लहानपणी बहीण रुथच्या आजारपणात, वॉल्ट डिस्नेनं एक प्रयोग केला होता. एक छोटी वही घेऊन तिच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत त्यानं एकाच प्राण्याची चित्रं काढली होती, पण थोडा थोडा फरक करून. बोटांमध्ये वहीची पानं धरून फडफडवली की, चित्रातला प्राणी हालचाल करायचा. अर्थात अ‍ॅनिमेशनचं हे मूलभूत तंत्र होतं. त्या वेळी  त्याचं वय होतं नऊ!
त्याच्यातल्या सर्जनशील, कल्पक स्वभावाची ही चुणूकच होती. त्यातूनच निर्माण झालं एक अफाट जादूई जग, डिस्ने वर्ल्ड. त्याच्या मिकी आणि मिनी माऊस, डोनाल्ड डक, ऑस्वल्ड, अ‍ॅलीस, अलादीन, लायन किंग, मोगली अशा असंख्य कॅरेक्टर्सनी लहानांनाच नव्हे, तर मोठय़ांनाही वेड लावलं. वॉल्ट कसा घडत गेला त्याविषयी..
एक उंदीर धिटाईनं वॉल्टच्या टेबलावर चढायचा. चीझचे तुकडे खात असलेल्या वॉल्टकडे तो बघायचा. वॉल्टही त्यातले काही तुकडे त्या उंदराला भरवायचा. पुढे पुढे तो उंदीर ते तुकडे, वाट न बघता मटकवायचा आणि त्याच्याच हातावर झोपायचा. वॉल्टनं त्याचं नाव मॉर्टमिर ठेवलं. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर, या मॉर्टमिरच्या स्मरणानं वॉल्टच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळाली की, वॉल्ट त्याच्या, करमणुकीच्या क्षेत्रात अग्रणी ठरला. करमणुकीच्या साम्राज्याचा वॉल्टर ईलियास डिस्ने अनभिषिक्त सम्राट होता. त्यानं चित्रकलेच्या छंदाचं रूपांतर असंख्य नवनव्या मनोरंजक गोष्टीत करत त्यांनी एक जादूई नगरीच स्थापन केली. डिस्ने नगरी.
वॉल्टर ईलियास डिस्ने म्हणजेच वॉल्टचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झाला. त्याचे वडील होते इल्यास केपल डिस्ने आणि आई फ्लोरा. वॉल्टच्या वडिलांनी अनेक उद्योग केले. आई लग्नापूर्वी शिक्षिका होती, पण लग्नानंतर तिने पूर्णत घराकडे लक्ष द्यायचं ठरवलं. वॉल्ट डिस्नेला तीन मोठे भाऊ- हर्बर्ट, रेमण्ड, रॉय आणि धाकटी बहीण रुथ अशी भावंडं होती.
या कुटुंबासाठी इल्यासने बाहेरच्या विश्वात अनेक उद्योगांमध्ये अत्यंत मेहनतीनं पाय रोवण्याचा प्रयत्न केला. शिस्तीत, प्रामाणिकपणे. आणि आपल्या कुटुंबाकडूनही त्याने त्याच मेहनतीचा, शिस्तीचा, प्रामाणिकपणाचा आग्रह धरला. शिकागोहून डिस्ने कुटुंब कालांतरानं मास्रेलिन इथं स्थलांतरित झालं. मास्रेलिन इथं इल्यासनं दोन मळे घेऊन त्यात फळबागा लावल्या, अनेक प्राणी पाळले. गायी, घोडे, कोंबडय़ा, बदकं, कबुतरं, डुकरं. डुकरं पाळण्याचं काम वॉल्ट अत्यंत आवडीनं करी. रॉय आपल्याबरोबर वॉल्टला घेऊन प्राण्यांवर स्वार व्हायचा. रॉय घोडय़ावर स्वार असायचा, तर वॉल्ट छोटा असल्यामुळे घोडय़ावर बसू शकत नसे, मग तो डुकरावर स्वार होऊन या मळ्यांमधून मनमुराद भटकण्याचा आनंद लुटायचा. डिस्नेच्या कार्टून जगतातल्या प्राण्यांचं सूत वॉल्टशी खरं तर मास्रेलिनमधल्या या मळ्यापासून जुळलेलं होतं, या दिवसांची आठवण काढताना वॉल्ट म्हणालाय, ‘‘मास्रेलिनमधल्या डिस्ने मळ्यांइतकं रमणीय स्थळ मी जगात खरोखरच कधी कुठं पाहिलेलं नाही.’’
  मात्र वडिलांच्या शिस्तीची वॉल्टवर दहशत होती. आई फ्लोरा सतत कामाच्या रामरगाडय़ात गुंतलेली होती. हर्बर्ट आणि रेमण्ड हे वडीलबंधू बरेच मोठे असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यामानानं जवळीक कमीच होती. धाकटा रॉय, वॉल्ट आणि धाकटी बहीण रुथ यांना सतत बरोबर ठेवायचा. अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शन करायचा. रॉय वॉल्टला मित्र म्हणूनच वागवायचा. जरी मत्रीचं नातं वॉल्टशी असलं तरी मनातून कुठेतरी वागताना पित्याची भूमिका रॉयने स्वतकडे घेतली होती. म्हणूनच तो वॉल्टला ‘किड’ म्हणून हाक मारायचा, अखेपर्यंत!
