ती सोन्याची कोंबडी होती. एका रात्रीचे ५०० रुपये मिळवून देणारी. घरच्यांनाच गवसलेली! देवाचं नाव घेऊन स्वार्थ साधणाऱ्यांना तिचं शिक्षण, तिच्या कोवळ्या शरीरावर होणारे अत्याचार यांची कुठे पर्वा होती? ती शिकावी म्हणून सात र्वष सुरू असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा मातीमोल ठरली, पण..

स्त्री सक्षमीकरणाचे अनेक दाखले दिले जातात. महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण स्त्रियांच्या प्रश्नांवर व्यापक चिंता व्यक्त करतो. साक्षर महिला, निरक्षर महिला ही आकडेवारी अगदी सहज टक्केवारीत सांगतो. किती मुली शाळेबाहेर आहेत याची संख्या हजार-लाखांत मोजतो. परंतु जेव्हा मुलीचा, स्त्रीचा एक एक प्रश्न घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की, आव्हान किती बिकट आहे. आणि काळजी वाटते, आपल्याला हे आव्हान पेलवणार आहे का?
दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व दैनिकं  व वृत्तवाहिन्यांवर एक बातमी चच्रेत आली. एका १३ वर्षांच्या मुरळीवर अत्याचार होऊन ती माता बनली.. सर्वत्र खळबळ माजली. मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हा प्रशासनापासून सर्वानी गंभीर दखल घेतली. काही आरोपींना अटक होऊन (मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.) त्या मुलीला शासकीय योजनेतून तीन लाख रुपयेही मिळाले. तिची रवानगी आता बाल सुधारगृहात झाली आहे. हा विषय मी व माझे सहकारी अ‍ॅड. रंजना गवांदे व श्रीनिवास रेणुकादास यांनी धसास लावला म्हणून आमचं अभिनंदन करणारे फोन सतत येत होते.. फार मोठी समाजसेवा घडल्यासारखं वाटत होतं, पण तो आभास होता. मी अत्यंत अस्वस्थ होतो. हे आमचं कायदेशीर यश असेलही, पण मला स्वत:ला माझ्या धडपडीचा ७ र्वष लढून झालेला पराभव वाटत होता. हा पराभव एकीच्या बाबतीतला असला तरी अशा किती तरी मुली आपल्या आजूबाजूला वावरत आहेत याची गणतीच नाही. त्यांचं काय? म्हणूनच या पराभवाची विषण्णता मनात दाटते. स्त्री शिक्षणाची आकडेवारी सतत सांगताना, सावित्रीबाईचा वारसा सांगताना एका वंचित मुलीला शाळेपर्यंत आणणं, तिला अत्याचारापासून वाचविणं किती कठीण आहे हे मी गेली सात र्वष अनुभवत होतो..
.. ही अत्याचारित, पीडित मुलगी पोलीस ठाण्यात माझ्यासमोर तिच्या दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन उभी होती.. दोघींच्या वयात फक्त १२ वर्षांचं अंतर.. दोघींच्याही चेहऱ्यावर निरागसता सारखीच. मला चित्रपटाच्या फ्लॅश बॅकसारखी ती सात वर्षे आठवू लागली..
 २००७ च्या एका रखरखीत उन्हाळ्यात दुपारी गावच्या वीटभट्टीवर शाळेत न जाणारी मुलं शोधायला गेलो. सगळीकडे विटांची कामं चालू. सगळे मजूर रोजीरोटी मिळवण्याच्या कामात व्यग्र. पोरांकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. पोरं समोरच्या नदीत मनसोक्त पोहत होती. गरिबीत एवढा एकच आनंद त्यांना परवडणारा.. नदीतून ओल्या कपडय़ातली ही पाच वर्षांची चिमुरडी माझ्यासमोर आली. समोर उभं राहून बंद मूठ माझ्यासमोर धरली आणि झटकन उघडली. एक माशाचं पिल्लू पाण्यात सूर मारून तिनं पकडून आणलेलं.. मी एकदम मागे सरकलो.. ती जोरात हसली आणि कपडे बदलायला निघून गेली.. चेहऱ्यावर पाणी निथळताना डोळ्यातली विलक्षण चमक लगेच लक्षात आली. तिची ही पहिली नाटय़पूर्ण निरागस भेट अजून विसरताच येत नाही. नदीच्या तळाशी जाऊन मासा आणणारी ती आज वासनांध पशूंच्या जाळ्यात माशासारखी अगदी सहज अडकली होती, तडफडत होती..
