‘‘एक जण नियमावर बोट ठेवून वागायला लागला की मग आपोआपच समोरच्याचा वत्सल हात मागे जातो. एकदा करार.. अटी.. नियम.. कायदे वगैरेंवर देवघेव ठरली की मग तेवढं पाळलं की झालं. असं आपोआप होत जातं! नियमानुसार काम.. नियमानुसार दाम. घसघशीत बोनस देणाऱ्यानं आठवणीनं दिवाळीच्या लाडू, करंज्या, वेगळय़ा का द्याव्यात? तुमचं तुम्ही आणावं हवं ते, बोनसच्या पैशातून!’’
दिवाळसणानिमित्तचं जंगी भोजन आटोपून वहिनी परत आल्या तेव्हा त्यांना सोसायटीच्या फाटकाजवळ बसलेल्या भामाबाई दिसल्या. सुमारे दोन तासांपूर्वी त्या मेजवानीसाठी निघाल्या होत्या तेव्हाही भामाबाई तिथेच, तशाच बसलेल्या होत्या. बाकी आवारात सामसूम होती.
‘‘हे काय भामाबाई? तुम्ही अजून इथेच?’’
‘‘काय करणार? ‘ई’ बिल्डिंगमधले सोनवणे लोक आताच गावाहून आल्येत. त्यांच्याकडचा बोनस अजून भेटला नव्हता म्हणून बसले होते. तो असा भेटला की तशी पळणार घरी.’’
‘‘अरे वा! दिवाळीचा बोनस. मजाच आहे तुमची!’’
‘‘ती नुसती म्हणायला. आता याच्यापुढे मी नातवांना नवे कपडे-मिठाई घ्यायची कधी आणि घरला जायची कधी.. नुसता त्रासच आहे जीवाला.’’
भामाबाई खरोखरच थकलेल्या, त्रासलेल्या दिसत होत्या. उभं आयुष्य याच सहनिवासात धुणीभांडी करण्यात गेलेलं! एका अर्थानं वहिनी आणि भामाबाई एकाच वेळी या सोसायटीत आलेल्या.. वहिनी एका टुमदार फ्लॅटची मालकीण म्हणून तर भामाबाई अनेक घरांमधली मोलकरीण म्हणून. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांच्या आगेमागे त्यांची पोरं फिरायची, आता नातवंडं खांद्यापर्यंत आली होती. भामाबाईंच्या आडमाप शरीरामुळे त्यांना पहिल्यापासून सगळे लोक ‘अहो-जाहो’ म्हणून संबोधायचे. मात्र या संबोधनाच्या पलीकडे त्यांचा मान कधी गेला नव्हता आणि त्याबद्दल त्यांचा आग्रहही नव्हता. परिस्थितीनुरूप त्यांच्या मुलानं थोडं लांब घर घेतलं, वयानुरूप त्यांची प्रकृती नरमगरम राहू लागली, तरीही हट्टानं इथं येऊन कामं ओढण्याचा आग्रह तेवढा होता. मध्येमध्ये पालुपद तोंडी लावायला असायचंच, ‘‘काही म्हणा वैनी, घरकामात आता पहिल्यासारखी मजा नाही राहिली.’’ जणूकाही खरकटय़ा भांडय़ांचा ढीग घासण्यात कधीतरी मजाबिजा होतीच! आताही त्या दिशेनं त्यांची गाडी जाईल हे ओळखून वहिनींनी मुद्दामच कलाटणी दिली,
‘‘भामाबाई, तेव्हाच्या दहा-पंधरापट पगार झाल्येत आता तुम्हा बायांचे. वरती बोनस. पगारी रजा, उगाच का हो कुरकुर करता? शिवाय आता एकेका घरामध्ये दोन-तीन माणसं असणार, काम तरी कुठे असतं पूर्वीइतकं?’’
