योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

मी त्याला म्हणालो, ‘‘अरे फोन हा शेवटी फोन असतो. तुला फोन मिळतो आहे ते बघ..’’ त्यावर उलट तो मला म्हणाला, ‘‘आयफोन हा ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. आयफोन असेल तर तुम्हाला ‘ओळख’ मिळते.  जरा हवा होते. तेव्हा फोन वापरायचा तर आयफोनच वापरायचा असाच सध्याच्या जनरेशनचा ट्रेंड आहे,’’ त्यावर मी पुढचा प्रश्न विचारला, ‘‘समजा माझ्या बजेटमध्ये बसत नाही म्हणून मी तुला आयफोन दिला नाही तर?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘मला शोभून दिसेल असा आयफोन माझ्याकडे असायला हवा ना? ती माझी ‘ओळख’ आहे. तेव्हा तुम्ही दुसराच फोन देणार असलात तर प्लीज तो देऊ नका.’’

त्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच त्याची जरा चिडचिड सुरू होती. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ असलं तरी सकाळी लवकरच त्याला कामाला सुरुवात करावी लागत होती. अर्थात त्याचाही नाइलाज होता. ऐन पंचेचाळिशीत कंपनीमध्ये बऱ्याच मोठय़ा आणि जबाबदारीच्या पदावर असल्यामुळे भारतातल्या आणि परदेशातल्या लोकांबरोबर त्याचे सतत ‘कॉन्फरन्स कॉल्स’ असायचे. अर्थात आज असलेल्या फार थोडय़ा कॉल्समध्ये त्याला बोलावं लागणार होतं. पण श्रवणभक्ती मात्र सगळीकडे करावी लागणार होती. थोडक्यात, ऐकावं लागणार होतं आणि ऐकूनही घ्यावं लागणार होतं.

त्यानं ब्रेकफास्टही आपल्या खोलीतून कॉल ऐकत ऐकतच पूर्ण केला. दुपारी जेवायच्या वेळीही तो सर्वात शेवटी जेवायला आला आणि कोणाशीही काहीही न बोलता जेवण संपवून पुन्हा लॅपटॉपसमोर जाऊन बसला. तेव्हा मात्र त्याचं आज काहीतरी चांगलंच बिनसलंय, हे घरातल्यांच्या लक्षात आलं. कामाच्या नादात दुपारचे चार कधी वाजले हे त्याला समजलंही नाही. तेवढय़ात त्याच्या खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. त्यानं वळून बघितलं, तर त्याची सत्तरीच्या आसपास असलेली आई चहाचा ट्रे घेऊन उभी होती.  ते पाहून तो कमालीचा ओशाळला. गेले काही आठवडे घरातून काम सुरू झाल्यापासून तो अगदी नेमानं दुपारचा चहा सगळ्यांसाठी करायचा. मग त्या वेळी मुद्दाम अध्र्या तासाचा ब्रेक घेऊन सगळ्यांबरोबर गप्पाही मारायचा. पण आज तसं काहीच झालं नव्हतं. तो घाईघाईनं उठला आणि त्यानं आईच्या हातातून ट्रे घेतला. तेवढय़ात आई त्याला म्हणाली, ‘‘तुझी धावपळ असेल तर मी माझा कप घेऊन बाहेरच बसते.’’

‘‘नाही.. असं काही नाही, बस ना’’, असं म्हणून त्यानं लॅपटॉप बंद केला. मग शांतपणे चहाचा पहिला घोट घेतला. कदाचित त्या वेळी त्याला चहाची नितांत गरज होती. चहाची चव घेताक्षणी त्याला विलक्षण तरतरी आली आणि ‘‘अरे वा, आपल्या कुंडीतला गवती चहा का?.. झकास.’’, अशी उत्स्फूर्त दादही त्यानं दिली.

‘‘आज तुमच्याकडे काहीतरी पेटलेलं दिसतंय..’’, आईनं अंदाज घेण्यासाठी त्याला विचारलं.

‘‘नुसतं पेटलेलं नाही, जाळपोळ आहे!’’

