हे म्हणण्याचा मोह होतोच. यालाच प्रेम म्हणतात का? माहीत नाही. तो चूक-बरोबरच्या पलीकडे माझ्या माणूसपणाचा भाग, तरीही मी तिच्याबाबतीत हे लिहिण्याचं धाडस करते आहे, कारण मला तिची काळजी वाटते आहे.
परवा फार फार दिवसांनी ती दिसली तेव्हा आम्ही कडकडून नेहमीसारखी मिठी मारली खरी, पण त्या दिवशी तिच्या डोळ्यांत बघून मी घाबरले. तिच्या डोळ्यांतला वाभरा, खोल एकटेपणा बघून मला सैरभैर व्हायला झालं. तिचं आयुष्य पुन्हा एकदा अनेक वर्षांनी एका सपकाऱ्यासारखं वेगात सामोरं आलं. ती प्रेम करत असलेला विवाहित पुरुष माणूस म्हणून चांगला आहे. पण त्याला लग्नाची बायको, मुलंबाळं आहेत. त्यानं त्याचं आयुष्य शिस्तीत बसवलं आहे. त्याच्यासाठी ‘ती’ आहे, पण घर, संसार, मुलबाळं, काम यानंतर! या नात्याच्या चूक-बरोबर किंवा नैतिक-अनैतिकतेविषयी काहीच बोलायचा कुठलाच अधिकार मला नाही हे मी जाणते. पण या सगळ्यातनं माझ्या मैत्रिणीला खरंच जे हवं आहे आणि जे तिच्या हाती लागतं आहे यातली तफावत मला अस्वस्थ करते आहे. तिच्या या नात्याकडे फक्त आंबट नजरेने बघणाऱ्यांची तिनं कधीच पर्वा करू नये, असं मला वाटतं, कारण आपण कसेही वागलो तरी इतरांना आपल्याविषयी काय वाटते यावर आपला फारसा अंकुश नसतो, असं मला वाटतं. मला तिचं स्वत:चं, तिच्या आत जे होतं आहे, ते तिला दिसतं आहे का हे विचारायचं आहे. ती खूप संवेदनशील आहे. अशी नाती सगळ्यांपासून लपवूनच पुढे न्यावी लागतात. त्या लपवण्यातनं दररोजची जी अनेक छोटी दडपणं तयार होत असतील त्यातनं तिचं काय होत असेल? त्याला त्याची बायको, मुलं सगळं आहे, तिला तिनं तिच्याशिवाय कुणी असू दिलं आहे का? ती जर त्याच्या आयुष्यात बायको, मुलं या सगळ्यानंतर असेल तर तिला खरोखर जेव्हा-जेव्हा त्याची गरज असते तेव्हा जोडीदार म्हणून तो किती वेळांना तिच्यापाशी येऊ शकतो? त्याची इच्छा असेलही, पण परिस्थिती त्याला येऊ देते का? त्याच्या येण्याच्या वेळांपेक्षा न येण्याच्याच जास्त असतील आणि सतत जरी ती त्याबद्दल स्वत:ची समजूत घालत राहत असेल तर त्यातल्या किती वेळांना तिची खरंच समजूत पटेल? जेव्हा पटत नाही तेव्हा त्या न पटलेल्या समजुतीचं ती काय करते? ही न पटलेली समजूत आत साचत राहत नाही का? मग हे साचणं तिला तिच्या स्वत:पासून दूर नेत नाही का? ज्या मोजक्या वेळांना तो तिच्याबरोबर असतो त्या वेळांना तिच्या मनात त्याच्या बायको-मुलांचे विचार येत नाहीत का? कदाचित तिनं त्यांच्या संबंधांना नकार दिला तर तो दुसरीकडे जाईलही, पण आता या क्षणाला तो त्याच्या कुटुंबापासून जे लपवतो आहे त्यात तीही सामील आहे हे ती पाहू शकते का? तिनं कदाचित ‘त्याचं आणि त्याच्या बायकोचं नातं चांगलं नाही म्हणून त्याला कशी माझीच गरज आहे’ अशी स्वत:ची घातलेली पोकळ समजूत तिला त्याच्याबरोबरचे क्षण खऱ्याखुऱ्या सुखात घालवू देते का? या सगळ्या प्रश्नांना आत दडपून ती तिचं-त्याचं एक भातुकलीचं नातं जोडू, जपू पाहते आहे. त्याचं पुढे काय होईल? काही पुरुष असेही पाहिलेत जे या ‘दुसरी’चीही खूप काळजी घेतात, पण शक्यतो त्यांना मुलं नाही होऊ देत, हे तिला चालेल? तिचं वय उलटत चाललं आहे. तिचं हे जागच्या जागी थांबलेलं नातं तिला मान्य आहे का? हे सगळे प्रश्न कदाचित तिला दुष्ट वाटतील. तिला माझा रागही येईल. हे प्रश्न कटू वाटले तरी तिनं त्याची उत्तरं शोधावीत अशी माझी तिला विनंती आहे. तिच्या एकुलत्या एक मौल्यवान आयुष्यात तिला जे खरंच हवं आहे, त्याकडे बघण्याचं तिनं धाडस करावं. ती फार चांगली मुलगी आहे. तिला हवं ते तिला नक्की मिळणार याची मला खात्री आहे. मला तिनं डोळे उघडायला हवे आहेत. खऱ्याला सामोरं जाण्यासाठी! ते वाटतं तेवढं भिववणारं नसतं. मला माहीत आहे तिचं सर्वमान्य नातं, तिला सर्वासमोर स्वीकारणारा जोडीदार, त्याच्या-तिच्या प्रेमातनं जन्मलेलं बाळ हे सगळे तिचे जन्मसिद्ध हक्क आहेत. ते तिला मिळणारच! मला जसं हे माहीत आहे तसं तिलाही मला हे माहीत व्हायला हवं आहे. माझं लक्ष आहे, नुसतं तिचं आडनाव बदललं का याकडे, नाहीतर तिच्या डोळ्यांत मला तिची खरी ओळख दिसते का याकडेही!