‘‘कामाचं नाही हो एवढं वाटत. दोन दिवस भांडी घासली नाहीत तर हात दगडासारखे होतात माझे, माहितीये? मालकिणींची मनं दगडासारखी होतात त्याचं जास्त वाटतं मनाला.’’
‘‘बोनस द्यायला एवढा उशीर करायला नको होता त्यांनी.’’
‘‘गावाला गेले होते. मुक्काम वाढला. आम्हाला पण समजतं की! पण गावाहून येताना ढीगभर कपडे, वस्तू आणल्या असतील स्वत:च्या लेकराबाळांना, त्यातली एखादीपण वाट चुकून आमच्या लेकराबाळाकडे येत नाही म्हणून वाटतं. पूर्वी सणावारी आमच्या घरी काहीपण खास करावं लागत नसे वैनी.’’
‘‘ का हो?’’
‘‘तुम्ही लोक द्यायचात की सगळं. दिवाळीच्या तेल-साबण-उटण्यापासून ते फराळाच्या ताटापर्यंत सगळं द्यायच्या जुन्यातल्या मालकिणी. ते पण न मागता. तुमच्या पोरांच्या फटाकडय़ांमधल्या एकदोन डब्या आपोआपच यायच्या आमच्याकडे.’’
‘‘सणावारी वाढणं द्यायची पद्धत होती हो तेव्हा. यजमान जेवण्याआधी मोलकरणीचं ताट वाढून केळीच्या पानानं झाकून ठेवणारे लोकसुद्धा होते कुठे कुठे.’’
‘‘आमच्या घरच्या गवराईचा पितळी मुखवटापण तुम्हीच दिलेला आहे. आठवतंय तरी का?’
‘‘तुम्हाला फार नाद होता त्याचा म्हणून आमच्यासाठी घेताना एक जोड तुमच्यासाठीही विकत घेतला खरा तेव्हा.’’
‘‘तेच म्हणते. ती मजा आता नाही.’’
‘‘आताच्या मालकिणी आमच्यासारख्या घरबश्या नसतात भामाबाई. नोकऱ्या करतात. घर बदलतात.. शनिवार, रविवारशिवाय एरवी अनेक मालकिणी आणि मोलकरणी समोरासमोर येतसुद्धा नाहीत कित्येक घरांमध्ये.’’
‘‘मी पण तीनचार घरांमध्ये कुलूप उघडून, काम करून, पुन्हा घर लावून जातेच की!’’
‘‘जाता ना? मग झालं तर! मग काय तुम्ही कुलपाला का सांगणार आहात.. ‘गौरीचा पितळी मुखवटा आणून देरे बाबा म्हणून?’ आम्ही देत होतो, वेळप्रसंगी हक्कानं चार जास्त कामं करून घेतही होतो. तेसुद्धा तेराव्या महिन्याचा पगार म्हणजे बोनस न देता.’’
‘‘बोनस तर झालाच, पण आता आमच्यातल्या काही पुढच्या बाया तासावर पगार ठरवतात. रोज एक तास काम केलं तर महिन्याचे अमुक इतके रुपये. आठवडय़ाला एक खाडा माफ. सगळं कसं नियमाला धरून.’’
‘‘तेच तर होतं ना भामाबाई!’’
‘‘काय होतं?’
‘‘एक जण नियमावर बोट ठेवून वागायला लागला की मग आपोआपच समोरच्याचा वत्सल हात मागे जातो.’’