‘‘त्यात नवीन काय आहे? तुझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून मी हेच ऐकते आहे, की अमका प्रोजेक्ट पेटला.. तमक्या प्रोजेक्टमध्ये भडका उडाला. कधी कधी तुझं बोलणं ऐकून तू आगीच्या बंबावर कामाला आहेस, असं वाटतं मला!’’ आईचं बोलणं ऐकून तो खळखळून हसला. ते पाहून आई म्हणाली, ‘‘अरे, कामाचा वैताग येणं हे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा थोडा वेळ तरी ब्रेक घे.  पुढच्या आठवडय़ात तुझ्या चिरंजीवांचा सोळावा वाढदिवस आहे. सध्याच्या स्थितीत घरातल्या घरात सेलिब्रेशन कसं करायचं, हे आपलं ठरवणं अजून बाकी आहे. त्याबद्दल सगळे मिळून जरा बोलू. काय काय करणं शक्य आहे त्यावर विचार करायला आजपासूनच सुरुवात करू, म्हणजे तुझाही थोडा वेळ चांगला जाईल आणि गोष्टीही मार्गी लागतील. तसं मी आपल्या नेहमीच्या फळवाल्याला आंब्याची पेटी सांगून ठेवली आहे. पण ती मिळेलच याची काही खात्री नाही. तेव्हा घरी चक्का बनवून श्रीखंड करणं हा एकच उपाय आहे.’’

आईचं बोलणं ऐकून क्षणभर विचार करत तो म्हणाला,‘‘आई, चिरंजीवांचा वाढदिवस हेच आजच्या वैतागाचं मुख्य कारण आहे.’’ काहीही न समजून आई प्रश्नार्थक चेहऱ्यानं त्याच्याकडे पाहात म्हणाली, ‘‘म्हणजे?..’’

‘‘सांगतो,’’ असं म्हणून तो जरा सावरून बसला आणि सांगायला सुरुवात केली, ‘‘अगदी कालचीच गोष्ट आहे. मी विचार केला, की याचा सोळावा वाढदिवस आहे, तर त्याचं बर्थडे गिफ्ट त्याला सकाळी झोपेतून जागा झाल्यावर लगेच मिळावं. या वाढदिवसाला मोबाइल देणार, हे मी त्याला अगोदरच कबूल केलं आहे आणि लॉकडाऊन होण्यापूर्वीच एक मोबाइलही घेऊन ठेवला आहे. अर्थात हे त्याला माहिती नाही. तेव्हा त्याला एक मस्त सरप्राइज मिळावं, म्हणून त्या गिफ्टसाठी जागा शोधायला तो नसताना त्याच्या खोलीत डोकावलो. त्याचं अभ्यासाचं टेबल मला गिफ्ट ठेवण्यासाठी सगळ्यात योग्य  वाटलं म्हणून मी टेबलापाशी गेलो. तर त्या टेबलाच्या मधोमध अनेक छोटय़ा कागदांचा एक गठ्ठा ठेवलेला होता. मी का कोण जाणे, पण थोडय़ा उत्सुकतेनं त्यातले काही कागद उचलून बघितले. बहुतेक त्यानं त्याचा ड्रॉवर साफ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे गेल्या नोव्हेंबरपासूनच्या बिलांचा तो गठ्ठा काढून टाकण्यासाठी तिथे ठेवलेला होता.’’

‘‘पण बिलं कसली होती?..’’,आईनं न राहवून विचारलं. ‘‘कॉफी शॉपची, ऑनलाइन ऑर्डर केलेल्या गोष्टींची, होम डिलिव्हरी झालेल्या खाद्यपदार्थाची. त्यातल्या काही गोष्टींचे पैसे त्यानं त्याच्या पॉकेटमनीमधून दिले होते. काही गोष्टींसाठी माझं किंवा हिचं कार्ड वापरलं होतं. खरेदी सांगूनच केली होती. पण तरीही फक्त तीन-चार महिन्यांतल्या त्या खरेदीतले नावाजलेल्या ब्रँडच्या बिलांवरचे आकडे पाहून मला जरा विचित्र वाटलं.’’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती.

