एकदा वेडाचा शिक्का लागला की ती व्यक्ती कधीही समाजात मोकळेपणाने, ताठ मानेने वावरू शकत नाही. अगदी पूर्ण बरी झाली तरीही. उलट तिला भरती केलं जातं, मनोरुग्णालयामध्ये. समाजापासून ती एकटी पडते. असं का? या प्रश्नाने झोप उडालेल्या भार्गवी दावर. चार वर्षांच्या स्वत:च्या डिप्रेशनमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपलं आयुष्य वाहून दिलं ते झोपडपट्टीतील गरीब लोकांसाठी, विशेषत: स्त्रियांच्या मानसिक आरोग्यासाठी. आज हजारो रुग्णांना सामान्य, आनंदी आयुष्य देणाऱ्या भार्गवींचा हा जीवन प्रवास ..
मी १९९३ साली पीएच.डी. केलं. माझा विषय होता, ‘फिलॉसॉफी ऑफ सायकिअ‍ॅट्री!’  मी हा विषय घेतला याला कारण ठरली माझी आई. माझी आई कृष्णभक्त होती. संस्कृतमध्ये ती कृष्णावर उत्तम कविता करायची. तामिळनाडूतील आमचं घराणं अत्यंत उच्चभ्रू आणि कर्मठ! आईला त्या ऐश्वर्यात रस नव्हता. पण तिचं भजन-पूजन, सत्संग, गरिबांना अन्नदान हे वेगळेपण हा वेडेपणा ठरला. माझ्या वडिलांनी तिला मनोरुग्णालयात टाकलं. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं जाणते झाल्यावर वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिला  सोडवून आणलं. पण ती जणू शुद्धबुद्ध हरवूनच बसली होती. मला वाटतं, मधल्या काळात तिचे खूप हाल झाले असावेत. खूप उपचार केले, पण ती अकाली गेलीच.

झोपडपट्टीत राहणारी तिजाबाई. तिची रोज मुलांशी, नवऱ्याशी भांडणं व्हायची. रोज घरात रडारड आणि मारामारी. ती उठायची दुपारी दोन वाजता. जेवण बनवायची नाही. आंघोळ नाही. कोणाशी बोलणं-चालणं नाही. हळूहळू आम्ही तिच्या घरात प्रवेश मिळवला. तिच्याशी बोलू लागलो आणि एके दिवशी धक्कादायक माहिती मिळाली. बालपणी तिच्यावर एका माणसाने महिनोन्महिने लैंगिक अत्याचार केले होते. तिच्या आईने तिचं त्याच माणसाबरोबर लग्न लावून दिलं. वस्तुत: तिला त्या माणसाबद्दल भयंकर घृणा वाटत होती. बालपणातील लैंगिक अत्याचारांमुळे तिची विषयवासना खूप तीव्र झाली होती. सुरुवातीला बस्तीतले लोकं म्हणायचे, ‘वो किसी के भी साथ जाती है। वो अच्छी औरत नही है।’ खरं तर ज्या वयात खेळायचं, बागडायचं त्या वयात ती विपरीत अनुभवातून गेली होती. तिचा तो नवरा मात्र आता दुसरं लग्न करण्याच्या विचारात होता. मग मात्र आम्ही त्याला सज्जड दम भरला. तिच्यासाठी नेहमीची ‘टॉक थेअरपी’ किंवा समुपदेशनाचं तंत्र वापरता येत नव्हतं. मग आर्ट बेस्ट थेअरपी, नाच, गाणी, पेंटिंग्ज, गोष्टी सांगणं असं करत शेवटी तिला त्यातून बाहेर काढलं. आज ती चांगली नोकरी करते. घर चालवते..