     मास्रेलिनमध्ये एक नवं चित्रपटगृह सुरू झालं होतं. वॉल्टला घेऊन रॉय तिथं गेला. पडद्यावरचं ते अद्भुतरम्य विश्व त्याने पहिल्यांदा वॉल्टसमोर खुलं केलं. रॉय त्याला वरचेवर चित्रपट किंवा तशाच प्रकारच्या काही मनोरंजक कार्यक्रमांना घेऊन जाई. त्याची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्याचे साहित्य आणून द्यायचा. वडिलांच्या आखडत्या स्वभावामुळे वॉल्टची होणारी कुचंबणा, स्वतच्या सढळ हाताने आणि समंजस मनोवृत्तीने कमी करायचा प्रयत्न करायचा.
इल्यासनं मळ्यात मोठय़ा दोन मुलांना कामाला जुंपायला सुरुवात केली, विनामोबदल्याचं. याला कंटाळून, ते दोघं घरातून पळून गेले. याचा ताण इल्यासवर पडायला लागला. फ्लोरानं त्याला तिथलं घरदार, जमीन विकण्यासाठी राजी केलं. तिथून डिस्ने कुटुंब कान्सासमध्ये स्थायिक झालं. तिथं, इल्यासनं वृत्तपत्रवाटपाचा नवा व्यवसाय सुरू केला. डिलीव्हरी बॉय म्हणून रॉयला आणि वॉल्टला राबवायला सुरुवात केली. त्यावेळी वॉल्ट होता १० वर्षांचा. पहाटे साडे तीन वाजल्यापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होई. सकाळी पेपर टाकणं, नंतर शाळेत शिकणं, त्यानंतर परत संध्याकाळचे पेपर टाकणं. हे सगळं करून रात्रीच्या जेवणापर्यंत घरी पोचायचा. सहा वष्रे असा दिनक्रम होता, विनामोबदला. या कठीण काळात, या दोघा भावांमधले मत्रीचे बंध अधिकच घट्ट होत गेले. वडिलांच्या असमंजसपणामुळं नंतर रॉयही घरातून पळून गेला. फक्त वॉल्टला त्यानं याची कल्पना दिली होती. रॉय अधूनमधून घरी यायचा. वॉल्टबरोबर वेळ घालवायचा. त्याला स्वभावानुसार लक्षात आलेल्या गोष्टी सांगायचा, शिकवायचा, त्याला मार्गदर्शन करायचा. त्याला मनोमनी जाणवलं होतं की वॉल्ट हा इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याला अजून व्यापक स्वरूपात जगासमोर सिद्ध व्हायची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यानं जगाचा अनुभवही घेतला पाहिजे.
 शिकागोतल्या एका जेली फॅक्टरीतल्या त्याच्या गुंतवणुकीमुळे, इल्यासला तिथे एक अधिकारपद मिळालं. त्यामुळे त्यानं, शिकागोला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. फ्लोरानं या निर्णयाला विरोध केला नाही. मात्र ती, वॉल्ट आणि रुथ यांच्या शिक्षणासाठी आग्रही राहिली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रॉयच्या सांगण्यावरून त्याने ‘न्यूज बूचर’ म्हणून काम करायला सुरुवात केली. न्यूज बूचर म्हणजे पगारी विक्रेता. यापाठोपाठ त्यानं अनेक नोकऱ्या केल्या. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी रेड क्रॉस रुग्णवाहिकेच्या पथकात नोकरी केली. रेड क्रॉस रुग्णवाहिकेचा चालक म्हणूनही त्याने काम केले आहे.
 रॉय आपल्यापरीनं वॉल्टला मार्गदर्शन आणि मदत करतच राहिला. नौदलातून बाहेर पडल्यावर कान्सास सिटीमध्ये एका बँकेत काम करत होता. व्यवहारी असल्यामुळे तो वॉल्टच्या भवितव्याविषयी अधिकच जागरूक होऊ लागला होता. तो हर्बर्टकडे दोन खोल्या भाडय़ाने घेऊन राहत होता. तिथे त्याने वॉल्टला बोलावून घेतलं. भेटेल त्याला वॉल्टच्या  नोकरीसाठी सांगून ठेवलं. रॉयच्या ओळखीनं वॉल्टला एका कमíशयल स्टुडिओत काम मिळालं.
 फ्लोराला- वॉल्टच्या आईला पहिल्यापासूनच जाणवत गेलं की त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याला चित्रकलेची आवड आहे, वाचनाची आवड आहे. तिनं त्याला त्याबाबतीत कधी अडवलं नाही. तिच्याकडून होईल तितकं स्वातंत्र्य देत राहिली. त्याला चित्रकलेची वही आणून देत राहिली. रूढार्थानं त्याची चित्रकला चित्रकलेच्या मोजमापात, नियमात बसणारी नव्हती. त्याला चित्रं कशी समजतायत, उमगतायत तशी तो काढायचा प्रयत्न करी. चित्रकलेच्या त्याच्या आकर्षणाबद्दल, आवडीबद्दल ती  प्रोत्साहित करे.