‘‘सगळं तुझ्यासमोर, तुला माहिती असताना झालं असेल तर त्यात विचित्र वाटण्याचं काय कारण आहे?,’’ आईला त्याचा मुद्दा अजूनही समजत नव्हता. त्यावर तो म्हणाला, ‘‘कदाचित ते सगळे आकडे एकत्र केल्यावर जो एक मोठा आकडा होत होता त्यामुळे मला विचित्र वाटलं असावं. मी त्याच्या खोलीत असतानाच चिरंजीव खोलीत आले आणि मला म्हणाले,  ‘‘बाबा तुम्हाला सांगायचं राहिलं, मला बर्थडे गिफ्ट म्हणून जो फोन देणार आहात तो प्लीज ‘आयफोन’च द्या..म्हणजे सध्या सगळी दुकानं, ऑनलाइन पोर्टलच्या डिलिव्हरी बंद आहेत ते मला माहिती आहे. पण कंपनीच्या साइटवर बुकिंग शक्य आहे का, ते तर आपण बघू या.. डिलिव्हरी जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. काय?’’

‘‘आयफोन? म्हणजे सफरचंदवाला? तो खूप महाग असतो ना?’’, घरात अशा तंत्रज्ञानाविषयी कायम चर्चा सुरू असल्यानं त्याच्या आईकडे ही नेमकी माहिती होती. ‘‘हो, मीही त्याला म्हणालो, ‘अरे फोन हा शेवटी फोन असतो. तुला फोन मिळतो आहे ते बघ..’ त्यावर उलट तो मला म्हणाला, ‘आयफोन हा ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. आयफोन असेल तर तुम्हाला ओळख मिळते. जरा हवा होते. तेव्हा फोन वापरायचा तर आयफोनच वापरायचा असाच सध्याच्या जनरेशनचा ट्रेंड आहे.’, त्यावर मी पुढचा प्रश्न विचारला, ‘समजा माझ्या बजेटमध्ये बसत नाही म्हणून मी तुला आयफोन दिला नाही तर?’ त्यावर तो हसून म्हणाला, ‘बाबा, तुम्ही मनात आणलंत तर दर महिन्याला मला नवीन आयफोन अगदी सहज देऊ शकता हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून तर मी सांगतोय. दुसरं म्हणजे मी सगळ्या गोष्टी कायम ब्रँडेड वापरतो.. म्हणजे तुम्हीच मला त्या देत असता. तेव्हा त्याला शोभून दिसेल असा आयफोनही माझ्याकडे असायला हवा ना? आय थिंक.. आय डिझर्व इट.. पण इतकं होऊनही तुम्ही दुसराच फोन देणार असलात तर प्लीज तो देऊ नका. थोडे दिवस थांबायची माझी तयारी आहे. पण मला आयफोनच पाहिजे,’ असं त्यानं मला ऐकवलं,’’ थोडा हताश होत तो आईला म्हणाला.

त्यावर क्षणभर विचार करून आई म्हणाली, ‘‘पण यात नवीन काय आहे? प्रत्येक बाबतीत तुमचे चिरंजीव असंच करतात. अगदी जेवण कुठून ऑर्डर करायचं, हे ठरवतानाही त्याचे नियम ठरलेले असतात. ठरावीक तीन-चार ठिकाणं सोडून दुसरा कोणताही पर्याय तो ऐकतच नाही. वाणसामानातही त्याला हव्या असणाऱ्या कंपन्यांच्या गोष्टीच विकत घ्याव्या लागतात. हे तुझ्या लक्षात आलं नाही कधी?,’’ आईच्या थेट प्रश्नावर तो निरुत्तर झाला. त्यावर आई  म्हणाली, ‘‘लक्षात आलं असेलही, पण जाणवलं नसेल. कारण तो मागेल तेव्हा आणि मागेल तितके पैसे तू देत राहिलास. या वेळी तू आणलेल्या फोनला त्यानं थेट नकार दिला तेव्हा तुला याबद्दल विचार करावासा वाटला.. हो ना?’’

मग पुढचा काही वेळ शांतपणे विचार करून तो म्हणाला, ‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. हा ब्रँड पाहिजे.. तो ब्रँड पाहिजे अशी त्याची नाटकं मी बघितलेली आहेत. पण काय होतं ना, मला मुळात त्याच्याबरोबर फार कमी वेळ मिळतो. त्यात दोनशे-पाचशे रुपयांसाठी काय वाद घालायचा, म्हणून मी त्याच्या या सवयीकडे लक्ष दिलं नाही. त्याच्या टेबलावरचा बिलांचा तो गठ्ठा पाहून मला तेच लक्षात आलं..’’