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

आज मी पन्नाशीला आलेय. कधीतरी मी स्वत:ला प्रश्न विचारते की, मी आज खरंच खूष आहे का? उत्तर हो ही आहे आणि नाही ही. कारण माझं बालपण अंगणात, बागेत खेळण्याऐवजी मेंटल हॉस्पिटलमध्ये आईसोबत राहण्यात गेलं. त्या कोवळ्या वयात मी फक्त तिचं ते मेंटल हॉस्पिटलमधलं एकलकोंडय़ासारखं जगणं, तिला वारंवार देण्यात येणारी शॉक ट्रिटमेंट, त्यानंतरचं तिचं करुण आक्रंदन, तिच्यावर केले जाणारे निर्घृण उपचार आणि घरादारातून तिच्यावर होणारी जहरी टीका हेच पाहिलं. हेच सोसलं. तरीही आज मला वाटतं की मी समाधानी आहे. माझं बालपण त्या तसल्या वातावरणात गेलं म्हणून तर आज मी माझं आयुष्य मनोरुग्णांच्या सेवेत, त्यांच्या समस्या सोडवण्यात वेचतेय. आणि त्याचं मला अपार समाधान आहे. माझ्या आईला समाजाकडून जी उपेक्षा, टीका व अन्याय सहन करावा लागला. ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून १९९९ ला मी ट्रस्ट स्थापन केला. आईचं नावं सावित्री. पण सगळे तिला ‘बापू’ म्हणत. म्हणूनच तिच्या स्मरणार्थ संस्थेला ‘बापू ट्रस्ट’ हे नाव दिलं. झोपडपट्टीतील गरीब, उपेक्षित खास करून महिला मनोरुग्णांसाठी ट्रस्ट अधिक काम करतो. मनोरुग्णांवर अन्याय करणारे आज दोनशेच्या वर ब्रिटिशकालीन कायदे आहेत. त्यातील अन्यायकारक कायदे बदलण्यासाठी व कल्याणकारी कायदे व्हावेत यासाठी पुढाकार घेतो आहोत.
आज आम्ही पुण्याच्या झोपडपट्टय़ांमध्ये काम करतोय. तिथेही मनोरुग्ण आहेतच. पण ओपीडीतल्या वेगवेगळ्या उपचारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं समुपदेशन केल्यानंतर ते सामान्य आयुष्य जगू शकतायत. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आम्हाला कधी गरजच वाटली नाही. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, आम्हाला मध्यमवर्गीय समाजापेक्षा झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन काम करणं जास्त सोपं असतं. तिथे आम्ही मोकळेपणाने फिरू शकतो. मला आठवतं, पहिली चार र्वष मी क्लिनिक उघडून बसले खरी, पण फार कमी लोक आले. मग मीच विचार केला की  आपल्याला लोकांत मिसळलं पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. मग मी माझ्याबरोबर काम करायला वस्तीतल्या मुला-मुलींना जमवलं. त्यांच्यासोबतीने वस्तीत कॉर्नर मीटिंग्ज सुरू केल्या. मुख्य म्हणजे मी देत असलेली माहिती व उपचार त्यांच्यासाठी नवीन होते. त्यांच्याकडे मोबाइल नाही. इंटरनेट नाही. पुस्तकं नाहीत. माहितीचा कोणताही स्रोत नाही. सुरुवातीला मीटिंगमध्ये कोणी तोंड उघडत नसे. मग सगळे लोक पांगले की, जिच्या किंवा ज्याच्या घरात असा मनोरुग्ण असेल ती व्यक्ती हळूच मजजवळ यायची. आमचा पत्ता घ्यायची. हळूहळू पेशंटला घेऊन आमच्या ओपीडीत येऊ लागायची. त्यांच्यासाठी काम करायला आम्हाला तिथल्याच समाजसेवकांची मोलाची मदत होत असते. झोपडपट्टय़ांमध्ये समस्या अमाप. तिथे कधी कोणाला दारू-जुगाराची समस्या असते. तर कधी कुपोषणामुळे डिप्रेशनची! कुणी असह्य़ मारहाणीने वेडीपिशी झालेली. तर कुणी तीन मुलींच्या पाठीवर चौथ्यांदा दिवस राहिल्याने भेदरलेली. अशा सर्व प्रकारच्या रुग्णांवर आम्ही आर्ट बेस्ड थेअरपी, ध्यानधारणा, व्हिज्युअलायझेशनद्वारे उपचार, रिलॅक्सेशन थेरपी, नृत्य, संगीत, पथनाटय़, स्वसंवाद, त्याद्वारे उपचार सुरू केले आणि त्याला यश येत गेलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीशिवाय मानसिक तंदुरुस्ती अशक्य! त्यामुळे देणगीदारांच्या देणग्यांमधून सर्वप्रथम आम्ही त्या रुग्णांना सकस व पौष्टिक आहार सुरू केले. त्याचा खूपच फायदा झाला. आज मला अशा अनेक स्त्रिया आढळतात, ज्या अशा उपचारांमुळे आज अगदी नॉर्मल आयुष्य जगत आहेत.