लहानपणी रुथच्या आजारपणात, त्यानं एक प्रयोग केला होता. एक छोटी वही घेऊन तिच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत त्यानं एकाच प्राण्याची चित्रं काढली होती, पण थोडा थोडा फरक करून. बोटांमध्ये वहीची पानं धरून फडफडवली की, तो चित्रातला प्राणी हालचाल करायचा. अर्थात अ‍ॅनिमेशनचं हे मूलभूत तंत्र होतं. हा त्याच्या दृष्टीनं फक्त प्रयोग होता, आणि त्याचं वय होतं नऊ! त्याच्यातल्या सर्जनशील, कल्पक स्वभावाची ही चुणूकच होती.
 इल्यासकडे एक नियतकालिक येत असे. त्याचे अंक वॉल्ट नेहमी चाळत असे. त्यातील व्यंगचित्र पाहून तो तशी व्यंगचित्र काढायचा प्रयत्न करायचा. हळूहळू स्वतच्या कल्पनेनं तो व्यंगचित्र काढायला लागला. शालेय शिक्षणानंतर वॉल्ट शिकागोला आईवडिलांकडे परत आला. मॅक्किन्ले हायस्कूलमध्ये वॉल्टनं पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या शाळेचं एक नियतकालिक होतं- ‘द व्हॉइस्.’ त्यात त्याची चित्रं छापली जायची. त्याच सुमारास त्यानं स्वखर्चानं ‘द् शिकागो अकॅडमी ऑफ फाइन आर्टस्’मध्येही प्रवेश घेतला. वॉल्टचं चित्रकलेतील तंत्र सुधारायला या अकॅडमीचा खूपच उपयोग झाला.
‘ रेड क्रॉस’मधल्या त्याच्या प्रवेशासाठी १८ वर्षांखालील नागरिकांच्या पासपोर्ट अर्जावर आईवडिलांच्या सह्य़ा आवश्यक होत्या आणि अपेक्षेनुसार इल्यासने सही करण्यास नकार दिला. अर्थात त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली त्याची आई. तिने त्या अर्जावर सही करून त्याच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
आई आणि वॉल्ट यांच्यातलं सामंजस्य वॉल्टच्या वयाबरोबर वाढतच राहिलं. रेड क्रॉसमध्ये मिळालेल्या पगाराची अर्धी रक्कम तो बँकेतल्या बचत खात्यात ठेवण्यासाठी आईकडे नेहमी पाठवायचा, तसेच काही छोटे मोठे उद्योग करून मिळणारे पसेही, अध्रेअधिक आईकडे पाठवायचा. वॉल्टनं एक कुत्र्याचं पिल्लू विकत घेतलं होतं. त्यांची बरीच चित्रं काढली होती आणि चित्रं काढल्यावर तो ती चित्रं आईकडे पाठवायचा.
आईच्या खंबीरपणे पाठीशी असण्यामुळे वॉल्टला आपल्या कल्पना, आपली स्वप्नं कृतीत उतरवता आली, त्याचवेळी आईबद्दलची ओढही त्याला सतत खुणावत राहिली. पुढे हॉलीवूडमध्ये एक बंगला त्याने आईवडिलांसाठी विकत घेतला.
 आपल्या वाटचालीत ज्यांनी मोलाची साथ दिली, त्यांच्याबरोबरच तो मॉर्टमिरलाही विसरला नाही. या यशाची सुरुवात एका उंदरानं केली, असं तो म्हणतही असे. त्या मॉर्टमिरवर वॉल्टनं कार्टून फिल्म केली. ‘मॉर्टमिर माऊस’ नावानं ही फिल्म प्रदíशत करायची होती. पण त्याच्या पत्नीनं-लीलीयननं याचं बारसं केलं, आणि प्रेक्षकांसमोर याचं नाव आलं, ‘मिकी माऊस.’ आपल्या या कागदावरच्या सवंगडय़ांसह वॉल्टने नंतर हॉलीवूडवर अधिराज्यच गाजवलं. त्याने आपला भाऊ रॉय याच्यासह वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन कंपनी सुरू केली; जी नंतर सिनेमा जगतातली जगातली एक सर्वोत्तम कंपनी ठरली. वॉल्टने काय केलं नाही. तो अ‍ॅनिमेटर तर होता, कार्टुनिस्ट, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखकही होता. इतकंच नव्हे, तर आपल्या कारकिर्दीत अनेकांना सढळ हाताने दान करणारा एक दाताही होता.
१५ डिसेंबर १९६६ रोजी वॉल्टचं दीर्घ आजारानं देहावसान झालं. चित्रकलाप्रेम आणि प्राणीप्रेम यांचा इतका सुंदर मिलाफ साधण्यासाठीच वॉल्ट डिस्ने नावाची कलाकृती त्या विधात्याला जमून गेली असावी, निसंशय!