त्याच वीटभट्टीवर आम्ही तिथल्या मुलांसाठी लेखन-वाचन वर्ग सुरू केला. ती खूप भरभर शिकू लागली. तिच्या डोळ्यातली चमक ही बुद्धिमत्तेची झलक होती. सतत हसतमुख आणि गमतीजमती करणं हा तिचा स्थायिभावच होता. पण आनंदी वाटणाऱ्या या मुलीचं जगणं मात्र आनंदी नव्हतं. भिल्ल आदिवासी कुटुंबातली ती, तिच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं. ही पहिल्या नवऱ्याची. आणि दुसऱ्या नवऱ्याच्या पाच मुली होत्याच. त्यामुळे आता ते मोठं कुटुंब झालं होतं. वीटभट्टीवर कसंबसं जगताना या मुलांकडे दुर्लक्ष होणं गृहीतच होतं, चुकीचं असलं तरीही!
जून महिना आल्यावर तिला शाळेत टाकलं. मोठय़ा कौतुकाने ती शाळेत जाऊ लागली. अशातच तिच्या आजीला दुर्बुद्धी सुचली. लहानपणी आजारातून वाचली म्हणून खंडोबाला नवस केला होता आणि त्याप्रमाणे तिचं लग्न खंडोबाबरोबर लावलं गेलं, वयाच्या सहाव्या वर्षी! मी आजीला खूप बोललो. पण ‘तिला शिकवणार आणि मोठी झाल्यावर मगच ती मुरळी होईल,’ असं आजीनं आश्वासन दिलं. तिची शाळा पुन्हा सुरू झाली. तिचं लग्न हा विषय मागे पडला.. आणि अचानक एक दिवस ती शाळेतून गायब झाली. चौकशी केली तर कळलं, त्यांचं कुटुंबच शेजारच्या तालुक्यात दुसऱ्या वीटभट्टीवर स्थलांतरित झालं आहे. कामासाठी स्थलांतर म्हटल्यावर कधी परत येतील माहीत नाहीत. त्याप्रमाणे ते वर्षभर आलेच नाही. वर्षभरानंतर सारे जण पुन्हा तालुक्यात आले तेव्हा सर्वाची रूपं बदललेली. मला ओळखपण दाखवेनात. या कुटुंबावरचं ओझं कमी व्हावं म्हणून या मुलीला, तिच्या लहान बहिणीला मी गावाजवळच्या आश्रमशाळेत दाखल केलं. खाण्याची तोंडं कमी करून दिली म्हणून पालक खूश झाले. पण काही दिवसांतच तिच्याविषयी तक्रारी यायला लागल्या. ती सुपारीच्या पुडय़ा खाते. अचकट-विचकट बोलते. चौकशी केली तेव्हा समोर आलं की, दुसऱ्या तालुक्यात हे कुटुंब गेलं तेव्हा तिच्या आजीनं तिला खंडोबाच्या कार्यक्रमांना पाठवायला सुरुवात केली होती. रात्री-अपरात्री कार्यक्रमांना जाताना या सवयी लागलेल्या. मग इतर बहिणी तरी सांभाळा म्हणून तिला तिथून काढून पुन्हा जवळच्या मराठी शाळेत दाखल केलं गेलं, पण तिला चोरून, लपून कार्यक्रमांना पाठवणं काही थांबलं नाही.. पुन्हा एकदा तिची शाळा बंद पडली.
अशात एकदा सकाळीच तिच्या वडिलांचा फोन आला, आमची शेळी वाघानं खाल्ली. काही तरी मदत करा. त्यांचं संकट हीच संधी समजून पुन्हा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांना पाठवणार नाही आणि रोज शाळेत पाठवू हे त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. मृत शेळीचा पंचनामा करून शासकीय मदतीचं प्रकरण करून दिलं. तिच्या वडिलांनी शब्द पाळला आणि तिची शाळा पुन्हा सुरू झाली. दरम्यान, पुन्हा एकदा पोटासाठी दाही दिशा म्हणत त्याचं राहण्याचं ठिकाण बदललं आणि त्याची परिणती म्हणून पुन्हा तिची शाळा बंद झाली. तिच्यासारख्या हुशार मुलीची बुद्धी वाया जाऊ नये म्हणून तिच्या शिक्षणासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण आता परिस्थिती बदलली होती. ती आता पैसे मिळवणारी झाली होती.
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून तिला एका रात्रीचे ५०० रुपये मिळायचे. हातात आलेली सोन्याची कोंबडी कोण घालवणार होतं? तिच्या घरच्यांकडून उलटच नव्हे तर आता उद्धट उत्तरं येऊ लागली. मी पुन्हा हतबल!