सावित्री ही अशीच वस्तीतली बाई. घरातल्यांनी आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनी जणू वाळीतच टाकलेली.  स्वत:च्या तान्ह्य़ा बाळाकडे ढुंकूनही बघत नसे. लोक म्हणत, ती पार वेडी आहे. एकटीच बडबडते. आता ती कपडे उतरवेल, आम्हाला दगड मारेल या भीतीने शेवटी पोलिसात तक्रार देऊन तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून द्यायचं सगळ्यांनी नक्की केलं. माझ्या फिल्डवर्करला हे कुठूनतरी कळलं. तिने हळूहळू तिच्या घरात प्रवेश मिळवला. वस्तीमध्ये असं सोशल वर्करने जाणं हे नित्याचं असतं. त्यामुळे तिलाही ते विशेष वाटलं नाही. त्या मुलीने सावित्रीला जेवण देणं, तिच्याशी गप्पा मारणं सुरू केलं. सुरुवातीला थंड प्रतिसाद! पण हळूहळू तिला विश्वास वाटू लागला. मग आमच्या इतर सोशल वर्कर्स तिच्याकडे जाऊ लागल्या. मुलाला कसं घ्यायचं, दूध कसं पाजायचं, स्वच्छता कशी ठेवायची ते शिकवू लागल्या. नंतर तिच्या शेजाऱ्यांना बोलावून कॉर्नरमीटिंग्ज घेतल्या. त्यामध्ये मानसिक ताणतणाव म्हणजे काय, अशा पेशंटशी प्रेमाने कसं वागायचं ते समजवलं. हळूहळू शेजारी तिच्या घरी जाऊ लागले. तिला खाणंपिणं देऊ लागले. गप्पागोष्टी करू लागले. आणि तिची तब्येत सुधारू लागली. ती नॉर्मल झाली. खरं तर ती वेडी नव्हतीच. कुपोषणामुळे तिच्यात काही जीवच नव्हता.
कमळीची केसही सावित्रीसारखी. ती अत्यंत गलिच्छ राहायची. तिच्या घरात भयानक घाण असायची. तिच्या अंगाला दरुगधी यायची. माझे फिल्डवर्कर्स सुरुवातीला अत्यंत अनिच्छेने जायचे तिच्याकडे. हळूहळू त्यांनी तिला आमच्या सेंटरला येण्यासाठी तयार केलं. इथे आल्यावर तिची शारीरिक तपासणी केली तेव्हा मला धक्काच बसला. ती पूर्णपणे क्षयरोगी होती. तिची फुप्फुसं पूर्ण निकामी झाली होती. सर्वात आधी डोनर शोधून आम्ही तिला पौष्टिक आणि सकस आहार सुरू केला. औषधोपचार सुरू केले. जसाजसा तिचा टीबी बरा झाला तसतशी तिची वर्तणूक सुधारत गेली. मात्र अशा केसेससाठी आम्हाला समुपदेशनाची खास स्कील्स वापरावी लागतात.