‘‘काय म्हणालात?’’ भामाबाई कोऱ्या चेहऱ्यानं म्हणाल्या. त्यांना समजायला कठीण असं आपण काहीतरी बोललो हे वहिनींना जाणवलं. त्यांनी भाषा आणि सूर बदलत म्हटलं,
‘‘हे बघा, एकदा करार.. अटी.. नियम.. कायदे वगैरेंवर देवघेव ठरली की मग तेवढं पाळलं की झालं. असं आपोआप होत जातं! नियमानुसार काम.. नियमानुसार दाम. काय? घसघशीत बोनस देणाऱ्यानं आठवणीनं दिवाळीच्या लाडू, करंज्या, वेगळय़ा का द्याव्यात? तुमचं तुम्ही आणावं हवं ते, बोनसच्या पैशातून!’’ वहिनी त्यांच्यापरीनं सोपं करून सांगणार तेवढय़ात भामाबाई पुटपुटत उठल्याच, ‘‘सोनवणेंची खिडकी उघडलेली दिसत्ये.. आपण आपलं जावं अन् नोटा हातात पडल्या की सुटावं.. नाहीतरी आता दुसरी मजा कुठे काय राहिलीये?’’
भामाबाई तीरासारख्या सोनवणेंच्या दिशेनं गेल्या. त्यांच्या डोळय़ांपुढे फक्त बोनस असणार. बाहेरचं जग जितकं जास्त व्यवहारी, रोखठोक होईल तितकी माणसांची त्यातली भावनिक गुंतवणूक कमी कमी होत जाईल, हे त्यांना समजलेलं नसणार. शेवटी हा परिसर हाच त्यांच्या संसाराचा आधार होता. नुसती हौसमौजच नव्हे, अगदी उन्हाळय़ातले पोहणे वर्ग सुरू करण्यापूर्वी घ्यायच्या टॉयफॉइडच्या वार्षिक लसीपर्यंत अनेक गोष्टी इथल्या बालबच्च्यांसह त्यांच्या मुलांना मिळण्याचा एक काळ होता. ती हरपलेली ‘मजा’ त्यांनाच काय वहिनींनाही स्मरत होती. त्या आठवणींमध्ये त्या घरापर्यंत कधी पोचल्या हे त्यांना समजलंच नाही.
बाकी आता घरात तरी काय मजा होती? एकेकाळी गजबजलेला भाग आता उजाड झाला होता. पती वारले, मुलं पांगली, वयानुसार बाहेरचा पसारा आकसत गेला, जुने संदर्भ गेले, नवे करण्याचं वय गेलं. जवळची मोजकी माणसं कारणप्रसंगानं आठवण काढत. आजच्या दिवाळसणाचं आमंत्रण त्यापैकीच. पण त्यामध्ये रीत पाळण्याचा भाव किंवा खबरदारीच जास्त जाणवे. वहिनी खुर्चीवर बसायला गेल्या तर तिथं मुलाकडून आलेली दिवाळी भेट अगोदरच ठेवलेली. दोघे मुलगे दोन दिशांना होते. आवर्जून शुभेच्छाकार्ड पाठवायचे. दिवाळी, वाढदिवस, मदर्स डे अशी तीन करड दरवर्षी नक्की यायची. कोणी इकडे येत असेल तर भेटवस्तूसुद्धा. चकचकीत कागदातून, गोड भाडोत्री शब्दांतून, अशी ठरीव वार्षिक स्मरणं व्हायचीच. पण त्यांच्या आगेमागे इतर, अवांतर काही नसे. ‘अमुक क्षणी आई तुझी फार आठवण आली’ किंवा ‘कधीतरी दोन दिवस निवांतपणे तुझ्याबरोबर घालवायला येईन’ असं कानी पडत नसे.
ऐन दिवाळीत आपल्या घरात आपण एकटय़ा, एकाकी आहोत या कल्पनेनं वहिनींना आतून भरून आलं आणि नंतर स्वत:शीच थोडं ओशाळंही वाटलं. अडाणी भामाबाईंना मोठ्ठय़ा तोंडानं उपदेश करणं सोपं गेलं आपल्याला, मग वास्तव उघडय़ा डोळय़ांनी स्वीकारणं एवढं जड का बरं जावं? त्यांनी मनोमन स्वत:ला टपली मारली आणि खुर्चीवरची भेटवस्तू मांडीवर घेतली. वस्तू छान होतीच, पण वरचं वेष्टण जास्त देखणं होतं!     
 mangalagodbole@gmail.com