   अशात त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्याकडे चोरीचं सिमकार्ड सापडलं. लोकांनी तिच्या वडिलांना खूप मारलं. पोलिसांनी तुरुंगात टाकलं. रात्री पुन्हा मला त्यांचा फोन आला. मीही पत्रकार मित्रांच्या मदतीने वस्तुस्थिती पटवून दिल्यावर त्याची सुटका झाली. मात्र त्याच्याकडून पुन्हा तिला शाळेत पाठवायचं वचन घेतलं. ‘सर, तुम्ही सांगाल तसंच आम्ही वागू.’ असं त्याने सांगितलं. पुन्हा तिला पाचव्यांदा शाळेत दाखल केलं. तिथं ती शिकू लागली. काही दिवसांत आजी आणि मामा वेगळे राहू लागले. त्यांना हा एका रात्रीच्या ५०० रुपयांचा मोह सोडवेना. आजीला आता काम होत नाही, पोटात काय घालायचं, सांगत भांडून तिला तिच्या घरी घेऊन गेले. पुन्हा शाळा बंद. कार्यक्रम चालू झाले आणि वाईटसाईट ऐकायला येऊ लागले. आजी आणि मामा दोघेही दारू प्यायचे. रात्रीच्या वेळी दुसरे लोक तिथं यायचे. एकदा भर रस्त्यात आजी आणि मामाचं कडाक्याचं भांडण झालं, कायमचा संवाद थांबला.. शेवटचा उपाय म्हणून आईने न्यायालयातून तिचा ताबा मागावा, असा प्रयत्न करून बघितला. पण तिची आईच म्हणाली, ‘‘तिला कशाला माझ्याकडे पाठवता. माझ्या बाकीच्या पोरींनाही ती बिघडवील..’’ जन्मदात्री आईच असं बोलल्यावर मग आमचा मार्गच खुंटला.
  आम्ही आमच्या ‘स्पार्क’ संस्थेच्या वतीने पोलिसांकडे अर्ज दिला होता तेव्हा पोलीस निरीक्षकांचं उत्तर धक्कादायक होते. ते म्हणाले, जेव्हा कुठे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असेल तेव्हा आम्हाला सांगायला या, आपण तिथं तिला पकडू. आता आपल्या घरात शुभकार्य सुरू असताना अशी माहिती येऊन आम्हाला कोण सांगणार, की पोलीस घेऊन या आणि वाघ्या-मुरळी पकडून न्या.
 तिचं आयुष्य फारच हेलकावे खात होतं. तिची सुटका करणारं तिच्या घरात तरी कुणीच नव्हतं. १०-११ वर्षांची ती पोर मुरळीच्या नावाने मोठे म्हणतील तशी नाचत होती. अखेरचा प्रयत्न म्हणून तिच्या औरंगाबादला राहणाऱ्या दुसऱ्या मामाला फोन केला. वस्तुस्थिती सांगितली आणि तिला घेऊन जा म्हणालो. तो आला आणि घेऊन गेला. आम्ही गाफील राहिलो. तिथून काही महिन्यांतच पुन्हा गुपचूप तिला इथं आणलं गेलं आणि पुन्हा जागरण गोंधळ, रात्रीचे लोक येणं सुरू झालं. आम्हाला खूप नंतर कळलं. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. ती १३ वर्षांची मुलगी  ५ महिन्यांची गरोदर होती. गर्भपात करणं शक्य नव्हतं. पण ती बाळंत होताच मात्र पोलिसांच्या मार्फत तिला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल केला.
तिच्या एका उदाहरणात खूप मोठा सामाजिक प्रश्न गुंतलेला असल्याचं लक्षात आलं. मुरळी आता महाराष्ट्रात शिल्लक नाहीत, असा शासनाचा दावा आहे. तो दावा आमच्या या प्रकरणानं उघड झाला. ही उपलब्धी असली तरीसुद्धा एक हताशपणा आणि निराशा नक्कीच होती. पाच वेगवेगळ्या शाळांमध्ये तिला दाखल करूनसुद्धा तिला शिकवू शकलो नाही. पाठपुरावा करूनसुद्धा तिला या अत्याचारातून वाचवू शकलो नाही. आकडेवारीत साक्षरता, शिक्षण मोजताना जेव्हा असं एक एक उदाहरण आपण तपासतो तेव्हा लक्षात येतं की हे आव्हान किती थकविणारं आहे.
 सुदैवाने या मुलीला आता बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तिला शिकवणंही सुरू झालं आहे. तिच्या मुलीला, तिला कदाचित चांगलं आयुष्य लाभेलही, पण आपलंच बालपण संपलेल्या या मुलीसारख्या अनेक मुलींचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? ती आयुष्यं सावरता येतील? अशी किती आयुष्यं सावरण्यापलीकडे गेली आहेत, याचा आपण कसा आणि केव्हा विचार करणार आहोत?
 शिक्षणावर लिहिण्या-बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष एका एका समस्येला भिडणं किती कठीण आहे, ही जाणीव मात्र या प्रकरणाने करून दिली.   
हेरंब कुलकर्णी -herambrk@rediffmail.com