     अशीच एक १३ वर्षांच्या मुलीची केस आली होती माझ्याकडे. ही चांगल्या, सुखवस्तू घरातली मुलगी होती. आजोबा मिल्रिटीमन. त्यामुळे घरात करडी शिस्त. तिच्यावर ‘अच्छी बच्ची’ होण्यासाठी सतत प्रेशर असायचं. दिवसातले १४-१५ तास ती फक्त अभ्यास करायची. तिला खेळ, टी.व्ही., करमणूक ठाऊकच नव्हतं. हळूहळू ती कोशात जाऊन स्वत:शी बडबडू लागली. तिचं रडणं, ओरडणं, मैत्रिणी-शेजारी यांना शिवीगाळ करणं सुरू झालं. तिला काऊन्सेलिंग करणं शक्यच नव्हतं. म्हणून आधी तिला कलर्स आणि आर्ट पेपर्स दिले. तिने अख्ख्या हातापायाला पेंट लावून ते पेपर्स रंगवले. तीन दिवस आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तिच्या मनातला राग, द्वेष बाहेर काढत होतो. चोर-शिपाईसारखे खेळ खेळलो. तिला खेळण्यातला चाकू आणि बंदूक दिली. तिने त्वेषाने ही हत्यारं खेळण्यांवर वापरली. स्टफ टॉईजच्या चिंध्या चिंध्या केल्या. हळूहळू आम्ही तिला नाचगाण्यात रमवलं. आणि ती शांत शांत होत गेली. चार दिवसांत नॉर्मल होऊन घरी गेली. आता ती डिझायनिंगचं शिक्षण घेतेय. माझ्याशी नेहमी फोनवर बोलते. अर्थात तिच्याबरोबरच तिच्या आईलाही आम्ही समजावलं की तिच्यावर जास्त बंधनं घालू नका. तिचं हे खेळण्या-बागडण्याचं वय आहे. तिला होमिओपथीची औषधंही खूपच उपयुक्त ठरली. अशा जवळजवळ १२-१३ मुलांवर आम्ही उपचार केलेत.

‘बापू ट्रस्ट ’ ही संस्था १९९९ सालापासून आरोग्य क्षेत्रात संशोधन व सेवा देण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांच्या मर्यादा लक्षात घेऊन संशोधनाद्वारे नवनवीन प्रयोग करून समाजामध्ये मानसिक आरोग्याबाबत गुणात्मक बदल घडून यावेत याकरिता संस्था प्रयत्नशील आहे. मानसिक आजार नसणे म्हणजे मानसिक आरोग्य नव्हे. समाधान, शांती आणि जीवनाबद्दल वाटणारा उत्साह हे खरे मानसिक आरोग्य आहे, अशा विश्वासाने मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरुकता निर्माण करणे, संवेदनशील वातावरण निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्यांना विविध पातळीवर मदत करणारे उपक्रम राबवणे हे जसे या संस्थेचे उद्दिष्ट आहे, तसेच या विषयाशी संबधित संशोधनासाठी तपशील जमा करणे व त्या आधारावर धोरणात्मक बदलाचा आग्रह धरणे यासाठीसुद्धा संस्था आग्रही आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने पुणे शहरातील लोहियानगर, काशेवाडी परिसर या ठिकाणी आहे.