‘‘आता विषय निघालाच आहे म्हणून विचारते. ‘वेळ देता येत नाही’, ही भावना मनात ठेवून वारेमाप पैसे खर्च करताना तुझ्यासारखे लोक नक्की काय विचार करतात?.. म्हणजे पैसे टाकल्यानं, वेळ देता येत नाही ही अपराधीपणाची भावना दडपली जात आहे, की सर्वासाठी आनंदाचा एक कोरा करकरीत क्षण आपण विकत घेत आहोत, की पैशांच्या जोरावर कोणतीही वेळ मारून नेण्याचा फाजील आत्मविश्वास आपण कमावत आहोत?’’

आईचे इतके थेट प्रश्न ऐकून काय बोलावं हे त्याला समजेना. त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. तो काहीसा अस्वस्थ होऊन म्हणाला, ‘‘मला समजलं नसेल.. हिच्याही लक्षात आलं नसेल. पण आई, तू तरी सांगायचं होतंस. म्हणजे ती फक्त तुझीच जबाबदारी आहे असं मला म्हणायचं नाही, पण तू सांगितल्यावर आम्ही ऐकलं असतंच ना.’’

‘‘तुझा मुद्दा माझ्या लक्षात आला. पण तू हाही विचार कर..‘हल्ली असंच असतं’,‘आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत’,‘तुम्हाला काही कळत नाही’, असं जेव्हा छातीठोकपणे तुम्ही आम्हाला ऐकवता, तेव्हा मग कुठे बोलायचं आणि कुठे गप्प बसायचं, हे आम्हालाही समजत नाही. आमचाही गोंधळ होतो. त्यात दिवसातला फार थोडा वेळ तुम्ही समोर असता. तेव्हाही कटकटच करायची का, असा विचार करून आम्ही शांत बसतो आणि जे काही समोर घडतं ते बघत राहतो.’’

त्यावर होकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘तू म्हणतेस तेही बरोबर आहे. पण हेही समजून घे, की पैसे खर्च करताना फक्त वेळ मारून नेणं हा एकमेव उद्देश नसतो. कितीतरी वेळा लहानपणचे दिवस डोळ्यांसमोर येतात. अनेकदा पैसे नसल्यानं फक्त मलाच नाही, तुला आणि बाबांनाही त्यांच्या इच्छा कशा माराव्या लागल्या हे आठवतं. त्याला असं करायला लागू नये एवढीच इच्छा असते.’’

‘‘इच्छा चुकीची नसते. पण इच्छापूर्तीनं होणारा परिणाम कदाचित चुकीचा असू असतो, त्याचं काय? शिवाय मनात असलेल्या सगळ्या इच्छा ताबडतोब पूर्ण झाल्या की ‘इच्छा पूर्ण होणं’ या गोष्टीची किंमतही कमी होते. मागेल ते हातात द्यायला आई-वडील म्हणजे काही अलाऊद्दीनच्या दिव्यातले जिनी नाहीत, हे मुलांना ठणकावून सांगणं ही आई-वडील असण्याची खरी ओळख असते आणि तसं न सांगता येणं हे आई-वडिलांचं अपयश असतं,’’ आईनं स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

त्यावर तो निर्धारानं म्हणाला, ‘‘खरं आहे तुझं. तुमची ओळख तुमच्या फोनमुळे किंवा विशिष्ट ब्रँडचे कपडे किंवा वस्तू वापरून तयार होते, असं वाटत असेल तर त्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही आणि ‘आय डिझर्व इट’ अशी भावना असेल तर खुशाल स्वत: कमवायला लागल्यावर त्याला जे हवं ते त्यानं विकत घ्यावं. कोणत्याही परिस्थितीत त्याला आयफोन मिळणार नाही. जो फोन मी आणला आहे तो त्याला नको असेल, तर त्याची मर्जी. पण यापुढे मलाही त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल हे निश्चित.’’

‘‘जे योग्य वाटेल ते कर. फक्त त्याच्याशी नीट बोल. तुला नेमकं काय म्हणायचं आहे, हे त्याला समजावून सांग. त्याला कदाचित सगळं पटणारही नाही. पण सांगावं तर लागेल,’’ असं म्हणून आई खोलीतून बाहेर पडणार तेवढय़ात तो आईला म्हणाला, ‘‘आई, तुझं स्किलपण आता अफाट झालंय.. हात न लावताही कान चांगला धरता येतो हं तुला,’’ त्याचं हे बोलणं ऐकून आई हसून म्हणाली, ‘‘हा आमच्या जनरेशनचा ट्रेंड आहे!’’