मी हे अभिमानाने सांगते की, माझे फिल्ड वर्कर्स खूपच तयारीचे आहेत. ते झोपडपट्टीत फिरून कोणाला काय त्रास आहे, ताण-तणाव आहे त्यावर लक्ष ठेवतात. वेगवेगळ्या कारणास्तव जी माणसं आमच्या सेंटरवर येऊ शकत नाहीत, त्यांच्या घरी ते ‘गृह भेटी’ देतात. कोणाला डॉक्टरकडे तर कोणाला नोकरी मिळवून दे तर कोणाच्या मुलांना शाळेच्या फी-पुस्तकांची व्यवस्था कर अशी मदत मिळवून देतात आणि त्यांच्या मनात आमच्या कामाबद्दल विश्वास निर्माण करतात. आमचं काम हे टीमवर्क असतं. आमच्या टीममध्ये न्यूट्रिशनिस्ट, आर्ट बेस्ट थेअरपिस्ट, फिल्ड वर्कर्स, समुपदेशक, होमिओपथिक डॉक्टर, पीडित व्यक्तीचे कुटुंबीय एवढे सगळेजण एकत्रितपणे काम करतात.  बस्तीत तर अशा रुग्णांना त्यांचे घरचे लोकं पण विचारत नाही. अशा वेळी त्याचे शेजारीपाजारी, बस्तीतले म्होरके त्याचंच आम्ही ‘सर्कल ऑफ केअर’ बनवतो. व  त्यांच्या माध्यमातून काम करतो.
अशा अनेक अनुभवांतून गेल्यावर आज मी हे ठामपणे म्हणू शकते की, प्रत्येक माणसाला निरोगी मानसिक आयुष्य जगण्याचा हक्क आहे. तसंच डिप्रेशनसारखे आजार निश्चितपणे बरे होऊ शकतात. माझंच उदाहरण बघा. माझं लग्न झालं. मला मुलगी झाली. दुर्र्दैवाने तिचं पोट उघडं होतं. तिचं शिवलेलं पोट, सतत केविलवाणं रडणं, तिच्या अपार वेदना आणि अखेर तिचा मृत्यू. मी पार कोलमडून गेले. चार वर्षे मी पूर्णत: डिप्रेशनमध्ये होते. मला कुणीही समजून घेतलं नाही. उलट माझ्यावर घायाळ करणारी टीका झाली. माझं वैवाहिक आयुष्यही संपुष्टात आलं. एका क्षणी मीच मला हलवून जागं केलं आणि काही ठाम निर्णय घेतले. इथून पुढे मी लग्नसमारंभांना जाणार नाही. फालतू गप्पांमध्ये वेळ घालवणार नाही. मी फक्त समाजातल्या मनोरुग्णांसाठी आणि पीडित महिलांसाठी आयुष्य वेचेन. बस्स. काही वर्षे चाचपडण्यात गेली आणि मी आतून सावरले. ‘बापू ट्रस्ट’ने मला संजीवनी दिली. जगण्याची दिशा दाखवली. आज मी स्वत: एक पैसाही माझ्या कामासाठी घेत नाही. माझ्या आईने जो पैसा ठेवलाय, त्यातून माझा व मुलीचा चरितार्थ चालतो. मला ठाऊक आहे, आमच्या कामाची फारशी दखल कोणी घेत नाही. पण आम्हाला त्याची खंत नाही. मात्र अलीकडेच बांगलादेश, चीन आणि कोरियातून ‘बापू ट्रस्ट’चं काम बघायला लोक आलेत. त्यांना आमचं काम बघून आश्चर्य व कौतुक वाटतं. त्यांनी, टाटा ट्रस्टने आम्हाला आर्थिक मदत दिलीय.
.. आयुष्यभर मी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतेय. माझी आई खरंच वेडी होती की ती उच्च आध्यात्मिक पातळीवरील व्यक्ती होती?
‘बापू ट्रस्ट’चं कार्य हा या प्रश्नाचा मी माझ्या परीने घेतलेला शोध आहे.

(शब्दांकन -माधुरी ताम्हणे )
संपर्क पत्ता -‘बापू ट्रस्ट’, अ-४, फ्लॅट नं.३८, उज्ज्वल पार्क सोसायटी, एन.आय.बी.एम. रोड,   कोंढवा, पुणे- ४८.
दूरध्वनी -०२०-२६८३७६४७
ई- मेल – camhpune@gmail.com